राजनैतिक चर्चेतून मतभेद मिटवा

0
94

>> अमेरिकेचा भारत – पाकिस्तानला सल्ला

 

अमेरिकेने भारत व पाकिस्तानला त्यांच्यातील मतभेद हिंसाचाराचा मार्ग न अवलंबिता राजनैतिक चर्चेतून सोडविण्याचा सल्ला दिला आहे. व्हाईट हाऊसचे प्रसार माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी यासंबंधीच्या एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, आम्ही भारत व पाकिस्तान यांना त्यांच्यातील मतभेद सोडविण्यासाठी हिंसाराचा मार्ग सोडून राजनैतिक पातळीवरून उपाययोजना आखण्यासाठी आतापर्यंत प्रोत्साहन दिले आहे. ‘आम्ही हिंसाचाराचा व खास करून दहशतवादी हल्ल्यांचा नेहमी निषेध केला आहे’ असे त्यांनी यावोळी स्पष्ट केले.
पाकिस्तानी सीमेवरून भारतीय भूमीवर सातत्याने होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांमुळे भारताने पाकमधील सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याविषयी प्रश्‍न केला असता अर्नेस्ट यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र भारताच्या या निर्णयावर स्पष्ट वक्तव्य भारत सरकारच करू शकेल अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या विदेश व्यवहार खात्याचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी दिली. ‘आम्ही अनेक वेळा जाहीरपणे म्हटले आहे की आम्हाला भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध सर्वसाधारण झालेले हवे आहेत.’ असे टोनर म्हणाले.
हे प्रत्यक्ष घडल्यास भारतीय उपखंडाला त्याचा लाभ होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. जे दहशतादी गट पाकिस्तानच्या शेजारी देशांमध्ये दहशतवादी कारवाया करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचा आमचा सतत प्रयत्न राहिला आहे असेही टोनर यांनी यावेळी स्पष्ट केले. उभय देशांमधील संबंध पूर्ववत होणे ही या देशांच्या हिताचे असल्याचेही ते म्हणाले.