कोंडी फुटली

0
64

ब्राझीलच्या रिओ दि जानेरोमध्ये गेले अकरा दिवस सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकाविना राहिलेल्या भारताची कोंडी अखेर साक्षी मलिकने फोडली. ५८ किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये तिने आपली प्रतिस्पर्धी किरगिस्तानच्या आयसुलू तायनीबेकोवाला आठ – पाच गुणाधिक्क्याने हरवूने स्वतःसाठी आणि भारतासाठी पहिले कांस्यपदक जिंकले. तिला कांस्यपदकावर जरी समाधान मानावे लागले असले तरी ते अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. एकीकडे भारताने ज्यांच्यावर आशा अपेक्षा ठेवल्या होत्या ते दिग्गज एकेक करून नामुष्कीजनक हार पत्करून रिंगणाबाहेर होत असताना साक्षीने अखेरपर्यंत झुंजत राहून हे पदक प्राप्त केलेले आहे. ज्या डावामध्ये तिला हे पदक मिळाले, ती लढत पाहिली तर साक्षीने आत्मविश्वास ढळू न देता अक्षरशः शेवटपर्यंत जिद्दीने लढत राहून हा विजय प्राप्त केल्याचे स्पष्ट दिसेल. खरे तर तो कुस्ती सामना सुरू झाला तेव्हापासून साक्षीची प्रतिस्पर्धीच वर्चस्व राखून होती. आधी तिने साक्षीचा पाय पकडला आणि दोन गुण मिळवले. नंतर दोनाचे तीन झाले, तीनाचे पाच झाले. ब्रेक झाला तेव्हा साक्षीची प्रतिस्पर्धी पाच गुण मिळवून आघाडीवर होती. दुसरी कोणी स्पर्धक असती तर या धक्क्याने कोलमडूनच पडली असती. परंतु साक्षी लढत राहिली. तिने आपल्या प्रतिस्पर्ध्याला पाडून दोन गुण मिळवले. त्याचीच पुनरुक्ती करीत आणखी तीन गुण मिळवले. जेव्हा गुणांची पाच – पाच अशी बरोबरी झाली, तेव्हा आता निर्वाणीचा क्षण आला आहे याची खूणगाठ मनाशी बांधून तिने शेवटच्या क्षणी आपल्या थकलेल्या प्रतिस्पर्ध्याशी अटीतटीची झुंज देऊन एका झटक्यात निर्णायक तीन गुण प्राप्त केले. ‘आता नाही तर कधीच नाही’ असाच विचार साक्षीने त्या निर्वाणीच्या क्षणांमध्ये केला असेल. मग सुरू झाला तो निव्वळ जल्लोष! रोहतकजवळच्या मोखरा या छोट्याशा खेड्यातून रिओपर्यंतचा हा प्रवास ही केवढी मोठी तपस्या आहे. साक्षी काय, सिंधू काय किंवा दीपा करमाकर काय, देशाच्या कुठल्या कानाकोपर्‍यातून आलेली ही मुले जिद्दीने येथवर आलेली आहेत. तीही केवळ क्रिकेट आणि फुटबॉलपलीकडे इतर खेळांना किंमत दिली जात नाही अशा भारतासारख्या देशातून आलेली ही मुले आहेत. जेथे ना या खेळांना प्रतिष्ठा, ना धड साधनसुविधा, ना आर्थिक पाठबळ, ना योग्य मार्गदर्शन. हार – जित ही कोणत्याही खेळात होत असतेच. परंतु कुठल्या कुठल्या खेड्यापाड्यांतून, प्रतिकुल परिस्थितीतून केवळ जिगर आणि मेहनतीच्या बळावर ऑलिंपिकपर्यंत आलेल्या या खेळाडूंची शोभा डेंसारख्या ‘पेज थ्री’ पलीकडे ज्यांचे विश्‍व नाही अशांनी ट्वीटरवरून घरबसल्या ‘रिओ जाओ, सेल्फी लो, खाली हाथ वापस आओ’ अशी कुजकट खिल्ली उडवणे हे अतिशय गैर होते. अपमानास्पदही होते. साक्षीने आपल्या पदकाद्वारे शोभा डेंना आणि त्यांच्यासारख्या कुजकट मानसिकतेला आपल्या पदकाद्वारे सणसणीत थप्पडच जणू लगावली आहे. ऑलिंपिकमध्ये पदक प्राप्त करणारी साक्षी ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. आजवर केवळ तीन महिलांना ऑलिंपिकमध्ये पदक प्राप्त करता आले आहे. कर्णम मल्लेश्‍वरी, मेरी कोम आणि सायना नेहवालनंतर साक्षी मलिक चौथी. हे यश थोडथोडके नाही. शेवटी कांस्यपदकच का! म्हणून हेटाळणी करणार्‍यांना या पदकाचे महत्त्वही उमगले पाहिजे. या पदकामागे साक्षीची बारा वर्षांची तपस्या आहे. ताश्कंदमध्ये आठव्या स्थानी फेकल्या गेलेल्या एका मुलीने दोहा आणि इस्तंबूलमार्गे आपला ऑलिंपिक प्रवेश निश्‍चित करण्यातील जिद्द आणि मेहनत आहे. आपण आता हरणार आहोत हे स्पष्ट दिसत असूनही अगदी शेवटच्या निर्वाणीच्या क्षणापर्यंत आपल्या प्रतिस्पर्ध्याशी जीव तोडून दिलेली झुंज आहे…