कासारवाडा-खोर्ली येथील जागृत देवस्थान श्री देवी सातेरी

0
151

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

श्री देवी सातेरीच्या मंदिरात व प्रांगणात साजर्‍या होणार्‍या उत्सवांची परंपरा आणि इतिहास हा मनोवेधक तर आहेच, पण त्याचबरोबर तो आजच्या युवापिढीसाठी आणि पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शकही आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये!

रात्रीच्या प्रहराला सुरुवात झाली होती. भास्कर अस्ताला गेला होता. वळणवाटेवरील पुढील वळण पार करण्यापूर्वी विश्रांती घेणे आवश्यक होते. इष्ट मुक्कामी पोचायला आणखी बरीच वळणं पार करावी लागणार होती. म्हणून जवळच्याच एका वृक्षाची डहाळी तोडून घेतली आणि वृक्षाच्या बुंद्याकडील जागा साफ करून तिथंच थोडासा पहुडलो. बसल्या ठिकाणाहून पुन्हा एकदा श्री विठ्ठल-रखुमाईच्या मंदिर परिसरातील विठ्ठलवाडीकडं लक्ष गेलं आणि तेथील युवावर्गाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा व संगीत क्षेत्रांतील योगदानाची आठवण झाली.
बालपणी या देवस्थानच्या प्रांगणातील रंगमंचावर वाड्यावरील बुजुर्ग कलाकारांनी सादर केलेल्या नाटकांचा आस्वाद घेतला होता. त्या नाटकाची जागा आज ऑर्केस्ट्रा व दशावतारी नाटकांनी घेतल्याचं दृश्य पाहावं लागतं. तरीसुद्धा वाड्यावरील युवापिढी देवस्थानच्या कारभारात सक्रिय सहभाग घेऊन विविध प्रकारच्या स्पर्धा, धार्मिक उत्सव मोठ्या उमेदीने साजरे करीत असतात ही एक सुखावह व आशादायक गोष्ट आहे. आजचा तरुण चुकीच्या मार्गाने चालला आहे, वाहवत चालला आहे, व्यसनात बुडाला आहे अशा प्रकारच्या तक्रारी वडीलधार्‍यांकडून सतत कानी पडत असताना विठ्ठलवाडीतील युवक श्री विठ्ठल-रखुमाईच्या चरणी लीन होऊन योग्य दिशेने वाटचाल करीत आहेत, ही दिलासादायक बाब होय.
विठ्ठलवाडीतील युवावर्गाचे योगदान
विठ्ठलवाडीतील युवकांनी गेल्या काही वर्षांपूर्वी एकत्र येऊन ‘विठ्ठलवाडी युवा असोसिएशन’ या एका सांस्कृतिक संस्थेची स्थापना केली आहे. गेली चाळीस वर्षे श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानातील कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी वाड्यावरील युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा ही सांस्कृतिक संस्था आयोजित करते. त्यात ‘रांगोळी स्पर्धा’, ‘आकाशकंदील स्पर्धा’, ‘नवरा सजावट स्पर्धा’, ‘वेशभूषा स्पर्धा’ आदी स्पर्धांचा व कीर्तन महोत्सवाचा समावेश असतो. वाड्यावरील घरोन्‌घर या स्पर्धेत सहभागी होत असते. या स्पर्धांना दर्शकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
विठ्ठलवाडीतील युवकांनी ‘विठ्ठलवाडी युथ असोसिएशन’प्रमाणे ‘श्री विठ्ठल-रखुमाई कला व संस्कृती मंडळ’ स्थापन करून या वॉर्डमधील नगरसेवक व कार्यकारी मंडळाचे एक पदाधिकारी श्री. तुषार ह. टोपले यांच्या नेतृत्वाखालील समितीने इ.स. २०१५ व २०१६ मधील फेब्रुवारी महिन्यात तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. महाराष्ट्राच्या विविध भागांतील कीर्तनकार व गोमंतकातील बालकीर्तनकार यात सहभागी झाले होते. याशिवाय ‘श्री विठ्ठल-रखुमाई घुमट आरती मंडळ‘ स्थापन करून दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘अखिल गोवा घुमट आरती स्पर्धा’ आयोजित केली जात आहे. त्याचप्रमाणे १५ ते २३ वर्षे वयोगटातील वाड्यावरील युवक या मंडळातर्फे गोव्यात आयोजित करण्यात येणार्‍या ‘घुमट आरती स्पर्धे’मध्ये सहभागी होऊन पारितोषिकेही मिळवत असतात. कोजागिरी पौर्णिमेला इतर कार्यक्रमांबरोबरच महिलांसाठी ‘दीपपूजा’ कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. हल्लीच देवस्थानच्या- इ.स. १९२६ मध्ये स्थापन झाल्यापासून इ.स. २०१६ पर्यंत- कार्यकारिणीवर काम केल्याबद्दल आजी-माजी पदाधिकार्‍यांचा सत्कार घडवून आणून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिवाय देवस्थानच्या स्थापनेस ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘शतकलशार्चन महाभिषेक‘ १०० यजमानांकडून करून घेण्यात आला होता.
