योगसाधना – २७४ योगमार्ग – राजयोग इश्‍वर प्रणिधान – ५

0
248

– डॉ. सीताकांत घाणेकर

गोव्यात या सर्व सजावटीला ‘माटोळी’ म्हणतात. या सर्व वनस्पतींमध्ये विविधता असते. काहीजण फार कष्ट घेऊन कल्पकतेने सर्व मांडणी करतात. आता तर माटोळी प्रदर्शन व स्पर्धाही घेतल्या जातात. आपल्या कृषीसंस्कृतीचे सुंदर व मानवोपयोगी विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवून ते टिकविण्यासाठी या सर्व गोष्टी अत्यंत जरुरी व उपयुक्त आहेत.

विश्‍वाच्या रचनेमागे विश्‍वकर्त्याचे फार मोठे कौशल्य आहे. तसेच त्यांच अत्यंत गूढ असे तत्त्वज्ञान आहे. बहुतेकजण याबद्दल विचार करीत नाहीत. मग अभ्यास व चिंतन दूरच राहिले. यात समाजातील विविध स्तरांतील व्यक्ती आहेत- श्रीमंत – गरीब – साक्षर – निरक्षर – स्त्री – पुरुष – तरुण – वृद्ध… अगदी अपवादात्मक अल्प लोक या तत्त्वज्ञानाच्या खोलात शिरतात. सुरुवातीला तत्त्वज्ञान कठीण वाटते, पण नंतर यांना मजा येते कारण त्यांची जिज्ञासू वृत्ती जागृत होते. त्यापुढील पायरीवर – तर त्यांना तत्त्वज्ञानाशिवाय चैनच पडत नाही. मग हळूहळू त्यांची सर्व पैलूंनी विकासाकडे वाटचाल सुरू होते. खर्‍या प्रामाणिक योगसाधकाकडून हीच अपेक्षा असते.
जगांत – व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. आपल्या ज्ञानी पूर्वजांना हे माहीत होते म्हणून त्यांनी हे तत्त्वज्ञान सर्वांना समजण्यास सोपे जावे म्हणून विविध कथा, गोष्टी सांगितल्या आहेत. असे करीत असताना त्यांनी प्रत्येक माणसाला निसर्गाच्या, भगवंताच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण केले. विविध तर्‍हेचे उत्सव भारतीय संस्कृतीसोबत जोडले. काही कर्मकांडे उभी केली.त्यामुळे लहान-मोठे सर्वजण आनंदाने उत्सव साजरे करू लागले. सध्या मोठ्या प्रमाणात सर्व भारतात चालू असलेला उत्सव म्हणजे गणेशोत्सव! सर्वांचा आवडता उत्सव – भाद्रपद तृतिया – चतुर्थी – पंचमी या तीन मुख्य तिथीत साजरा केला जातो. तद्नंतर काही ठिकाणी पाच ते एकवीस दिवस कौटुंबिक किंवा सार्वजनिक स्तरावर विविध प्रकारे उत्सव हा चालूच असतो.
पहिलाच दिवस शुद्ध तृतियेचा. त्यालाच हरितालिका म्हणतात. गोव्यात या दिवसाला ‘तय’ म्हणतात. हा उत्सव मुख्यत्वे करून पार्वतीचा. हिमालय पर्वताची कन्या म्हणून तिला ‘पार्वती’ म्हणतात. पार्वतीला अनेक नावे आहेत. गौरी हे त्यांपैकी एक. म्हणून हा गौरीपूजनाचा दिवस मानतात. ही पूजा मुख्यत्वे करून कुमारीकांसाठी आहे, असे मानतात. परंतु विवाहित स्त्रियादेखील हे व्रत करताना दिसतात.
प्रत्येक कुमारिकेला वाटते की आपल्याला चांगला, सुंदर, सद्गुणी, ज्ञानी… पती मिळावा! म्हणून त्यांनी हे व्रत करावे असे समजले जाते. विवाहित स्त्रीची इच्छा असते की तिला अखंड सौभाग्य, आरोग्य, संतती, संपत्ती, सुख, समाधान प्राप्त व्हावे. म्हणून त्यादेखील या व्रताचे पालन करतात.
