निवडणुकीचा डंका

0
100

गेल्या शनिवारच्या बूथ कार्यकर्ता संमेलनातून भारतीय जनता पक्षाने गोव्यातील आपल्या संघटनात्मक ताकदीचे विराट दर्शन घडवले. विरोधकांनी आणि स्वकीयांनी कितीही वातावरण तापविले, तरी आपली मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद कायम आहे हा संदेश भाजपाने पक्षाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत या कार्यकर्ता संमेलनातून दिला. कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणुकीतील कामगिरी ही त्या पक्षाचे बूथ पातळीवर किती मजबूत संघटन आहे त्यावरच ठरत असते. नेत्यांचे हवाई दौरे आणि धावत्या सभा यापेक्षा ही खेड्यापाड्यांत पसरलेली संघटनात्मक ताकद महत्त्वाची असते. मतदाराला अखेरच्या क्षणीही आपल्या बाजूने वळवण्याची ताकद या संघटनात्मक शक्तीमध्ये असते. भारतीय जनता पक्षाने आजवर राज्यात आपली पाळेमुळे रुजवताना या संघटनात्मक बांधणीकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. सत्तेवर नसतानाही नाही आणि सत्तेवर आल्यावरही नाही. त्यामुळे भाजपाने केलेली विकासकामे, राबवलेल्या कल्याणयोजना यापेक्षाही गावोगावी निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे बळ ही त्या पक्षाची सर्वांत मोठी शक्ती आहे. सरकार म्हणून पाहता पक्षाने अनेक चुका केल्या, अनेक यू टर्न घेतले. माध्यम प्रश्न असो, कॅसिनोंचा विषय असो, खाण प्रश्न असो, या कोलांटउड्यांनी नाराज झालेल्या मतदारालाही पुन्हा जवळ खेचण्याची ताकद या कार्यकर्त्यांमध्ये आहे हे विसरता येणार नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सत्ताधारी भाजपाला खाली खेचण्याची ताकद असलेला प्रबळ विरोधी पक्षच समोर दिसत नाही. अरविंद केजरीवाल अधूनमधून येतात आणि माध्यमांद्वारे हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु व्यापक संघटनात्मक जाळ्याअभावी ३५ जागा जिंकण्याचे त्यांचे दावे अतिरंजित वाटू लागतात. दिल्लीची पुनरावृत्ती गोव्यात करू असे ते सांगत आहेत, परंतु वास्तविक पाहता ‘आप’च्या गोव्यातील अस्तित्वाचा फायदा कॉंग्रेसची मते दुभंगून गेल्याने भाजपालाच मिळू शकतो. प्रमुख विरोधी पक्ष म्हणवणारा कॉंग्रेस तर अजूनही विस्कळीत रूपातच आहे. दिग्विजयसिंहांपलीकडे कोणत्या प्रमुख नेत्यांचे गोव्याकडे लक्ष आहे असेही दिसत नाही. त्यामुळे दिग्गूराजा कॉंग्रेसला गोव्यात गतवैभव प्राप्त करून देतील हे मानण्यास गोमंतकीय मतदार तयार नाही. महागठबंधनावरून त्या पक्षात झालेली तणातणी तर सर्वज्ञात आहे. त्यामुळे या परिस्थितीत भाजपाचा सामना करणारी तुल्यबळ ताकद समोर दिसत नाही ही वस्तुस्थिती मान्य करायला हवी. मगो दूर जाऊ नये याची खातरजमा भाजपाध्यक्षांनी चालवली आहे. त्या प्रयत्नांना यश आले आणि भाजपा – मगो युती अखंड राहिली, तर ही एकसंधता दोन्ही पक्षांना लाभदायक ठरू शकते. शिवाय भाजपाच्या गोव्यातील कामगिरीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची कामगिरीही पूरक ठरते आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने आणि तत्पूर्वी मोपाची कोनशिला, तुये इलेक्ट्रॉनिक सिटीचा आणि गोमेकॉच्या नव्या सुपरस्पेशालिटीचा शिलान्यास या तिहेरी कामासाठी गोव्यात येणार आहेत. याचा पुरेपूर लाभ उठविण्याचा प्रयत्न भाजपा करील. गोव्यातील राजकीय परिस्थितीबद्दल नुकतीच नानाविध सर्वेक्षणे केली गेली, परंतु निवडणूक अजून दूर असल्याने कोणी आताच गुडघ्याला बाशिंग बांधले तरी त्याला काही अर्थ नाही. निवडणुकीचा खरा रागरंग शेवटच्या महिन्या-दोन महिन्यांत स्पष्ट होत असतो. २०१२ च्या निवडणुकीतही भाजपची लाट अगदी शेवटच्या क्षणी निर्माण झाल्याचे दिसून आले होते. मतदाराची मते प्रभावीत करण्याचा प्रयत्न यापुढील काळात प्रत्येक राजकीय पक्ष करील. निवडणुकीच्या धुमश्चक्रीत कोणते मुद्दे ऐरणीवर येतात, जनमत कसे प्रभावित करतात यावरच जनतेचा कौल अवलंबून असेल.