या ठिकाणी आणखी एक नमूद करण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे, कार्तिकी एकादशी वगळता इतर उत्सवांच्या वेळी श्री विठ्ठल-रखुमाईची लालखी नगरप्रदक्षिणेला निघते तेव्हा नव्याने बनवलेल्या रथावरून नवीन लालखीतून मिरवणूक काढली जाते. परंतु कार्तिकी एकादशीच्या उत्सवाच्यावेळी जेव्हा श्री विठ्ठल-रखुमाईची लालखी नगरप्रदक्षिणेला निघते तेव्हा ती जुन्या रथावरून आणि जुन्या लालखीतून काढली जाते. याशिवाय मंदिर नूतनीकरणावेळी मुख्य दरवाजावर उभारलेल्या नगारखान्यातून रोज सकाळी ७ वा. व संध्या. ७ वा. नगारा वाजवण्यात येतो. नगारा वाजवण्यासाठी आज वाजंत्री मिळत नसल्यामुळे विजेवर चालणारा नगारा वाजवला जातो.
बालपणीच्या या आठवणी डोक्यात रुंजी घालत असतानाच मी झोपेच्या अधीन कधी झालो हे कळलंच नाही.
दुसर्‍या दिवशी पहाटे रविकिरणांच्या हलक्याशा स्पर्शाने जाग आली. सारा आसमंत प्रकाशानं उजळून निघाला होता. उठून बसून आजूबाजूला नजर टाकली तेव्हा एक दहा-बारा पावलांवर खळाळत वाहणारा निर्झर दिसला. निर्झराच्या थंडगार पाण्यानं मुखमार्जन केलं आणि त्याच वृक्षाखाली बसून सूर्याचं कोमल ऊन अंगावर घेत पुन्हा एकदा पायथ्याशी नजर टाकली.
कासारवाडा- खोर्ली परिसरातील श्री देवी सातेरी संस्थान
म्हापसानगरीच्या पश्‍चिम, दक्षिण व उत्तर सीमेवर हिरव्यागार वृक्षवल्लीची शाल पांघरलेले डोंगर दृष्टिपथात येत होते. या डोंगराच्या अंगावरील याच वनराईतून डोकं वर काढणारा मंदिराचा नक्षीदार गोलाकार घुमट दिसत होता. डोंगराच्या उतरणीवर वसलेल्या म्हापसानगरीच्या सात वाड्यांपैकी ‘कासारवाडा’ (सध्याचा खोर्ली परिसर) हा एक वाडा आणि याच खोर्ली परिसरातील हे श्री देवी सातेरी संस्थानचे नक्षीदार आणि दिमाखदार मंदिर! तसं पाहिल्यास समजू लागल्यापासून खोर्ली परिसर आणि या परिसरातील श्री सातेरी देवीचे मंदिर यांची ओळख आणि परिचय झालेला. पुढचा पल्ला गाठायचा आहे हे ध्यानात असूनही देवस्थानच्या इतिहासात डोकावल्याशिवाय मला राहवेना!
कासारवाडा- खोर्ली येथील श्री देवी सातेरी संस्थान हे पुरातन असून ते तेराव्या किंवा चौदाव्या शतकात अस्तित्वात आलं असावं असा कयास आहे. आमचे एक सन्मित्र कवी आणि शिक्षकी पेशातील एक सहकारी कै. सुदाम जयदेव मोटे यांनी श्री देवी सातेरी संस्थानचा ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करून बरीच माहिती गोळा केली होती. ही असामी मग कधीतरी गप्पांच्या ओघात श्री देवी सातेरी संस्थानची सारी माहिती आम्हाला ऐकवायचे. त्याचबरोबर मधल्या पिढीतील आमचे मित्र आणि पत्रकार श्री. नारायण राठवड जे गेली अनेक वर्षे देवस्थानच्या कार्यकारी समितीवर कार्यरत आहेत. तसेच देवस्थानच्या शिशिरोत्सवात विविध प्रकारे आपले योगदान देणारे श्री. पांडुरंग गणेश कोरगावकर, नाट्यलेखक व दिग्दर्शक श्री. महाबळेश्‍वर रेडकर, श्री. श्यामसुंदर पेडणेकर, श्री. गोपाळ राऊळ, श्री. उमेश धावस्कर, श्री. पांडुरंग वराडकर, श्री. नारायण कारेकर, श्री. निशिकांत साळगावकर, श्री. दिनेश पानकर, श्री. विकास लांजेकर, ऍड. निशिकांत शिंदे, श्री. शिवदास चिबडे, श्री. सचिन मोरजकर, श्री. सुनील च्यारी आदी देवस्थानच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेली माहिती माझ्या ज्ञानभंडारात भर घालणारीच होती याचा याठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो. श्री देवी सातेरीच्या मंदिरात व प्रांगणात साजर्‍या होणार्‍या उत्सवांची परंपरा आणि इतिहास हा मनोवेधक तर आहेच, पण त्याचबरोबर तो आजच्या युवापिढीसाठी आणि पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शकही आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये!
