योगसाधना – २७५ योगमार्ग – राजयोग ईश्‍वर प्रणिधान – ६

0
123

– डॉ. सीताकांत घाणेकर

भारतीय संस्कृतीत भगवंताबरोबर भक्तालाही फार महत्त्व आहे. म्हणूनच विविध संतांना देवस्वरूप मानले जाते. श्रीमद्भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात… माझ्या भक्ताचे भक्त ते मला सर्वांत अधिक प्रिय वाटतात. पंढरपुरात विठ्ठलाच्या गजराबरोबर संतांच्या नावाचा गजरही सतत व भावपूर्ण मनाने केला जातो. … निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम… 

भारतीय संस्कृतीत भगवंताची अनेक नावे व रुपे आहेत. प्रत्येक देवाबद्दल काहीतरी तत्त्वज्ञान आहेच. या विषयांवर थोडा थोडा अभ्यास करणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे भगवंताबद्दल कुतूहल जागृत होते. मग प्रेम वाढते. भाववृद्धी होते. तद्नंतर त्या देवाची पूजा किंवा उत्सव फक्त कर्मकांडं राहात नाही. त्याबद्दल चिंतन सुरू होते. तो देव मग फक्त मनात व बुद्धीत न राहता सरळ भक्ताच्या हृदयात प्रवेश करतो. संतांची चरित्रे अभ्यासली तर हे सहज लक्षात येते. कुठल्याही साधनेत असे घडणे अत्यावश्यक आहे.
भारतात प्रत्येक देवाचे विविध उत्सव आहेत. सगळेच उत्सव आनंद देतात, उत्साह वाढवतात. पण एक उत्सव सर्व लहानथोरांनाही अत्यंत आवडतो – भारतात अन् परदेशातही – तो म्हणजे हल्लीच भाद्रपद महिन्यात साजरा केलेला गणेशोत्सव!
गणपतीला सगळीकडे इष्ट दैवत म्हणून मानतात. लोकमानसावर अत्यंत प्रभाव असलेला हा देव आहे. कुठल्याही शुभकार्याच्या आधी गणेशपूजा करणे बंधनकारक आहे. गणपतीला वेगवेगळी नावे आहेत- विनायक, लंबोदर, एकदंत, गजानन, विद्याधर, विघ्नहर्ता, वक्रतुंड, गणेश, गणराज… या प्रत्येक नावामध्ये गर्भितार्थ आहे. आध्यात्मिक अर्थही आहे. या प्रत्येक नावावर लक्षपूर्वक व बुद्धीने विचार व चिंतन केलं तर ही सर्व नावे किती महत्त्वपूर्ण आहेत व आमच्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक अशी सर्व नावे एकाच देवाला दिली हे लक्षात येते.
प्रत्येक नावाचा अभ्यास केला तर गणपतीच्या विविध गुणांवरून ती आलेली आहेत, हे लक्षात येते. यामुळे खर्‍या भक्ताच्या मनातील भाव वाढतो. मग असे हे गुण आपल्या जीवनात यावेत असे वाटायला लागते. सर्वांनाच असे वाटते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. पण जीवनविकासासाठी असे वाटणे आवश्यक आहे.
अशा या विविध गुणांमुळेच गणपतीला १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती मानतात. तो गणांचा पती आहे. तो सुखकर्ता तसाच दुःखहर्ता व विघ्नहर्ता आहे. तो रंगदेवता आहे, रणांगणातील उत्कृष्ट योद्धा आहे. राजकारण पटू आहे. तो बुद्धिदाता आहे. या बुद्धीची आपण मागणी त्याच्याकडे करतो पण त्याचबरोबर प्रयत्न, कष्ट व सत्कर्म अभिप्रेत आहेत.
आमच्या लहानपणी आम्हाला गणपतीबद्दल सुंदर कथा ऐकायला मिळत. जास्त करून दिवेलागणीच्या वेळी म्हणजे तिन्हीसांजेला सर्वजण प्रार्थनेला बसत, तेव्हा. तशा सर्वच कथा आनंददायक आहेत. पण एक गोष्ट जी गणपतीच्या बुद्धीबद्दल सांगितली जाते ती मला फार आवडते. ती कथा अशी…
* गणपतीचा मोठा भाऊ कार्तिकेय. सगळेचजण गणपतीला बुद्धीमान मानतात म्हणून त्याला राग यायचा. ही गोष्ट शंकर-पार्वतीच्या लक्षात आली. त्यांनी दोघा मुलांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी दोघा मुलांना तीन पृथ्वीप्रदक्षिणा करून यायला सांगितले. जो प्रथम येईल तो जिंकणार. गणपतीचे वाहन उंदीर व कार्तिकेयाचे वाहन मोर. कार्तिकेयाला वाटले की ही शर्यत मीच जिंकणार! असे वाटणे साहजिक आहे. कारण उंदराची गती ही काय? मोर तर उडतच जाणार. कार्तिकेय पृथ्वीप्रदक्षिणेला निघाला. गणपती तिथून हलेना. तो विचारात पडला. तो आपल्या बुद्धीला चालना देत होता. त्याला एक सुंदर युक्ती सुचली. त्याने आईवडिलांना नमस्कार केला व त्यांना प्रदक्षिणा घालायला लागला. त्याच्या प्रदक्षिणा चालू असताना कार्तिकेय वरून प्रदक्षिणा काढतच होता. त्याला आश्‍चर्य वाटले कारण त्याचा भाऊ तिथेच कैलासावरच होता. मग हा काय शर्यत जिंकणार?
