वादे वादे…

0
135

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे रंग भरू लागले आहेत. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यातील संघर्ष आता अटीतटीच्या टप्प्यावर आलेला दिसतो. नुकतीच जी राष्ट्राध्यक्षीय वादविवादाची पहिली फेरी पार पडली, त्यामध्ये दोघांनी एकमेकांविरुद्ध उपहास, उपरोधाने खच्चून भरलेली जी शेरेबाजी केली, एकमेकांच्या धोरणांची जी खिल्ली उडवली, त्यातून या निवडणुकीत येणार्‍या काळात काय वाढून ठेवले आहे याची पुरेपूर चाहूल लागते. वास्तविक राष्ट्राध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार अशा प्रकारे जाहीर वादविवादासाठी एकत्र येणे ही बाब अमेरिकेतील प्रगल्भ लोकशाहीची निदर्शक आहे. असेच आणखी दोन वादविवाद येणार्‍या काळात नऊ ऑक्टोबरला आणि एकोणिस ऑक्टोबरला अनुक्रमे सेंट लुईस आणि नेवाडामध्ये होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातील या वादविवादामध्ये अर्थकारणापासून विदेश नीतीपर्यंतच्या एकमेकांच्या धोरणांमधील त्रुटी दाखवणे अपेक्षित होते, परंतु दोघांचाही अधिक भर हा एकमेकांवर वैयक्तिक हल्ले चढवण्यात आणि एकमेकांना वरचढ शेरेबाजी करण्यावर दिसून आला. डोनाल्ड ट्रम्प यांचे एकंदर वागणे – बोलणे पाहिले तर त्यामध्ये बेताल आणि बेफामपणाच अधिक दिसतो. त्या तुलनेत हिलरींचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भतेकडे झुकणारे आहे, परंतु अमेरिकी मानसिकता लक्षात घेता दोन्ही प्रकारची माणसे त्या देशात असल्याने दोन्ही उमेदवारांना जोरदार समर्थनही आहे. ट्रम्प आणि हिलरी यांच्यातील या शाब्दिक हल्ल्या – प्रतिहल्ल्यांमागे एक प्रकारचा विखारही भरलेला दिसून आला. ट्रम्प यांनी प्राप्तिकर भरला नव्हता किंवा ते आपल्या कंत्राटदारांना पैसे देण्यात टाळाटाळ करतात किंवा हिलरी यांच्यापाशीे दीर्घ काळ काम करण्याची क्षमता नाही अशी टीका करताना किंवा टोमणे मारताना एकमेकांची वैयक्तिक उणीदुणी काढण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा या वादविवादाच्या एकंदर पातळीबद्दल भुवया उंचावल्या गेल्या तर नवल नाही. ट्रम्प यांनी आपल्या स्वभावानुरूप हिलरी यांच्या बोलण्यात सतत व्यत्यय आणला, त्यांचा आवाज अनेकवेळा चढा राहिला, तर दुसरीकडे हिलरी यांना त्यांच्यावरील हल्ले परतवून लावणे अवघड गेल्याने केविलवाणे हास्य मुखावर पसरून राहिले. हे झाले देहबोलीबाबत, परंतु एकमेकांच्या धोरणांसंदर्भात दोघांनी जी चिरफाड केली, तीही विदारक होती. एक लक्षात घेणे आवश्यक आहे, ते म्हणजे या दोघांमधून उद्या अमेरिकेसारख्या महाबलाढ्य देशाचा सर्वसत्ताधीश निवडला जाणार आहे. ज्याच्यापाशी जगाचा विनाश घडवू शकणार्‍या महासंहारक अण्वस्त्रांची कळ असेल, ज्याच्यापाशी जागतिक राजकारण, अर्थकारण यामध्ये उलथापालथ घडविण्याची क्षमता असेल. अशा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार्‍या व्यक्तीच्या वागण्या – बोलण्यामध्ये अधिक जबाबदारपणा, अधिक प्रगल्भता दिसणे आवश्यक आहे. हिलरी ओबामांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. ट्रम्प हे प्रथितयश उद्योगपती आहेत, परंतु जेव्हा राष्ट्राध्यक्षपदाची पायरी त्यापैकी एक व्यक्ती चढेल, तेव्हा जगातील ती एक सर्वशक्तिमान व्यक्ती बनलेली असेल. अमेरिकी जनता निवड करण्यास समर्थ आहे, परंतु केवळ अमेरिकेचे हित सांभाळणे नव्हे; या जगाच्या कल्याणाचा कोणता रोडमॅप या मंडळींपाशी आहे हे त्यांनी सांगणे आवश्यक आहे, कारण शेवटी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष हा जागतिक घडामोडींची दिशा ठरवीत असतो. या निवडणुकीचा टप्पा येईपर्यंत दोन्ही उमेदवारांना आपल्या शिरावर केवढी मोठी जबाबदारी येणार आहे याचे भान येईल अशी आशा आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः असे या चर्चेतून दिसले नाही हे मात्र खरे!