योगसाधना – २९६ योगमार्ग – राजयोग स्वाध्याय – ९३

0
116

– डॉ. सीताकांत घाणेकर

अनेक सामाजिक संस्था, सरकार अनेक वर्षांपासून ही स्थळे तसेच पवित्र नद्या साफ करण्याच्या गोष्टी करतात. आयोजन करतात पण शेवटी या योजनांचे काय होते? त्या भगवंतालाच माहीत. हे सगळे उपद्व्याप निसर्ग सांभाळण्यासाठी आवश्यक आहेतच. ते करायलाच हवे. पण त्याचबरोबर मानवाचे मन, त्याचे विचार, त्याची बुद्धी यांची साफसफाई तेवढीच आवश्यक आहे. तरच कृती पवित्र होईल.

शास्त्रकार सांगतात- स्वाध्याय केल्याने ईश्‍वरप्राप्ती होते तर धन असले तर मंदिर मिळते. सामान्य व्यक्ती विचार करते की मंदिरे तर कितीतरी आहेत- पुरातन, आधुनिक. जुनी तर आहेतच शिवाय नवी मंदिरे पण बांधली जातात. लाखो लोक या मंदिरांमध्ये जात असतात. वेगवेगळ्या दिवशी, विविध सणांना किंवा उत्सवांच्या निमित्ताने! नैसर्गिक आपत्तीमुळे, आतंकवाद्यांमुळे जीवहानीदेखील होण्याची शक्यता असते. तरीपण जिवावर उदार होऊन श्रद्धाळू, भाविक मंदिरात जातात- एकटा-दुकटा नव्हे तर लाखो भक्त- नियमित वर्षानुवर्षे जातात. खरेंच, या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गर्दी तर भयंकर लोटते- जणु काय माणसांचा पूरच तिथे येतो. त्यांना पुष्कळ गैरसोयींचा सामना करावा लागतो. फार कष्ट घ्यावे लागतात. पण तरीही हे भावनाप्रधान लोक मंदिरात जातातच. त्यांच्या भावनेला खरेंच नमस्कार.
इथे मुख्य मुद्दा हा की या भक्तांना ईश्‍वर भेटतो का? या सर्वांना भगवंताच्या मूर्तीचे दर्शन अवश्य होते- बर्‍याच वेळा काही क्षणच! अनेकांना त्यामुळे समाधानही होत नाही. तरीही ते जातात- भक्ती समजून. अशी ही आपली भक्ती कर्मकांडातच अडकली आहे. या भक्तीमुळे मानवाचा जीवनविकास होतो का? –
अशा विषयावर विचार, अभ्यास व चिंतन हवे.
बालपणी आजोबांबरोबर एका मंदिरात जात होतो. तिथे दरवाजावर लिहिले होते-
* दया, क्षमा, शांती… तेथे देवाची वसती!
भगवद्प्राप्तीसाठी किती छान सांगितले आहे या संतवचनात…
थोडेसे निरीक्षण केले तर सहज लक्षात येईल की अशा या अनेक क्षेत्रात दया, क्षमा यांचे दर्शन होत नाही. मग तिथे शांती कशी असणार व भगवंताचे दर्शन कसे होणार?
अनेक मोठमोठ्या मंदिरात भक्तांमध्ये, व्यवस्थापकांमध्ये मतभेद होतात. त्यामुळे भांडणे सुरू होतात. काही ठिकाणी तर लोक कोर्टांत जातात. मंदिराची शांतता बिघडते. कधी कधी पोलिसांनाही यावे लागते. काही प्रकरणांमध्ये विषय गुंतागुंतीचे असतात. त्यामुळे मतभेद वाढतात. एकमेकांना अपशब्द वापरले जातात. या संदर्भात प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. प्रत्येकास स्वतःचे प्रामाणिक मतप्रदर्शन करण्याची संधी तर मिळायलाच हवी. प्रत्येकाचा तो हक्क तसेच कर्तव्यही आहे.
व्यक्ती तितक्या प्रकृती- त्यामुळे स्वाभाविकपणे मतभेद असणारच. पण शेवटी आम्ही सगळे भक्त आहोत. भक्तीयोगामध्ये भावाला प्राधान्य दिले आहे. म्हणून भावपूर्ण होऊन सर्वांमध्ये सुसंवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शेवटी-
* देव भावाचा भुकेला आहे.
अशा या भांडणे चालणार्‍या ठिकाणी देव राहीलच कसा?- याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
आपल्या काही मंदिरांत भक्तांवर सक्ती केली जाते, अत्याचार होतात. अनेक वर्षांपूर्वी आम्ही पंढरपूरला गेलो होतो. तिथे सकाळी साडेतीन वाजेपासून रांगेत उभे रहावे लागते. त्यावेळी तिथे काकड आरती असते. पुष्कळ गर्दी होती. एक-एकाने रांग पुढे सरकत होती. शेवटी आम्ही विठोबाच्या जवळ पोहचलो. आमच्यापुढे एक व्यक्ती होती. त्याच्या कपड्यांवरून तो अत्यंत गरीब आहे असे अनुमान करता येत होते. त्या बिचार्‍याने भगवंताच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला आणि तो पुढे जायला लागला. तेव्हा मूर्तीजवळ असलेला पूजारी दरवाजावर असलेल्या दरवानाला सांगतो- ‘‘त्याला सोडू नका. त्याने पैसे टाकले नाहीत.’’ पण तेवढ्यात तो माणूस बाहेर निसटलाच.
