मनःशांतीसाठी संतवाणी शोध मनःशांतीचा!

0
362

– प्रा. रमेश सप्रे

साधुसंत एकांतसेवनावर खूप भर देतात. एकांतात आपल्यावर विचारांचा झोत (फोकस) ठेवला जातो. आपल्या गुणदोषांचा आपल्यालाच परिचय होतो. मनःशांतीला आड येणार्‍या गोष्टींचा विचार केला जातो. मनाचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी हे प्रभावी ठरतं. आपल्या आत जो अहंकार असतो त्या एकाचाही अंत म्हणजे खरा एकांत…

मानसशास्त्रात, अध्यात्मशास्त्रात एक उल्लेख वारंवार येतो. भगवद्गीतेत, संतांच्या वाङ्‌मयातही तो येतो. – इंद्रियांच्या (देहाच्या) पलीकडे मन; मनापलीकडे बुद्धी; बुद्धीच्या पलीकडे आत्मा म्हणजेच आनंद – समाधान (समाधी) – शांती असते. मन एका बाजूनं इंद्रियांना जोडलेलं असतं तर दुसर्‍या बाजूनं ते बुद्धीला जोडलेलं असतं. दोन्ही बाजूंनी ते सतत खेचलं जात असतं.
उपनिषदात हे सारं एका रूपकाच्या किंवा चित्राच्या माध्यमातून स्पष्ट केलं गेलंय. आपलं जीवन हा एक रथ आहे. त्याला पाच इंद्रियांचे पाच घोडे आहेत. इंद्रियांचे विषय म्हणजे हे घोडे धावतात ते मार्ग आहेत. जसे डोळे रूपाच्या मार्गानं; कान शब्दाच्या (ध्वनीच्या) मार्गानं; त्वचा स्पर्शाच्या मार्गानं; जीभ रसाच्या (रुचीच्या) मार्गानं तर नाक गंधाच्या मार्गानं, अशी इंद्रिये आपापल्या विषयाच्या मार्गावरून धावत असतात. त्यांना लगाम जोडलेले असतात ते मनाचे असतात. ‘मनः प्रग्रहमेव च’ – प्रग्रह म्हणजे लगाम. घोडे आणि गाडीवान (सारथी) यांना लगाम जोडलेला असतो. मन हे सारथी असलेल्या बुद्धीच्या दिशेनं खेचलं गेलं किंवा मनानं बुद्धीचं ऐकायचं ठरवलं – ते बुद्धीच्या नियंत्रणाखाली आलं तर जीवनाचा रथ योग्य मार्गावरून दौडत राहील. उलट मनानं इंद्रियांचं ऐकलं तर हा रथ खड्‌ड्यात जाईल हे काय सांगायला हवं?
हे सांगायचं कारण – बुद्धीच्या पलीकडे असलेली शांती अनुभवायची असेल तर योग्य विचार करून आचार केला पाहिजे. या रथाच्या रूपकात बुद्धीच्या पलीकडे (बुद्धीहून सूक्ष्म, श्रेष्ठ) असलेल्या आत्म्याला ‘रथी’ म्हणजे रथाचा स्वामी म्हटलंय. एका अर्थानं बुद्धीच्या पलीकडे अनुभवायला मिळणारी शांती ही आत्मशांती असते. मनःशांतीपेक्षा अधिक खोल अशी शांती!
पू. गोंदवलेकर महाराजांचं या संदर्भातलं चिंतन महत्त्वाचं आहे. ते म्हणतात ‘आत्मदानाशिवाय भगवंताची (आनंदाची, शांतीची) प्राप्ती नाही. देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे.’ ‘आत्मबलिदान’ हा शब्द सर्वसाधारणपणे देहासंबंधी वापरला जातो. जसं – स्वातंत्र्यसैनिकांनी आत्मबलिदान करून देशासाठी स्वातंत्र्य मिळवलं. पण ‘आत्मदान’ हे देहभावनेचं, अहंकाराचं दान आहे. पू. महाराज म्हणायचे त्याप्रमाणे सर्वस्व अर्पण करताना ‘सर्व’ दिलं नाही तरी चालेल पण ‘स्व’ (अहं) मात्र अर्पण केला पाहिजे. एकदा का ‘स्व’ दिला की ‘सर्व’ दिल्यासारखंच आहे.’