स्त्रियांसाठी असलेल्या या सुंदर उत्सवामध्ये आणखी आनंत मिळावा म्हणून एक गोष्ट प्रचलीत आहे.
* पार्वतीच्या मनात ‘आपला विवाह शंकराशी व्हावा’ असे होते. त्यासाठी तिने तपश्‍चर्या केली. सुरुवातीला स्वतः शंकराने रूप बदलून तिला शिवाबद्दल विविध गोष्टी सांगितल्या- तो कुरूप आहे, त्याचे रूप भयानक आहे, तो सर्वांगाला भस्म लावतो, तो गरीब आहे, भोळा आहे, स्मशानात राहतो, … इत्यादी. पण पार्वती आपल्या निश्‍चयापासून ढळली नाही. शेवटी शंकर प्रगट झाले कारण कन्या परिक्षेत पास झाली होती. तिने शिवाच्या गुणांवर प्रेम केले होते. ते भोळे दिसले तरी तपस्वी, शक्तिमान, कर्तृत्ववान ज्ञानी होते.
या कथेमध्ये एक हेतू दिसतो व तो म्हणजे आपला पती कसा असावा याबद्दल मार्गदर्शन अविवाहित मुलींना व त्यांच्या पालकांना मिळावे! बहुतेक वेळा मुलांचे सौंदर्य, त्याच्याकडील संपत्ती, त्याचा नावलौकीक यांनाच जास्त महत्त्व दिले जाते. या सर्व गोष्टी असायलाच हव्या. पण मुलाचे सद्गुण जास्त महत्त्वाचे आहेत. त्याचे चारित्र्य शुद्ध हवे.
दक्षिण भारतात ‘कन्याकुमारी’ हे क्षेत्र फार सुंदर, प्रेक्षणीय आहे. इतिहासकार लिहितात की तिथे पार्वतीने एका पायावर उभे राहून शंकराच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षे तपश्‍चर्या केली होती. ज्या शिळेवर पार्वतीने तप केले होते त्याच ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस व तीन रात्री अखंड ध्यान केले होते. आजही तिथे स्वामी विवेकानंद स्मारक त्या तपाचे स्मरण आपल्याला करून देतो. तिथे एक ध्यानमंदिर आहे. त्यात ध्यान केल्यावर योगसाधकाला वेगळाच आंतरिक आनंद मिळतो. आपल्या चिदानंद रूपाची अनुभूती मिळते. त्याचे वर्णन करता येणेच शक्य नाही.
भारतीय इतिहास व संस्कृतीविषयीच्या अनेक कथा या उत्सवांबद्दल आनंद वाढवतात. त्यातील एक कथा.
* पार्वतीला तिच्या मनाप्रमाणे पती मिळावा म्हणून पार्वतीने जे व्रत केले त्या व्रतासाठी तिच्या ‘आली’ नावाच्या सखीने मदत केली आणि त्यामुळेच तिला ‘हर’ नावाचा पती मिळाला म्हणून त्या व्रताचे नाव ‘हरतालिका’ असे पडले.
सुंदर कन्येला तेव्हासुद्धा मागणी घातली जात होती व आजही घातली जाते त्याविषयी एक कथा.
* पार्वतीने श्रीविष्णुशी विवाह करावा- अशी मागणी घेऊन स्वतः विष्णुभक्त नारद हिमालयाकडे गेले होते. पण पार्वतीच्या मनात महादेवाशी विवाह व्हावा असे होते. म्हणून तिने नकार दिला.
लहान मुला-मुलींना अशा छोट्या छोट्या कथांमध्ये फार रस असतो. त्या वयात या सर्व कथा सत्यच वाटतात. पण लक्षात ठेवायची मुख्य गोष्ट म्हणजे त्यातील भाव व बोध. प्रौढांसाठी महत्त्वाचे.
गौरीपूजनाच्या दिवशी पार्वतीसह शिवाच्या प्रतिमेचे पूजन करतात. भगवान शंकराचे ‘पार्वतीपते’ असे नाव देखील आहे. तत्वतः हे उत्सव एक सृजनोत्सव आहे. कारण देवदेवतांच्या प्रतिमेबरोबर निसर्गातील विविध वस्तू ठेवल्या जातात. जसे पानपत्री, फळफळावळ, फुले, नारळ, सुपारी यामुळे प्रसन्न अशी वातावरणनिर्मिती होते. मनाला आनंद मिळतो.
