गोव्याची नवरात्र आणि दसर्‍याची उत्सव-परंपरा

0
634

– डॉ. पांडुरंग फळदेसाई

दसर्‍याचा सण म्हणजे तब्बल दहा दिवसांचा उत्सव. एका वेगळ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करावयाचा पर्वकाळ. आपल्या पूर्वजांनी गाजविलेल्या विजयाची आठवण मनीमानसी जागवत स्वकर्तृत्वाला तजेला देण्याचा हा उत्सवकाल असतो. छोट्याशा गोव्यात नवरात्र आणि दसर्‍याचा पर्वकाळ विविधतेने साजरा होतो. मात्र सगळीकडची भावना एक, उत्साह तोच आणि उमेद तेवढ्याच तोलामोलाची.

गणेश चतुर्थीच्या सणाला निरोप देता देता गोमंतकीयांना नवरात्र आणि दसर्‍याचे वेध लागतात. अन्य सण एक-दोन दिवसांपुरते मर्यादित असतात. परंतु दसर्‍याचा सण म्हणजे तब्बल दहा दिवसांचा उत्सव. एका वेगळ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करावयाचा पर्वकाळ. आपल्या पूर्वजांनी गाजविलेल्या विजयाची आठवण मनीमानसी जागवत स्वकर्तृत्वाला तजेला देण्याचा हा उत्सवकाल असतो. नवरात्र म्हणजे शक्तिदेवतेच्या आवाहनाचा काळ. या काळाच्या आगमनाची चाहूल निसर्ग तर देतोच, परंतु गोव्यातील मंदिरांच्या प्राकारात एक लगबग सुरू होते. प्राकाराची साफसफाई, रोषणाई, सजावट, मखराला नवा साज, वाद्यसंगीताची सुरावट, भक्तिसंगीताचे सादरीकरण, अहोरात्र चाललेले धार्मिक विधी, नवसपूर्ती, कीर्तनच्या बारी, भाविकांची भाऊगर्दी यांमुळे गोव्याचे ग्रामीण वातावरण पार बदलून जाते. संपूर्ण वातावरणात भाविकता आणि आध्यात्मिकतेचे पावित्र्य भरून राहिलेले दिसते. छोट्याशा गोव्यात नवरात्र आणि दसर्‍याचा पर्वकाळ विविधतेने साजरा होतो. मात्र सगळीकडची भावना एक, उत्साह तोच आणि उमेद तेवढ्याच तोलामोलाची.
आपल्या दसर्‍याला भारतीय संस्कृतीने एक आनंददायी सण मानला आहे. म्हणूनच आपण दसर्‍याचा उल्लेख ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असा करतो. भारतीय संस्कृतीने या सणाला ‘विजयादशमी’ हे एक अर्थपूर्ण नाव बहाल केले आहे. विजयादशमी हा विजयाची आठवण करून देणारा दिवस. हा विजय कोणता? आपल्या पूर्वजांनी शत्रूंवर संपादन केलेला विजय. दुष्ट वृत्तीवर सुष्ट वृत्तीने मिळविलेला, वाईटावर चांगल्याने मात केलेला, असत्यावर सत्याने मिळविलेला विजय. त्या विजयाचे भान आपण आपल्यात जागवायचे असते. आपणच आपल्यात डोकावून आपल्यातील वाईट गोष्टींचे दमन करावयाचा हा दिवस. आमच्या कल्पक पूर्वजांनी माणसामधली माणुसकी जागविण्यासाठी वेगवेगळ्या व्रत-उत्सवांची योजना केली. माणसाच्या दैनंदिन व्यवहारातील माणुसकीचा ओलावा कायम टिकून राहावा म्हणून त्यांनी हा सगळा उपद्व्याप केला. आपल्या विविध व्रत-उत्सवांमधून त्यानी मानवी आयुष्याला विविध स्वरूपाचे नवनवे आयाम दिले आणि मानवतेची गुढी नेहमी उंचावर फडकत ठेवण्याची तजवीज केली.