थोडक्यात मनःशांतीसाठी अहंकाराचं दान (सद्गुरुंना समर्पण) केलं पाहिजे. हा अहंकारच मनःशांतीच्या आड येतो व प्रत्येकाच्या जीवनात अनर्थ घडवतो. आपल्या सार्‍या क्रिया-प्रतिक्रियांच्या मुळाशी हा अहंकार असतो. हा कधी सुखावतो, कधी दुखावतो, पण दोन्ही परिस्थितीत तो मनाचं संतुलन बिघडवतो हे निश्चित. यश मिळालं, लाभ झाला. सत्ता-संपत्ती मिळाली तरी मन शांत ठेवणं कठीण जातं. आपले पायही जमीनीवर राहत नाहीत. याउलट जर अपयश पदरी आलं, नुकसान झालं, सत्ता-संपत्ती निघून गेली तर मनःशांती धोक्यात येते हे सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या मनासारखी गोष्ट झाली तर बरं वाटतं. तशी गोष्ट पुन्हा पुन्हा घडावी, मिळावी असं वाटून लोभ वाढतो. त्यामुळे मनाची शांत अवस्था बिघडते.
उलट आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडली तर क्रोध निर्माण होतो. यातून मन कमालीचं अस्वस्थ होतं.
एखादी वस्तू आपल्यालाच मिळावी, मिळाली तर ती आपल्याकडेच राहावी, इतकंच नव्हे तर तसली वस्तू दुसर्‍या कुणालाही मिळू नये अशी भावना निर्माण होण्यातून मोह – मत्सर यासारखे मनःशांतीचे महाशत्रू जन्मतात. खूपच अतृप्ती, बेचैनी, अशांती यामुळे निर्माण होते.
आपल्याकडे असलेल्या गोष्टींचं दुसर्‍याच्या नजरेत भरेल एवढं (उद्दाम) प्रदर्शन घडवण्यातून मद निर्माण होतो. यामुळे विरोध, शत्रुत्व, द्वेष निर्माण होऊन मनाचं समाधान नष्ट होतं. सर्वांत सामान्य असा मनःशांतीचा शत्रू म्हणजे काम. याचा अर्थ केवळ कामवासना नव्हे तर सर्वप्रकारच्या प्रमाणाबाहेर असलेल्या तीव्र, अनावर इच्छा, कामना – म्हणजेही कामच. भल्याभल्यांना या वासनेचा त्रास होतो. ‘कामातुराणां न भयं न लज्जा’ असं म्हटलं जातं. विश्‍वामित्र – पाराशर यासारख्या ऋषींनाही कामवासनेचा फटका बसतो. मेनका – सत्यवती (मत्स्यगंधा) यांच्या रूपानं त्यांच्या मनाची साम्यावस्था ढळते. त्यांच्याकडून जे वर्तन घडते त्यामुळे मनःशांती ढळते. भीष्माचार्यांसारख्या प्रतिज्ञा-पालन करणारा महामानव मात्र अनेक प्रसंगात मनःस्वास्थ्य राखू शकतो.
ययाती हा सर्वप्रकारच्या अतिभोगवासनेमुळे सतत अशांत असतो तर त्याचा बंधू यती हा मनोविजय साधल्याने सतत शांतस्वस्थ असतो.
श्रीमहाराज एक उदाहरण (दृष्टांत) द्यायचे. त्यात हा सगळा विषय प्रभावीपणे येऊन जातो.
एक स्त्री आपल्या पतीकडे सतत नथ हवी म्हणून हट्ट करते. त्याची परिस्थिती चांगली नसते. म्हणून तो तिला नथ करू शकत नाही. तिची इच्छा (काम) हळुहळू तीव्र होत जाते. नवर्‍याचा येता जाता अपमान करू लागते. दोघांचीही मनःशांती आणि गृहशांती यामुळे बिघडून जाते. हवी ती वस्तू मिळत नाही म्हणून तिला क्रोध येत राहतो. अखेर तिचा पती तिला नथ आणून देतो. आता आपल्याकडेही नथ आहे हा अहंकार (मद) तिच्या मनाला व्यापून टाकतो. येताजाता नाक उडवत ती आपली नथ सर्वांना दाखवत राहते. ती नीट राहावी, टिकावी म्हणून खूप काळजी घेते. आता तिला मोह त्रास देत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या मनासारखी नथ मिळाली, आता आणखी दागिने मिळाले तर बरं होईल म्हणून तिचा लोभही वाढू लागतोे. या सर्वांमुळे कोणत्याही स्थितीत ती अस्वस्थच राहू लागते. शांत होऊ शकत नाही. यातून सुटण्याचा मार्ग कोणता?
