सावध खेळी

0
94

येणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांत दूरदृष्टीची खेळी सध्या मगो पक्ष खेळत असल्याचे दिसते. भाजपाशी असलेली विद्यमान युती कायम राखण्यासंदर्भात सुस्पष्ट ग्वाही देण्यात एकीकडे वेळ काढला जात आहे आणि दुसरीकडे इतरांनाही नेत्यांची नेत्रपल्लवी सुरू आहे. त्यामुळे एकाचवेळी भाजप, नरेश सावळांसारखे अपक्ष, पांडुरंग मडकईकर व बाबू कवळेकर यांच्यासारखे कॉंग्रेसचे संभाव्य बंडखोर, भाभासुमं, मराठी राजभाषा समिती या सर्वांशी सख्य दाखविण्याची चतुराई मगो नेतृत्वाने सध्या दाखवलेली आहे. मगोने आपले संख्याबळ वाढवण्याला या निवडणुकीत प्राधान्य दिलेले दिसते आणि त्या दिशेनेच त्यांची पावले पडत आहेत. शेवटी मगो हा एक राजकीय पक्ष असल्याने अनुकूल राजकीय परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न त्याने चालवला तर त्यात काही गैर म्हणता येत नाही. स्वतः ढवळीकर हे एक अनुभवी व मुरब्बी राजकारणी आहेत. वार्‍याची दिशा अचूक हेरण्यात ते वाकबगार आहेत. त्यामुळे अद्याप चित्र पुरते स्पष्ट नसताना आपले सगळे पत्ते खोलण्याचा भाबडेपणा ते कदापि करणार नाहीत. त्यांना तशी घाईही नाही. त्यामुळे मगो पक्ष सावकाशीने युतीची बोलणी सुरू करील, काही विवादित जागांवरून ती लांबवत नेईल आणि निवडणूक तोंडावर येऊन ठाकल्यावरच आपले सगळे पत्ते खोलेल असे दिसते. शिवाय यावेळी ढवळीकरांची मुख्यमंत्रिपदाची दावेदारीही त्यांनी लपवून ठेवलेली नाही. त्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व करण्याची मगोची तयारी आहे. एकीकडे भाजपाची साथ सोडायची नाही, पण दुसरीकडे जवळ येऊ पाहणार्‍यांनाही दूर लोटायचे नाही असा मध्यममार्ग त्यांनी अवलंबिला आहेे तो त्यामुळेच. म्हैसही मरू नये आणि लाठीही तुटू नये अशा प्रकारची मगो नेत्यांची सध्याची वक्तव्ये त्यांचे मनसुबे स्पष्ट करतात. मगोला भाजपाची साथ सोडायची नाही, परंतु भाभासुमंच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे. मराठी राजभाषेची मागणी त्यांना मान्य आहे. म्हणजे आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या विरोधात जे दंड थोपटून उभे आहेत, त्यांच्याशी हातमिळवणी करण्यात मगोला काहीही गैर वाटत नाही. दुसरीकडे, भाजपा आमदारांनाही आता मगोची सोबत आवश्यक वाटू लागली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जागावाटपाचा घोळ सुरळीत सुटला तर ही युती कायम राहील असे चित्र सध्या तरी आहे. मगोने गेल्या निवडणुकीतील सात जागांवरून आता किमान चौदा जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी चालवली आहे. भाजपचे २१ मतदारसंघ वगळता उर्वरित १९ पैकी १४ आपल्याला मिळावेत अशी मगोची मागणी आहे. त्यासाठी कॉंग्रेसमधील संभाव्य बंडखोरांसाठी आणि नरेश सावळांसारख्या अपक्षासाठी मगोने दारे खुली केली आहेत. परंतु दुसरीकडे आपले संख्याबळ २१ च्या वर नेणे यावेळी शक्य आहे असा आत्मविश्वास भाजपाला आहे. त्यामुळे काही जागा मगोला आयत्या आंदण देण्याची त्यांची तयारी नाही. मावीन गुदिन्होंचे विमान दाबोळीवर अडकले आहे. डिचोलीची जागा भाजपला हवी आहे. इतर ठिकाणांहूनही अशाच मागण्या पुढे होऊ लागल्या आहेत. शिवाय मगोची ताकद वाढणे भविष्यात तापदायक ठरेल व निवडणुकोत्तर त्यांची दावेदारी वाढेल याचे भानही भाजपाला आहे. त्यामुळे मगोच्या विस्तारवादावर भाजपाची बारीक नजर आहे. या परिस्थितीत कोणाचा कोणावर पूर्ण भरवसा दिसत नाही. उघडपणे घेतलेली भूमिका आणि अंतःस्थ भूमिका यामधील अंतर कधी जनतेला साध्या डोळ्यांनी दिसत नाही, पण ते असते आणि तेच निवडणुकीत निर्णायक ठरत असते हेच खरे! त्यामुळे मगोची सावध खेळी, भाजपचा

आत्मविश्‍वास, कॉंग्रेसची निष्क्रियता, ‘आप’ची धडपड, इतरांची लुडबूड या सगळ्याचे मंथन येणार्‍या निवडणुकीत व्हायचे आहे!