यश आणि अपयश

0
100

रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणार्‍या पी. व्ही. सिंधूचे आधी हैदराबादेत आणि नंतर विजयवाड्यात जंगी स्वागत झाले. स्वागतापेक्षाही तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांचा तिच्या यशाचे श्रेय उपटण्याचा हा खटाटोप होता. यशाचे श्रेय घ्यायला सगळेच पुढे असतात, मात्र अपयशाची जबाबदारी घ्यायला मात्र कोणी तयार होत नाही. रिओ ऑलिंपिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीनंतर हेच चित्र समोर आलेले दिसते आहे. रिओ ऑलिंपिकमध्ये जे भारतीय खेळाडू अपयशी ठरले, ते कुठे व का कमी पडले त्याचा हिशेब मांडण्याची आणि आपल्या चुका सुधारण्याची खरे तर या क्षणी आवश्यकता आहे. विविध पदक विजेत्या देशांमध्ये ज्या प्रकारचे प्रोत्साहन विविध क्रीडाप्रकारांना मिळते, तसे आपल्या देशात खरोखर मिळते का हा प्रश्नही स्वतःला विचारण्याची ही वेळ आहे. त्यासाठी आधी भारतीय खेळाडूंच्या रिओ ऑलिंपिकमधील कामगिरीवर एक नजर टाकू. बॅडमिंटन आणि कुस्तीमध्ये भारताला पदके मिळाली, परंतु बॅडमिंटनमध्ये दुहेरी सामन्यांच्या पहिल्याच फेरीत आमच्या दोन्ही जोड्या बाहेर फेकल्या गेल्या. लाज राखली ती सिंधू आणि के. श्रीकांतने. श्रीकांत उपांत्यफेरीत पोहोचू शकला नाही, परंतु सिंधू रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. कुस्तीमध्ये नरसिंग यादव प्रकरणाने आधीच वादाचा धुरळा उडवून दिला होता. योगेश्वर दत्त आणि फोगात भगिनींकडून अपेक्षा होत्या, परंतु साक्षी मलिकने कांस्यपदक पटकावले. मुष्टियुद्धात मनोजकुमार आणि विकास कृष्णनने थोडीफार चमक दाखवली. नेमबाजीत अभिनव बिंद्राकडे सर्वांचे लक्ष होते, परंतु सर्व नेमबाजांनी निराशाच केली. बिंद्रा १० मी. एअर रायफलच्या अंतिम फेरीत पोहोचला, परंतु चौथा आल्याने त्याचे पदक हुकले. तिरंदाजीत दीपिका कुमारी, बॉम्बायला देवी आणि अतानु दासला अपयश आले तरी त्यांनी चांगली झुंज दिली. हॉकीमध्ये पुरुषांना उपांत्यफेरीपर्यंत मजल मारता आली, परंतु महिलांनी एकही सामना न जिंकता निराशा केली. टेनिसमध्ये दोन्ही दुहेरी जोड्या सुरवातीलाच पराजित झाल्या. सानिया मिर्झा आणि बोपण्णालाही कांस्यपदकापर्यंत मजल मारता आली नाही. ऍथलेटिक्समध्ये माहेश्‍वरी तिसावी आली, पण अंकित शर्मा आणि सीमा पुनिया. विकास गौडा वगैरेंनी निराशा केली. जिम्नॅस्टिक्ससारख्या भारतात विशेष प्रचलित नसलेल्या खेळात दीपा करमाकर ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला स्पर्धक होती, परंतु तिचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. ही सगळी कामगिरी पाहिली तर जाणवते ती म्हणजे योग्य सुविधा आणि मार्गदर्शनाची उणीव आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉलपलीकडील इतर क्रीडाप्रकारांसाठी प्रोत्साहक वातावरणाचा पूर्ण अभाव. इतर देशांमध्ये या क्रीडाप्रकारांवर ज्या प्रकारची गुंतवणूक केली जाते, त्याच्या पासंगालाही आपण पुरत नाही. ब्रिटनसारखा देश आपल्या चौपट गुंतवणूक करत असतो. भारतात मात्र या ऑलिंपिकवीरांना मानहानीचाच सामना करावा लागतो. दत्तू भोकनळवर आर्थिक कारणांमुळे हॉटेल सोडण्याची आलेली वेळ असो वा धावपटू ओ. पी. जैशाला धावताना पाणीही न पुरवणारे भारतीय अधिकारी असोत, त्यांना आलेले हे अनुभव सुन्न करणारे आहेत. अशा परिस्थितीत ही मंडळी पदकांसाठी झुंजत असतात हेच मुळी प्रशंसनीय आहे. ऑलिंपिकमध्ये यश मिळवायचे असेल तर केवळ पदकांवर नजर ठेवून चालणार नाही. या खेळाडूंची तालीम, त्यांचा सराव, त्यांना आर्थिक पाठबळ, मानसिक पाठिंबा या सगळ्या गोष्टींवरही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. यश साजरे व्हावेच, परंतु अपयशाची जबाबदारीही शिरावर घेण्यासाठी पुढे व्हावे लागेल. तरच भविष्यात यश आपल्या पावलांनी चालत येईल!