दीनदयाळ विमा योजनेखाली ४४७ आजारांवर उपचार  

0
93

>> आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

दीनदयाळ आरोग्य विमा योजनेखाली समावेश करण्यात आलेल्या ४४७ आजारांवर रुग्णांना सरकारी तसेच खासगी इस्पितळातही उपचार घेता येणार असल्याचे आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला बाबुश मोन्सेर्रात यांनी यासंबंधी विचारलेल्या मूळ प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
अतिसार, मूतखडा, ताप आदी आजार झालेल्यांना दीनदयाळ आरोग्य विमा योजनेखालील खासगी इस्पितळांत उपचार घेता येईल की त्यासाठी त्यांना सरकारी इस्पितळातच जावे लागेल, असा प्रश्‍न मोन्सेर्रात यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना अतिसार, ताप, सर्दी आदी रोग दिनदयाळ विमा योजनेखाली आणलेले नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना उपचारांसाठी सरकारी इस्पितळांतच जावे लागेल असे डिसोझा यांनी स्पष्ट केले. मात्र, मूतखडा झालेल्यांना आरोग्य विमा योजनेखाली सरकारी इस्पितळात उपचार घेता येणार आहे. एकूण ४४७ आजार या आरोग्य विमा योजनेखाली आणण्यात आलेले असून या सर्व रोगांसाठी रुग्णांना खासगी इस्पितळात उपचार घेता येणार असल्याचे डिसोझा म्हणाले. या योजनेसाठीच्या खासगी इस्पितळांची यादी तयार करण्यात आली आहे काय, असे मोन्सेर्रात यांनी विचारले असता अजून ती तयार करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ती तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.१ टक्कासुध्दा शस्त्रक्रिया या योजनेखाली आलेल्या नाहीत असा विजय सरदेसाई यांनी केलेला आरोप मुख्यमंत्र्यांनी खोडून काढताना ४४७ प्रकारचे आजार या योजनेखाली आणलेले असल्याने बहुतेक शस्त्रक्रियाही या योजनेखाली आल्या असल्याचे स्पष्ट केले.
मेडिक्लेम चालूच ठेवा : राणे
आरोग्य खात्याने मेडिक्लेम योजना चालूच ठेवावी, अशी मागणी यावेळी विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी केली. कर्करोग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी राज्याबाहेरच्या इस्पितळात जावे लागत असून त्यासाठी ७-८ लाख रु. खर्च येत असतो. मेडिक्लेम योजना बंद केल्यास अशा रुग्णांना मोठी आर्थिक अडचण होणार असल्याचे राणे यांनी सांगताच अशा रुग्णांचा वेगळा विचार करण्यात येणार असल्याचे डिसोझा यांनी स्पष्ट केले.