विजयादशमी म्हणजे दसरा हा त्यापैकीच एक उत्सव. असुर वृत्तीवर, असत्यावर, वाईट गोष्टींवर विजय मिळविलेला आणि सांप्रतच्या आयुष्यात विजय मिळविण्याची प्रेरणा देणारा हा दिवस. रामायणात रामाने याच दिवशी रावणाला ठार करून त्याच्या बंदिवासातून सीतेची मुक्तता केली. कालीमातेने महिषासुर, शुंभ, निशुंभ, रक्तबीज इत्यादी दैत्यांचा वध करून देवांना विजय मिळवून दिला. या दैत्यांचा वध करणे देवांना शक्य झाले नाही, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकमताने निर्णय घेतला. त्यांच्या मुखांतून प्रकटलेल्या विद्युतशलाकेतून दिव्य अशी दहा हातांची लावण्यवती अवतरली. देवांनी तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे दिली. ती शस्त्रे घेऊन ही महादेवी दैत्यांवर तुटून पडली. नऊ दिवसपर्यंत वेगवेगळ्या दैत्यांशी तुंबळ युद्ध केले आणि तिने एकेक राक्षसाचा वध केला. महिषासुराचा वध केलेला दिवस तो विजयादशमी.
महाभारतात पांडवांच्या वाट्याला वनवास आणि अज्ञातवास आला. त्या अज्ञातवासात जाण्याअगोदर त्यानी आपली शस्त्रे शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली. मात्र जेव्हा कौरवसैन्य विराटावर स्वारी करून त्याच्या गायी पळवू लागले तेव्हा विजयादशमीला ढोलीत लपविलेली शस्त्रे काढून त्यांच्या जोरावर अर्जुनाने कौरव सैन्याला पिटाळून लावले आणि विजय संपादन केला. त्यावेळेपासून शमीवृक्षाला विजय मिळवून देणारी वनस्पती मानण्यात येऊ लागले. तो वृक्ष म्हणजे अपराजिता देवीचे रूप मानले जाते.
नवरात्र-दसर्‍याच्या काळात शमी आणि आपट्याची पूजा केली जाते. आपट्याची पाने तर सोने म्हणून वाटण्यात आणि लुटण्यात येतात. त्यामागे एक पुराणकथा दडलेली आहे. पराकोटीचा दानशूर रघुराजा कौत्साला मागेल तेवढे धन देण्याचे वचन देऊन बसला. कौत्साने चौदा कोटी सुवर्णमुद्रा राजाकडे मागितल्या. परंतु त्याच्या राजकोषात तेवढ्या सुवर्णमुद्रा नव्हत्या. म्हणून त्याने देवांचा कोषागाररक्षक कुबेरावर स्वारी करण्याचे ठरविले. हे कुबेराला समजताच कुबेर घाबरला आणि त्याने त्याच रात्री शमी आणि आपट्याच्या झाडांवर प्रचंड प्रमाणात सुवर्णमुद्रांची वृष्टी केली. त्यामुळे रघुराजाला कौत्साने मागितलेल्या १४ कोटी सुवर्णमुद्रा सहजपणे देता आल्या. त्याशिवाय राहिलेल्या सुवर्णमुद्रा प्रजाजनांना वाटता आल्या. त्यावेळेपासून विजयादशमीला आपट्याची पूजा करून त्याची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची परंपरा सुरू झाली.
दसर्‍याच्या दिवशी काणकोण तालुक्यातील श्रीस्थळ येथील मल्लिकार्जुन मंदिरात आणि शिरोटी खोला येथील नारायण देवालयात शमीपत्र वाचण्याची प्रथा आहे. देवाची उत्सवमूर्ती पालखीतून सीमोल्लंघनाला निघते. ती शमी, आपटा या वृक्षांखाली किंवा एखाद्या पारावर विसावते. त्या ठिकाणी शमीपत्राचे जाहीर वाचन करण्यात येते. आपल्या पूर्वजांनी सीमोल्लंघन करून संपादन केलेल्या विजयाची आठवण करून देण्याचा हा विधी असावा. शमीपत्रातील भाषा जुन्या आणि प्राकृत वळणाची असते. उदाहरणार्थ- मल्लिकार्जुन देवालयाजवळ वाचले जाणारे शमीपत्रातील काही अंश-
‘स्वस्ति श्री नृप शालीवाहन शके…. संवत्सरे दक्षिणायेन शरदृतौ आश्‍विन मासे शुक्ल पक्षे दशम्या…. सदरेचे सुमुहुर्तीं श्री मनलप्रभु मल्लिकार्जुन शिबिकायनी आरोहण होऊन सीमोल्लंघनार्थ समागमे वेदो कीर्ती घोष……’
नवरात्राची सुरुवात प्रतिपदेला घटस्थापनेने होते. त्या दिवसापासून रोज शक्तिदेवतेच्या मंदिरात विविध धार्मिक कृत्ये आणि विधी पार पडतात. बहुतेक हिंदू कुटुंबांतून नवरात्रात तुळशीवृंदावनासमोर एक आडवी काठी बांधून त्यावर रोज फुलांच्या माळा चढविण्यात येतात. त्यांची संख्या प्रतिपदेला एक माळ तर दसर्‍याला दहा माळा अशा चढत्या क्रमाने असते. नवरात्रातील काही दिवसांत विशिष्ट विधी केले जातात. ललिता पंचमी याच काळात साजरी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून घागर फुंकण्याचा विधी होतो. महानवमीला मंदिरात देवकार्य होऊन गावभोजनाचा विधी असतो. नवरात्रात कुमारीपूजनाचा विधी प्रामुख्याने केला जातो. कुमारिकांना घरी बोलावून त्यांना सन्मानपूर्वक भोजन व भेटवस्तू दिल्या जातात. काही भागांत घटस्थापनेबरोबर रुजवण विधी असतो. विविध धान्ये रुजविण्याची ही पद्धत असते. त्या धान्यावर रोज घटातील पाणी हळद मिसळून प्रोक्षण करण्याची प्रथा आहे. दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे अंकुर प्रसाद म्हणून वाटतात.
