भाभासुमं स्थापणार नवा राजकीय पक्ष

0
89

 

>> विधानसभेसाठी ३५ उमेदवार उतरवणार
>> युती तोडण्यास मगोला ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत

आगामी गोवा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचने पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून मगोला भाजपबरोबरील युती तोडण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मगोने भाजपची साथ सोडल्यास भाभासुमंचा त्यांना पाठिंबा असेल, असे भाभासुमंच्या राजकीय विभागाचे प्रमुख ऍड. उदय भेंब्रे यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी मंचचे सहनिमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. येत्या निवडणुकीत आपला पक्ष ३५ मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचेही भेंब्रे यांनी स्पष्ट केले.
नव्या प्रादेशिक पक्षाची घटना तयार करण्यासाठी ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यात ऍड. स्वाती केरकर, महेश म्हांबरे व वल्लभ केळकर यांचा समावेश आहे. पक्षाची नोंदणी लवकरच करून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. मगोने भाजपची साथ सोडल्यानंतर मगोने मराठीला राजभाषा करण्याचा प्रस्ताव पुढे केल्यास भाभासुमंचे धोरण काय असेल, असा प्रश्‍न केला असता, ही एकच अडचण आहे. भाभासुमं, अन्य विषयांवर विचार केल्याशिवाय आंधळेपणाने पाठिंबा देऊ शकत नाही. या विषयावर बैठकीत उपाय काढणे शक्य आहे, असे ते म्हणाले. मगोवरही पूर्णपणे विसंबून राहता येत
नाही
शैक्षणिक माध्यम प्रश्‍नावर भाजपने ङ्गसवणूक केली. त्यामुळे मगोवरही पूर्णपणे विसंबून राहता येत नाही. परंतु या एकाच राजकीय पक्षाचे भाभासुमंप्रमाणेच शैक्षणिक धोरण आहे. त्यामुळे मगोकडे मंच पर्याय म्हणून पहात आहे. अर्थात सर्व काही त्यांच्या निर्णयावर अवलंबून असेल. त्यामुळेच नवा प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
पक्ष जनतेच्या सर्वच प्रश्‍नांचा विचार करणार
नवा प्रादेशिक पक्ष शैक्षणिक माध्यमाबरोबरच गोमंतकियांच्या हिताच्या सर्वच प्रश्‍नांचा विचार करेल. त्यात कॅसिनो, विशेष राज्यांचा दर्जा आदींचाही अंतर्भाव असेल, असे ऍड. भेंब्रे यांनी सांगितले.
संभाव्य उमेदवारांची यादीही तयार
आठवड्यापूर्वी मगो पक्षाच्या नेत्यांबरोबर बोलणी केल्याची माहिती त्यांनी दिली. ३५ मतदारसंघात निवडणूक लढविण्याचे ठरविले असून संभाव्य उमेदवारांची यादीही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. नुवे, बाणावली, कुंकळ्ळी, केपे व वेळ्ळी या मतदारसंघाच्या बाबतीत अद्याप विचार केलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या तयारीसाठी
३ पूर्णवेळ स्वयंसेवक तयार
निवडणुकीच्या दृष्टीकोनातून भाभासुमंच्या तयारीसाठी ३ पूर्ण वेळ स्वयंसेवक तयार झाले आहेत. त्यांनी त्यासाठी आपला व्यवसाय बाजूला ठेवला आहे. त्यात भाजपचे कार्यकर्ते आनंद शिरोडकर, विनायक च्यारी व देवानंद नाईक यांचा समावेश आहे.
मातृभाषा रक्षण ः दोन लाख
सदस्य नोंदणी होणार
मातृभाषा रक्षण अभियानाखाली दोन लाख सदस्यांच्या नोंदणीचे लक्ष्य पूर्ण होईल. इतकेच नव्हे तर सध्याचा प्रतिसाद लक्षात घेतल्यास त्याहून अधिक सदस्यांची नोंदणी होईल, असा विश्‍वास सहनिमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केला. दक्षिण गोव्यात व उत्तर गोव्यात मिळून आतापर्यंत ६६ सभा घेण्यात आल्याची माहिती वेलिंगकर यांनी दिली. मातृभाषेतून शिक्षण हा जागतिक सिद्धांत आहे. त्यामुळे संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेने याबाबतीत घेतलेल्या ठरावाचे भाभासुमं पालन करीत आहे व या आंदोलनाला सर्व स्वयंसेवकांचा पाठिंबा असल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस ऍड. स्वाती केरकर, ङ्गा. आताईत, अरविंद भाटीकर, पुंडलिक नाईक, सुभाष देसाई, महेश म्हांबरे आदी उपस्थित होते.

पणजीतील उमेदवारीबाबत
वेलिंगकरांचे नो कॉमेंटस्
पणजी मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार काय, असा प्रश्‍न पत्रकारांनी प्रा. वेलिंगकर यांना केला असता, ते काहीवेळ स्तब्ध झाले व नंतर त्यांनी ‘नो कॉमेंटस्’ असे सांगितले.