ट्रॅफिक स्ट्रेस सिंड्रोम…

0
132

आधुनिक जीवनशैलीमध्ये गुरफटलेल्या माणसांना आजकाल खायला-प्यायला दिवसभरात वेळ मिळत नाही. तुडुंब भरून वाहणारे रस्ते आणि सततचं ट्रॅफिक जॅम यांना मात्र पावलोपावली सामोरं जावं लागतं. रोजच्या आयुष्यात सोसाव्या लागणार्‍या ताणतणावात भरगच्च वाहतुकीमुळे आयुष्यात निर्माण होणारा तणाव- हा एक महत्त्वाचा घटक आहे, हे वैद्यकीय शास्त्रानंदेखील मान्य केलेलं आहे.

रोजगारासाठी, दैनंदिन कामासाठी, शिक्षणासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी आज प्रत्येकालाच रस्त्यानं ये-जा करावी लागते. रस्ता मोठा असो वा छोटा, वाहनांची तुडुंब गर्दी, बेशिस्तीनं मध्ये घुसणारी वाहनं, दुचाकी, तिचाकी, चारचाकी गाड्यांच्या लांबलचक रांगा आणि त्यामध्ये वरचेवर होणारी वाहतुकीची कोंडी या सार्‍यांचा परिणाम गाडी चालवणार्‍या व्यक्तींवरच नव्हे, तर गाडीतील सहप्रवासी, बसेसमधील प्रवासी आणि पादचारी यांच्याही मानसिक आरोग्यावर होत असतो. याला ‘ट्रॅफिक स्ट्रेस सिंड्रोम’ असं नाव देण्यात आलं आहे.
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेव्हिड मोक्सोन यांनी याबाबत केलेल्या एका पाहणीमध्ये असं दाखवून दिलं आहे, की जगभरातल्या सर्व शहरांमध्ये दर तीन वाहनचालकांपैकी एकाला या ट्रॅफिक स्ट्रेसचा प्रसाद मिळत असतो. ट्रॅफिक जॅममध्ये तीन ते पाच मिनिटं सापडलेल्या ३३ टक्के चालकांमध्ये या विकाराची लक्षणं लगेच दिसू लागतात, असं त्यांनी या पाहणीच्या निष्कर्षांत नमूद केलं आहे.
लक्षणं ः-
१. हृदयाचे ठोके वाढून छातीत धडधडण्याचा त्रास ७ टक्के चालकांना होतो.
२. डोकं ठणकण्याचा आणि जड होण्याचा त्रास ६ टक्के चालक अनुभवतात.
३. हाताच्या तळव्यांना घाम फुटण्याचा अनुभव ५० टक्के व्यक्तींना येतो.
४. उच्च-रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये ही तीनही लक्षणं जास्त करून जाणवतात.
५. ट्रॅफिक जॅममधून बाहेर पडल्यावर गाडी चालवताना एकाग्रता भंग होऊन स्वैरपणा येण्याचा धोके पत्करत वाहन चालवलं जाण्याचा आणि छोटे-मोठे अपघात घडण्याचे प्रसंग एक टक्का लोकांमध्ये आढळून आले.
६. ३० मिनिटं किंवा जास्त काळ वाहतुकीच्या कोंडीत सापडल्यानंतर सुमारे २ टक्के लोकांना मळमळणं, गरगरणं, पोटात क्रॅम्प्स येणं अशा तक्रारी प्रकर्षानं जाणवतात.
७. वाहतुकीच्या जंजाळात रोजच अडकणार्‍या व्यक्तींपैकी जवळजवळ ८० टक्के लोकांमध्ये सतत चिडचिड होणं, पटकन राग येणं, अकारण चिंताग्रस्त होणं ही लक्षणं ध्यानात येऊ लागतात.
८. ३० टक्के व्यक्तींमध्ये त्यांच्या कामातील निर्मीतीक्षमता कमी होण्यामागे वाहतुकीचा तणाव हे प्रमुख कारण असते.
९. जे जास्त वेळ वाहन चालवतात त्यांच्यामध्ये हा तणाव जास्त निर्माण होतो.
सतत वाहनांमधून प्रवास करणं- हा आधुनिक जीवनशैलीचा परिपाक आहे. आजच्या रोजच्या जीवनातल्या असंख्य गोष्टी मानसिक आरोग्यात अगणित गुंते निर्माण करतच असतात. त्यामुळे निर्माण होणारा मानसिक तणाव हा आजचा एक ज्वलंत प्रश्‍न आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे निर्माण होणारा ट्रॅफिक स्ट्रेस त्यामध्ये रोजच्या रोज मोठी भर टाकतो. वाहनांमुळं होणारं वायुप्रदूषण, ध्वनी प्रदूषण यांचा या वाहतुकीच्या संदर्भातल्या मानसिक तणावामध्ये मोठा वाटा आहे.
उपाय ः-
आजच्या जीवनशैलीत प्रवास टाळणं ही अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे ट्रॅफिक स्ट्रेसला सामोरं जाण्यावाचून गत्यंतर नसतं. तो टाळण्यासाठी काही पर्याय शोधणं महत्त्वाचं ठरतं.
– गर्दीचे रस्ते आणि गर्दीच्या वेळा टाळणं… हा एक उपाय सुचवला जातो. पण अनेकदा कामाच्या ठिकाणी जायला पर्यायी रस्तेच नसतात. त्यामुळे हा आदर्श पर्याय फारसा उपयुक्त ठरत नाही. अशा वेळी गाडीतील म्युझिक सिस्टीमवर गाणी ऐकणं हा चांगला उपाय ठरू शकतो. आपल्या आवडीची गाणी किंवा वाद्यसंगीताची सीडी बाळगणं आणि ती शांतपणे ऐकणं यामुळे आजूबाजूच्या कोंडीचा विसर पडून मन उल्हासित राहू शकतं. दुचाकी वाहनांना हा पर्याय उपयुक्त नसतो. त्यांनी शांतपणे आपल्या श्‍वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रीत केल्यास आणि दीर्घ श्‍वसन करत राहिल्यास तणावाचं थोडंफार नियोजन होऊ शकतो.
वाहनांच्या संख्येचा अतिरेक झाल्यामुळे ट्रॅफिक स्ट्रेस सिंड्रोमचा शापही मिळाला आहे. वैयक्तिक पातळीवर सकारात्मक आणि शिस्तबद्ध रीतीनं त्यास सामोरं गेल्यास या समस्येची उकल होऊन ट्रॅफिक जॅमची कडू चव गोड होऊ शकेल.
…………………………………………………………….