सिंधूची जीत

0
92

रिओ ऑलिंपिकमध्ये पुसारला वेंकट तथा पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदक हुकले, परंतु रौप्यपदक पटकावताना तिने जी चिवट झुंज दिली ती कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी किंवा अमिताभ बच्चन किंवा सुपरस्टार रजनीकांतसारखे चाहते सिंधूला आज लाभले आहेत ते काही उगीच नाही. कॅरोलिना मारीनसारख्या छोट्या चणीच्या परंतु अत्यंत चपळ प्रतिस्पर्ध्याशी सिंधूची गाठ होती. मारीन जगज्जेती आणि सिंधू त्या तुलनेत नवखी. परंतु सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम एकेरी बॅडमिंटन सामन्यात तिन्ही सेटस्‌मध्ये सिंधूने दिलेली झुंज निश्‍चितच प्रशंसनीय होती. पहिला सेट तर तिने २१ – १९ असा जिंकलाच. त्यातही ती सुरवातीला ६ – ११ अशी मागे होती. ऐरागैरा कोणी असता तर या पिछाडीने ढेपाळला असता, परंतु सिंधू टिकून राहिली. लागोपाठ पाच गुण पटकावत तिने ही पिछाडी भरून काढली आणि अटीतटीने झुंजत सत्तावीस मिनिटांत पहिला सेट खिशात टाकला. दुसरा सेट सुरू झाला तेव्हा सिंधू थकलेली दिसत होती. मिड ब्रेकपर्यंत ती पिछाडीवर राहिली. तो सेट तिने गमावला, त्यात तिच्या अपयशापेक्षा मारीनची चपळाई आणि जबर आत्मविश्‍वास अधिक कारणीभूत होता. निर्णायक तिसर्‍या सेटमध्ये सिंधूने जी झुंज दिली ती सफल झाली नसली, तरीही अविस्मरणीयच आहे. ६-१, ९-४ करता करता आपली पिछाडी भरून काढत जेव्हा तिने सामना १०-१० वर नेऊन ठेवला तेव्हा कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. दुर्दैवाने मारीनच्या चपळाईच्या चालींपुढे तिचा टिकाव लागू शकला नाही आणि १९-१५ व शेवटी २१-१५ असा तो सेट आणि सामनाही तिने गमावला, परंतु तरीही सिंधूचा शिस्तबद्ध खेळ, तिची प्रतिस्पर्ध्याला सतत उजवीकडे – डावीकडे झुंजवत ठेवण्याची शास्त्रशुद्ध खेळी कौतुकास्पद होती. तिच्याकडून काही चुकाही घडल्या, ज्या फार महागात पडल्या. मारीनने हाणलेल्या फटक्यामुळे शटलकॉक बाहेर जाऊन पडेल हा तिचा अंदाज अनेकदा चुकला आणि तिला गुण गमवावे लागले. परंतु तरीही हा सामना तिने एकतर्फी होऊ दिला नाही. सर्वांत उठून दिसली ती तिची खेळातली शिस्त. मारीन प्रत्येक गुणप्राप्तीनंतर किंचाळायची, वारंवार शटलकॉक बदलायची. अंपायरनी तिला वारंवार त्यासाठी समजही दिली. परंतु समोरच्याला विचलीत करण्याच्या या खेळीला सिंधू बळी पडली नाही. फक्त पिछाडीवर राहिली की, तिचा आत्मविश्वास ढळायचा, परंतु जागच्या जागी उड्या मारून ती आपले मन थार्‍यावर आणायची. सिंधूची आणि तिचा मार्गदर्शक पुलेला गोपीचंद या दोघांचीही देहबोली त्यांच्या खेळावरच्या निष्ठेचे दर्शन घडवणारी होती. सिंधूच्या या कामगिरीमागे दोघांचीही प्रचंड मेहनत आहे. सायना नेहवालला ज्या प्रकारे गोपीचंदने घडवले, त्याच जिद्दीने त्याने सिंधूला त्याने रिओपर्यंत पोहोचवले. सिकंदराबादच्या सिंधूला वडील सकाळी शाळेत सोडण्याआधी गोपी अण्णाच्या अकादमीत सोडायचे. शाळा सुटल्यावर पुन्हा अकादमीत न्यायचे. किमान चार वर्षे त्यांचा हा नित्यक्रम होता. सिंधूसाठी पहाटे साडे चारला उठून गोपी अण्णा, त्याचा मुलगा सराव करायचे. या सगळ्या अतोनात मेहनतीतून सिंधू घडली आहे. गेले तीन महिने तिला हातात फोन घ्यायलाही गोपीची मनाई होती. रिओत गेल्यापासून सर्दी होऊ नये म्हणून तिला दही आणि आइसक्रीमही खाऊ दिले गेले नाही. परंतु तक्रार न करता सिंधूने ही पथ्ये पाळली आणि यश जोडले. घरबसल्या या खेळाडूंची खिल्ली उडवणे शोभा डेंसारख्यांना फार सोपे आहे. परंतु खेळावरची ही निःस्सीम निष्ठा, मेहनत, त्याग याची तुलनाच होऊ शकत नाही. हार जीत महत्त्वाची असेल, परंतु ज्या प्रकारे सिंधूने झुंज दिली, ती जिद्द आणि खेळावरची निष्ठा कोट्यवधी भारतीयांची ह्रदये जिंकून गेली आहे!