या लेखमालेत यापूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे ‘म्हापसे’ शहर सात वाड्यांमध्ये (विभाग) विभागले गेले होते. या सात वाड्यांपैकी म्हापसे शहराच्या पश्‍चिम दिशेला असलेल्या विभागाला ‘कासारवाडा’ या नावाने ओळखले जात असे. या वाड्यावर महिला हातात घालतात त्या काचेच्या बांगड्या बनवणारे व तांब्या-पितळेची भांडी घडवणारे कारागीर प्रामुख्याने वास्तव्यास होते. या कारागीर समाजाला ‘त्वष्टा कासार समाज’ असं म्हणत. तिन्ही बाजूनी हिरवीगार मखमलीची शाल ल्यालेल्या डोंगरांच्या कुशीत विसावलेला सदर भाग ‘कासारवाडा’ किंवा ‘खोर्ली’ या नावाने परिचित आहे. आज हा वाडा फक्त त्वष्टा कासार समाजापुरताच मर्यादित राहिलेला नसून अठरा पगड जाती-धर्माचे लोक या वाड्यावर वास्तव्य करून आहेत. पश्‍चिम व उत्तर दिशेकडील डोंगरउतरणीवर परप्रांतीय व स्थानिकांनी उभारलेली बेकायदेशीर पक्की घरं व झोपड्या वगळता या खोर्ली-कासारवाड्याचं स्वरूप आजही तसंच आहे. म्हापसे शहराच्या पश्‍चिम दिशेच्या टोकाला असलेल्या या वाड्यावरच श्री देवी सातेरी देवस्थानचे सुंदर आणि सुबक असे मंदिर उभे आहे.
श्री देवी सातेरी संस्थानच्या इतिहासाला पुन्हा झळाळी
योगायोगाची गोष्ट पाहा! ज्या परिसरात आणि ज्या स्थळी श्रीदेवी सातेरीचे मंदिर आहे तो परिसर म्हणजे म्हापसानगरीतील सात वाड्यांपैकी एक ज्याला ‘कासारवाडा’ म्हणतात. या वाड्याला ‘कासारवाडा’ असं नामाभिधान करण्याचं कारण म्हणजे, या वाड्यावर तांब्या-पितळेची भांडी घडवण्याबरोबरच बायका हातात घालतात त्या काचेच्या बांगड्या विकण्याचा व्यवसाय करणार्‍या ‘त्वष्टा कासार समाजा‘च्या कुटुंबांचा जास्त भरणा आहे. या समाजातील भांडी घडवणारे कारागीर जुन्या भांड्यांना नव्याने झळाळी देण्याचंही काम करतात.
मग मनात येतं की, जुन्या भांड्यांना नव्यानं झळाळी देणार्‍या कारागिरांप्रमाणेच जुन्या पिढीतील ज्येष्ठांकडून श्री देवी सातेरी देवस्थानच्या इतिहासाची आणि उत्सवांसारख्या सांस्कृतिक परंपरेची जी माहिती सांगितली जाते त्यावरून देवस्थानच्या इतिहासाबरोबरच सांस्कृतिक परंपरेला पुन्हा एकदा नव्याने झळाळी देण्याचे काम केले जाते यात कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही.
श्री देवी सातेरीची प्रार्थना
याच श्री देवी सातेरी देवस्थानाबद्दल जे वाचलं, जे ऐकलं, जे पाहिलं त्या ‘श्री’च्या चरणी माझी ही शब्दसुमनांची ओंजळ अर्पण करताना मला मनस्वी समाधान आणि आनंद होत आहे. श्री देवी सातेरीची प्रार्थना येथे उद्धृत करून देवस्थानच्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो.
श्री सातेरीची प्रार्थना
दुर्गे स्मृता हरसिभीतिम् अशेषजन्तोः|
स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभांददासी॥
दारिद्य्र दुःख भय हारिणी का त्वदन्या|
सर्वोऽपकार करणाय सदाद्रिचित्ता॥
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके|
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते॥