रवींद्रनाथांची कविता

0
152

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

आज ७ ऑगस्ट. रवींद्रनाथांची पुण्यतिथी. त्यांनी लौकिक जगाचा निरोप घेऊन ७५ वर्षे लोटली. परंतु त्यांचा कीर्तिसुगंध आजही दरवळत आहे. ते श्रेष्ठ भारतीय कवी होतेच; पण ते विश्‍वकवी म्हणूनही संबोधले जातात. सृजनशक्तीवर त्यांची अपार श्रद्धा. आपल्या कवितेमधून त्यांनी विश्‍वनिर्मितीच्या मूलबीजाचा शोध घेतला. जीवनाच्या चिरंतनत्वाचा शोध घेतला. जे जे मानवी आहे ते ते त्यांना मननीय वाटायचे. ऐंशी वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. ते अर्थपूर्ण जीवन जगले. त्यांनी सदैव सकारात्मक अनुभूती बाळगली. सौंदर्याचा वेध घेतला. जीवन समृद्ध करणार्‍या साहित्य, नाट्यकला, चित्रकला, संगीत, नृत्य आणि शिल्प आदी कलांशी निरंतर अनुबंध ठेवून आपले व्यक्तिमत्त्व विकसित केले.

आज ७ ऑगस्ट. रवींद्रनाथांची पुण्यतिथी. त्यांनी लौकिक जगाचा निरोप घेऊन ७५ वर्षे लोटली. परंतु त्यांचा कीर्तिसुगंध आजही दरवळत आहे. ते श्रेष्ठ भारतीय कवी होतेच; पण ते विश्‍वकवी म्हणूनही संबोधले जातात. सृजनशक्तीवर त्यांची अपार श्रद्धा. आपल्या कवितेमधून त्यांनी विश्‍वनिर्मितीच्या मूलबीजाचा शोध घेतला. जीवनाच्या चिरंतनत्वाचा शोध घेतला. जे जे मानवी आहे ते ते त्यांना मननीय वाटायचे. ऐंशी वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. ते अर्थपूर्ण जीवन जगले. त्यांनी सदैव सकारात्मक अनुभूती बाळगली. सौंदर्याचा वेध घेतला. जीवन समृद्ध करणार्‍या साहित्य, नाट्यकला, चित्रकला, संगीत, नृत्य आणि शिल्प आदी कलांशी निरंतर अनुबंध ठेवून आपले व्यक्तिमत्त्व रवींद्रनाथांनी विकसित केले. आपण सारे त्यांना कवी म्हणून ओळखत असलो तरी त्यांच्या प्रतिभेचे क्षितिज विस्तीर्ण होते. ते उत्तम कथाकार होते, कादंबरीकार होते, नाटककार होते, संगीतकार होते. ‘रवींद्रसंगीत’ अशी पृथगात्म मुद्रा त्यांनी संगीतक्षेत्रात निर्माण केली. ते उत्तम चित्रकारही होते. साठाव्या वर्षी त्यांनी चित्रकलेला खर्‍या अर्थाने प्रारंभ केला. वीस वर्षांच्या कालावधीत दोन हजार चित्रे काढली. स्वतःची अशी चित्रशैली निर्माण केली. ते निबंधकार होते, नट होते, गायक होते, कुशल शिक्षक होते, शिक्षणतज्ज्ञ होते, बालमानसशास्त्रज्ञ होते, समाजसुधारक होते, दृष्टे विचारवंत होते आणि तत्त्वचिंतक होते.

