अरे पुरावा काय मागताय?

0
125

– दत्ता भि. नाईक

पहिल्यांदा सार्क मंडळाच्या बहुसंख्य देशांनी भारताला पाठिंबा दिल्यामुळे वा थेट कारवाईनंतर जगातील दहशतवादग्रस्त देशांनी उघड वा छुपा पाठिंबा व्यक्त केल्यामुळे भारत सरकारची प्रतिमा उजळ होते हे न पाहवणारे अनेक लोक आपल्या देशात आहेत.

यंदाची २९ सप्टेंबरची पहाट भारताच्या अलीकडच्या इतिहासात फारच गाजली. भारतीय सैनिकांनी जम्मू-काश्मीरची विभाजन रेषा म्हणजेच नियंत्रण रेषा पार करून सर्जिकल स्ट्राईक घडवून पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचे सात अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. त्यांचे तंबू, इमारती व निवासस्थाने नेस्तनाबूत केली. देशात नवरात्रीचे वातावरण सुरू होण्यापूर्वीच व देश विजयादशमीच्या सांकेतिक सीमोल्लंघनाच्या तयारीत असतानाच भारतीय सैनिकांनी सीमोल्लंघन घडवून जगाला अनपेक्षित असा धक्का दिला.
पठाणकोट व उरी येथील भारतीय सैन्यदलांच्या छावण्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशात सर्वत्र जनक्षोभ पसरला होता. आता काहीतरी केले पाहिजे असे सर्वांनाच वाटत होते. आपले सरकार करते काय? आपण आपल्या घरातील युवकांना हकनाक मारण्यासाठी सीमारेषेवर पाठवतो की काय? अशी भावना जवानांच्या कुटुंबीयांमध्ये वाढते की काय? असे वाटू लागले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई म्हणजे देशात विजयश्रीचे वातावरण निर्माण करणारी घटना ठरली.
केजरीवाल आणि सबूत
भारतीय सीमारेषेवरील डी.जी.एम.ओ.ची सीमेपलीकडील पाकिस्तानी डी.जी.एम.ओ.शी हॉटलाईन चालू असते. कारवाई फत्ते झाल्याबरोबर व सर्व भारतीय सैनिक परत आल्यावर भारतीय डी.जी.एम.ओ.ना हॉटलाईनवरून आपल्या सेनेच्या सर्जिकल स्ट्राईकची माहिती दिली. उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर केलेला हल्ला व त्यात मरण पावलेल्या अठरा जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
निश्‍चित ध्येय समोर ठेवून चालणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रोखठोक बोलणारे गृहमंत्री राजनाथ सिंह, अथक परिश्रमाची सतत तयारी ठेवणारे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि यावर वरताण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या एकमुखी निर्णयामुळे ही कारवाई पार पडली. पाकिस्तानने ऊरबडवेपणा करून ही कारवाई झालीच नसल्याचा प्रचार जगभर केला आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील काही विचारवंतांनीही भारत सरकारजवळ पुरावे मागण्याचा धटिंगणपणा दाखवला. सुरुवातीला राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त केला, परंतु या कारवाईचे पूर्ण श्रेय सत्ताधारी पक्षाला मिळणार असल्याचे लक्षात येताच त्यानीही घूमजाव केले.
या मंडळींचा सर्वात अग्रेसर नेता म्हणजे सतत प्रसिद्धीच्या झोतात वावरणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. त्यांनी पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळून भारत सरकारजवळ ‘सबूत’ हवे असल्याची मागणी केली. खासदार संजय निरुपम हे पूर्वी शिवसेनेत होते. आता गेली कित्येक वर्षे ते कॉंग्रेसमध्ये आहेत. ते सध्या मुंबई क्षेत्राचे कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांनी म्हटले की, प्रत्येक भारतीयाला पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक्स झालेल्या हव्यात, पण त्या भारतीय जनता पक्षाला राजकीय भांडवल करता यावे म्हणून ‘बनावट’ नसाव्यात. कॉंग्रेससारख्या एका अखिल भारतीय पक्षाने सर्जिकल स्ट्राईक बनावट असल्याचा संशय व्यक्त करणे म्हणजे या पक्षाची भीती स्पष्ट होते. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यानी मात्र ते संजय निरुपम यांच्या मताशी सहमत नसल्याचे वक्तव्य करून या कारवाईचा तपशील जारी करावा अशी मागणी केली आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांनीही याच प्रकारचे वक्तव्य करून सरकारला कारवाईच्या यशाचे श्रेय मिळवण्यापासून वंचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
भारताची प्रतिमा उजळ
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या सर्व घटनाक्रमावर मत व्यक्त करताना केजरीवाल यांचे वक्तव्य पाकिस्तानी वर्तमानपत्रांतून बॅनर लाईन मिळवण्याच्या योग्यतेचे आहे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. दोन्ही कम्युनिस्ट पक्ष सैनिक कारवाईला आज विरोध करत नसले तरी त्यांचा परधार्जिणेपणा सर्वश्रुत आहे व ज्या घटनेमुळे मोदी यांचे भारतीय जनता पार्टीचे सरकार लोकप्रिय होईल त्या घटनेचे ते मनःपूर्वक स्वागत करूच शकत नाहीत.
