खो ऽ खो ऽ ऽ खोकला!

0
1009

– डॉ. मनाली म. पवार(गणेशपुरी-म्हापसा)

बरेच जण तर ‘व्हायरल इन्फेक्शन’ या गोंडस नावाखाली स्वतःचे व आपल्या मुलांच्याही आजाराचे निदान करतात व केमिस्टकडे जाऊन अँटीकोल्ड सिरप व गोळ्या किंवा कफसिरपसारखी औषधे आणून स्वतःही घेतात व मुलांनाही पाजतात. खोकला जेव्हा आटोक्यात येत नाही तेव्हा आणि तेव्हाच डॉक्टरांकडे धाव घेतात. खोकल्याला ‘खो’ दिला आणि झाले मोकळे… एवढे सोपे असतात का खोकल्याचे उपचार?

आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी सर्दी-खोकल्याशी सामना हा करावाच लागतो. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्दी-खोकल्याचा त्रास कधी ना कधी उद्भवतो. ‘सर्दी-खोकला’ असे एकत्रितपणे म्हणण्याचे कारण बर्‍याच वेळा खोकल्याची सुरुवात ही सर्दीपासूनच होते. पेशंटला त्याच्या तक्रारी विचारल्या असता, पेशंट्‌सही- ‘काही नाही हो डॉक्टर, जरा सर्दी-खोकला आहे’, असेच सांगताना आढळतात. हल्ली-हल्ली तर पेशंट्‌स – ‘काही नाही, जरा व्हायरल इन्फेक्शन आहे’, असेही म्हणताना आढळतात. बरेच जण तर ‘व्हायरल इन्फेक्शन’ या गोंडस नावाखाली स्वतःचे व आपल्या मुलांच्याही आजाराचे निदान करतात व केमिस्टकडे जाऊन अँटीकोल्ड सिरप व गोळ्या किंवा कफसिरपसारखी औषधे आणून स्वतःही घेतात व मुलांनाही पाजतात. खोकला जेव्हा आटोक्यात येत नाही तेव्हा आणि तेव्हाच डॉक्टरांकडे धाव घेतात. खोकल्याला ‘खो’ दिला आणि झाले मोकळे… एवढे सोपे असतात का खोकल्याचे उपचार? मुळात खोकलाच कधी कधी एवढा तीव्र होतो की रुग्णाच्या तोंडचे पाणीच पळवून नेतो. पूर्ण गात्र हलवून टाकतो. रात्रीची झोप घालवतो. मग अशा प्रकारचा खोकला फक्त कफसिरप घेतल्याने बरा होईल का?… आयुर्वेद शास्त्राप्रमाणे खोकला हा पाच प्रकारचा असतो. वातज, पित्तज, कफज, क्षतज व क्षयज. त्यामुळे खोकल्याची कारणेही वेगळी असतात व चिकित्सा – उपचारही!

खोकला कसा उत्पन्न होतो?…

आयुर्वेद शास्त्रामध्ये खोकल्याला ‘कास’ असे म्हटले आहे.
‘कसनात् कास उच्यते|’ कंठाने वायू वेगाने ज्या व्याधीत बाहेर पडतो त्याला कास व्याधी म्हणावे. हा वायू बाहेर पडताना फुटलेल्या काश्याच्या भांड्याप्रमाणे आवाज करतो म्हणून ‘कास व्याधी!’
खोकल्यामध्ये फक्त कफ एकटा दूषित होत नाही तर वातही प्रकूपित होतो. कफकर आहार-विहारामुळे छाती (ऊर) व कंठ किंवा घसा या कफाच्या स्थानी अवरोध निर्माण होतो. व वातकर आहार-विहारामुळे वात प्रकूपित होऊन अपान वायूस ऊर्ध्वगती प्राप्त होते. अपानाच्या प्रतिलोम गतीमुळे उदानाच्या स्वाभाविक ऊर्ध्वगतीस अधिक वेग प्राप्त होतो. उदानाच्या या अति वेगवान गतीमुळे प्राणाच्या प्राकृत गतीत अडथळा येऊ लागतो. प्राण व उदान यांच्या परस्पर विरुद्ध गतीमुळे एक प्रकारचा संघर्ष निर्माण होतो. व त्याचप्रमाणे छाती व गळाप्रदेशी कफावरोध असल्याने प्राणवायूस प्रतिलोमगती प्राप्त होते व हा प्रकूपित वायू मुखावाटे वेगाने बाहेर पडतो. मुखावाटे बाहेर पडताना विशिष्ट असा फुटलेल्या भांड्याप्रमाणे आवाज येतो व यालाच ‘कास’ असे म्हणतात.

