मधुमेहापासून रक्षण

0
550

सौ. मोहिनी सप्रे

मधुमेहाची कारणे ः
मधुमेहाला अमुक एकच कारण असे नसते. या रुग्णांचा संपूर्ण इतिहासाचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की अनेक कारणांमुळे हा रोग उद्भवतो. आपल्या आई-वडिलांपैकी कोणाला जर हा रोग असेल तर त्यांच्याकडून मुलांना मधुमेह होण्याची खूप शक्यता आहे. कित्येकदा आई-वडलांच्या मुलांना हा रोग होण्याची शक्यता असते.
मधुमेह आटोक्यात ठेवायचा असल्यास आहार योग्य प्रकारचा घेणे फार महत्त्वाचे आहे. मंद मधुमेह असलेला रुग्ण सामान्यतः स्थूलदेही असतो. त्याने कडकरीत्या आहाराचे नियमन केले तर औषधाशिवाय हा रोग काबूत ठेवता येतो. सामान्य आवश्यकतेपेक्षा आहारात कमी कर्बोदके पदार्थ घेतल्याने ती उणीव पेशींमधील जमा झालेल्या जास्तीच्या चरबीच्या दहनाने भरून निघते व शरीराला जरूर ती शक्ती पुरविली जाते. स्थूलपणाचा नाश होतो व बेडौल शरीराला परत आकार व सुरेखपणा प्राप्त होतो. कर्बोदित पदार्थांचे आहारातील प्रमाण कमी झाल्यामुळे इन्शुलीनवरील त्यांचा चयापचयावरील बोजा हलका होतो. सामान्यतः मधुमेहाच्या रुग्णाला त्याच्या वजनाच्या प्रत्येक किलोग्रामला ३० कॅलरी ऊर्जा परविणारा समतोल आहार पुरेसा म्हणावा. स्थूल व्यक्ती किंवा जास्त वजन असणार्‍या रुग्णांसाठी हे प्रमाण २५ कॅलरी इतके कमी करायला हरकत नाही.
मधुमेही रुग्णांनी स्वाद व भूक या दोघांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्या आहारातील कर्बोदके, प्रथिने व चरबी यात दर ग्रॅमला अनुक्रमे ४, ४ व ९ कॅलरी असतात. ही बाब लक्षात घेऊन आहारात त्याचे प्रमाण ठरवावे लागते. त्याचबरोबर पुढील गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे…
१) साखरेचा चहा, दूध, कॉफी, मिठाई खाऊ नये.
२) बटाटे, भात, रताळी, साबुदाणा, शिंगाडा, राजगिरा इत्यादी स्टार्च असलेले पदार्थ खाऊ नयेत.
३) पोळी, भाकरी, पाव, बिस्किटे इत्यादी पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत.
४) काजू, शेंगदाणे, कडधान्ये योग्य प्रमाणात खावेत.
५) केळी, चिक्कू, सिताफळ, आंबा, द्राक्ष्य ही फळे कमी खावीत. जांभूळ, नारींग, अननस, कलिंगड खायला हरकत नाही.
६) म्हशीच्या दुधाऐवजी गायीचे दूध वापरावे.
७) मध, साखर, गुळ, चॉकलेट, सुका मेवा, पोहे, लोणी, तूप, चुरमुरे, लाह्या, दूध पावडर अजिबात बंद करावे.

मधुमेहींसाठी व्यायाम ः
१. अर्धा ते एक तास फिरायला जाणे. रोज सकाळी व संध्याकाळी जलद गतीने फिरणे. यामुळे स्नायुंची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे ग्लुकोज वापरले जाऊन त्याचे रक्तातील प्रमाण कमी होते. तसेच हृदय व रक्तवाहिन्यांवर ताणही पडत नाही.
२. कमी वेळात जास्त फायदा हवा असेल तर रोज योग्य प्रमाणात धावणे. फक्त थकवा येणार नाही याकडे लक्ष द्यावे.
३. पोहणे – यातही थकवा येणार नाही याची काळजी घ्यावी.
४. हातापायाच्या सांध्यांचे व्यायाम करणे, तसेच शरीराचे सर्व सांधे हालचाल करतील पण थकवा येणार नाही, असे व्यायाम करावेत. व्यायाम हा जास्तीत जास्त २० मिनिटे करावा.

