मन खिन्न करणारा ‘थकवा’

0
1580

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

शरीरावरची, चेहर्‍यावरची कांती निस्तेज होते. चेहरा म्लान दिसू लागतो. डोळ्याखाली काळी वर्तुळे स्पष्ट दिसू लागतात. डोळे ओढलेले, सुकलेले वाटतात. ग्लानी आल्यासारखी वाटते. मोठ्याने बोलण्याचा आवाज, टीव्हीचा आवाज, बडबड, गडबड-गोंधळ नकोसा वाटतो, चिडचिड वाढते.

‘मला बरे वाटत नाही, काहीतरी होतंय..’ अशी तक्रार घेऊन येणारे रुग्ण प्रत्येक डॉक्टरांच्या दवाखान्यात, प्रत्येक डॉक्टरच्या प्रॅक्टीसमध्ये नक्कीच आढळत असतील. हे… काहीतरी होतंय… हे डॉक्टरांनीच समजून घेऊन त्यावर उपाय करायचा. कारण हे काय होतं?… हे पेशंटला कधीच कळत नसतं. कारण हे काहीतरी म्हणजे ‘थकवा’ होय. सर्वसामान्य जनतेत ‘थकवा’ही तक्रार सर्रास आढळते. मग हा थकवा थोड्या काळापुरती असतो किंवा दीर्घकाळ रेंगाळणारा असू शकतो. थकवा हा शारीरिक किंवा मानसिक काही कारणांनी असू शकतो. शरीरातील रसधातू बिघडल्यास रसाचे प्रीणन हे कार्य बिघडते. त्यामुळे शरीरातील धातूंची कार्ये उत्तरोत्तर बिघडत जातात. त्या रसधातुच्या दुष्टीने अंग गळून गेल्यासारखे वाटते व थकवा जाणवतो. कधी कधी मानसिक तणाव असतो, मनामध्ये विचारांची गर्दी होत असते, झोप पूर्ण झालेली नसते. अशा स्थितीतसुद्धा ‘थकवा’ जाणवतो. खूप काम केल्यानंतर काही काळाकरिता थकवा येतो पण विश्रांती घेताच तो दूरही होतो. पण काही वेळा हा थकवा शरीरावर रेंगाळत राहतो, शरीर-मन अस्वस्थ करतो. काम करण्यासाठी ऊर्जाही नसते व काम करण्याची इच्छा किंवा उत्साहही नसतो. अशा या थकव्यासाठी बहुदा पेशंट ‘डॉक्टर बरंच वाटत नाही. काहीतरी टॉनिक वगैरे द्या’ असेच सुचवत असतात. त्यांच्या मते ‘थकवा’ येणे म्हणजे शारीरिक कमजोरी. पण बर्‍याच वेळा असे असतेच असे नाही.
आपल्या शरीरातील शक्ती वापरण्यात व्यत्यय येणे आणि विश्रांती किंवा झोप घेण्याची प्रबळ इच्छा होणे या स्थितीला ‘थकवा’ असे म्हणतात. अशक्तपणा किंवा निरुत्साह हेदेखील ‘थकव्या’चेच बोधक आहे. अशक्तपणामध्ये शारीरिक शक्ती कमी झाल्याचे जाणवते. काम करणे, वजन उचलणे किंवा पायी चालणे अशा क्रिया ज्यांना शक्ती लागते त्या क्रिया सुरळीत करणे शक्य होत नाही. या ज्या क्रिया जे रुग्ण सहज करायचे, त्या क्रिया त्यांना आता जमेनाशा होतात म्हणजे शक्ती कमी झाली आहे, ‘अशक्तपणा’ आला आहे. अशी स्थिती शरीरिक आजारामुळे येते. ‘निरुत्साह’ म्हणजे काम करण्याची इच्छा नसणे. अशी स्थिती शारीरिक किंवा मानसिक समस्यांचा परिणाम असू शकते. उदा. आमवात किंवा संधीवाताच्या रुग्णांना हालचाल करताना बरीच वेदना होत असल्यास, रुग्ण भीतिनेच निरुत्साही होतो व क्रिया करायला घाबरतो. बर्‍याच वेळा निरुत्साह मानसिक प्रक्रियांतूनच रुग्णाला जाणवतो. चिंतातुरता व खिन्नता या मानसिक स्थितीमुळे उत्साह वाटत नाही. या व्यक्ती काहीही श्रम न करताच कमालीच्या ‘थकलेल्या’ व निरुत्साही दिसतात.
थकव्यामध्ये आढळणारी सर्वसाधारण कारणे ः-
* थकवा हा सुद्धा एक बदललेल्या जीवनशैलीचा आजार आहे. अनेकवेळा हा लक्षणस्वरूपात आढळतो.
* कामाचा अतिरेक, नुसती धावपळ, तणावग्रस्त जीवन पद्धती, सतत स्पर्धा, निकृष्ट आहार योजना, व्यायामाचा अभाव किंवा व्यायामाचा अतिरेक, उशिरा झोपणे, झोप पूर्ण न होणे यामुळे शरीरावर सारखा थकवा रेंगाळत असतो.
* पांडुरोगासारख्या व्याधीमध्ये थकवा हे लक्षण प्रामुख्याने आढळते. पांडुरोग हा रसवहस्रोतसाचा व्याधी असल्यामुळे रसक्षयामध्ये बल, वर्ण, स्नेह व ओजक्षय होतो. सर्व शरीर निःसार होऊन इंद्रिये शिथिल होतात व थकवा येतो. गरोदरपणात, रजोनिवृत्ती काळात तसेच अंगावरून रक्त जात असल्यास थकवा जाणवतो.
* अपचन, अग्निमांद्यसारख्या व्याधीतदेखील थकवा जाणवतो.
* थायरॉइडसारख्या व्याधीत लठ्ठपणा वाढतो, मांसधातुमध्ये शैथिल्य येते, हालचालींवर निर्बंध येतो व थकवा जाणवतो.
* तापासारख्या व्याधीत रक्तामध्ये वाढत्या साखरेच्या पातळीमुळे थकवा येतो.
* तापासारख्या व्याधीतही रसदुष्टी विशेष होत असल्याने रुग्णाला लगेच थकवा येतो.
* पौगंडावस्थेत जाणवणारा थकवा हा बर्‍याच वेळा खिन्नतेचे लक्षण असते.
* उतार वयात मधुमेह, रक्तक्षय, विविध जंतुसंसर्ग व आर्थिक ताण ही कारणे असू शकतात.
* कौटुंबिक कलह हेदेखील थकव्याचे कारण असू शकते.
थकव्यामध्ये आढळणारी सर्वसामान्य लक्षणे ः-
– थकवा आलेल्या व्यक्तीची ‘बरे वाटत नसल्या’ची तक्रार असते. कोठे ना कोठे शरीरात अस्वास्थ्य जाणवत राहते.
– दैनंदिन दिनक्रमसुद्धा नकोसा वाटतो. अगदी आंघोळीपासून ते जेवायलासुद्धा कंटाळा येतो. सुस्ती आल्यासारखी वाटते. नुसते पडून रहावेसे वाटते. या स्थितीला घरातील इतर माणसं आळशीपणा म्हणतात. काय त्रास होतो.. याची गंभीरता फक्त रुग्णाला स्वतःलाच जाणवत राहते.
– व्यायाम करणे, साध्या हालचाली करणे, घरातली कामे करणे, चालणेसुद्धा नकोसे वाटते. यामध्ये मनात ही कामे करायची इच्छा असते, पण शरीर गळून गेल्यासारखे वाटते.
– शरीरावरची, चेहर्‍यावरची कांती निस्तेज होते. चेहरा म्लान दिसू लागतो. डोळ्याखाली काळी वर्तुळे स्पष्ट दिसू लागतात. डोळे ओढलेले, सुकलेले वाटतात.
– ग्लानी आल्यासारखी वाटते.
– मोठ्याने बोलण्याचा आवाज, टीव्हीचा आवाज, बडबड, गडबड-गोंधळ नकोसा वाटतो, चिडचिड वाढते. दुसर्‍यांचा राग यायला लागतो.
– बर्‍याच वेळा थकवा हा सकाळी व संध्याकाळी असतो.