एका बाजूला पाकिस्तान सर्जिकल स्ट्राईक झालाच नसल्याचा कांगावा करत असताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ यानी आम्ही ठोशास ठोशाने उत्तर देऊ असे वक्तव्य केलेले आहे. हा ठोसा कोणाला की ज्याला ते ठोशाने उत्तर देऊ इच्छितात, हे पाक सरकारची री ओढणार्‍यांनी स्पष्टपणे सांगावे. दुसरीकडे या घटनेनंतर पाकिस्तानने नौशेरा, अखनूर, राजौरी क्षेत्रात सैन्याची जमवाजमव करून भारतीय हद्दीतील कलसियान, कलाल व बाबा खोरी परिसर यांवर शस्त्रास्त्रे रोखलेली आहेत. सर्जिकल स्ट्राईकचा घाव पाकिस्तानच्या वर्मावर बसलेला आहे म्हणूनच पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय.एस.आय.चे प्रमुख ले. जन. रिझवान अख्तर यांना पदावरून हटवण्याची हालचाल सुरू झालेली आहे. राहिल शरीफ यांनी अणुयुद्धाची धमकी मोदी यांना घाबरवण्यासाठी दिलेली आहे की केजरीवालना संतोष वाटावा म्हणून याचे उत्तर आता केजरीवाल यानीच दिले पाहिजे.
पहिल्यांदा सार्क मंडळाच्या बहुसंख्य देशांनी भारताला पाठिंबा दिल्यामुळे वा थेट कारवाईनंतर जगातील दहशतवादग्रस्त देशांनी उघड वा छुपा पाठिंबा व्यक्त केल्यामुळे भारत सरकारची प्रतिमा उजळ होते हे न पाहवणारे अनेक लोक आपल्या देशात आहेत.
यंदाची विजयादशमी
दि. ९ ऑक्टोबर रोजी लखनौ येथे भारतीय जनसंघाचे पूर्व अध्यक्ष स्व. दीनदयाल उपाध्याय यांचे जीवन व कार्य यावरील १५ खंडांच्या संचाचे प्रकाशन करताना प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी यंदाची विजयादशमी देशाच्या जीवनात अतिशय महत्त्वाची आहे असे म्हटले व दि. ११ रोजी रामलीलेच्या वेळीही दहशतवादरूपी रावणाचा आपल्याला अंत करायचा आहे असेही म्हटले.
प्रधानमंत्री मोदी या देशातील लोकांना ताठ मानेने जगायला शिकवतील ही भीती कॉंग्रेस-कम्युनिस्ट-समाजवादी व ‘आप’ या मंडळींच्या मनात आहे. समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांनी तर सर्जिकल स्ट्राईकच्या लक्ष्यवेधी कारवाईचा सल्ला त्यानीच सरकारला दिल्याचे म्हटले आहे. हे खरे असेल तर वाईट वाटून घेण्यासारखे काहीच नाही. माजी संरक्षणमंत्री या नात्याने संरक्षण मंत्रालयाला ते सल्ला देऊ शकतात, परंतु त्यांच्या या म्हणण्यात काही तथ्य आहे असे वाटत नाही.
गजस्तत्र न हन्यते
लक्ष्यभेदी कारवाईचे श्रेय सरकारने वा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने घ्यावयाचे नाही असे ठरवले तरीही जनता त्यांना हे श्रेय देणारच आहे. १९६५ च्या युद्धातील यशाचे श्रेय तत्कालीन प्रधानमंत्री स्व. लालबहादूर शास्त्री यांनाच जाते. कॉंग्रेस पक्षाला त्यांच्यासारखा नेता पचनी पडला नाही. त्यामुळे या यशाचे श्रेय कॉंग्रेसला लाटता आले नाही हे त्या पक्षाचे दुर्दैव आहे. १९७१ च्या युद्धातील यशाचेही श्रेय स्व. इंदिरा गांधी यांच्याकडे जाते. परंतु त्यानीही या विजयाचे श्रेय स्वतःच लाटण्याचे ठरवल्यामुळे वा पक्षात वीरश्रीचे वातावरण नसल्यामुळे पक्षाला काहीही फायदा झाला नाही. यामुळे लोकप्रियता कमी होते हे लक्षात येताच १९७५ साली त्यानी देशात आणीबाणी जाहीर करून हुकूमशहा बनण्याचे प्रयत्न केले.
प्रसिद्ध चरित्र अभिनेता ओम पुरी यांनी तर लष्कराना आम्ही सीमेवर जाण्यास सांगितले होते का? यासारखे देशाच्या सार्वभौमिकतेला आव्हान देणारे वक्तव्य केलेले आहे. ओम पुरी हे उत्कृष्ट कलाकार आहेत, पण त्यांची लाल सलाम वृत्ती वेळोवेळी दिसून येते. दिल्लीतील अण्णा हजारेंच्या उपस्थितीत भरलेल्या मेळाव्यात त्यानी संसद व संसदीय लोकशाहीवर सडकून टीका केली होती. अशी भाषा कोण वापरतात हे आता सर्वजणांना माहीत आहे.
काही लोकांना देशभरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले तर ते सहन होत नाही. यातच सत्ताधारी भारतीय जनता पक्ष या विषयाचे राजकारण करत आहे असे म्हणून हीच मंडळी यात राजकारण घुसवत आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या लक्ष्यभेदी कारवाईमुळे ही सर्व मंडळी घाबरली आहे, म्हणूनच ती काहीबाही बरळत आहे. एका सिंहिणीने एक कोल्ह्याचे पिल्लू पोसले होते. त्या पिल्लाचे बंधू असलेल्या सिंहाच्या छाव्यानी एक भला मोठा हत्ती पकडला. हे पाहून ते कोल्ह्याचे पिल्लू सिंहीण आईला घाबरत घाबरत सांगू लागले की माझ्या भावानी एक भला मोठा प्राणी पकडला आहे. त्यावेळी सिंहीण त्याला म्हणते- ‘यत्कुले त्वमुत्पन्नः गजस्तत्र न हन्यते.’ ज्या कुळात तुझा जन्म झाला आहे त्यात हत्तीला मारण्याची परंपरा नाही. या लोकांकडे पाहून हेच म्हणावे लागेल.