मनःशांतीसाठी संतवाणी बिचारा देव

0
153

– प्रा. रमेश सप्रे

माणूस आता खूप चतुर (स्मार्ट) झाला याची खात्री होऊन… त्याला आपली आता गरज उरलेली नाही… यापुढे तो आपल्याला – साक्षात देवाला – पावलोपावली फसवणार याचा विचार केल्यामुळे मोठा स्फोट होऊन ग्रामदेवाच्या मूर्तीचे असंख्य तुकडे झाले व आकाशात विलीन झाले. स्फोटामुळे बंद केलेले कान व डोळे उघडल्यावर लोकांना आश्चर्य वाटलं. कारण समोरचा गाभारा रिकामा होता.

राज्य वसुमती. राजधानी अवंतीनगर. देवीचं भव्य मंदिर. राजघराण्याची कुलदेवता. सार्‍या राज्याची राष्ट्रदेवी. महोत्सवाचा कार्यक्रम. देवीच्या मूर्तीची मंदिरप्रदक्षिणा. सुंदर सजवलेला रथ. सर्वांनी मिळून ओढायचा. सर्वांत पुढे राजा, मंत्री, सरदार, नंतर राजघराण्यातली माणसं, शेवटी जनता- या क्रमानं रथ ओढत मंदिर परिसराभोवती प्रदक्षिणा घालायची.
त्यावर्षी काय झालं कुणास ठाऊक.. रथ हालेच ना! ‘जोर लगा के हैशा’ एक सुरात म्हणत ओढण्याचा प्रयत्न कितीतरी वेळ केला. रथ जागच्या जागीच. असं का होतंय? कळायला मार्ग नव्हता. शेवटी पुजार्‍यानं प्रार्थना केली.. देवीकडे कळतनकळत झालेल्या पापांबद्दल – अपराधांबद्दल क्षमा मागितली. त्यावेळी आकाशवाणी झाली –
इथं जमलेल्या मंडळीत कुणीतरी चोर आहे. त्यानं आपल्या पापाची कबुली दिल्याशिवाय रथ हालणार नाही.
हे ऐकताच सर्वत्र पूर्ण शांतता. इतकी की श्‍वास ऐकू यावा. – राजाला वाटलं राजनर्तकीसाठी आपण राज्यकोशातून मोठी रक्कम कुणालाही न सांगता दिलीय त्याची कबुली द्यावी लागते की काय? त्याचवेळी राजनर्तकीला वाटलं कुणाच्याही नकळत आपण राजाच्या मुकुटावरील तुरा चोरला हे सांगावं लागणार की काय? राणीच्या मनात भीतीची लाट उठली, ‘प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसाला आपलं त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी राजाची एक मौल्यवान अंगठी आपण दिली ते सर्वांसमक्ष सांगावं लागणार? त्याचवेळी प्रधानमंत्र्याच्या मनात राजाविरुद्ध कटकारस्थान करून राज्य बळकावण्यासाठी सेनापतीला मंदिराच्या मालकीची जमीनीची कागदपत्रं चोरून दिल्याचं उघड करावं लागेल याची भीती निर्माण झाली तर पुजार्‍याच्या पोटात भीतीनं गोळा उठला कारण त्यानं देवीच्या अलंकारांची चोरी केली होती.
…. प्रत्येकानं कशाची ना कशाची चोरी क्षुद्र स्वार्थासाठी केली होती.