श्रीमहाराजांचं सांगणं आहे – ‘हाव सुटेल तेव्हाच समाधान’. हाव म्हणजे लालच, हव्यास. हवी ती गोष्ट आणखी हवी, आणखी हवी असं सतत वाटत राहतं. ‘ये दिल मॉंगे मोअर्’. असाच प्रकार! हे हवं – ते हवं, हे नको – ते नको असं सतत वाटत राहणं हा मनाचा स्वभाव आहे याला श्रीमहाराजांनी एक नवाच शब्द शोधून काढलाय – ‘हवे नकोपण’. जसं बालपण शहाणपण तसं हे ‘हवेनकोपण’. यामुळे मन सतत हेलकावत राहतं. त्याला शांत करणं महाकठीण होऊन जातं.
यापुढे जाऊन ते सांगतात – जे दुःख आपल्याला नको असतं ते आपल्या वाट्याला येतं आणि जे सुख हवंहवंसं वाटतं ते आपल्या वाटेलाही येत नाही. हुलकावण्या देत राहतं. यामुळे मन सतत चिडचिडं, अस्वस्थ होऊन राहतं.
यावर उपाय?
* वासनाक्षय – आपल्या इच्छा कमी करायच्या. गरजा कमी करायच्या. सध्या जाहिरातींमधून जे संदेश दिले जातात – ‘प्यास बढाओ!’ ‘बडा बनाओ (मेक इट लार्ज)’ त्याचा परिणाम म्हणून जीवनात उपभोगांना ताळतंत्र राहत नाही. सध्याची अर्थव्यवस्थाच बाजारू आहे. (मार्केट इकॉनॉमी). जे विविध इंद्रियांची तृप्ती करणारे पदार्थ – वस्तू बाजारात येतात त्यांच्या जाळ्यात सामान्य ग्राहक सापडतो. सुपर मार्केट्‌स – मॉल्समध्ये तर गरजा वाढवण्याचं अप्रत्यक्ष शिक्षण दिलं जातं. अन् त्या भागवण्याच्या संधीही व साधने निर्माण केली जातात. आपणच ठरवून आपल्या गरजा, मागण्या कमी केल्या पाहिजेत. याचा अर्थ दरिद्री जीवन जगायचं असा बिलकूल नाही. अनावश्यक वस्तूंची खरेदी व उपभोग मात्र टाळलाच पाहिजे.
* प्रतिक्रिया सांभाळणं – क्रिया सर्वांकडून घडतात. त्यांना प्रतिक्रिया आपल्या असतात. त्यावर आपलं अधिक नियंत्रण असू शकतं. दुसरे आपल्याशी कसे वागतील, निरनिराळ्या प्रसंगात त्यांचं वर्तन कसं असेल हे आपण ठरवू शकत नाही. पण प्रयत्नपूर्वक, निर्धारानं आपलं वागणं आपण ठरवू शकतो.
उदा.- एखाद्यानं शिवी दिली, अपमान केला, आपल्यावर अन्याय केला तर आपणही असंच वागू शकतो. पण याच्या विरुद्धही वागू शकतो. अशा परिस्थितीत आपण शांत राहिलो, दुसर्‍याच्या कृतींचा विचारपूर्वक, सकारात्मक वृत्तीनं स्विकार केला; मनात सूडाच्या प्रतिक्रियेची भावना उमटू दिली नाही अन् उगीचच नको ते विचार करत बसलो नाही तर आपलं मन शांत राहण्याची शक्यता वाढते. नाहीतर मग त्यानं पहिल्यांदा खडा मारला, मी त्याच्यावर दगड मारला; म्हणून त्यानं वीट फेकून मारली, त्यावर मी मोठा दगड फेकला; नंतर त्यानं बंदूक चालवली, यावर मी पिस्तुल चालवलं… असं करत करत दोन व्यक्ती, दोन समाज, दोन देश युद्धाच्या खाईत लोटले जातात. अशानं अशांती वाढणार नाही तर काय? अर्थात ही अशांती बाहेरची आहे.
