मराठी नियतकालिकांची चैतन्यमय सृष्टी

0
1245

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

त्या काळापासून आजमितीला जी नियतकालिके निर्माण झाली त्यांनी ज्ञानप्रसार, समाजप्रबोधन मोठ्या प्रमाणावर केले. त्या अनुषंगाने नीतिबोधाचे आणि मनोरंजनाचे कार्यही नेटाने केले. त्या प्रतिकूल राजकीय वातावरणात, साधनसामग्रीचा अभाव असताना ज्या प्रज्ञावंतांनी समाजमानसास प्रबुद्ध केले, राष्ट्रवादाची ऊर्मी निर्माण केली आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांत संचार करण्यासाठी स्फूर्ती दिली, यासाठी या नियतकालिकांचे आपण कायमचे ऋणी राहायला हवे.

मराठी वाङ्‌मयाच्या अभिवृद्धीसाठी नियतकालिकांनी महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर या द्रष्ट्या प्रज्ञावंताने ‘दर्पण’ हे साप्ताहिक सुरू केले. ही नियतकालिकांची गंगोत्री होती. ‘दर्पण’ हे काही वाङ्‌मयीन नियतकालिक नव्हते. पण त्यानंतरचे ‘दिग्दर्शन’ हे नियतकालिक त्या दिशेने वाटचाल करीत होते. तत्कालीन नियतकालिकांमागची प्रेरणा ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्रसार आणि ज्ञानसंवर्धन हीच होती. ‘ज्ञानोदय’, ‘ज्ञानप्रकाश’ आणि ‘मराठी ज्ञानप्रसारक’ इत्यादी नावांमधून हे सूचित होत होते.
त्या काळापासून आजमितीला जी नियतकालिके निर्माण झाली त्यांनी ज्ञानप्रसार, समाजप्रबोधन मोठ्या प्रमाणावर केले. त्या अनुषंगाने नीतिबोधाचे आणि मनोरंजनाचे कार्यही नेटाने केले. त्या प्रतिकूल राजकीय वातावरणात, साधनसामग्रीचा अभाव असताना ज्या प्रज्ञावंतांनी समाजमानसास प्रबुद्ध केले, राष्ट्रवादाची ऊर्मी निर्माण केली आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांत संचार करण्यासाठी स्फूर्ती दिली, यासाठी या नियतकालिकांचे आपण कायमचे ऋणी राहायला हवे. त्यांचा क्रमवार इतिहास सांगणे हा येथे उद्देश नाही; मात्र काही संस्मरणे तेवढी जागवायची आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे लोटली. शिक्षणाचा प्रसार झाला. पण समाजाने ज्ञानप्राप्तीचा मार्ग पूर्णत्वाने स्वीकारला असे म्हणायला मन धजत नाही. १८७४ ते १९२० या ऊर्जस्वल कालखंडाकडे दृष्टिक्षेप टाकला असता, एकेक व्यक्ती स्वतःच संस्था बनून देशकार्यासाठी समर्पित वृत्तीने वावरत होती. ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांचे ‘काळ’ हे नियतकालिक राजकीय स्वरूपाचे होते. पण ज्या वक्रोक्तिपूर्ण शैलीत त्यांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादावर घणाघात केला, त्यातून त्यांच्या विदग्ध लेखणीचा विलास दिसून येतो. लोकमान्य टिळकांनी प्रसंगोपात लिहिलेल्या अग्रलेखांतून त्यांच्या जाज्वल्य मनोवृत्तीचे रूप आजही मनाला स्फूर्ती देते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतील चिरस्मरणीय वैचारिक निबंधांचे पुनर्वाचन करताना त्यांच्या बुद्धिवैभवाचे, व्यासंगाचे आणि खंडन-मंडनादी कौशल्याचे अपूर्व दर्शन