हा काय पोरखेळ?

0
143

सांत आंद्रेचे आमदार आणि गोव्याचे प्रतिभावान साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांची गेला पंधरवडाभर मृत्यूशी झुंज सुरू आहे. ज्या दिवशी त्यांना ह्रदयविकाराचा दुसरा धक्का बसला, त्या दिवशी सकाळीच ते नवप्रभेच्या वर्धापनदिन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहून सर्वांशी गप्पागोष्टी करून गेले होते. शिवाय गेली काही वर्षे ते केवळ नवप्रभेसाठी सातत्याने नियमित स्तंभलेखन करीत आले आहेत. नवप्रभेशी असलेले त्यांचे असे दृढ नाते असल्याने गोव्याचे हे लाडके व्यक्तिमत्त्व लवकरात लवकर बरे व्हावे आणि पूर्ववत होऊन आमच्यात यावे ही आज समस्त गोव्याची जी जनभावना आहे, तीच नवप्रभेचीही आहे. परंतु वाघ यांच्या प्रकृतीच्या प्रगतीबाबत रोज उलटसुलट तपशीलवार बातम्या पसरवण्याचा पोरखेळ मात्र आम्ही चालवलेला नाही. ज्या व्यक्तीची ह्रदयक्रिया आठ मिनिटे बंद पडली होती, जिच्या मेंदूच्या पेशींना इजा झाल्याचा कयास आहे, अशी व्यक्ती अचानक उठून बसेल आणि पुन्हा कामास लागेल अशी अपेक्षा ठेवता येत नाही. त्यामुळे थोडा संयम, थोडी प्रतीक्षा अपरिहार्य आहे. हे सारे अतिशय दुःखद असले तरी परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. वाघ यांची प्रकृती सुधारावी यासाठी त्यांना थोडा वेळ देणे आवश्यक असताना क्रिकेट सामन्याचा स्कोअर सांगावा तसे वाघांसंबंधी, त्यांनी डोळे किलकिले केले, त्यांनी मान हलवली, ते हसले अशी प्रत्येक बाब माध्यमांमधून येऊ नये असे आम्हाला प्रकर्षाने वाटते. विशेषतः सोशल मीडियातून वाघांच्या प्रकृतीसंबंधी जी विटंबना गेले काही दिवस चालली आहे, ती निषेधार्ह आहे. कोणत्याही व्यक्तीविषयी एवढ्या हीन पातळीवर अपप्रचार चालावा आणि तिच्या जीवनमरणाच्या झुंजीचा राजकारणाशी बादरायण संबंध जोडून अफवा पसरवल्या जाव्यात हे अत्यंत खेदजनक आहे. कितीही वैचारिक मतभेद असले तरी मृत्यूशी झुंज घेत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या निधनाच्या अफवा व्हॉटस्‌ऍप वरून पसरवणे ही तर अत्यंत घृणास्पद सामाजिक विकृती आहे आणि प्रत्येक महत्त्वाच्या घटनेच्या संदर्भात सोशल मीडियावर अशा घृणास्पद गोष्टी मोठ्या प्रमाणावर फैलावल्या जाताना दिसत आहेत. या नवमाध्यमाची ताकद मोठी असली तरी अशा दुष्प्रवृत्तींनी त्यांचा बाजार करून टाकलेला आहे. अलीकडेच झालेल्या महाड दुर्घटनेच्या वेळीही भलत्याच वाहनांची आणि मृतदेहांची छायाचित्रे दुर्घटनेची म्हणून व्हॉटस्‌ऍपवरून पाठवण्याचा प्रकार घडला होता. ज्या व्यक्ती त्या दुर्घटनेत बळी ठरल्या त्यांच्या कुटुंबियांना त्यामुळे काय वाटले असेल याचा विचारही अशा विकृत, सडलेल्या मानसिकतेच्या माणसांना करावासा वाटत नाही याला काय म्हणावे? वाघ यांच्या प्रकृतीसंबंधीची हालहवाल माध्यमांपर्यंत अनधिकृतरीत्या पोहोचविण्याचा आटापिटाही काही घटक करीत आहेत असे दिसते. त्यांना हा उचापतखोरपणा करण्याचा परवाना दिला कोणी? वाघ यांच्या प्रकृतीसंबंधी वास्तविक आधी गोमेकॉने आणि नंतर हिंदुजा इस्पितळाने अधिकृत पत्रक काढणे आवश्यक होते. परंतु वैद्यकीय व्यवस्थेने अधिकृतरीत्या मौन बाळगल्यानेच उलटसुलट बातम्या, अफवा यांचे उदंड पीक राज्यात आले. वाघ यांच्यासंबंधी अफवा पसरवून या अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाविषयीचे तमाम गोमंतकीय जनतेचे प्रेम, आस्था, जिव्हाळा यांच्याशीच आपण खेळ मांडत आहोत याचे भान अशा अफवा पसरवणार्‍यांनी ठेवायला हवे. विष्णू सूर्या वाघ यांच्यासारख्या अष्टपैलू, झुंजार व्यक्तिमत्त्वामध्ये ती चेतना पुन्हा यावी यासाठी या त्यांच्या कसोटीच्या क्षणी आपण सारे प्रार्थना करूया. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहूया आणि वाघ पूर्णपणे या प्राणांतिक संकटातून सुखरूप बाहेर पडावेत असे येणार्‍या विघ्नहर्त्या गणरायापाशी मागणे मागूया!