महागाईचे स्मरण

0
108

गुजरातमधील दलित अत्याचारांवर लोकसभेत गृहमंत्री निवेदन करीत असता पेंगताना दिसलेले राहुल गांधी अखेर बोलले. लोकसभेत त्यांनी परवा दणदणीत भाषण केले. जनसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा महागाईचा विषय ऐरणीवर आणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती हल्ला चढवला. राहुल गांधींच्या राजकारणाची मोठी त्रुटी म्हणजे ते ‘हिट अँड रन’ स्वरूपाचे असते. म्हणजे त्यांच्या कृती आणि उक्तीमध्ये सातत्य कधीच दिसत नाही. अचानक प्रकटायचे, वक्तृत्वाची चमक दाखवायची आणि मग पुन्हा अंधारात गुडूप व्हायचे असा काहीसा प्रकार राहुल आजवर करीत आले आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही राजकारणामध्ये गांभीर्याने घेतले जात नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दुसरी सर्वांत मोठी त्रुटी म्हणजे त्यांचे जनसामान्यांशी नाते जुळलेले दिसत नाही. खरे तर त्यासाठी ते प्रयत्नही करतात. कधी दलिताच्या झोपडीत जाऊन राहा, कधी शेतकर्‍यांना भेट, कधी मजुरांचे प्रश्न समजून घे असा विविध प्रकारे त्यांच्या प्रतिमेचा कायापालट घडवण्याचा प्रयत्न सतत होत असतो, परंतु तरीही आपली आजी इंदिरा गांधींप्रमाणे अथवा वडील राजीव गांधींप्रमाणे राहुल यांची नाळ तळागाळाशी जोडलेली आहे असे जाणवत नाही. त्यामुळे असे राहुल गांधी जेव्हा डाळ आणि टोमॅटोचा विषय मांडतात, तेव्हा ते नक्राश्रू वाटू लागतात. वक्तृत्व म्हणून पाहता राहुल यांचे भाषण चांगले होते. यापूर्वीच्या ‘सूट बूट की सरकार’ किंवा ‘फेअर अँड लव्हली योजना’ च्या धर्तीवर त्यांनी यावेळी ‘घर घर मोदी’ ऐवजी लोक आता ‘अरहर मोदी’ म्हणत असल्याचे टीकास्त्रही सोडले. उत्तर भारतात तूरडाळीला ‘अरहर’ डाळ म्हणतात. त्यादृष्टीने राहुल यांचे हे विडंबन म्हणजे वर्मावर घाव आहे, परंतु या आवेशपूर्ण भाषणात विद्यमान सरकारच्या दिशेने बोट दाखवताना उर्वरित चार बोटे आपल्या पक्षाच्या सरकारच्या दोन कार्यकाळांकडेही लक्ष वेधत आहेत हे मात्र ते विसरले. डाळीच्या आणि टोमॅटोच्या वाढलेल्या दरांवरून सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडले असले तरी घाऊक दर निर्देशांकाचा आढावा घेतल्यास असे दिसते की, केवळ डाळी आणि टोमॅटो वगळता इतर सर्व पदार्थांच्या घाऊक दरांचा निर्देशांक खाली आलेला आहे. निदान आकडेवारी तरी तसे सांगते. एकूण अन्नधान्याचा निर्देशांक यूपीए सरकारच्या पाच वर्षांच्या काळातील ६८.५ टक्क्यांवरून भाजपच्या गेल्या दोन वर्षांच्या सरकारच्या काळात १४.१ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. तांदुळ, गहू, कांदा, बटाटा, फळे, दूध यांचा घाऊक दर निर्देशांक खाली आला आहे. फक्त विविध डाळी, टोमॅटो, कोबी, वांगे यांचे दर भडकले आहेत. विशेषतः डाळींच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. उडीद डाळ १२० टक्के, तूरडाळ ८४ टक्के, चणाडाळ ७६ टक्के भडकली आहे. कोबीचा दर १३८ टक्के आणि वांग्याचा दर ६९ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब बाजारात कायम आहे अशीच आज जनभावना आहे. महागाई आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत असे म्हणणेही योग्य ठरणार नाही. प्रत्येक सरकार तसा प्रयत्न करीतच असते. तो किती तत्परतेने आणि कार्यक्षमतेने होतो त्यावर त्याचे यशापयश अवलंबून असते. अन्नधान्याच्या किरकोळ दराच्या निर्देशांकाचा मागोवा घेतल्यास असे दिसेल की गेल्या जानेवारीत तो ५.६९ टक्के होता. फेब्रुवारीत ५.२६ पर्यंत आणि मार्चमध्ये ४.८३ टक्के खाली आला. एप्रिलमध्ये त्यात तब्बल ५.४७ पर्यंत वाढ झाली आणि वाढती मागणी आणि कमी पुरवठा यामुळे मे आणि जूनमध्ये तो वाढतच गेला. आता सहा टक्क्यांच्या आसपास हा निर्देशांक पोहोचला आहे. अर्थात, दरवर्षी उन्हाळी पीक बाजारातून गायब होऊ लागले की ही समस्या उद्भवत असतेच. नवे हंगामी पीक बाजारपेठेत येऊ लागले की मग हे वाढलेले दर हळूहळू उतरू लागतात. कोबी, वांगे, टोमॅटोच्या बाबतीतही हे होणार आहे. यापूर्वी कांद्याच्या बाबतीत नेहमी हे घडत आले आहे. गेली दोन वर्षे सातत्याने देशातील कृषीउत्पादक राज्यांमध्ये दुष्काळ पडत आहे. शेती उत्पादन अपेक्षेनुरूप झालेले नाही. डाळीचे दर वाढण्यामागे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मागील सरकारने दहा वर्षांत डाळीचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न न केल्याचे कारण पुढे केले आहे. परंतु कारणे काही असोत, महागाईमुळे जनतेच्या खिशाला चटका हा लागतोच. त्यामुळे राहुल यांनी अगदी योग्य मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आणि पुरेशा आक्रमकतेनेही केला. मोठमोठ्या योजना आणि मोहिमा आखणार्‍या सरकारला महागाईचे स्मरण करून देणेही आवश्यक होतेच, परंतु हा मुद्दा ते आणि त्यांचा पक्ष लावून धरणार की दरवेळचे ‘हिट अँड रन’ आताही दिसणार?