प्रत्येकजण मूर्तीच्या पायाजवळ पैसे ठेवत होता. पुजारी ते लगेच काढून घेत असत. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो तर तेथे एक मोठा बोर्ड लावला होता- * मंदिरात देवाच्या चरणी पैसे द्यायलाच पाहिजे अशी सक्ती नाही. स्वखुशीने कुणाला देणगी द्यायची असेल तर अवश्य द्यावी.’’
आता त्यातील शब्द वेगळे असतीलही पण संदर्भ हाच होता आणि योगायोग म्हणजे ज्या दोन खिळ्यांवर तो बोर्ड टांगला होता त्यांतील एक खिळा सुटला व आम्ही वाचत असताना तो बोर्ड वाकडा झाला. ‘भक्ताला दुखावल्यामुळे भगवंताचाच अप्रत्यक्ष संदेश असेल का?’ ईश्‍वरच गरीब शेतकर्‍याच्या वेषात आले असतील का?… असे अनेक विचार ही घटना मानवाच्या मानसिकतेची द्योतक आहेत.
नाशिकमध्ये घडलेली अशीच एक घटना.
* कोल्हापूरचा एक गरीब शेतकरी त्र्यंबकेश्‍वराच्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला गेला होता. कारण त्याच्या दिवंगत वडिलांची इच्छा होती की अस्थिविसर्जन त्या पवित्र क्षेत्री व्हावे. गरीब परिस्थिती असल्यामुळे त्या शेतकर्‍याने तेथील कर्मकांड करणार्‍या पूजार्‍याला सांगितले की त्याच्याजवळ थोडेच पैसे आहेत. त्यामुळे त्या पैशांतच सर्व कर्मकांड करावे.
गरीबाची परिस्थिती ज्ञान झाल्यामुळे पूजारी ५०० रुपयात सर्व विधी करण्यास तयार झाला. सगळे यथासांग पार पडले. शेवटी तो मुलगा त्या पूजार्‍याचे आभार मानून निरोप घेऊ लागला. तर पूजारी म्हणतो कसा- ‘‘अहो, तुम्हाला अजून शंभर रुपये द्यायचे आहेत.’’
त्याला आश्‍चर्य वाटले. कारण ५०० रुपयात सर्वकाही ठरले होते आणि तेवढे पैसे त्याने आधीच दिले होते. म्हणून त्याने पूजार्‍याला तसे विचारले तर उत्तर मिळाले, ‘‘तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे. पण श्राद्धविधीत गोदान करायचे असते. त्याचे शंभर रुपये द्यायला हवे किंवा मला एक गाय आणून द्यायला हवी. आणि शंभर रुपयात गाय मिळत नाही. पण तुम्ही गरीब आहात म्हणून मी शंभर रुपयेच मागतो.’’
तो गरीब बिचारा शेतकरी थक्क झाला. त्याच्याकडे फक्त तिकिटासाठी पैसे होते. त्याने तसे पंडितांना म्हटले तर पंडित म्हणे सांगतात- ‘‘गोदान केले नाही तर तुझ्या वडलांना मुक्ती मिळणार नाही. कर्मकांडं करताना मी मंत्र म्हटले आणि तुम्ही पाणी सोडून गोदान केले. पुढे तुमची इच्छा!’’
या अशा घटना अनेक तीर्थक्षेत्री घडतात. काशीमध्ये तर म्हणे हे पंडे भाविकांना भीति दाखवून लुटतात. आणि बहुतेक अंधश्रद्धाळू त्यांना बळी पडतात.
त्याशिवाय अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांत बहुतेकांकडे घाणच पसरलेली असते. नद्यांचे पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. प्रयागच्या त्रिवेणी संगमावर तर एवढे प्रदूषण आहे की त्या पाण्याचे आचमन करणे म्हणजे रोगराईंना आमंत्रण देण्यासारखे आहे. तिथे म्हणजे अर्धी जळलेली, कुजलेली प्रेतेदेखील बघायला मिळतात. अशा या भव्यदिव्य मंदिरात पावित्र्य कुठे असेल? दया, क्षमा नसेल तर शांती कशी असेल? देवाची वसती कशी असेल?
अनेक सामाजिक संस्था, सरकार अनेक वर्षांपासून ही स्थळे तसेच पवित्र नद्या साफ करण्याच्या गोष्टी करतात. आयोजन करतात पण शेवटी या योजनांचे काय होते? त्या भगवंतालाच माहीत. हे सगळे उपद्व्याप निसर्ग सांभाळण्यासाठी आवश्यक आहेतच. ते करायलाच हवे. पण त्याचबरोबर मानवाचे मन, त्याचे विचार, त्याची बुद्धी यांची साफसफाई तेवढीच आवश्यक आहे. तरच कृती पवित्र होईल.
सुजाण, सज्ञान भक्तभाविकांनी या विषयावर चिंतन करण्याची फार आवश्यकता आहे. त्यामुळे योगसाधना अत्यंत जरुरी आहे. तसेच नियमित आळस न करता स्वाध्याय करायला हवा. असे केले तर स्वाध्यायामुळे ईश्‍वरप्राप्ती कशी होते, याची सुंदर प्रचीति योगसाधकाला सहज होईल.