त्यांचा मनःपिंड सृजनशील होता. त्यांनी आपल्या आयुष्यात अखंडितपणे भारताच्या नवनिर्माणाचा ध्यास घेतला. पण तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. ‘शांतिनिकेतन’ आणि ‘श्रीनिकेतन’च्या रूपाने त्यांची कार्यदर्शी पावले काळाच्या पटलावर उमटली. रवींद्रनाथांची उत्कृष्ट कविता कोणती? शांतिनिकेतन! एका आनंदयात्रिकाचा हा समृद्ध जीवनप्रवास नंतरच्या पिढ्यांना प्रकाशमान करीत राहिला. जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या तरी संदर्भात रवींद्रनाथांची आठवण होत नाही असा आपला एकही दिवस जात नाही. असा हा सम्यक जीवन व्यापून राहिलेला प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत. ही व्यक्तिपूजा नसून ज्या श्रेयसासाठी त्यांनी अहर्निश जीव पाखडला, ज्या मूल्यांसाठी जीवनसाधना केली त्याची ही परिणती. सृजनाची आस असलेल्या प्रत्येक व्यक्तीला रवींद्रनाथ अत्यंत जवळचे वाटतात. देश, धर्म, भाषा यांच्या सीमा उल्लंघून विश्‍वमानवाचे स्वप्न पाहणार्‍या या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वासमोर आपण नतमस्तक होतो. एकाच वेळी आपुलकी आणि आदर प्राप्त होणे ही दुर्मीळ बाब. वंगभूमीचे हे नररत्न अवघ्या भारताचे झाले. ‘यत्र विश्‍वं भवति एक नीडम्’ हा मूलमंत्र त्यांनी ‘विश्‍वभारती’च्या माध्यमातून सार्‍या जगाला दिला. या रवींद्राचे तेज सार्‍या विश्‍वात फाकले.
अशा या असामान्य कोटीच्या प्रतिभावंताच्या व्यक्तिमत्त्वाचे स्वच्छ प्रतिबिंब त्याच्या कवितेत पडलेले आहे. एकाच माणसामध्ये इतके पैलू असावेत याविषयी आपल्याला विस्मय वाटतो; शिवाय त्याचे सव्यसाचित्व न्याहाळताना भारतीय पुनरुत्थानपर्वाचे ते अपत्य असल्याचा प्रत्ययही येतो. ‘गीतांजली’च्या रूपाने भारतीय जीवनधारणेची शान त्याने सार्‍या जगाला पटवून दिली. आपली मान अभिमानाने ताठ झाली.
या कवीचा आत्मशोध कवितेच्या माध्यमातून निरंतर सुरू होता. निसर्गानुभूतीमधून जीवन-मृत्यूच्या तांडवासंबंधी त्याचे चिंतन चालू असे. भूत-वर्तमान-भविष्य यांमधील हेलकाव्यांसंबंधी तो आपले मानसतरंग व्यक्त करतो. एका गीतात तो म्हणतो ः
‘‘पौष-फाल्गुनाच्या बदलत्या लहरींवर हेलकावणार्‍या हसण्या-रडण्याच्या झोक्यात, मला माझ्या गाण्यांची परडी वाहायची आहे. यात फार आनंद मिळतो का तुला, एवढ्यासाठीच का तू मला ही स्वरगंधित माळ घातली आहेस? म्हणूनच का माझी झोप उडून गेली आहे, मनाचे बंध मोकळे झाले आहेत, वेड्या सुसाट वार्‍याने चिरव्यथेचे रान घुसळून निघते आहे आणि माझ्या दिवस-रात्रींमध्ये छाया-प्रकाशाचे स्पंदन सुरू आहे. यामुळे फार आनंद मिळतो का तुला, एवढ्यासाठीच का ही स्वरगंधित माळ मला घातली आहेस? रात्रीची विश्रांती नाही, दिवसाचे काम संपता संपत नाही. माझ्या निर्हेतुक सेवेतून थोडीही फुरसत मिळत नाही. विश्‍वात कोठेही मला शांती लाभत नाही, मन अस्वस्थ होते आणि त्यातूनच प्राणदाहक गीतांची अग्निज्वाला भडकून उठते. यात फार आनंद मिळतो का तुला, एवढ्यासाठीच का ही स्वरगंधित माळ मला घातली आहेस?’’
– चढत्या श्रेणीने रवींद्रनाथांच्या जीवनदृष्टीची लय या गीतात व्यक्त झाली आहे. ‘निर्झराचा स्वप्नभंग’ या कवितेत कवीचा आत्मभाव उत्कट शब्दांतून व्यक्त झाला आहे ः
मी करुणेच्या धारांचा वर्षाव करीन
मी हे पाषाणाचे कारागृह फोडून टाकीन
वेड्याप्रमाणे भावोन्मत्त होऊन,
जगातील भेदभाव बुडवून, मी गात गात फिरेन.