मनाची शांती वाढण्यासाठी कोणत्याही क्रियेला आपली प्रतिक्रिया विवेकपूर्वक, दुसर्‍याला समजून घेणारी असली पाहिजे. नाहीतर मनःशांती दूरच राहील.
* प्रत्येक प्रसंग साजरा करणं – आपण नेहमी म्हणतो- ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा.’ दिवाळी दसरा हे आनंदाचे सण असतात. कारण त्या दिवशी आपल्या मनात आनंद असतो. आपल्या बुद्धीनं तो आनंद मनात भरलेला असतो. एरवी आपल्या घरात असलेल्या अडचणी दिवाळीच्या चार दिवसातही असतातच. आपल्या स्वभावात (भिती वाटणे, चिंता करणे इ.) बदल झालेला नसतो. तरीही नव्या उत्साहानं आपण दसरादिवाळीचं स्वागत करतो. यात विशेष गोष्ट आहे ती दिवाळीसारख्या सणात नाही तर ‘साजरा करण्या’च्या आपल्या मनःस्थीतीत आहे. साधुसंत कायम अशा मनःस्थितीत असतात. त्यामुळे त्यांच्या आगमनानं, सहवासानं, सत्संगतीमुळं आपलं घर आनंदानं भरून जातं.
जीवनात घडणार्‍या कोणत्याही घटनाप्रसंगात, आपल्याला येणार्‍या कसल्याही अनुभवात आपण आनंदात राहण्याची सवय लावून घेतली, तसा निश्चय केला तर रोज दिवाळी असणं अशक्य नाही.
* भगवंताची इच्छा – काही मंडळी भगवंताचं अस्तित्व मानत नाहीत. मग त्याची इच्छा तरी कशी मानणार? बरोबर आहे. मग त्यांनी जीवनातले प्रसंग अटळ समजावेत व त्यांचा समाधानानं स्विकार करावा. प्रारब्धाची, नियतीची अटळता मानून शांत राहावं.
पू. गोंदवलेकर महाराजांचं सांगणं आहे- ‘मागे घडलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे * आनंदात बिघाड होतो. तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो. होते-जाते ते सर्व भगवंताच्या इच्छेने होते. हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का करावी?’ सर्व प्रसंगात सद्गुरुंची किंवा परमेश्वराची इच्छा पाहणे हे मनःशांतीचं रहस्य आहे.
जे प्रारब्ध, नियती असं काहीही मानत नाहीत, त्यांनी सतत आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण करत राहावं. आपल्या व दुसर्‍यांच्या चुका समजून घ्याव्यात. आपल्या सुधाराव्यात, दुसर्‍यांच्या चुकांबद्दल त्यांना यथाशक्य जाणीव करून द्यावी. नाहीतर मन विशाल करून त्यांना क्षमा करावी. नाहीतर क्रिया-प्रतिक्रियांचं वाढते दुष्परिणाम घडवणारं चक्र सुरुच राहील. आपल्या मनाची शांती मात्र निश्चित ढळेल.
* मौन-ध्यान-एकांतसेवन – या गोष्टी नित्यनेमानं केल्या तर मन स्थिर-शांत ठेवायला खूप मदत होते. दिवसातून काही वेळ मौन पाळणं जमवलं पाहिजे. अशा वेळी कृतीही थांबवून शांत बसायला शिकलं पाहिजे. कोणत्याही पद्धतीनं ध्यानाची बैठक जमवली पाहिजे. ध्यानात आपण आपल्या आत उतरतो. त्याचा मनःशांतीसाठी खूपच उपयोग होतो.
साधुसंत एकांतसेवनावर खूप भर देतात. एकांतात आपल्यावर विचारांचा झोत (फोकस) ठेवला जातो. आपल्या गुणदोषांचा आपल्यालाच परिचय होतो. मनःशांतीला आड येणार्‍या गोष्टींचा विचार केला जातो. मनाचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी हे प्रभावी ठरतं. आपल्या आत जो अहंकार असतो त्या एकाचाही अंत म्हणजे खरा एकांत- असे श्रीमहाराज नेहमी म्हणत. हे जमलं तर मनाचा तोल जाण्याचा, मनःशांती बिघडण्याचा प्रसंगच येणार नाही. पण हे वाटतं तेवढं सोपं नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे?