डिचोलीत सेझा कामगारांचा विराट मोर्चा

0
109

विविध मागण्यासाठी संपावर असलेल्या येथील सेझा गोवा खाण कंपनीच्या ४०० कामगारांनी काल काढलेल्या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसह कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी भाग घेतल्याने मोर्चाला मोठा प्रतिसाद लाभला. कामगार नेते ऍड. अजितसिंह राणे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात सरकारविरोधी घोषणांबरोबरच कामगारांना न्याय देण्याच्या घोषणांनी आसमंत दणाणून निघाला.

शांतादुर्गा विद्यालयाकडून सुरू झालेला मोर्चा डिचोली शहरातून केळबायवाडा, मये येथे पोचल्यानंतर जाहीर सभा झाली. ऍड. राणे यांच्यासह डिचोलीचे नगराध्यक्ष राजाराम गावकर, प्रदीप बखले, पर्यावरणप्रेमी रमेश गावस, मनोहर शिरोडकर, सुभाष किनळकर, अनिल नाईक, नीळकंठ गावस, कामगार प्रतिनिधी बालाखान गोटी आदींसह महिलांचा मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी सभेत बोलताना उपस्थित राजकीय नेत्यांनी कामगारांना पाठिंबा व्यक्त करून न्यायाची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांना सज्जड इशारा
कामगारांच्या मागण्या न्याय्य असून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कामगारांच्या संयमाला तडा जाऊ न देता त्यांना न्याय द्यावा. ते कंपनीचे प्रतिनिधी नसून जनतेचे असल्याने त्यांनी कामगारांचे हित जपणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने हा प्रश्‍न सोडवावा अन्यथा खुर्ची सोडावी असा सज्जड सल्लावजा इशारा कामगार नेते ऍड. अजितसिंह राणे यांनी जाहीर सभेत बोलताना दिला.