केस मोकळे सोडून, काठाकाठांवरची फुले वेचीत
इंद्रधनुष्याने अंकित झालेले पंख फडकवीत,
रविकिरणांवर हास्य विरवरवीत,
मी आपले प्राण ओतून देईन.
कवीची अदम्य जीवनेच्छा आणि चिरंतनतेचा ध्यास त्याच्या ‘प्राण’ या कवितेत प्रतिबिंबित झालेला आहे. ‘माणूस’ हे त्याच्या चिंतनाचे केंद्र आहे ः
या सुंदर जगतामध्ये मी मरणाची इच्छा करीत नाही,
मानवामध्ये मी जगू इच्छितो!
या सूर्यकिरणांमध्ये, या फुललेल्या वनात-
जिवंत हृदयामध्ये जर मला स्थान मिळाले तर…!
पृथ्वीवर चिरंतन तरंगित होणार्‍या प्राणांच्या खेळात
कितीतरी हास्यमय व अश्रुमय अशा विरहात-मीलनात,
मानवाच्या सुखदुःखात संगीत गुंफून
जर मी चिरंतन गृह रचू शकलो तर…!
मानवी अभ्युदयाविषयीची तळमळ ‘निष्फळ कामना’ या कवितेत व्यक्त झाली आहे ः
मानव हे भूक भागविण्याचे खाद्य नव्हे,
कोणी तुमचा-आमचा नाही!
अत्यंत जपून
अतिशय गुपचूपपणे
सुखा-दुःखात, दिवसरात्री
विपत्ती, समृद्धीत
जीवनात, मरणात
शेकडो ऋतुचक्रांच्या फेर्‍यात
(जे) शतदलांचे कमल उमलत असते-
ते वासनांच्या तीक्ष्ण सुरीने
तू तोडून घेऊ पाहतोस काय?
त्याचा सौंदर्यविकास न्याहाळ,
त्याचा मधु प्राशन कर,
त्यावर प्रेम कर, प्रेमाने बलवान हो
रवींद्रनाथांच्या काव्यात्म अनुभूतीत निसर्गाला प्राधान्य मिळालेले आहे. सुखवस्तू घराण्यात जरी त्याचा जन्म झाला तरी ते हस्तिदंती मनोर्‍यात कधीच रमले नाहीत. त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ सिलयदाह व सजदपूर या नादिया व पवना जिल्ह्यांतील व्यवस्थापकाच्या वाड्यात गेला. त्यांना नद्यांच्या पात्रांमधून नौकेचा प्रवास करावा लागे. तेथील ग्रामीण परिसराशी, निसर्गाशी आणि माणसांच्या जीवनशैलीशी त्यांचा निकटचा संबंध आला. ‘सोनार तरी’ यासारख्या त्यांच्या प्रारंभीच्या कवितासंग्रहामध्ये तत्कालीन मानसप्रतिक्रिया आढळतात. त्यातील तीन कविता प्रातिनिधिक स्वरूपाच्या. त्या म्हणजे ‘जेते नाही दिब’ (जाऊ देणार नाही)
‘समुद्रेर प्रति’ (समुद्रास) आणि ‘वसुंधरा.’
‘जेते नाही दिब’मध्ये कवी उद्गारतो ः
‘‘ती हाक म्हणजे जणू काही या विश्‍वाच्या रुक्ष अरण्यात हुंदके देणारी अनंताची बासरीच. त्यामुळे पृथ्वी उदास होते आणि केस मोकळे सोडून, गंगेकाठच्या विस्तृत शेतावर, अंगाभोवती दुपारच्या उन्हाचा सोनेरी पदर घेऊन, अचल नजरेने निःशब्द होऊन, दूरच्या क्षितिजाकडे डोळे रोखून बघत बसते. मी तिचा तो म्लानमधुर चेहरा पाहिला- अगदी दारापाशी स्तब्धपणे उभ्या असलेल्या माझ्या चार वर्षांच्या दुःखी मुलीसारखाच.’’
‘वसुंधरा’ ही रवींद्रनाथांची लक्षणीय कविता. कवीला स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये विश्‍वनिर्मितीचे आदिम स्पंदन ऐकू येते. गंधवती पृथ्वीविषयीचे कवीचे नितांत प्रेम येथे व्यक्त झाले आहे. जीवनातील दृश्यांकडे, नादांकडे, गंधांकडे व भावनांकडे तो अलीकडच्या गतिमान काळातील किळसवाण्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर पाहतो आणि उद्गारतो ः
तू माझी पृथ्वी बहुत वर्षांची
मिसळून मला तुझ्या मातीसंगे
अनंत गगनात अश्रांत चरणांनी
केल्या तू प्रदक्षिणा सूर्यमंडळाला
असंख्य रात्रंदिस युगानुयुगें;
उगवली आहे माझ्यात तुझी हिरवळ
उमलली आहेत फुले राशी-राशींनी
वर्षाव केला आहे तरुराजींनी
पानांचा, फुलाफळांचा, सुगंध परागांचा
यास्तव आज
बसून एकाकी विमनस्कपणे पद्मातीरी
पाहात समोर मुग्ध नेत्रांनी
अनुभवतो सर्वांगी सर्वान्तः करणी-
कसे रोमांचत असतात तृणांकुर तुझ्या मातीत
तुझ्या अंतरी रात्रंदिस
संचारते कोणती जीवनधारा…
निसर्गाच्या सान्निध्यात रवींद्रनाथांना विचारसमाधी प्राप्त होते. म्हणून ते कृतज्ञतेने उद्गारतात ः
मी धन्य आहे कारण मला स्वर्गीय प्रकाश दिसतो आहे.
मी धन्य आहे कारण माझे या विश्‍वावर प्रेम आहे.
निसर्गलयीत तन्मय झालेल्या कविमनाचे चित्र ‘एइ स्तब्धताय’ या ‘नैबेद्य’ या कवितासंग्रहातील कवितेत आहे ः
शुनितेछि तृणे तृणे धुलाय धुलाय
मोर अंगे रोमे रोमे, लोके लोकांतरे
ग्रहे सूर्ये तारकाय नित्य काल धरे
अणुपरमाणुदेर नृत्यकलरोल…
तोमार आसन घेरि अनन्त कल्लोळ
(या स्तब्धतेत, गवताच्या पात्यापात्यांत, धुळीच्या कणाकणांत, माझ्या रोमारोमांत, जनसागरात आणि मनसागरात, ग्रहांत, सूर्यात, तारकांत, अणुपरमाणूंच्या नर्तनलयीत सदैव भरून राहिलेला आणि तुझ्या आसनालाही घेरून टाकणारा तो अनंत कल्लोळ मला स्पष्ट ऐकू येतो.) मानवी जीवन आणि निसर्ग या दोहोंमध्ये सळसळणारे चैतन्यतत्त्व एकच आहे. ते सुंदर आहे आणि आनंददायीही आहे. या चैतन्यप्रवाहाला सुसंगती आहे. लय आहे. या चैतन्याला रवींद्रनाथ ‘जीबनदेवता’ असे संबोधतात. पार्थिव जगात राहून अपार्थिवतेचा आनंद निसर्गसान्निध्यात घेता येतो अशी त्यांची जीवनधारणा आहे.
‘नववर्षा’, ‘वैशाख,’ ‘बलाका’ व ‘मधुमालती’ या कवितांतील निसर्गसौंदर्याचे विभ्रम न्याहाळणे हा एक आगळा-वेगळा आनंदानुभव आहे.
रवींद्रनाथांच्या कवितांत प्रेमभाव व्यक्त करणार्‍या कविता विपुल आहेत. त्यांच्यामधील भावकोमल स्वर मनात रेंगाळत राहणारा आहे. ‘रात्री आणि प्रभाती’ ही कविता येथे अधोरेखित करावीशी वाटते. कवी उद्गारतो ः
काल वासंतिक निशासमयी चंदेरी मध्यरात्री
कुंजवनात सुखभराने मी फेसाळणारी तारुण्य मंदिरा
तुझ्या मुखाशी धरली
तू माझ्या नेत्रांकडे पाहात, हळूहळू हातांत पेला घेतलास,
हंसत तू चुंबनांनी भरलेल्या सुरस लाल ओठांनी
काल वासंतिक निशासमयी चंदेरी मध्यरात्री मधुर आवेश भरात
ती प्राशन केली..