त्याचवेळी दोन-तीन दिवसांचं उपाशी एक पोर एका बाईच्या कडेवरील मुलाच्या हातात असलेल्या चण्यांच्या पुड्यातून काही चणे खाण्याच्या प्रयत्नात होतं. सगळ्या उत्सवी गजबजाटाचा फायदा घेऊन त्यानं चार चणे खाल्लेही होते. आणखी चणे काढणार इतक्यात सगळीकडे शांतता पसरली. त्याला काही चणे काढता आले नाहीत. त्यानं त्या बाईला विचारलं- ‘काय झालं?’ ती उद्गारली ‘देवीचा रथ हालत नाहीये.’ ‘का?’ या त्याच्या प्रश्‍नावर ती म्हणाली, ‘या गर्दीत कुणीतरी चोर आहे. त्यानं आपल्या चोरीची कबुली दिल्याशिवाय रथ हालणार नाही.’ ते पोर विचारतं, ‘पण चोरी म्हणजे काय?’ ‘अरे, कोणतीही वस्तू ज्याची असते त्याला न कळू देता, न विचारता घेणं म्हणजे चोरी!’ हे ऐकल्यावर त्या उपाशी भुकेल्या अनाथ पोरानं विचार केला… म्हणजे आपण जे चणे खाल्ले ती चोरी होती? आपण चोर आहोत… या विचारानं तो बाणासारखा धावत देवीच्या रथासमोर गेला. हात जोडून देवीची क्षमा मागू लागला… ‘देवी, मी आत्ता चण्यांची चोरी केली. मला क्षमा कर. कुणावर रागवू नकोस. क्षमा कर.’ ही चोरीची कबुलीच होती. तत्काळ रथ हालला. राजासकट सर्वांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. सर्वांना आपली चोरी कबूल करावी लागली नाही म्हणून हायसं वाटलं.
ज्यावेळी रथ हलू लागला त्याच क्षणी एक मोठा स्फोट झाला. सर्वांचे डोळे दिपले. काही क्षणांनी उघडून पाहतात तो काय- देवीच्या मूर्तीचे तुकडे तुकडे होऊन रथात विखुरले होते. सारे सुन्न झाले. पण एक समाधानाची गोष्ट होती – रथाची प्रदक्षिणा सुरू झाली होती. मग रथात देवीची मूर्ती नसली म्हणून काय बिघडलं??
– ही कथा एक रुपक कथा आहे. यात अनेक वृत्तीप्रवृत्तींचं दर्शन आपल्याला होतं. पण त्यासाठी आवश्यक ते सहचिंतन आपण करु या.
* कोणत्याही देवदेवतेची पूजा, मंदिराची व्यवस्था, देवस्थानांची भव्यता नि संपन्नता यांचा खर्‍या भक्तीशी, आध्यात्मिक उपासनेशी किती जिवंत संबंध उरलाय याचा खरंच विचार करायला हवा. मूर्तीच्या आतलं अमूर्त देवत्व आपल्या अनुभवाला आलं पाहिजे. दिव्यत्वाची उपासना जिथं केली जाते अशा ठिकाणी आपल्याला मनःशांतीची प्रचीती येतेच येते.
* आपले उत्सव, सोहळे, विधी ही केवळ यांत्रिक कर्मकांडं झालीयत का? याचा विचार संबंधितांनी अवश्य करायला हवा. भावनिक ओलावा हा भक्तीचा आत्मा आहे. नुसता शुष्क, कोरडा भाव हा स्वतःला फसवणारा, आत्मवंचना करणारा असतो. वेळेनुसार अगदी वक्तशीरपणे, शिस्तीत जरी नित्यनैमित्तिक कार्यक्रम, उत्सव पार पडले तरी आर्तता, उत्कटता नसेल तर देवाला ते मान्य होणार नाही.
* आज अनेक मंदिरातून पूजा, यज्ञ, अनुष्ठानं मोठ्या प्रमाणावर केली जातात. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पण याप्रसंगीसुद्धा ध्यान-नाम-चिंतनासाठी पारायण, कीर्तन, प्रवचन यावर अधिक भर दिला पाहिजे. प्रत्येक देवाचा-देवीचा मंत्र असतो. त्याची उपासना अधिकाधिक भक्तभाविकांनी एकत्र येऊन सामूहिक स्वरूपात केली पाहिजे.
* देवांच्या मंदिरांपेक्षा संतांच्या समाधीस्थानी, पादुकामंदिरात अधिक प्रभावी अशी आध्यात्मिक उपासना चालते जी मनःशांतीसाठी, नित्यनेमानं करण्याच्या दृष्टीनं अधिक परिणामकारक असते. इथलं वातावरणही शांत निवांत एकांतपूर्ण असतं.
* बाह्य देखावा, भव्यता यापेक्षा अंतरीचा भाव व चैतन्याचा स्पर्श करून देणारी उपासना मनःशांतीसाठी अधिक आवश्यक व उपयुक्त असते.
साध्य आणि साधनं यापेक्षा साधना अधिक महत्त्वाची आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे.
