काश्मीर भारताचेच राहणार : स्वप्ने पाहू नका

0
99

>> संयुक्त राष्ट्र आमसभेत भारताने सुनावले पाकला खडे बोल

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य प्रदेश असून तो कायम भारताचाच राहील. काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याचे स्वप्न पाकिस्तानने पाहू नये अशा शब्दात भारताच्या विदेश व्यवहारमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र महासंघाच्या आमसभेत खडसावले.
हिंदीतून केलेल्या भाषणात पाकिस्तानवर थेट हल्लाबोल करताना सुषमा स्वराज यांनी बलुचिस्तानमधील पाक विरोधाकडे अंगुली निर्देश केला. ‘जिनके घर शीशेके होते है वो दुसरों के घरपर पत्थर नही फेकते’ असे सांगतानाच पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बलुचिस्तानात काय चालले ते पहावे असे त्या म्हणाल्या. भारत काश्मीरात मानवाधिकारांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप नवाज शरीफ यांनी केला होता त्याला स्वराज यांनी याद्वारे उत्तर दिले.
दहशतवाद हेच सर्वात
मोठे मानवी हक्क उल्लंघन
आम्हाला दहशतवादाचा मुकाबला करायचा असेल तर आपल्याला मान्य करावे लागेल की दहशतवाद हेच मानवी हक्कांचे सर्वात मोठ उल्लंघन आहे. या अनुषंगाने विचार करताना दहशतवादाला सुरक्षित आसरा कोण देतो हे पहावे लागेल, त्यांना आर्थिक पाठबळ कोण देतो, त्यांना शस्त्रास्त्रे कोण पुरवतो हे पहावे लागेल. दहशतवादाची बीजे ज्यांनी पेरली त्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागले आहेत याकडे स्वराज यांनी लक्ष वेधले.
दहशतवादविरोधात संयुक्त
यंत्रणा उभारावी लागेल
‘एखादा दहशतवादी हल्ला हा आपल्यावरील किंवा इतरांवरील असे म्हटल्यास दहशतवाद विरुध्दाची लढाई जिंकता येणार नाही. या लढाईत विजयासाठी आम्हा सर्वांना संयुक्त यंत्रणा निर्माण करावी लागेल. एखादा देश अशा लढाईत सहभागी होत नसेल तर त्याला एकाकी पाडू या’ असे आवाहन स्वराज यांनी केले.
पाकमधून अतिरेकी
घुसखोरीचा पुरावा
पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी बहादूर अली हा भारताच्या ताब्यात आहे. पाकिस्तानमधून कायम सुरू असलेल्या भारतातील घुसखोरीचा बहादूर अली हा जिवंत पुरावा आहे, याकडे स्वराज यांनी लक्ष वेधले.

मैत्रीच्या बदल्यात मिळाले उरी, पठाणकोट !
‘आम्ही आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यास पाकिस्तानी पंतप्रधानांना निमंत्रित केले होते. त्यासाठी आम्ही निमंत्रण देण्याआधी त्यांना पूर्वअट घातली होती काय? अफगाणिस्तानमधून भारतात परतण्याआधी पंतप्रधान मोदी लाहोरला गेले. त्यासाठी त्यांनी पूर्वअट घातली होती काय?’ असे सवाल स्वराज यांनी उपस्थित केले. ‘पंतप्रधान मोदी यांच्या या मित्रत्वाच्या कृतीनंतर आम्हाला काय मिळाले? पठाणकोट? उरी? असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.