कर्नाटकात आज राज्यव्यापी बंद

0
86

>> म्हादई निवाड्याविरोधात उद्रेक सुरूच

 

म्हादईप्रश्‍नी जल लवादाने गोव्याच्या बाजूने अंतरिम निवाडा दिल्यानंतर उत्तर कर्नाटकात उद्रेक उसळला असून आज शेतकरी व कन्नड समर्थकांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता असून अनुचित घटना रोखण्यासाठी सरकारने जलद कृती दल व सीमा सुरक्षा दल जवानांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.
आजच्या राज्यव्यापी बंदला वाहतूक कामगार संघटना, ऑटोरिक्शा, टॅक्सी, सिनेमागृहे, हॉटेल्स, रेस्टॉंरंट, मॉल्स तसेच कन्नड फिल्म इंडस्ट्रीजने पाठिंबा दर्शविला आहे. काही खासगी शाळा व महाविद्यालयांनी बंदची हाक दिल्यानंतर सुट्टी जाहीर केली आहे. कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शकांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून हिंसक घटना खपवून घेण्यात येणार नसल्याचा इशारा दिला आहे. जलद कृती दल व सीमा सुरक्षा दल पोलिसांच्या प्रत्येकी दोन तुकड्या अतिसंवेदनशील भागात तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नेहमीच्या पोलिसांसमवेत राखीव पोलीस परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचे ते म्हणाले. धारवाड, बेळगाव व गदग जिल्ह्यांमध्ये जलद कृती दलासमवेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, गदग, नवलगुंद, बेळगाव आदी भागात वातावरण तंग आहे. नवलगुंद येथे १२७ जणांना अटक करण्यात आली आहे. गदग येथे १८, बेळगाव ५६ तर हुबळीत ३६ आंदोलकांना अटक करण्यात आले.