खोकल्याची कारणे ः

* रूक्ष, शीत, कषाय असा आहार घेणे. बेकरी उत्पादने, शीतपेये, आईसक्रीम, चिप्स, फरसाणसारखे रूक्षान्न, नियमित ब्रेड-पाव खाणे, कमी खाणे किंवा जास्तच उपवास करणे, वेगांचे धारण करणे, रात्री जागरण करणे, अतिश्रम करणे, अजीर्ण, धूर किंवा धूळ इत्यादी बाह्य कारणांनी नासा, कंठ यांचा अवरोध होणे… या कारणांनी वातज खोकला उत्पन्न होतो.
* तिक्त, उष्ण, विदाही, अम्ल, क्षार या पदार्थांचे सेवन, मसालेदार चटपटीत तेलकट जसे वेफर्स, शेव, समोसा, वडा, भजी, चाट यांसारखे पदार्थ अतिप्रमाणात खाणे, राग येणे, अग्नी व उन्हात जास्त वेळ काम करणे यांसारख्या कारणांनी पित्तज खोकला होतो.
* गुरू, अभिष्यंदि, मधुर, स्निग्ध अशा पदार्थांचे सेवन करणे, दही, थंड दूध, केळाचे शिकरण, फ्रूट सॅलड, वेगवेगळे शेक अशा प्रकारचे खाणे, तसेच भरपूर खाणे, शिळे खाणे, अधिक प्रमाणात शीतपेये पिणे, फ्रीजमध्ये साठवलेले अन्न तसेच खाणे, दिवसा झोपणे, फार हालचाली न करणे… अशा प्रकारच्या कारणांनी कफज खोकला उत्पन्न होतो.
* अति व्यायाम करणे, अति प्रमाणात मार्गक्रमण करणे, खाल्लेल्या अन्नाचा कण श्‍वास-नलिकेमध्ये जाणे, मोठी ओझी उचलणे, फार मोठ्याने पठण करणे, मार लागणे इत्यादी कारणांनी क्षतज खोकला होतो.
* विषमाशन, विरुद्धाशन, अतिमैथुन, वेगनिग्रहण (शिंकांच्या वेगाचे धारण करणे), शोक, घृणा येणे इत्यादी कारणांनी क्षयज खोकला उत्पन्न होतो.

प्रकारानुरूप खोकल्याची लक्षणे ः

सर्व प्रकारच्या खोकल्यामध्ये प्रत्यक्ष लक्षणे व्यक्त होण्याअगोदर घशामध्ये टोचल्याप्रमाणे वाटणे, अडकल्याप्रमाणे वाटणे, घशात खाज सुटणे, घसा खवखवणे, घास गिळताना तो घशात अडकणे ही लक्षणे दिसतात. ‘तदेव व्यक्ततां यातं|’ या न्यायाने हीच लक्षणे पुढे व्यक्त होतात.
वातज खोकला ः वातज खोकल्यामध्ये हृदय प्रदेशी, शंखप्रदेशी, शिर, उदर तसेच पार्श्‍वभागी दुखणे हे लक्षण प्रामुख्याने आढळेल कारण खोकला सतत असतो. बाहेर पडणारा खोकला हा वेगाने बाहेर रेटला जातो. कोकला कोरडा असतो. ठसका लागतो. फार खोकल्यानंतरही थोडासाच कफ बाहेर पडतो. लहान मुलांना वारंवार ढास लागते. अति खोकल्यामुळे काही वेळा मुलांना उलटी होते व उलटीतून कफ बाहेर पडल्यावर थोडे बरे वाटते. लहान बालकांमध्ये आढळणार्‍या खोकल्याला व्यावहारिक भाषेत डांग्या खोकला किंवा माकड खोकला असेही म्हणतात.
पित्तज खोकला ः छातीत जळजळ होणे, तोंड कोरडे पडणे, तहान लागणे, तोंड कडवट होणे, खोकताना डोळ्यासमोर अंधारी येणे, थुंकीतून पित्तयुक्त कफ पडणे, डोके दुखणे, जास्त खोकला आल्यास पीतवर्णाची कडवट किंवा रक्तयुक्त उलटी होते.
कफज खोकला ः कफज खोकल्यामध्ये अंग जड होणे, अग्निमांद्य, तोंड बेचव होणे, उलटी, मळमळणे, घशाशी येणे, लाळ सुटणे, तोंड चिकट – गोड होणे, नाक चोंदणे, अंग गळून जाणे, सर्वांगाला खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात. खोकल्यातून बाहेर पडणारा कफ हा मधुर, स्निग्ध, घन स्वरूपाचा असतो. डोकेदुखी हेही प्रमुख लक्षण आढळते.
क्षतज खोकला ः या प्रकारात सुरुवातीस कोरडा खोकला असतो व कालांतराने खोकल्याबरोबर पीत, श्याव, ग्रथीत, दुर्गंधित व रक्तयुक्त असा कफ पडू लागतो. या अवस्थेत तीक्ष्ण सूयांनी टोचल्यासारख्या वेदना कंठामध्ये व छातीमध्ये होतात. खोकल्याच्या वेळी व नंतरही रोगी फार कण्हतो. कण्हण्याचा आवाज पारवा फुंकल्यासारखा वाटतो.
क्षयज खोकला ः या खोकल्यामध्ये होणारे कफष्ठीवन हरित वा रक्तवर्णाचे असते. खोकताना हृदय आपल्या स्थानांतून बाहेर आल्यासारखे वाटते व तीव्र वेदना जाणवतात. रोगी खूप खा-खा खातो. तरीही कृशता वाढत जाते. रोगी चिडचिडा होतो. नेहमी कशाची तरी किळस वाटत असते. कधी द्रवमलप्रवृत्ती तर मलावष्टंभ असतो. आवाज बदलतो वा बसतो. क्षयज खोकला अधिक वाढल्यास त्याची परिणती ‘क्षय रोगात’ होते.