तीन प्रदक्षिणा झाल्यावर कार्तिकेय परत आला तर गणपती तिथेच आईवडिलांना नमस्कार करून बसलेला. तो हसतच त्याला वेडावू लागला. त्याची मस्करी करू लागला. पण आईवडिलांनी सांगितले की तू हरलास व गणपती शर्यत जिंकला आहे. त्याला राग आला. वाटले की रोजच्याप्रमाणे आपल्यावर अन्याय होतोय. त्याने आईवडलांना त्याबद्दल जाब विचारला. त्यांनी सांगितले की गणपतीच त्याबद्दल खुलासा करेल.
गणपती म्हणाला, ‘‘जशी पृथ्वी आपली माता आहे तशी आपली पार्वतीआई देखील माताच आहे. त्याचप्रमाणे आपले माता-पिता म्हणजेच पूर्ण ब्रह्मांड आहे. म्हणून मी आपल्या आई-वडिलांना प्रदक्षिणा घातली.’’
गणपतीने् दिलेले हे उत्तर ऐकून कार्तिकेयाला पटले की आपल्या या छोट्या भावाला बुद्धिमान कां मानतात?…
आता अशा कथांमधील सत्यासत्यता बघायची नसते, तर त्यातील बोध घ्यायचा असतो. मुख्य मुद्दा हा की आम्हाला त्या वेळेला फार गंमत वाटायची व त्याचबरोबर गणपतीबद्दल आदर, प्रेम, श्रद्धा वाढायची. त्यामुळे गणपतीला सहज समर्पित होत असू- म्हणजेच ईश्‍वर प्रणिधान आपोआप घडत असे.
भारतीय संस्कृतीत भगवंताबरोबर भक्तालाही फार महत्त्व आहे. म्हणूनच विविध संतांना देवस्वरूप मानले जाते. श्रीमद्भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात…
* माझ्या भक्ताचे भक्त ते मला सर्वांत अधिक प्रिय वाटतात.
पंढरपुरात विठ्ठलाच्या गजराबरोबर संतांच्या नावाचा गजरही सतत व भावपूर्ण मनाने केला जातो…. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम…
* तशीच आणखी एक धुन चालते… ग्यानबा तुकाराम | ज्ञानोबा – तुकाराम. म्हणूनच तत्त्ववेत्ते म्हणतात- ‘जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला!
गणपतीच्या नावाबरोबर ‘मोरया’ हा शब्द जोडलेला आहे. ‘मोरया’ म्हणजे नमस्कार. परंतु अनेकांचे म्हणणे असे आहे की गणपतीच्या मोरेश्‍वर नावाच्या भक्ताच्या नावावरून हा शब्द घेतला आहे. इतिहासकार याबद्दल एक बोधप्रद कथा सांगतात- घटना आहे शालीवाहन शके १४११ मधील. चवदाव्या शतकात पुण्याजवळ चिंचवड गावात श्री मोरेश्‍वर गोसावी या नावाची व्यक्ती होती. त्यांची गणेशावर फार श्रद्धा होती. ते एक खास भक्त होते.
दरवर्षी मोरगावात प्रख्यात गणपती मंदिर आहे तिथे न चुकता ते जात असत. तिथे ते भक्तिभावाने गणेशाची उपासना करीत असत. वृद्धत्व आले तरी त्यांनी आपली वार्षिक वारी चुकवली नाही. एका वर्षी त्यांना ऋद्धि-सिद्धीबरोबर गणपतीचा साक्षात्कार झाला. मोरेश्‍वरांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी गणपतीला साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी देवाने त्याला म्हटले, ‘‘आता तुझे वय फार झाले आहे. दरवर्षी दूरच्या गावांतून इथे येण्यास तुला फार कष्ट होतात. तुझे हाल मला बघवत नाही. मीच तुझ्या चिंचवडला येईन. उद्या गणेशकुंडात आंघोळ करताना तुला एक ‘शेंदरी दगड’ मिळेल. त्याची प्राणप्रतिष्ठा तिथे भाद्रपद चतुर्थीला कर.’’
दुसर्‍या दिवशी तसा दगड खरोखर त्या मोरेश्‍वरला मिळाला. तो घेऊन तो मयुरेश्‍वराच्या मंदिरात गेला. भगवंताचे आभार मानले. तद्नंतर त्यांनी चिंचवडला येऊन देवाची प्रतिष्ठापना केली. तरीदेखील मोरेश्‍वर मोरगावला जात असत. काही वर्षांनंतर त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांचा मुलगा चिंतामणी. त्याने वडलांच्या समाधीस्थानी गणपती मंदिर बांधले. ते मंदिर मोरया गोसावीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मोरेश्‍वराचे कार्यसुद्धा वाखाणण्यासारखेच होते. त्यांची गणेशभक्ती, गोरगरिबांना मदत करणे सर्वांना माहीत होते. त्यांना वाटे की गणेशभक्तांना कसलीही अडचण येता कामा नये. असो. तर गणपतीचा गजर करताना आपण म्हणतो ना…
* गणपती बाप्पा मोरया…
* बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे…
काही आरत्याही या नावाने आहेत.
आज अनेक लोक अष्टविनायक यात्रा करतात. ही यात्राही मोरया गोसावींनीच सुरू केली होती, अशी नोंद आहे. यातील पहिला गणपती मोरगावातला मयुरेश्‍वर. तिथूनच ही यात्रा सुरू होते.
अशा या गोष्टींचे तात्पर्य एकच की भक्तिभावाने साधना केली तर भगवंताच्या पवित्र चरणी नक्की स्थान मिळते. असे ईश्‍वरप्रणिधान केले की योगसाधनेचा हेतू सहज साध्य होतो.
* मरावे परी कीर्तीरुपे उरावे… म्हणतात ना ते असे! आपणही यातून बोध घेऊया आणि तशी भक्ती व योगसाधना करुया.
……………………………………………………