‘केवळ कला शिक्षणाने माणूस मोठा होत नाही’

0
96

>> जगविख्यात गोमंतकीय चित्रकार श्री. लक्ष्मण पै यांचे प्रतिपादन

 

माझ्या कलेला भौगोलिक सीमा नाहीत. माझी तैलचित्रे आणि मी एवढेच माझे विश्‍व आहे. त्याला प्रादेशिक मर्यादा नाहीत असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार श्री. लक्ष्मण पै यांनी नवप्रभेला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले.
गोव्याने आजवर खूप प्रगती केली आहे. पूर्वी येथील रस्ते खूपच खराब होते. वाहतुकीत बेशिस्त होती. आता येथील वाहतुकीला शिस्त आहे. सुंदर रस्ते आहेत. गोवा फार सुंदर आणि शांत प्रदेश आहे. गोवा मला अतिशय आवडतो असे श्री. पै म्हणाले.
श्री. पै हे गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्या आठवणी ताज्या करताना ते म्हणाले, ‘‘गोव्यात कला महाविद्यालयाची स्थापना झाली, त्यावेळी कला अकादमी स्थापन झालेली होती. मला तिच्या जवळच गोवा कला महाविद्यालयाची स्थापना करायची होती. नृत्य, संगीत, नाटक आणि चित्र या कला एकत्र असाव्यात असा माझा विचार होता. गोव्याचे मुख्यमंत्री त्यावेळी प्रतापसिंह राणे होते. त्यांना मी तसे बोललो, तर ते म्हणाले की येथे महाविद्यालयासाठी पुरेशी जागा नाही. त्यांनी मला आल्तिनोची जागा दाखवली आणि म्हणाले, तुम्हाला जागा पाहिजे ना? ही घ्या. पाहिजे तेवढी घ्या. मी आणि आर्किटेक्ट साल्टो आल्मेदा आम्ही दोघांनी विचार केला आणि सांगितले की, ही जागा आम्ही घेतो. नंतर प्लॅनिंग वगैरे झालं आणि आल्तिनोवर गोवा कला महाविद्यालय साकारलं.’’
‘‘माझं मत असं होतं की यामध्ये खोल्या जास्त नसाव्यात, पण प्रशस्त असाव्यात. त्यात भरपूर मोकळी जागा असली पाहिजे. त्यानुसार सुंदर अशी वास्तू उभी राहिली. फार सुंदर अशी ती जागा आहे. या गोवा कला महाविद्यालयाचा मी दहा वर्षे प्राचार्य होतो.’’ असे श्री. पै यांनी सांगितले.
श्री. पै हे प्रागतिक कला चळवळीचे एक घटक होते. त्या आठवणी जागवताना ते म्हणाले, ‘‘मी प्राथमिक शिक्षण चार वर्षे मराठीतून मडगावला घेतले. नंतर दोन वर्षे पोर्तुगीज शिकलो. मग मॅट्रिकपर्यंतचे इंग्रजी शिक्षण न्यू इरा हायस्कूल, मुंबईला घेतले. त्यानंतर १९५७ ला मी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथेच मी शिकवायला सुरुवात केली. त्याचवेळी मी प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट चळवळीचा भाग बनलो. त्याची स्थापना सहा लोकांनी केली होती. एफ. एन. सौझा, एस. एच. रझा, एम. एफ. हुसेन, के. एच. आरा, एच. ए. गाडे आणि एस. एस. बाक्रे. आणखीही काही लोक त्या चळवळीशी संलग्न होते- मनिषी डे, राम कुमार, अकबर पद्मसी आणि तयब मेहता. पण माझे फारसे जमले नाही. प्रत्यक्ष काम करण्यासाठी मी १९५१ साली पॅरिसला गेलो. तिथे भारतीय विद्यार्थी होते, त्यांच्याबरोबर राहिलो. दहा वर्षे मी तिथे होतो. या काळात मी स्वतः माझ्या चित्रांची दहा प्रदर्शने भरवली. तसेच अन्य देशांतही माझ्या चित्रांची प्रदर्शने भरवली.’’ पॅरिसच्या दहा वर्षांच्या वास्तव्यानंतर मी दिल्लीला परतलो. दिल्लीला भारतीय चित्रकारांची वसाहत आहे तिथे राहत होतो. गोव्याला येण्यापूर्वी मी अमेरिकेत होतो, अशी माहिती त्यांनी दिली. ‘‘मी अमेरिकेला होतो. शाहिस्ता थापर यांनी माझी चित्रे संग्रहित केली. माझी अनेक चित्रे त्यांच्याकडे आहेत. त्यांनी मला गोव्यात बोलावले आणि त्यानिमित्ताने गोव्यात येणं झालं,’’ अशी माहितीही त्यांनी दिली. ‘‘१९४७ ते १९५० या काळात मी गोव्याचे विषय आणि लहान लहान भारतीय चित्रकृतींची कल्पना यांनी प्रेरित झालो होतो. माझ्या सुरुवातीच्या कार्यामध्ये गोमंतकीयांची जीवन जगण्याची शैली उमटलेली दिसते, जसा जांबावलीचा शिगमा किंवा फेणी बनवण्याची प्रक्रिया, गडद रंग वापरण्याची माझी सवय- ही गोमंतकीयांच्या दोलायमान स्वभावाविषयी भाष्य करते, जो मला आवडतो. माझ्या चित्रांची दुसरी बाजू अशी आहे की माझा गाण्यांशीही निकटचा संबंध होता. जेव्हा मी चित्र काढतो तेव्हा संगीत ऐकायला आवडते. माझ्या काही चित्रांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातील रागही चित्रित झालेले तुम्हाला दिसतील.’’ असे पै यांनी सांगितले. कला क्षेत्रात नव्याने येणार्‍या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल या प्रश्‍नावर, ‘‘कला महाविद्यालय हे केवळ मूलभूत व्याकरणासारखे आहे. केवळ कला शिक्षण घेऊन माणूस मोठा होऊ शकत नाही. कॉलेज कलाकार निर्माण करत नाही, ते तुम्हाला संधी देते. कलाकार होणे तुमच्याकडे आहे. सगळेच काही कलाकार बनू शकत नाहीत. तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. सल्ला देण्याचं काम माझं नाही. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. कुणी काय करावं हे ज्यानं त्यानं ठरवावं, त्यात मी ढवळाढवळ करणार नाही.’’ असे मत श्री. पै यांनी व्यक्त केले.