पेडण्यातील प्रसिद्ध दसरा हा गणेशपूजन आणि घटस्थापनेने सुरू होतो. पेडण्याचे आद्य दैवत म्हणजे भगवती. त्या महामाया भगवती, रवळनाथ आणि भूतनाथाचा हा उत्सव असतो. या दैवतांना गार्‍हाणे घालून उत्सवास प्रारंभ करतात. गार्‍हाण्यातील काही अंश थोडेफार पुढीलप्रमाणे असतात-
‘‘राज्याच्या देवांचां आनी तुजां गणीत तूं एक कर… चतुर्शीमेचे शिमधडे घट्ट कर… एक करा हो गांव तुजो… सुखी आनी सुरक्षित तूं आजवर… ह्या गावांत काय रोगराई आसल्यार तूं पूर्ण नष्ट कर… तूं ह्या गावांचां पूर्ण बरां कर… ह्या म्हालाचां पूर्ण बरा कर…’’ रोज पुराण, पूजा, आरत्या केल्या जातात. या उत्सवाची सुरुवात रवळनाथाच्या मंदिरापासून होते. रवळनाथ आणि भूतनाथाची दोन तरंगे आदिस्थानात पोचतात. तिथून ती भगवतीच्या मंदिरात येतात. त्यानंतर भगवती आणि रवळनाथाचे सीमोल्लंघन होते. भगवती मंदिरात तुळाभार होतो. नवस बोललेली माणसे आपल्या वजनाएवढ्या वस्तू देवीला तोलून-मापून अर्पण करतात. त्यात तांब्या-पितळेसारखे धातू, नारळ, तांदूळ इत्यादी वस्तूंचा पण समावेश असतो. रवळनाथ आणि भूतनाथाच्या तरंगांच्या सोबतीने पूर्वी माऊलीचे पण तरंग यायचे असे सांगतात. ही तिन्ही तरंगे एकसाथ भगवती मंदिराकडे येताना म्हणे माऊलीच्या तरंगाने एक पाऊल अगोदरच पुढे टाकले. माऊलीच्या आगाऊपणावर संतापून रवळनाथाने एका लाथेसरशी माऊलीच्या तरंगाला बाजूच्या विहिरीत टाकून दिले. त्यावेळेपासून ही दोनच तरंगे दसर्‍याच्या उत्सवात नाचवितात. मात्र अजूनदेखील ती दोन्ही तरंगे त्या विहिरीजवळ पोचताच विहिरीतील माऊलीचे तरंग घुमू लागते आणि वर येण्याचा अयशस्वी प्रयत्न करते. रवळनाथ आणि भूतनाथाच्या तरंगाला अनुक्रमे २२ आणि २१ लुगड्यांच्या निर्‍या गुंडाळलेल्या असतात. या दसरोत्सवातील ढोलवादनही अत्यंत चित्ताकर्षक असते. पाच-सात ढोल, एक ताशा, एक सनई आणि झांज यांच्या तालबद्ध आणि अप्रूप लयकारीचा प्रत्यय श्रोत्यांना येतो. हा दसर्‍याचा उत्सव कोजागिरीपर्यंत साजरा करतात.