खोकल्याची चिकित्सा व उपचार ः

चिकित्सेचा चांगला उपयोग व्हावा यासाठी त्या त्या कारणांचा त्याग करावा. स्थानाला बल देणारी कण्ठ्य औषधी वापरावी. कोरडा खोकला व सकफ खोकला याचाही विचार करावा.
वातज खोकल्यात स्नेहन हा उपक्रम अत्यावश्यक ठरतो. स्नेहासाठी पेया, दूध, यूष, मांसरस यांचेबरोबर कंटकारी घृत, पिप्पलादि घृत, त्र्यूषणादि घृतांचा वापर करावा. किंवा शुद्ध घरात कढवलेल्या तूपाचाही वापर केला जाऊ शकतो.
विविध प्रकारचे लेह – उदा. कंटकादि लेह, चित्रकादि लेह, बकुलचंपकावलेह यांचा वापर होतो. लहान बालकांमध्ये आढळणार्‍या डांग्या खोकल्यासाठी बकुळीची फुले, चाफ्याची फुले, डाळींब सत्व व पिंपळ यांचा काढा किंवा लेह अत्यंत उपयुक्त ठरते. वातज खोकल्यामध्ये वारंवार येणारी खोकल्याची उबळ लवंगादि वटी, तालीसादि वटी, खडीसाखरेबरोबर चोखून खाल्ल्यास कमी होते. अनेक वेळा रात्री झोपण्यापूर्वी व पहाटे कोरडी ढास लागते. अशा वेळी हळद, मीठ टाकून कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यास बरे वाटते.
पित्तज खोकल्यामध्ये रोगी बलवान असल्यास वमन द्यावे. कर्पूरादि चूर्ण, समशर्कर चूर्ण, चित्रकादि चूर्ण, मरिच्यादि चूर्णाचा कफज खोकल्यात उपयोग होतो. कण्ठ्य म्हणून अचूषणासाठी खदिरादि वटी वापरावी.
क्षतज खोकल्यामध्ये दूध, तूप, मधुर, बल्य अशा औषधांचा चिकित्सेमध्ये वापर करावा. बल्य औषधांनी सिद्ध केलेले तूप द्यावे. मांसाहारी रुग्णास मांसरस द्यावा.
क्षयज खोकल्यामध्ये सुरुवातीस अग्नीवर्धक व बृहण औषधे वापरून थोडे बल प्राप्त झाले की मग मृदू विरेचन द्यावे. वसंत कुसुमाकर, लक्ष्मीविलास, लघुमालिनी वसंतसारखे सुवर्णकल्प लाभदायी ठरतात. रसायन म्हणून च्यवनप्राशावलेह अत्यंत उपयुक्त ठरते.
पथ्यकर आहार ः
– पातळ, हलका व बलवर्धक असा आहार असावा.
– तांदूळ, गहू, बाजरी ही धान्ये, मूग, लाह्या यांचे कढण.
– दूध, तूप, सूप, मांसरस, लसूण, वांगे, तोंडली, डाळिंब हे विशेष पथ्यकर असे पदार्थ आहेत.
अपथ्यकर आहार-विहार ः
– अति थंड, तळेलेले, शिळेस भविक्ष्यंदि पदार्थ अपथ्यकर असतात.
– धूर, धूळ, मोठ्याने बोलणे व दिवसा झोपणे अपथ्यकर विहार आहेत.