आता ही दुसरी कथा पाहू या. माणसाच्या अतिहुशार वृत्तीचा, हृदयापेक्षा केवळ तर्कबुद्धीचा, देहसुखाच्या विचारांचा मनात अशांती, असमाधान निर्माण करण्यावर कसा प्रभाव पडतो याचं दर्शन या बोधकथेत घडतं. म्हटलं तर हीही रुपक कथाच आहे.
गावातली सुंदर टेकडी. माथ्याकडे जाणारी पायवाट. बाजूला झाडंझुडपं. बाभळीसारख्या काट्यांची झाडं अधिक. शिखरावर मंदिर. प्राचीन स्थान. ग्रामदेवतेची मूर्ती. लोकांचं, गावाचं रक्षण करणारा देव म्हणून सर्व गावकर्‍यांची त्याच्यावर श्रद्धा. पुजारी अगदी सदाचरणी, सात्त्विक नि भाविक. पण खूप थकलेला, म्हातारा झालेला. एकदाच टेकडी चढून वर जाण्याइतकी शक्ती. दिवसभर मंदिरातच राहून रात्रीची पूजा, आरती झाल्यावर घरी परतायचा. पहिली पत्नी देवाघरी गेलेली. दुसरं लग्न केलं, ही बायको गरीबाची, पण सुंदर व तरुण. ती अत्यंत मनापासून पतीची सेवा करायची. फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे पुजारीबुवा घरात नसताना तिचा लग्नापूर्वीचा प्रियकर तिला भेटायला यायचा. गावकर्‍यांना ही गोष्ट खटकली. त्यांनी पुजारीबुवांच्या कानावर ती घातली. एकदा त्यांनी दुपारीच घरी येऊन पाहिलं. त्याला कुणी दिसलं नाही पण येऊन गेल्याचं लक्षात आलं. पत्नीला तसं विचारल्यावर ती आपल्यावर उगीच संशय घेतला म्हणून तिनं खूप कांगावा केला. आदळआपट केली.
शेवटी असं ठरलं की लवकरच असणार्‍या ग्रामदेवाच्या जत्रेत तिनं सर्वांसमक्ष देवावरचं फूल उचलून प्रतिज्ञापूर्वक आपल्या पतीशी असलेल्या एकनिष्ठेची शपथ घ्यायची. ज्यावेळी हे तिनं प्रियकराला सांगितलं त्यावेळी तो शांतपणे म्हणाला, ‘चिंतेचं कारण नाही. मी योग्य वेळी योग्य ते करतो.’
जत्रेचा दिवस उजाडला. पुजार्‍याची पत्नी प्रियकरानं सांगितल्याप्रमाणे इतर मंडळींबरोबर मंदिराकडे निघाली. वाटेत ठरलेल्या ठिकाणी टेकडीवर पोचल्यावर पायात काटा मोडला म्हणून थयथयाट करू लागली. लोकांना काय करावं ते कळेना. ती कुणाला हात लावू देत नव्हती. इतक्यात तिकडून एक धनगर आला. खांद्यावर घोंगडं, कानात कडं, पायात वाजणारे तोडे, हातात घुंगरु लावलेली काठी, डोक्याला पागोटं… आल्यावर तिच्याकडे पाहून त्यानं डोळे मिचकावले – तो दुसरातिसरा कोणी नसून तिचा प्रियकरच होता. त्यानं तिला बसायला सांगितलं. तिचा पाय हातात घेऊन स्वतःच्या मांडीवर ठेवला. दुसरा एक पडलेला काटा हातात घेतला नि त्याच्या साह्यानं तिच्या पायातला (नसलेला) काटा काढला. तिला खूप बरं वाटलं. ती उभी राहून सर्वांबरोबर मंदिराकडे चालू लागली. घडलेल्या प्रकाराला अनेक लोक साक्षी होते.
जत्रेची गडबड सुरू होती. पण पूजा झाल्यावर जेव्हा आपापल्या दुष्कृत्यांची, पापांची देवासमोर तसेच सर्व लोकांसमोर कबूली देऊन – पश्चात्ताप व्यक्त करून – देवाची क्षमा मिळवण्यासाठी देवावरचं फूल उचलण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सर्वांत शेवटी उठली पुजार्‍याची पत्नी.
