गोव्याला ब्रिक्स परिषदेचे वेध

0
128

येत्या १५ व १६ ऑक्टोबरला ‘ब्रिक्स’ देशांची आठवी परिषद गोव्यात होत असून त्याची जोरदार तयारी सध्या चालली आहे. गोव्यातील या परिषदेचे बोधवाक्य ‘बिल्डिंग रिस्पॉन्सिव्ह, इन्क्लुझिव्ह अँड कलेक्टिव्ह सोल्युशन्स (ब्रिक्स)’ किंवा ‘प्रतिसादात्मक, सर्वसमावेशक व सामूहिक उपायांची निर्मिती’ असे आहे. 

गोव्यातील येत्या परिषदेमध्ये ब्रिक्स देशांशी भारत सामाजिक सुरक्षाविषयक करार करणार असून गेले दोन दिवस दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या मजूरविषयक परिषदेमध्ये सर्व देशांचे त्याबाबत एकमत झाले आहे. हे करार प्रत्यक्षात उतरल्यास ब्रिक्सच्या घटक राष्ट्रांतील कामगारवर्गास त्याचा लाभ मिळेल.
शेतीसंदर्भातही एक संशोधन केंद्र स्थापन करण्याचे पाऊल गोव्यातील परिषदेत उचलले जाणार आहे. ब्रिक्स राष्ट्रांमधील कृषीविषयक सहकार्यासंदर्भात कृषीमंत्र्यांची जी परिषद अलीकडेच झाली, त्यात तसा निर्णय झालेला आहे. २०२१ पर्यंत हे ब्रिक्स देशांचे कृषी संशोधन केंद्र प्रत्यक्षात येईल. ‘ब्रिक्स’ देश जगातील ४५ टक्के कृषी उत्पादन करतात.
भारतापाशी ‘ब्रिक्स’ चे अध्यक्षपद फेब्रुवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळासाठी आहे. भारताने आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत पाच उद्दिष्टे समोर ठेवली असून त्या अनुषंगाने गोव्यातील येत्या परिषदेत चर्चा होणार आहे. ‘ब्रिक्स’ सहकार्य अधिक सखोल, सातत्यपूर्ण व्हावे यासाठी त्याला संस्थात्मक रूप देणे, मागील परिषदांच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, सध्याच्या सहकार्य यंत्रणेचे एकात्मिकरण करणे, नावीन्याचा अवलंब किंवा सहकार्याची नवी पावले उचलणे आणि सध्याच्या सहकार्याच्या यंत्रणेत सातत्य राखणे अशी पाच उद्दिष्टे निश्‍चित करण्यात आली आहेत.
गोव्याने या परिषदेच्या आयोजनाचे आव्हान संधीत रूपांतरित केले आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सांगितले. या परिषदेच्या निमित्ताने गोव्याची ओळख जगाला घडविता येईल असे ते म्हणाले.
वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांशी मुख्यमंत्र्यांनी परिषदेच्या आयोजनासंदर्भात वार्तालाप केला. या परिषदेला अकरा देशांचे राष्ट्रप्रमुख येणार असून जगाच्या जवळजवळ ४० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व ते करीत आहेत. त्यांच्यासमोर आपण गोव्याची जी प्रतिमा निर्माण करू ती ते जगभर पोहोचवतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुरगाव, सासष्टीतील विद्यालयांना
परीक्षांसंदर्भात निर्देश जारी

>> ४ ते १७ ऑक्टो.पर्यंत परीक्षा नको
ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर येत्या ४ ते १७ ऑक्टोबर या दरम्यान सासष्टी व मुरगाव तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालये व माध्यमिक विद्यालयांनी परीक्षा घेऊ नयेत, असा आदेश काल शिक्षण संचालक गजानन भट यांनी जारी केला. पर्वरी येथे घेतलेल्या बैठकीतून या तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांचे प्राचार्य व माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना हा आदेश देण्यात आला.
वाहतुकीची कोंडी झाल्यास समस्या निर्माण होईल म्हणून हा ओदश देण्यात आला आहे. दरम्यान, ६ ते १८ ऑक्टोबर या दरम्यान सरकार ब्रिक्स परिषदेसाठी २७३ वाहने भाड्याने घेणार आहे. त्यात १०५ इनोव्हा, ४० बसगाड्या, सुमो व अन्य वाहनांचा समावेश असेल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
शाळांची साफसफाई
दरम्यान, १ व २ ऑक्टोबर या दरम्यान राज्यातील शाळांनी आपली शाळा व समोरचा परिसर याची साफसफाई करावी, अशी सूचना शाळांना करण्यात आली आहे. नंतर या शाळांमधून स्वच्छ व सुंदर शाळांची निवड करण्यात येणार आहे.

‘ब्रिक्स’च्या आयोजनासाठी
सरकार सज्ज : मुख्यमंत्री
गोव्यात होणार्‍या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी राज्य सरकार पूर्णपणे सज्ज असून ही परिषद गोव्यासाठी पर्यटन, उद्योग, दळणवळण व साधनसुविधा विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण संधी उपलब्ध करून देणार असल्याचा विश्‍वास काल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथे व्यक्त केला.
ब्रिक्स परिषदेसंदर्भात राज्य प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर मुख्यमंत्री पार्सेकर यांनी चर्चा केली. ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेल्या या परिषदेचे आयोजनस्थळ म्हणून केंद्र सरकारने गोव्याची निवड करणे, ही जशी या राज्यासाठी सन्मानजनक बाब आहे, तशीच ही गोष्ट आव्हानात्मक देखील आहे. आपल्या सरकारने हे आव्हान समर्थपणे स्वीकारले असून परिषद यशस्वी करण्यासाठी काटेकोरपणे लक्ष दिले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
परिषदेदरम्यान राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन पोलीस दलाने केले असल्याची माहिती त्यांनी दिली. ब्रिक्स परिषदेत सहभाग घेणार्‍या देशांची जागतिक लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकसंख्या आहे, अशाप्रकारे मोठी लोकसंख्या असलेल्या देशांसमोर गोव्याला सादर करण्याची महत्वपूर्ण संधी ब्रिक्स परिषदेच्या माध्यमातून मिळाली आहे.
या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्‍वास पार्सेकर यांनी व्यक्त केला. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ही परिषद गोव्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिक्स परिषद १५-१६ ऑक्टोबर या दरम्यान गोव्यात आयोजित केली जाणार असली तरी या परिषदेच्या दरम्यान राज्यात उपलब्ध केल्या जाणार्‍या साधनसुविधा व दळणवळण सुविधा बराच काळ लोकांच्या वापरात येणार आहेत.