कर्नाटकातील गोमंतकीयांची काळजी घ्या

0
68

>> मुख्यमंत्र्यांची कर्नाटक सरकारला सूचना

 

म्हादई पाणी तंटा प्रकरणी जल लवादाने गोव्याच्या बाजूने अंतरिम निवाडा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकात राहणार्‍या गोमंतकीयांवर हल्ले होणार नाहीत यावर खास लक्ष द्यावे, अशी सूचना कर्नाटकचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आदींना करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी वरील प्रश्‍न उपस्थित केला होता.
कर्नाटक सरकारला तेथील गोमंतकीयांवर हल्ले होणार नाहीत याकडे लक्ष देण्यास सांगावे, अशी मागणी खंवटे यांनी केली होती. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही यापूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याशी संपर्क साधून कर्नाटकात राहणार्‍या गोमंतकीयांच्या सुरक्षेसंबंधी त्यांच्याशी चर्चा केली आहे. पाणी तंटा म्हणजे गोवा व कर्नाटक यांच्यातील लढाई नव्हे. त्यामुळे या प्रश्‍नावरून कुणी गुंडागिरी, तोडफोड करू नये. लोकशाहीत अशा गोष्टींना स्थान नसते. या प्रश्‍नावरून गोव्यात कलह निर्माण होणार नाही. कर्नाटकातील नागरिक मोठ्या संख्येने गोव्यात असून ते येथे सुरक्षित आहेत. कर्नाटकातून गोव्यात येणार्‍या बसेस्‌ही येथे सुरक्षित प्रवास करीत असतात. त्यामुळे कर्नाटकातील गोमंतकीयही सुरक्षित रहायला हवेत, असे पार्सेकर यांनी सांगितले.