घडते. गोपाळ गणेश आगरकरांसारखा द्रष्टा पुरुष त्या काळात जन्मास येणे ही दुर्मीळ बाब होती. संघर्षाच्या सहाणेवर तावूनसुलाखून निघून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली. आपल्या अल्पायुष्यात सामाजिक सुधारणेची धुरा त्यांनी धीरोदात्त वृत्तीने आपल्या खांद्यावर वाहिली. सुरुवातीला ‘केसरी’मधून आणि नंतर ‘सुधारक’मधून लिहिलेले त्यांचे लेख वाचताना त्यांच्या प्रज्ञा-प्रतिभेच्या दर्शनाने आपण भावमंत्रित होतो. चिपळूणकर- टिळक- आगरकर या त्रिमूर्तीने दिलेल्या विचारांच्या वारशामुळे प्रबोधनाला दिशा तर मिळालीच, शिवाय मराठीतील वैचारिक निबंधाची वीण पक्की झाली. तो वारसा नंतरच्या विचारवंतांना, समाजसुधारकांना आणि निबंधकारांना मिळाला. महात्मा ज्योतिराव फुले, लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, ‘संदेश’कार अ. ब. कोल्हटकर इत्यादी व्यक्तींना विसरून चालणार नाही. हे प्रत्येक व्यक्तिमत्त्व म्हणजे एकेक स्फुल्लिंग होतंं. प्रत्येकाचे पृथगात्म पैलू कार्यरूपाने आणि लेखनरूपाने प्रकट होत होते. सामाजिक कणवेने त्यांचे अंतःकरण ओथंबलेले होते. ‘प्रभाकर’ या नियतकालिकातून लोकहितवादींनी लिहिलेली शतपत्रे, महात्मा फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’च्या निमित्ताने केलेले, शेतकर्‍यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी केलेले प्रखर अनुभवांचे चित्रण आजही आपल्याला अंतर्मुख करून जाते.
या प्रबोधनाच्या बळकट पायावर मराठीत त्या काळात उल्लेखनीय अशी वाङ्‌मयीन नियतकालिके निर्माण झाली. प्रत्येकाचे कार्य म्हणजे वाङ्‌मयीन इतिहासाचे सुवर्णपान आहे. ‘विविधज्ञानविस्तार’ आणि ‘मराठी ज्ञानप्रसारक’ या नियतकालिकांकडे तर तर्जनी दाखवावी लागेल. मराठीतील नामवंत समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी स्वतंत्र ग्रंथामधून त्यांच्या कार्याचा चिकित्सक वृत्तीने परामर्श घेतलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने ‘मराठी नियतकालिकांचा इतिहास’ साकार केला आहे. शिवाय ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे‘च्या खंडात्मक वाङ्‌मयीन इतिहासामध्ये त्यांचे समालोचन केले गेलेले आहे. ख्यातनाम कादंबरीकार व कथाकार हरी नारायण आपटे यांच्या ‘करमणूक’ या नियतकालिकाने केलेले वाङ्‌मयीन कार्य मौलिक स्वरूपाचे होते. कथावाङ्‌मयाला त्या काळात त्याने विशेष प्रतिष्ठा मिळवून दिली. याच कालखंडातील दुसरे महत्त्वाचे नियतकालिक म्हणजे मासिक ‘मनोरंजन.’ का. र. मित्र हे त्याचे कल्पक आणि उपक्रमशील संपादक. १९०९ मध्ये बंगालमधील नियतकालिकांच्या धर्तीवर त्यांनी पहिला दिवाळी विशेषांक प्रसिद्ध केला. मराठी साहित्याला ललामभूत ठरलेल्या दिग्गज कवींनी, कथाकारांनी, विचारवंतांनी आणि विनोदी लेखकांनी त्यात वर्णी लावली होती. हा विशेषांक न्याहाळणे हा अपूर्वाईचा तसाच अभ्यासाचा विषय आहे. ‘नवयुग’, ‘शालापत्रक’, अनेक स्थित्यंतरांतून वाटचाल केलेले ‘लोकशिक्षण’ या नियतकालिकांचा येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ‘यशवंत’ मासिकाने कथावाङ्‌मयाला वाहून घेतले होते. ‘रत्नाकर’सारखे अभिरूचिसंपन्न नियतकालिक याच काळातले. १९३४-३५ च्या सुमारास ‘प्रतिभा’सारखे वाङ्‌मयीन नियतकालिक ह. वि. मोटे यांनी चालवायला घेतले आणि त्यात साहित्यिकांची मांदियाळी निर्माण केली. गं. दे. खानोलकर, वि. ह. कुलकर्णी व के. नारायण काळे हे संपादकवर्गात होते. कथा, प्रवासवर्णने, अनंत काणेकरांचे लघुनिबंध, कविता यांबरोबरच तत्कालीन वाङ्‌मयीन वाद आणि प्रवाहांविषयी त्यात मंथनप्रक्रिया चालत असे. प्र. श्री. कोल्हटकर यांच्या ‘संजीवनी’ या नियतकालिकाचा येथे उल्लेख करायला हवा. अनंत काणेकर त्यातून लघुनिबंध लिहायचे. ‘पारिजात‘, ‘ज्योत्स्ना’, ‘समीक्षक’, ‘रागिणी’, ‘साहित्य’ व ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ इत्यादी वाङ्‌मयीन नियतकालिकांमधून अनेक कवी, लेखक आणि समीक्षक पुढे आले. रघुवीर ज. सामंत, वि. स. खांडेकर, वामनराव चोरघडे, वा. ल. कुलकर्णी, रा. भि. जोशी, शेष, वि. ह. कुलकर्णी, वा. रा. ढवळे, पु. शि. रेगे, डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये, के. नारायण काळे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर इत्यादींचे लेखन या नियतकालिकांमधून सातत्याने प्रसिद्ध झाले. वा. रा. ढवळे यांनी पोस्ट ऑफिसमधील आपली नोकरी सांभाळून निगुतीने यांतील काही नियतकालिकांचे संपादन केले. पण आर्थिक ओढगस्तीमुळे यातील बरीच नियतकालिके बंद पडली. पण कालाच्या पटलावर त्यांनी आपली मुद्रा उमटविली. ‘मुंबई मराठी संघा’चे ‘साहित्य’ आणि ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ ही मुखपत्रे असल्यामुळे ही नियतकालिके अव्याहतपणे चालू राहिली.
१९३४ च्या सुमारास ‘प्रगती’ हे साप्ताहिक त्र्यं. शं. शेजवलकर यांच्या संपादनाखाली प्रसिद्ध होत असे. इतिहाससंशोधक शेजवलकरांचे विचारपरिप्लुत लेख ‘प्रगती’मध्ये प्रसिद्ध होत असत. त्यांनी आपली स्वतंत्र शैली संपादन केली होती. वि. स. सुखटणकर यांच्या ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ या कथासंग्रहाचा आणि त्यातील भूमिप्रेमाचा त्यांनी गौरव केला होता. डॉ. माधवराव पटवर्धन हे त्यातून ‘काव्यचर्चा’ सदर चालवीत. कुमार रघुवीर (रघुवीर ज. सामंत) यांची शब्दचित्रेही त्यातून प्रसिद्ध व्हायची. ‘पारिजात’ आणि ‘ज्योत्स्ना’ या नियतकालिकांचा काळ म्हणजे मराठी साहित्यातील नव्या प्रगतिशील किंवा पुरोगामी विचारप्रवाहांचा उत्थानकाल होता. ‘साहित्य’ या नियतकालिकातून ग. त्र्यं. माडखोलकर, वि. स. खांडेकर, यशवंत, पु. शि. रेगे, रा. भि. जोशी, माधवराव काटदरे, वामनराव चोरघडे, कुसुमाग्रज, बोरकर, शेष, इंदिरा संत, वि. भि. कोलते, वा. रा. कान्त, भ. श्री. पंडित, वि. म. कुलकर्णी, कृ. ब. निकुंब आणि वसंतराव चिंधडे यांचे विविध प्रकारचे साहित्य प्रसिद्ध होत असे.