अशा या परंपरेमागे आमच्या पूर्वजांचा अन्य हेतूदेखील आहे. आपली संस्कृती कृषीसंस्कृती आहे. त्यामध्ये मुख्य शास्त्र म्हणजे आयुर्वेद. त्यामधील बहुतेक औषधे वनस्पतींपासून तयार करण्यात येतात. कारण आयुर्वेद शास्त्रज्ञांनी त्यांचे औषधी गुण पारखून घेतले आहेत. त्यांचा खोलवर अभ्यास केलेला आहे.
गोव्यात या सर्व सजावटीला ‘माटोळी’ म्हणतात. या सर्व वनस्पतींमध्ये विविधता असते. काहीजण फार कष्ट घेऊन कल्पकतेने सर्व मांडणी करतात. आता तर माटोळी प्रदर्शन व स्पर्धाही घेतल्या जातात. आपल्या कृषीसंस्कृतीचे सुंदर व मानवोपयोगी विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवून ते टिकविण्यासाठी या सर्व गोष्टी अत्यंत जरुरी व उपयुक्त आहेत.
या सर्व सजावटीतील एका फुलाचे उदाहरण घेतले तर आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी सहज कळेल. ते फूल म्हणजे ‘सोनकी (हर्णे)’ गोव्यातील डोंगरात, रानमळ्यांत मोकळ्या जागेवर ही लहानशी पिवळी फुले फुलतात. वनस्पतीदेखील नाजूक असते. पाने छोटी हिरवी असतात. पाऊस पडल्यामुळे सर्व सृष्टी हिरवीगार दिसते. त्यावेळी या झाडावर फुललेली पिवळी फुले मनाला प्रसन्नता देतात.
‘हर्णे’ या नावातही गर्भितार्थ आहे, असे काहीजण म्हणतात. ‘मनाचे हरण करणारी फुले’ म्हणजे ‘हर्णे’. वनस्पती शास्त्रात वेगवेगळी नावे सापडतात- ‘सिनोसिया बेलगावमॅन्सीस’(बेळगावात सापडणारी), ‘हिल सिनोसिओ ‘ग्रॅहम्स ग्रावण्डसॅल’ ‘सोनकी’ … या वनस्पती वेगवेगळ्या रोगांसाठी चांगल्या उपयोगी आहेत.
उदा. अपचन, पोटाचे विविध विकार, तोंडातील जखमा, त्वचारोग….
भारतीय संस्कृतीची हीच तर महत्ता आहे. प्रत्येक कृतीमागे फक्त कर्मकांडं नाहीत तर त्यात उच्च तत्त्वज्ञान आहे. कर्मयोग आहे. आपल्या संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी प्रत्येक सणाच्या, उत्सवाच्या निमित्ताने ज्या विविध वनस्पती वापरतात त्यांची संपूर्ण माहिती गोळा करून आजच्या पिढीने समजून घेणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर ती पुढील पिढीला शिकवणे गरजेचे आहे.
योगसाधनेत ‘ईश्‍वर प्रणिधान’ या नियमावर विचार करताना या सर्व गोष्टींची नोंद घेण्याचे हेतू अनेक आहेत…
* भारतीय संस्कृतीमधील तत्त्वज्ञान समजणे.
* कर्मकांडाबरोबर कर्मयोग घडणे.
* ईश्‍वराच्या पूजेसाठी वापरण्यात येणार्‍या सर्व वस्तू किंवा साहित्य त्याच भगवंताने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केल्या आहेत याची प्रत्येक मानवाला जाणीव होणे व या सर्व ज्ञानाचा योग्य उपयोग करणे.
अशा या सूक्ष्म गोष्टी समजल्यावर अशी अपेक्षा आहे की प्रत्येक जण निदान योगसाधक तरी सहज आणि आपोआप ईश्‍वराजवळ स्वतःचे समर्पण करतील!