मतभेदांचेच दर्शन

0
102

राज्यातील कॉंग्रेस शिलेदारांना एकसंध राहून सत्ताधार्‍यांशी संघर्ष करण्याचा गुरूमंत्र पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल दिल्लीतील बैठकीत दिला आहे. हा गुरूमंत्र देण्यास त्यांना खूप उशीरच झाला असे म्हणावे लागेल, कारण गेल्या साडे चार वर्षांतील निष्क्रियता, विधिमंडळ आणि प्रदेश समितीतील लाथाळ्या, महाआघाडीवरून काढल्या गेलेल्या एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या यातून कार्यकर्ते तर संभ्रमित झाले आहेतच, परंतु पक्षाची प्रतिमाही रसातळाला पोहोचली आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपसातील मतभेद मिटवून एकत्र येण्याची हाक जरी राहुल यांनी दिली असली, तरी हे मतभेद मिटण्यापलीकडे जाऊन पोहोचले आहेत असेच एकंदर परिस्थितीवरून दिसते. पक्षाचे चार आमदार राहुल यांचे भेटीचे फर्मान धुडकावून गैरहजर राहिले आणि जे भेटीला गेले, त्यांच्यामध्येही एकवाक्यता नव्हती. एकत्रित बैठकीऐवजी प्रत्येकाशी वैयक्तिक भेटीगाठी घेण्याच्या राहुल यांच्या भूमिकेने एकमेकांवर दोषारोप करण्याची संधीही या नेतेमंडळींना मिळाली. या भेटीने प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांना मात्र हत्तीचे बळ मिळाले आहे, कारण महाआघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवावी या त्यांच्या भूमिकेला पक्षश्रेष्ठींचा भक्कम पाठिंबा राहुल यांच्या मुखातून मिळाला आहे. राहुल यांनी गोव्यासाठी तीन तास काढले ही खचितच स्वागतार्ह बाब, परंतु हे जर त्यांनी पूर्वी केले असते, तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. पांडुरंग मडकईकर आज भाजपच्या वाटेवर आहेत. पक्ष सोडण्याची घोषणा करताना त्यांनी पक्षाच्या आमदारांना राहुल यांची भेटही मिळत नाही अशीच तक्रार केली होती. त्यामुळे आता पक्षातील धुसफुशीची आग पराकोटीला गेल्यावर आणि चार आमदारांनी वेगळ्या वाटा चोखाळण्याची तयारी केल्यावर विहीर खोदायला घेऊन उपयोग काय? बाबूश यांच्या निलंबनामुळे ते असंलग्न आमदार बनले. त्यांच्या पत्नी जेनिफर यांनीही अर्थातच कॉंग्रेसला रामराम ठोकण्याची तयारी चालवलेली दिसते. मावीन गुदिन्हो तर भाजपमयच होऊन गेले आहेत. आता मडकईकरही चालले आहेत. विश्‍वजित राणेंनी महाआघाडीच्या विषयावरून पक्षनेतृत्वापासून घेतलेली फारकत आणि त्यांची नाराजी अजून मिटलेली दिसत नाही. या बंडखोरांना माघारी आणा असे राहुल यांनी पक्षनेत्यांना सांगितले खरे, परंतु पक्षी पिंजर्‍याबाहेर उडून गेल्यावर ये, ये केल्याने ते थोडेच परतणार आहेत! या परिस्थितीत जी नेतेमंडळी राहुल यांच्या भेटीसाठी गेली, त्यांच्यात तरी एकवाक्यता दिसायला हवी होती. परंतु तेही घडले नाही. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी वेगळा सूर लावला. दिगंबर, राणे आणि रवी हे तिघे तर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. प्रदेश समिती पदाधिकारी आणि विधिमंडळ गट यांच्यातही संघर्ष आहे. या सगळ्या परिस्थितीत विस्कळीत कॉंग्रेस एकसंध बनवणे सोपे नाही. २०१७ मध्ये स्वबळाची सत्ता आणूया असे स्वप्न राहुल यांनी भेटीला गेलेल्या नेत्यांपुढे ठेवले. परंतु नेत्यांपाशी काही जादूची कांडी आहे का ती. छू मंतर ऽ म्हणताच सत्तासिंहासन यांच्यासाठी मोकळे व्हावे! गेली साडे चार वर्षे विद्यमान सरकारविरुद्ध चकार शब्द न काढता मूक राहिलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी जे आरोपपत्र नुकतेच मांडले, त्यातील बहुतेक निर्णय हे कॉंग्रेसच्याच सत्ताकाळात झाले आणि अनेक विषय त्यावेळीही ऐरणीवर होते. कालपरवा राज्यात प्रवेशलेल्या आम आदमी पक्षाने अत्यंत शिस्तबद्धरीत्या घरोघरी प्रचाराला सुरूवातही केली आहे. कॉंग्रेसच्या पारंपरिक मतपेढीवर डल्ला मारायला ‘आप’चे स्वयंसेवक सरसावले आहेत. अशा वेळी राहुल यांच्यापुढे झालेल्या आमदारांच्या परेडमुळे पक्षाची एकसंधता दिसण्याऐवजी चिरफाळ्याच जनतेला दिसणार असतील, तर ते पक्षाला मारकच ठरेल!