– त्वचा रोग होण्याचे प्रमाण या विकारात वाढतात. रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
– जास्त खारट, गोड व तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होते.
– नेहमी कसली ना कसली चिंता सतावत असते. मनामध्ये विचारांची गर्दी असते.
– झोप व्यवस्थित पूर्ण झालेली असली तरी कधी कधी सकाळी उठू नये असे वाटते.
– बर्‍याच वेळा स्मरणशक्ती कमी होते. साधी साधी दैनंदिन कामेसुद्धा विसरायला होते.
थकव्यामध्ये काय कराल?…
* थकवा जर अतिश्रमामुळे असेल तर थोड्याशा विश्रांतीनंतर लगेच थकवा नाहीसा होतो. पण थकवा एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ‘मेडिकल स्टोअर’मधून स्वतःच्या मनाने टॉनिक आणून घेऊ नये.
* बर्‍याच वेळा थकवा हा अन्नवहस्रोतस दुष्टीतून होतो. यामध्ये अपचन, अग्निमांद्य यांसारखे आजार होतात व रसधातूची विशेष विकृती होते. त्यामुळे शरीरातील रक्त, मांस, आदी उत्तरोत्तर धातूचे पोषण होत नाही व थकवा जाणवतो.
अशा स्थितीमध्ये रक्तवहस्रोतसातील आमाचे पाचन करण्यासाठी लंघन व पाचन उपक्रम द्यावेत. आमपाचनासाठी त्रिभुवनकीर्ती, सूतशेखर, अग्नितुंडी, हिंग्वाष्टक चूर्ण, शंखभस्म यासारख्या योगांचा वापर करावा.
* तसेच विविध प्रकारचे मण्ड, मंथ व आप्य पदार्थांची योजना करावी. मर्जुरमंथ, लाजामण्ड, विविध फलरस, विविध भाज्यांचे सूप उपयुक्त ठरतात.
* त्याचबरोबर गुडुचीचे सत्व, घनवटी, गुडुची स्वरस या कुठल्याही स्वरूपात रसायन म्हणून वापर करावा.
* एकदा रसधातु प्राकृत झाला म्हणजे ज्या धातूंची दुष्टी झालेली आहे असे वाटते, त्या त्या धातूची चिकित्सा करावी.
* इतर व्याधी उदा. रक्तक्षय, मधुमेह, क्षयरोग किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे थकवा असल्यास तिकडे लक्ष पुरवून ते आधी दुरुस्त करावे.
* कोणतेही शारीरिक विकार नसल्यास चिंतातुरता, खिन्नता हे मानसिक विकार नाहीत ना, याची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रसंगी समुपदेशनाची गरज भासल्यास समुपदेशकाची मदत घ्यायला संकोच करू नये.
* शरीराला जेव्हा विश्रांतीची गरज भासते तेव्हा लगेचच शरीर व मनाला विश्रांती द्यावी. एवढे हातातले काम संपवून नंतर विश्रांती घेऊ असा विचार करत राहिल्यास थकवा हा वाढत जातो.
* लवकर झोपून लवकर उठावे. रात्रीची ७-८ तास शांत झोप घ्यावी.
* रोज हलका-फुलका शरीराला झेपेल एवढा व्यायाम जरूर करावा.
* सकस, संतुलित आहार घ्यावा.
* थकवा दूर करण्यासाठी आपण जो चहा, कॉफीचा अतिरेक सेवन करतो, तो टाळावा. त्याऐवजी हर्बल चहा, ग्रीन टी, किंवा लिंबू-पाणी, शहाळ्याचे पाणी यांसारख्या पेयांचा वापर करावा.
* तसेच थकव्यामध्ये आहारावर मोठा परिणाम होत असल्याने थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे् खावे.
* सगळ्याच आजारांवर योगसाधनेसारखे दुसरे औषध नाही. प्राणायाम, ध्यान व शवासनासारख्या योगासनांचा थकव्यामध्ये विशेष उपयोग होतो. थकव्यामध्ये व्यक्तीचे मनोधैर्य, आत्मविश्‍वास कमी होतो, त्यामुळे योग्य उपचारांनी थकवा या स्थितीवर मात केली पाहिजे.