आनंदाची हंडी

0
68

मुंबईतील दहीहंडी उत्सवासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वीस फुटांच्या उंचीची मर्यादा घातली आहे आणि अठरा वर्षांखालील मुलांना त्यात सहभागी होण्यास मनाई केली आहे. अर्थात, या निवाड्यावरून तेथील राजकारण तापणे साहजिक आहे. ‘आम्ही दहीहंड्या स्टुलावरून फोडायच्या काय’, असा खोचक सवाल राज ठाकरेंनी आपल्या शैलीत केला. सर्व राजकीय पक्षांना दहीहंडी उत्सवावरील हे निर्बंध मंजूर नाहीत असे दिसते. त्यामुळे शिवसेनेच्या संजय राऊतांपासून कॉंग्रेसच्या संजय निरुपमपर्यंत सर्वांनी यासंदर्भात आपले आक्षेप नोंदवले आहेत. खरे तर दहीहंडी उत्सवाचे वाढते व्यावसायीकरण, त्यातील लाखा – लाखांची बक्षिसे, बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी हे विषय गेली अनेक वर्षे चर्चेत आहेत. परंतु तरीही दरवर्षी दहीहंडी अधिकाधिक उत्साहाने साजरी होत आली आहे. दरवर्षी दहीहंडी जवळ आली की, त्याविरुद्ध न्यायालयात याचिकाही दाखल केल्या जातात. यापूर्वी एकदा मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सव साजरा करायलाच मनाई केली होती व नंतर ती हटवण्यात आली होती. यावेळी जे निर्बंध घातले गेले आहेत, त्यांना अर्थातच दोन बाजू आहेत. उंचच उंच दहीहंडी बांधल्याने त्या फोडण्याच्या नादात खाली पडून गोविंदा जखमी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. पूर्वी मुंबईत किमान पाच – सहाशे गोविंदा अशा घटनांत जखमी वा जायबंदी होत असत. यासंदर्भात जनजागृती होऊ लागताच सर्वांचे सामूहिक विमे उतरवले जाऊ लागले, वरच्या थरांवरील बालगोविंदांना हेल्मेट घातली जाऊ लागली. सुरक्षेसंदर्भात थोडी अधिक काळजी घेतली जाऊ लागली, परिणामी, जखमी गोविंदांचे प्रमाण थोडे खाली आले, परंतु ते पूर्णांशाने बंद झालेले नाही. त्यामुळे खेळाच्या नादात आयुष्याचाच खेळ होत असेल तर असे प्राणघातक खेळ हवेत कशाला असे मानणारा एक वर्ग आहे, तर या दहीहंड्या परंपरेने चालत आलेल्या असून त्यावर कोणतेही निर्बंध म्हणजे आपल्या धर्मावरचा घाला असे मानणाराही एक वर्ग आहे. परंतु प्रथा व परंपरेतील धोका कमी करायला काय हरकत आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यासंदर्भात गोविंदा पथकांची आणखी एक अडचण आहे. अठरा वर्षांखालील मुलांना बंदी घातली गेली असल्याने वरच्या थरांना वजनदार बाप्ये कसे चढवायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे. वरच्या थरांवर कमी वजनाची छोटी मुले सहसा चढवली जातात ती खालचे थर टिकावेत यासाठी. परंतु बघायला हे आकर्षक जरी वाटत असले तरी प्राणघातक ठरू शकते हे मान्य करण्याची मात्र या गोविंदा पथकांची तयारी नाही. या खेळाचे केवळ व्यावसायीकरणच झाले आहे असे नव्हे, तर समस्त राजकारण्यांना दहीहंडी उत्सव हे स्वतःच्या शक्तिप्रदर्शनाचे एक साधन बनले आहे. सचिन अहिरांच्या संकल्प प्रतिष्ठानची वरळी बीडीडी चाळीतील दहीहंडी असो, पाचपाखाडी – ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडी असो, प्रताप सरनाईकांची ठाण्याच्या वर्तकनगरची दहीहंडी असो, नाही तर राम कदमांची घाटकोपरची दहीहंडी, या सगळ्या दहीहंड्यांमधील चुरस, त्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांची लागणारी अहमहमिका, होणारी लाखोंची गर्दी यामागे प्रथा, परंपरा सांभाळण्याचे उद्दिष्ट नसते. त्यामागे असतो केवळ व्यवहार. स्वतःचे राजकीय वजन वाढवण्याची महत्त्वाकांक्षा. त्यामुळे आठ थरांची, नऊ थरांची दहीहंडी करण्याच्या या चुरशीची परंपरेशी सांगड घालण्याचा प्रयत्न करणे योग्य म्हणता येणार नाही. एखादी परंपरा जर प्राणघातक ठरत असेल, तर ती अधिकाधिक सुरक्षित आणि निर्भेळ आनंददायी करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात गैर काय? या आनंदोत्सवाला कोणाच्या दुःखाची किनार नसावी. कोणाचे कुटुंब त्यातून उद्ध्वस्त होऊ नये.