बदललेली जीवनशैलीच ‘हार्टअटॅक’ला कारणीभूत

0
138

भारतासह जगातील माणसाला ‘हार्टअटॅक’ येण्यास बदललेली जीवनशैलीच कारणीभूत आहे. राज्य, भारत किंवा जगात ‘हार्टअटॅक’मुळे होणार्‍या मृत्यूची आकडेवारी उपलब्ध नसली तरी जगात हृदयरोगामुळे ४० टक्के नागरिकांचा मृत्यू होतो, तर एकूण लोकसंख्येच्या १५ ते २० टक्के हृदयरोगाचे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती तज्ज्ञ सांगतात.

सप्टेंबरचा शेवटचा रविवार हा ‘जागतिक हृदय दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी ‘वर्किंग टुगेदर हेल्दी हार्टस्’ असे घोषवाक्य असल्याचे सांगून तज्ज्ञ म्हणाले, इतर आजारांच्या तुलनेत ‘हार्टअटॅक’मुळेच जगात सर्वाधिक म्हणजेच ४० टक्के मृत्यू होतात. पूर्वीच्या आणि आजच्या जीवनशैलीमध्ये प्रचंड तफावत पाहायला मिळत आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे युवकांमध्ये कमी वयातच ‘हार्टअटॅक’चा धोका बळावला आहे. मधुमेह, रक्तदाब, तणाव या गोष्टींचा परिणाम थेट हृदयावर होतो.
जन्मजात होणार्‍या हृदयाच्या विकारांमध्ये कंजनायटल व हृुमॅटिक असे दोन प्रकारचे आजार असतात. हृुमॅटिकमध्ये हृदयावर इन्फेक्शन होतात. हे कमी स्वरूपाचे असते तर कंजनायटलेमध्ये ‘हार्टअटॅक’ होण्याचा धोका जास्त बळावतो. आजच्या जीवनशैलीवर टेंशन, जास्त आहार व व्यायाम या तीन गोष्टींचा प्रभाव आहे. याशिवाय धुम्रपानाचीही मोठी भूमिका आहे. युवकांमध्ये ‘लक्षणे’ असतात. पण, ते वेळीच लक्षात येत नाही असे नाही तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच ‘हार्टअटॅक’चा धोका युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. पूर्वी ‘हार्टअटॅक’ ४० वयोगटावरील माणसांमध्ये यायचा. आता रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याने ४० वयोगटाखालील ३० टक्के युवकांमध्ये ‘हार्टअटॅक’चा धोका संभवतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. पूर्वी शेतात शेतकरी पायी जायचे. आता मात्र घरच्या दुचाकीने शेतात जातात. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातही ‘हार्टअटॅक’ने समप्रमाणात शिरकाव केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.