पुरुषोत्तम आत्माराम चित्रे आणि विमलाबाई पुरुषोत्तम चित्रे यांच्या संपादनाखाली बडोद्याहून प्रसिद्ध होणारे ‘अभिरूची’ मासिक हे नावाप्रमाणेच अभिरुचिसंपन्न होते. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, पु. ल. देशपांडे आणि अळुरकर त्यात ‘पुरुषराज अळुरपांडे’ या नावाने विनोदी स्वरूपाचे लेखन करायचे. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि ग. द. गोडसे ‘शमा’ आणि ‘निषाद’ या नावाने लिहीत असत. वाङ्‌मयीन क्षेत्रातील विसंगतींवर प्रकाश टाकण्याचे कार्य त्यांनी केले. गंगाधर गाडगीळांची ‘किडलेली माणसे’ ही कथा, कुसुमावती देशपांडे यांचे ललित निबंध, समीक्षालेख, बा. सी. मर्ढेकरांची ‘पिंपात मेले ओल्या उंदीर’ ही कविता ‘अभिरूची’त प्रसिद्ध झाली. मर्ढेकर या कवितेमुळे चर्चेला विषय झाले. जोरदार प्रतिक्रिया वाङ्‌मयीन क्षेत्रात उमटल्या. कथा-कविता या वाङ्‌मयप्रकारांना- विशेषतः त्यातील नव्या प्रवाहांना- प्रोत्साहन देण्याचे ‘अभिरूची’चे श्रेय फार मोठे आहे.
नववाङ्‌मयाला स्थान देणारे आणि नवसमीक्षेला प्रोत्साहन देणारे ‘सत्यकथा’ मासिक हे वाङ्‌मयीन क्षेत्रातील महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. या मासिकाला वाङ्‌मयीन क्षेत्रातील महत्त्वाचे नियतकालिक म्हणून दर्जा प्राप्त करून देण्याचे श्रेय प्रा. श्री. पु. भागवत यांना आहे. त्यांचा वाङ्‌मयाचा व्यासंग दांडगा होता. पाश्‍चात्त्य वाङ्‌मयाचे आणि नियतकालिकांचे त्यांनी चोखंदळपणे वाचन केलेले होते. त्यामुळे त्यांनी नव्या प्रवाहांना आपल्या मासिकात स्थान दिले. साहित्याबरोबर चित्रकला, संगीतकला, रंगभूमी, शिल्प, नृत्यकला, लोकसाहित्य आणि लोकपरंपरा यांच्या अनुबंधांचा शोध घेणार्‍या अभ्यासकांना हेरले आणि लिहायला पाचारण केले. दुर्गाबाई भागवत यांनी लोकसाहित्याची रूपरेखा ‘सत्यकथा’मधूनच सुरुवातीला मांडली. प्रा. म. ना. सहस्रबुद्धे यांनी लोकपरंपरांचा वेध घेतला. प्रा. न. र. फाटक यांनी संतवाङ्‌मयाचा धांडोळा घेतला. डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये, वा. ल. कुलकर्णी आणि प्रा. गंगाधर गाडगीळ यांनी समीक्षेची नव्याने मांडणी केली. गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर आणि अरविंद गोखले या नवकथाकारांच्या कथांबरोबरच शांताराम, सदानंद रेगे, विजया आपटे (विजया राजाध्यक्ष), शशिकांत पुनर्वसु इत्यादिकांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. कुसुमाग्रज, बोरकर, अनिल, पु. शि. रेगे, इंदिरा संत, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, पद्मा गोळे, संजीवनी मराठे, शांता शेळके यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. ‘आजकालचे कथालेखक’ आणि ‘आजकालचे कवी’ या लेखमाला ‘सत्यकथा’मध्ये सुरू झाल्या. मातब्बर सृजनशील लेखक- कवी आणि त्यांच्यावर लिहिणारे मातब्बर समीक्षक असा मेळ घातला गेला. ‘सत्यकथा’च्या दीर्घकालीन वाङ्‌मयीन प्रवासात कसदार लेखक- कवींची मांदियाळीच निर्माण झाली. त्या सर्वांचा स्वतंत्रपणे परामर्श घ्यायला हवा. ‘सत्यकथा’विषयी वाङ्‌मयीन क्षेत्रात अनुकूल आणि प्रतिकूल मते अनेक असली तरी उच्च अभिरूची जोपासणारे आणि नव्या प्रयोगशीलतेचे स्वागत करणारे ते नियतकालिक होते याविषयी दुमत होण्याचे कारण नाही.
