मातृत्वाच्या बाजाराला चाप

0
117

व्यावसायिक ‘सरोगसी’ वर बंदी घालणार्‍या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजुरीसाठी मांडले जाईल. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होऊ शकेल. कृष्णजन्माष्टमीच्या दिवशीच या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली यालाही विशेष अर्थ आहे. कृष्ण देवकीच्या उदरी जन्मला, पण त्याला यशोदेने वाढवले. म्हणून तो देवकीचा तान्हा, पण यशोदेचा कान्हा ठरला. मातृत्वाच्या उच्चतम भारतीय मूल्यांचा दाखला देत त्याचा व्यावसायिक बाजार मांडण्यास प्रतिबंध करणारे हे पाऊल सरकारने उचलले आहे. ‘सरोगसी’ द्वारे गोरगरीब भारतीय महिलांचे चाललेले शोषण त्यामुळे यापुढे तरी थांबावे अशी अपेक्षा आहे. ‘सरोगसी’चा जो बाजार गेल्या काही वर्षांत भारतात मांडला गेला होता, त्याला खीळ बसणे अत्यंत आवश्यक बनले होते. विदेशी दांपत्यांनी केवळ ‘सरोगसी’साठी भारतात यायचे, दलालांमार्फत एखाद्या गरीब महिलेला पैशांची लालूच दाखवून तिच्या गर्भाशयात स्वतःचे मूल वाढवायचे आणि आपली मातृत्वाची हौस भागवायची या प्रकाराला फार मोठ्या व्यवसायाचे रूप आलेले आहे. देशात किमान दोन हजार सरोगसी क्लीनिक आहेत असा अंदाज आहे आणि हा संपूर्ण व्यवसाय लाखो डॉलरच्या घरांत पोहोचलेला आहे. गुजरात, राजस्थानसारख्या राज्यांमध्ये तर अशा सरोगेट मातांचा सुळसुळाट झालेला आहे. मातृत्व ही काही पैसे देऊन विकत घेण्याची चीज नाही. निदान भारतीय संस्कृती तरी तसा बाजारू दृष्टिकोन बाळगत नाही. हा जेवढा शारीरिक विषय आहे, तेवढाच तो भावनिक विषयही आहे. जन्मणार्‍या बाळाशी मातेची भावनिक गुंतवणूक असते. मातृत्वाचा आनंद हवा, मात्र मातृत्वाच्या वेदना नकोत हा सोईस्कर विचार करणार्‍या सेलिब्रिटींनी तर सरोगसीला फॅशन बनवून टाकले. रिकी मार्टीन्स, एल्टन जॉनसारखे विदेशी सेलिब्रिटी असोत किंवा आपल्याकडचे शाहरूख खान, आमीर खान असोत; सरोगसीद्वारे मूल जन्माला घालून आपण काहीतरी जगावेगळे केल्यागत हे पालकत्व ते मिरविताना दिसत आहेत. एखाद्या दांपत्याने आपल्या वंध्यत्वापोटी सरोगसीचा आधार जरूर घ्यावा, परंतु कुत्रा पाळावा तशी मुले ‘पाळण्या’ची हौस भागवण्याचा अट्टहास ही मातृत्वाची चेष्टा ठरेल. भारतासारख्या देशामध्ये जिथे पैशांसाठी काहीही विकले जाऊ शकते, त्या ठिकाणी वैद्यकीय पर्यटनाच्या नावाखाली मानवी अवयवांची तस्करी, मूत्रपिंड प्रत्यारोपण, रुग्णांना अंधारात ठेवून त्यांच्यावर औषधांच्या वैद्यकीय चाचण्या, सरोगसी असले प्रकार जर बेफाट चालणार असतील तर त्यावर नियंत्रण आणि निर्बंध ही अत्यावश्यक बाब आहे. ज्यांचे व्यावसायिक हितसंबंध यात गुंतलेले आहेत, ते या विषयी आरडाओरडा करतील, परंतु अशा गोष्टींचा बाजार मांडायचा नसेल तर काही बंधने आवश्यक आहेत. एकेरी पालक, लिव्ह इन नातेसंबंध आदींच्या संदर्भात सरोगसीच्या विकल्पासंबंधी सार्वजनिक चर्चा होऊ शकते, परंतु विदेशी दांपत्यांनी येथे यायचे आणि गर्भाशये भाड्याने घेऊन मुले जन्माला घालायचा जो काही व्यवसाय भरभराटीला आलेला आहे, त्याला मज्जाव हा हवाच हवा. मध्यंतरी समृद्धी पोरेंनी ‘मला आई व्हायचंय’ हा मराठी चित्रपट याच विषयावर बनवला होता. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. एक विदेशी महिला भारतात येते, सरोगेट मातेकरवी मूल जन्माला घालते. मूल गर्भात असताना कळते की त्यात दोष आहे, तेव्हा ती विदेशी महिला त्याचा स्वीकार करायला नकार देऊन परागंदा होते. अशा घटना प्रत्यक्षात घडलेल्या आहेत. सरोगेट मातेच्या उदरी मूल वाढत असताना मूळ पालकच विभक्त झाल्याचेही दाखले आहेत. अशा गैरप्रकारांवर बंधन घालणे गैर कसे म्हणता येईल?