‘सार्क’ परिषद लांबणीवर?

0
87

पाकिस्तानमधील आगामी ‘सार्क’ परिषदेवर भारतासह चार सदस्य देशांनी बहिष्कार घातला असला तरी यजमान पाकवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नसून येत्या नोव्हेंबरमध्ये या परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय या देशाने घेतला आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते नफिस झकारिया यांनी या वृत्तास दुजोरा दिल्याची माहिती रेडिओ पाकिस्तानने दिली. मात्र, चार देशांच्या बहिष्कारामुळे परिषद लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

भारतीय विदेश मंत्रालयाने पाकिस्तानमधील सार्क परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे ट्विट केले असून हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया झकारिया यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण आशियाई देशांमधील शांततेसाठी पाकिस्तान वचनबध्द असून या देशांमधील लोकांच्या हितासाठी पाकिस्तान कार्यरत राहील असे झाकारिया यांनी म्हटल्याची माहिती रेडिओ पाकिस्तानने दिली आहे.

सार्क परिषद पुढे ढकलण्याची भारताची मागणी

नवी दिल्ली ः ‘सार्क’ परिषदेच्या आठ सदस्य देशांपैकी ४ सदस्यांनी पाकमधील परिषदेवर बहिष्कार घातल्याने ही परिषद पुढे ढकलावी अशी मागणी भारताने काल केली. तथापि भारताचे विदेश व्यवहार खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी याबाबतची औपचारिक घोषणा नेपाळतर्ङ्गे केली जाईल असे म्हटले आहे.
पाकमधील परिषदेचे अध्यक्षपद नेपाळकडे आहे. या परिषदेच्या नियमानुसार एखाद्या सदस्य देशाच्या प्रमुखाने परिषदेतून माघार घेतल्यास परिषद पुढे ढकलावी लागते.