काणकोण तालुक्यातील पैंगीण गावाच्या नवदुर्गा देवालयात रोज रात्री ‘गोंदोळ’ होतो. गोंदोळ म्हणजे तरंगे नाचविणे. नवरात्रातील प्रतिपदेच्या दिवशी भगतीपुरातून दोन तरंगे आणि दोन छत्र्या नवदुर्गेच्या देवळात आणल्या जातात. ती तरंगे व छत्र्या लुगडी आणि फुलमाळांनी सजवितात. पिल्लकुचा म्हणजे मोरपिसांची केरसुणीसारखी जाडजूड जुडी. नवदुर्गेची पूजा, अर्चा, पुराणकथन झाल्यावर तरंगे, छत्र्या आणि पिल्लकुचा घेऊन परंपरेने ठरलेली माणसे मंदिराबाहेरील प्रशस्त उघड्या प्रांगणात उभी राहतात. त्यांची यथासांग पूजा करून आरती ओवाळल्यानंतर भगत शेंसर मारतो. स्वतःभोवती शस्त्र वेळावतो आणि वाद्यांच्या चढत्या तालावर पिल्लकुचाधारी अंगात आल्याने बेहोषित जातो. त्याला तिथे सज्ज असलेले त्याचे साथीदार सावरतात. वाद्यांचा ताल वाढतो. तरंगे मंदिराच्या दोन्ही सीमारेषेपर्यंत जाऊन अंगणात येतात व त्यांचे लयबद्ध नृत्य सुरू होते. तरंगे नाचवून झाल्यावर जमलेल्या भाविकांच्या डोक्याला लुगड्याचे काठ टेकवून दर्शन दिले जाते व तरंगे देवालयात परत येतात. या संपूर्ण विधीला ‘गोंदोळ’ असे म्हणतात. दसर्‍याच्या दिवशी हा सगळा विधी दिवसा म्हणजे सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान होऊन दसरा साजरा केला जातो. नंतर तरंगे जवळच्या आरव या आदिस्थानात जाऊन आपट्याच्या झाडाची पूजा करून सोने लुटण्यात येते. दुसर्‍या दिवशी सकाळी सर्व तरंगे-छत्र्या भगतीपुरात परततात.
साखळीजवळच्या आमोणे या गावी आश्‍विन महिन्यातला दसरा कार्तिक शुद्ध पंचमीपासून त्रयोदशीपर्यंत साजरा करतात. त्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वीच्या काळी आमोणे गावातील मंडळी पराक्रम गाजवीत प्रतापगडपर्यंत पोचले. तिथे त्यांच्यासमोर संकट उभे राहिले. त्यांच्या पराभवाची चिन्हे दिसू लागताच त्यानी आमोणेच्या बेताळाला साकडे घातले. बेताळ त्यांच्या हाकेला धावला आणि त्यांची संकटमुक्ती झाली. परंतु त्या धामधुमीदरम्यान दसर्‍याचा मुहूर्त टळला. म्हणून तो कार्तिक महिन्यात साजरा केला जातो. या दसर्‍याच्या उत्सवात पूजा, आरत्या, कीर्तन, महानैवेद्य, नृत्य-गायने होतात. हे सर्व विधी बेताळाच्या मंदिरात पार पडतात. पाचव्या रात्री रवळनाच्या देवळात असलेला बेताळाचा घोडा बेताळाच्या मंदिरात आणून तो सजवितात व त्यावर बेताळाला बसवून मखरोत्सव साजरा केला जातो. नवव्या दिवशी शांतादुर्गेची जत्रा भरते. दहाव्या दिवशी संध्याकाळी बेताळाचे सजविलेले तरंग देवळासमोरील अंगणात नाचविले जाते. आपट्याची पूजा करून सोने लुटतात. नंतर शांतादुर्गेचा कळस आणि तरंग आपापल्या मूळ स्थानी मिरवणुकीने परतते. दुसर्‍या दिवशी दिवजोत्सव होऊन दसर्‍याची समाप्ती होते.
छोट्याशा गोव्यातील नवरात्र आणि दसर्‍याची ही विविध रूपे होत. याशिवाय छोट्या-मोठ्या गावांतून याहूनही वेगळ्या प्रथा-परंपरा आपणास अनुभवायला मिळतील. नवरात्र आणि दसरा म्हणजे आजच्या गोमंतकीय समाजाला फक्त गरबा आणि दांडियाची झिंग चढलेली असताना आपल्या पूर्वापार चालत आलेल्या सांस्कृतिक परंपरेची आठवण करून देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.