निसर्गोपचार व मधुमेह ः
१. पाण्याचे उपचार –
एनिमा – मधुमेहात आहारावर मर्यादा आल्याने रुग्ण अर्धपोटी असतो. त्यामुळे मलाभिसरण नीट होत नाही. त्यासाठी एनिमा हा उत्तम उपाय आहे. पण एनिमा घेण्याची सवय करू नये. गरज पडली तरच एनिमा घ्यावा.
कटीस्नान – दोन टबांमध्ये पाणी भरावे. एकात गार व एकात गरम व कंबरेचा भाग बुडेल असे बसावे. ५ ते ७ मिनिटे प्रथम गरम व मग गार पाण्यात बसावे. नंतर शरीर नीट पुसून घ्यावे. कटीस्नानाला नंतर एक तास काही खाऊ-पिऊ नये.
मालीश – आठवड्यातून एक किंवा दोन वेळा मालीश करावी. शक्यतो तज्ज्ञांकडूनच मालीश करून घ्यावी. सर्व अंगाला तेलाने मालीश करावी. याने स्नायू व त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
सूर्यस्नान – मालीशनंतर सूर्यस्नान केले पाहिजे. यासाठी सूर्याचे कोवळे किरण अंगावर पडले पाहिजेत. हिवाळ्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत व उन्हाळ्यात आठ वाजेपर्यंत ही वेळ सूर्यस्नानासाठी योग्य समजावी. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीचा एक तासही चालेल.
स्नान – मालीश व सूर्यस्नानानंतर गार पाण्याने स्नान करावे. स्नान करताना साबण वापरू नये. बेसन वापरावे व खरखरीत टॉवेलने अंग पुसावे. याने स्फूर्ती व उष्णतेचा शरीराला अनुभव येईल.

पथ्याचे काही पदार्थ ः
मधुमेहाच्या रुग्णाने खालील पदार्थ आहारात घेतल्यास ते पथ्यकारक ठरतील…
१. मध+लिंबू पाणी – हे अनशापोटी घ्यावे. ४०० मिली. पाण्यात ४ चमचे लिंबू रस व ६ चमचे मध.
२. दूध – गायीचे दूध गरम करूनच वापरावे.
३. दही – ताजे व गोड दही वापरावे.
४. मठ्ठा – दह्यापेक्षा मठ्‌ठा पचायला हलका असतो.
५. ताक – गोड व पातळ ताक प्यावे.
६. तुळशीचा काढा – चार ग्रॅम तुळशीची पाने १५० मिली. पाण्यात उकळावीत व गाळून त्यात १०० मिली दूध व चार चमचे गुळाचा पाक घालून प्यावे.
७. सूप – मेथी, पालक, तांदूळजा यांपैकी एक भाजी घेऊन ती स्वच्छ धुवून त्यात गाजर, मुळा, टोमॅटो, दुधी यापैकी ज्या असतील त्या भाज्या घालून वाफवून त्याचे सूप बनवावे.
८. भाज्यांचा रस – गाजर, काकडी, टोमॅटो, मेथी या भाज्या कच्चा खाव्यात किंवा त्यांचे रस काढून त्यात ताक, मीठ घालून प्यावे.
९. कोशिंबीर – काकडी, मुळा, गाजर,, टोमॅटो, कांदा अशा भाज्या तसेच मुळा, पालक अशा पालेभाज्या घेऊन त्यात दही, कोथिंबीर घालून कोशिंबीर खावी.
१०. धान्याचे पदार्थ – गहू, तांदूळ, बाजरी यांचे पीठ थोड्या तुपावर भाजून वापराव्यात. या आहाराने साखरेचे प्रमाण मर्यादित राहते. इन्स्युलीनची गरज पडत नाही.