फूल उचलून, देवाला नमस्कार करून, सर्वांना उद्देशून ती म्हणाली – ‘हे ग्रामदेवा, आत्ता पायात घुसलेला काटा काढण्यासाठी त्या धनगरानं केलेल्या स्पर्शाशिवाय पतिदेवांखेरीज दुसर्‍या कुणाचाही स्पर्श मला झालेला नाही.’
त्या धनगरानं तिला काटा काढण्यासाठी केलेल्या स्पर्शाला अनेकजण साक्षी होते. सर्वांची खात्री पटली. पुजारीबुवांचे समाधान झाले. एक गोष्ट मात्र ती सोडून कुणालाही माहीत नव्हती की धनगर हाच तिचा प्रियकर होता. तिची ती चलाखी देवाला मात्र समजली. माणूस आता खूप चतुर (स्मार्ट) झाला याची खात्री होऊन… त्याला आपली आता गरज उरलेली नाही… यापुढे तो आपल्याला – साक्षात देवाला – पावलोपावली फसवणार याचा विचार केल्यामुळे मोठा स्फोट होऊन ग्रामदेवाच्या मूर्तीचे असंख्य तुकडे झाले व आकाशात विलीन झाले. स्फोटामुळे बंद केलेले कान व डोळे उघडल्यावर लोकांना आश्चर्य वाटलं. कारण समोरचा गाभारा रिकामा होता. देव अदृश्य झाला होता.
तरीही कुणाच्याही डोक्यात प्रकाश पडला नाही, त्यांचे डोळे खर्‍या अर्थानं उघडले नाहीत. असं का झालं? .. कसं झालं? याचा विचार करण्याची गरज कुणालाही वाटली नाही. तेव्हाच नि तिथंच सर्वांनी एकमुखी निर्णय घेतला .. नवी मूर्ती बसवू या. यावेळी मात्र काळ्या पाषाणाची नको.. पांढरी संगमरवरी (मार्बलची) बसवू या.
या कथेतही आपल्या अंतरीच्या अशांतीची कारणं दडलेली आहेत.
* ज्याचा आपल्याला खरा आधार वाटायला हवा, योग्य मार्गदर्शन व्हायला हवं तो देव आपल्या आतच आहे हे आपल्याला कळत नाही. कळलं तरी वळत नाही.
* हा खरा देव कधीही भंगत नाही – चळत नाही – ढळत नाही. गीतेत म्हटल्याप्रमाणे अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला ओलं करू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही, शस्त्र त्याला काटू (कापू) शकत नाही. तो सदासर्वदा सर्वत्र असतोच. हा खरा आपला आतमधला देव-आत्मदेव आहे. हाच आपला खरा गुप्त रुपानं आत वसून राहिलेला गुरू आहे. गुरु – सद्गुरु – बाहेर नसतातच. आतून आपल्या जीवनाचं सूत्रसंचालन करत असतात. आपण जीवननौकेचे कर्णधार; जीवन कर्तृत्वाचे शिल्पकार काहीही असू, खरा सूत्रधार आतला ईश्‍वरच आहे. जो शक्तिरूप किंवा चैतन्यरूप आहे. हाच सर्वांच्या हृदयात असलेला परमेश्‍वर, सर्वांचा परमात्मा, परब्रह्म .. भगवंत सांगतात ‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत’. अर्जुन भरतवंशी म्हणून ‘भारत’ होता. आपण भारतवासी ‘भारत’च आहोत.
मनःशांतीचा खरा स्रोत, उगम, झरा खरोखर आपल्या आत आहे. अंतरंगात. ‘घर देता का घर?’ म्हणत दगडामातीचं किंवा सिमेंटकॉंक्रीटचं ‘घर’ (हाऊस) मिळेलही नव्हे मिळतंच. याचना करून नव्हे तर पैसे मोजून – कोणत्याही रंगाचे पैसे … काळे, पांढरे, करडे (ग्रे). हा आजचा ‘फंडा’ आहे ना! पण कितीही याचना, प्रार्थना करून शांतिनिकेतन … शांतविशांतप्रशांत घरकुल (होम) कधीही मिळत नाही. मिळणार नाही.
शांतीचं घर आपलं आपणच निर्माण करायचं असतं. नि त्या घरात शांतीही आपली आपणच अनुभवायची असते. आपल्या आतच. आतल्या आतच.