भारतवर्षाच्या भविष्यकाळाच्या चिंतेने कवीचे मन ग्रासलेले आहे. त्या वेदनांना त्याने वाट करून दिलेली आहे; पण त्याच्या मनातील आशादीप मालवला गेलेला नाही. ‘परित्राण’ या कवितेत रवींद्रनाथ उद्गारतात ः
हे मंगलमया, या दुर्भागी देशातून सर्व क्षुद्र भये-
लोकभय, राज्यभय आणि मृत्युभय- दूर कर
चैतन्यहीन दुर्बलांचा हा पाषाणभार,
ही धुळीतील नित्याची अवनती
हा क्षणोक्षणी होणारा स्वतःचा अवमान,
आतील बाहेरील ही गुलामगिरीची दोरी,
गांजलेल्या माना खाली घातलेल्या जनतेचा हजारो (आक्रमकां)च्या
पायदळी वारंवार होणारा हा मनुष्यमर्यादा गर्वाचा
चिरपरिहार-
ही लज्जेची प्रचंड रास, आपल्या पायाच्या
ठोकरीने चूर्ण करून उडवून दे. मंगल प्रभातीं
अनंत आकाशाखाली महोदार प्रकाशात,
मोकळ्या वायुलहरीत मस्तक उंच करता येऊ दे
याच संदर्भात ‘भारततीर्थ’ ही चिंतनगर्भ कविता संवेदनशील मनांना अंतर्मुख करणारी आहे. संस्कृतिप्रवाहासंबंधीचे ते प्रगल्भ भाष्य आहे. ‘अपमानित’मध्ये अशाच स्वरूपाचा आशय व्यक्त झाला आहे.
रवींद्रनाथांनी आर्ष आणि अभिजात महाकाव्यांवर भाष्य करणार्‍या कविता लिहिल्या आहेत. तो स्वतंत्र विवेचनाचा विषय आहे. एकीकडे ही नवनिर्मिती आहे; तर दुसरीकडे ती सृजनात्मक समीक्षा (उीशरींर्ळींश लीळींळलळीा) आहे. साहित्यसागरामध्ये त्यांनी विचक्षण वृत्तीने केलेले हे अवगाहन आहे.
मृत्यू समीप आला तरी रवींद्रनाथांची कवित्वशक्ती अम्लान स्वरूपाची राहिली. त्याच्या खाणाखुणा शेवटच्या टप्प्यातील कवितांत आढळतात. त्यांच्या परिणतप्रज्ञ प्रतिभेचे नवनीत ‘या जीवनात सुंदराचा मधुर आशीर्वाद मला मिळाला आहे’ या कवितेत प्रकट झाले आहे. त्यांचा आत्मभाव येथे फुली फुलून आलेला आहे ः
या जीवनात सुंदराचा मधुर आशीर्वाद मला मिळाला आहे.
मानवाच्या प्रीतिपात्रातून
त्या सुंदराच्याच सुधेचा आस्वाद मला लाभतो.
दुःसह दुःखाच्या दिवसांत
मी अक्षत-अपराजित आत्म्याला जाणले आहे
ज्या दिवशी निकट आलेल्या मृत्यूच्या छायेचा अनुभव मी घेतला,
त्या दिवशी भयाच्या हातून माझा दुर्बल पराभव झाला नाही.
महत्तम मानवांच्या स्पर्शाला मी मुकलो नाही.
त्यांची अमृतवाणी अंतरामध्ये मी संचित करून ठेविली आहे.
जीवनाच्या विधात्याची जी उदारता मला जीवनात लाभली,
तीच मी कृतज्ञमनाने आपल्या स्मरणात कोरून ठेविली आहे.