‘सत्यकथा’ मासिकाचा संक्षेपाने परामर्श घेताना त्याचे भावंड असलेल्या ‘मौज’ साप्ताहिकाचे आणि नंतर रूपांतरित झालेल्या ‘मौज’ वार्षिकाचे विस्मरण होऊन चालणार नाही. मौज साप्ताहिकाचे १९५८-५९ च्या सुमारास ‘टेब्लॉइड’ आकाराचे अंक आठवतात. राजकारण, समाजमंथन, विचारदर्शन आणि साहित्यचर्चा यांची लयलूट त्या साप्ताहिकात असायची. ‘सत्यकथा’प्रमाणेच ‘मौज’ साप्ताहिकानेही वाचकांची अभिरूची घडविली. काळाच्या ओघात संचालकांना ते साप्ताहिक बंद करावे लागले. पण दिवाळी अंकाच्या रूपाने गेली कित्येक वर्षे हे वार्षिक वाङ्‌मयीन कार्य करीत आहे. कथा, लघुकादंबरी, वैचारिक लेख, ललितनिबंध, संस्मरणे आणि महाराष्ट्राच्या सुदूर प्रदेशातील पन्नास-बावन्न प्रतिभावंतांच्या उत्तम कविता हा नजराणा घेऊन ‘मौज’ दिवाळी अ आपल्या इतमामाने येतो. ‘न मिळे मौज अशी पुन्हा!’ अशी रसिक वाचकांची मानसप्रतिक्रिया होते.
पु. शि. रेगे यांनी १९५४ च्या ऑक्टोबरमध्ये ‘छंद’ द्वैमासिक सुरू केले. ते प्राचार्य होते. सरकारी सेवेत होते. त्यामुळे सौ. सरिता रेगे यांचे संपादक या नात्याने नाव असे. स्वतः पु. शि. रेगे, वा. ल. कुलकर्णी, डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये, प्रा. रा. भि. जोशी आणि चित्रकार द. ग. गोडसे हे सर्वजण या अंकाचे संपादन कल्पकतेने करायचे. ते साधारणतः सहा वर्षे चालले. अल्पावधीत त्यात येऊन गेलेली वाङ्‌मयीन टिपणे पाहता आणि नव्या सृजनात्मक ऊर्मी पाहता वाङ्‌मयीन व्यवहारासंबंधी सजग भान निर्माण करण्यात आणि उच्च दर्जाची वाङ्‌मयीन अभिरूची घडविण्यात या द्वैमासिकाने केलेले कार्य विसरता येणार नाही.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या सुमारास ‘नवभारत’सारखे ‘प्राज्ञ पाठशाळा’ वाईहून निघणारे वैचारिक स्वरूपाचे मासिक सुरू झाले. वाङ्‌मयाला त्यात पुरेसे स्थान होते. विदर्भ साहित्य संघाचे ‘युगवाणी’, ‘मराठवाडा साहित्य परिषदे’चे ‘प्रतिष्ठान,’ दलित साहित्य आणि समीक्षेला वाहिलेले ‘अस्मितादर्श’, धुळ्यातून सुरुवातीला निघणारे ‘अनुष्टुभ’ आणि आता सुरू असलेले ‘नव-अनुष्टुभ,’ केवळ कविता आणि काव्यविचाराला वाहिलेले ‘कवितारती’, समीक्षाविचाराला वाहिलेले ‘आलोचना’, ग्रंथप्रसाराला वाहिलेले आणि अर्धशतक पूर्ण केलेले ‘ललित’ मासिक, स्त्रीजाणिवांना प्राधान्य देणारे ‘मिळून सार्‍याजणी’, गुलबर्ग्याहून निष्ठेने चालविलेले ‘अनुबंध’, हैदराबादहून चोखंदळपणे साहित्यविमर्श करणारे ‘पंचधारा’, अस्नोडा (गोवा) येथून प्रसिद्ध झालेले ‘मांडवी’ मासिक, ग्रंथप्रसाराला वाहिलेले ‘खेळ’सारखे नियतकालिक, भाषेच्या संशोधनासाठी वाहिलेले ‘भाषा आणि जीवन’ आणि केवळ अनुवादाला वाहिलेले ‘केल्याने भाषांतर’ या नियतकालिकांचा परामर्श खरे पाहता विस्ताराने घ्यायला पाहिजे. पण निदान कृतज्ञतेने त्यांचा नामोल्लेख करणे आवश्यक आहे.