कॅसिनो प्रश्‍नावरून विरोधकांचा सभात्याग

0
103

कॅसिनोच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप करून अपक्षांसह सर्व विरोधी आमदारांनी काल रात्री विधानसभेतून सभात्याग केला. कॅसिनोच्या बाबतीत काही आमदारांचे साटेलोटे असल्याचे वक्तव्य पार्सेकर यांनी करताच विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतल्याने वातावरण तापले होते.

कॅसिनोविषयी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता कॅसिनो व्यवहाराशी काही आमदारांचे साटेलोटे असल्याचा गौप्यस्फोट केला. यामुळे अपक्ष आमदार रोहन खंवटे, नरेश सावळ, कॉंग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड खवळले. डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी आमदारांची नावे सांगा, असा आग्रह धरला. अन्य विरोधी आमदारांनीही सावळ यांच्या सुरात सुर मिसळत नावे उघड करण्याची मागणी केल्याने वातावरण बरेच तापले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सावळ यांना तुम्हांला डिचोलीत येऊन सांगतो असे उत्तर दिल्याने सावळ व पार्सेकर यांच्यात जुगलबंदी रंगली. विरोधकांनी कॅसिनोवरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवत त्यांना फैलावर घेतले. शेवटी मुख्यमंत्री समाधानकारक उत्तरे देत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.
कॅसिनो विषयावर बोलताना गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या माध्यमातून कॅसिनोचा विषय उकरून काढत सरकारवर टीका व आरोप केले जात असल्याचे पार्सेकर म्हणाले. कॅसिनोला आपल्या पक्षानेच विरोध केला होता. कॅसिनोवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या सरकारने प्रवेश शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली असून त्यात आणखी वाढ झाली पाहिजे असे पार्सेकर म्हणाले. मांडवी नदीतील कॅसिनो हलविण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून कॅसिनो नको असल्यास कायदा बदल करावा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. शक्य तितक्या लवकर गेमिंग कमिशन स्थापन करणार असल्याची माहिती पार्सेकर यांनी दिली. नियमांचे उल्लंघन केल्यास कॅसिनो सील करण्याचा अधिकार कमिशनला असेल, असे त्यांनी सांगितले.
आपण पूर्वीच्या सरकारचे पाप स्वीकारले आहे. असे असले तरी कॅसिनोवर विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल, असे पार्सेकर म्हणाले. प्रतिकूल परिस्थितीत कॅसिनोचा फायदा झाला हे नाकारणेही शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. कायद्यानुसार सोपस्कार पूर्ण करून पंचतारांकित हॉटेलने अर्ज केल्यास परवाना नाकारणे शक्य नाही. परंतु नदीत जागा नसल्याचे कारण देत समुद्रातील कॅसिनोला परवाना नाकारणे शक्य आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले.
रायबंदर येथील कॅसिनो पुढील आठवड्याअखेरीस हटविणे शक्य होईल, असे पार्सेकर यांनी आमदार मडकईकर यांचे आरोप फेटाळत सांगितले.