॥ मनःशांतीसाठी संतवाणी ॥ शिवभावे जीवसेवा…

0
253

– प्रा. रमेश सप्रे

आपणही सर्व ऋतूंशी थोडी जवळीक, थोडा संवाद साधायला काय हरकत आहे? तन शांत तर मन शांत हे जितकं खरं आहे त्याहून अधिक खरं आहे मन शांत तर तन शांत अन् जीवनही शांत तृप्त समाधानी आनंदी बनेल.
थोडक्यात मी सेवेच्या माध्यमातून ‘शिवभावे जीवसेवा’ या भावनेतून समाजाला जोडलं पाहिजे. तर.. एकरूपतेच्या प्रयत्नातून – प्रयोगातून निसर्गाला जोडलेलं राहिलं पाहिजे.

त्यांचे नाव जटिलाही नव्हते नि कुटिलाही नव्हते. जटिला-कुटिला या होत्या महारवट, दुष्ट स्त्रिया ज्या नेहमी श्रीकृष्ण व गोपिका यांच्या भेटीत विघ्नं निर्माण करीत. त्या व्यक्तीचं नाव होतं प्रतापचंद्र हाजरा. फार बुद्धी नसूनही आपण बुद्धिवादी असल्याचं नाटक ते करत असत. तेही दक्षिणेश्‍वरच्या रामकृष्ण परमहंस यासारख्या साक्षात्कारी सत्पुरुषाच्या सहवासात.
मनःशांतीच्या आड येणारी ही एक प्रमुख गोष्ट आहे. अधिकारी – अनुभवी व्यक्तीशीही कोरडा युक्तिवाद (आर्ग्युमेंट) करत राहणं. गीतेच्या आरंभी अर्जुन असाच प्रज्ञावाद (युक्तिवाद) भगवान् श्रीकृष्णासमोर करत होता. युद्धात होणारा सर्वनाश; सगेसोयरे असलेल्या आदरणीय, पूजनीय व्यक्तींची हत्या; त्यामुळे लागणारं पाप व घडणारा नरकवास इ. इ. अनेक मुद्दे तो भगवंतासमोर मांडू लागला. युद्ध न करण्याच्या आपल्या निर्णयाचा पुनरुच्चार करू लागला. तेव्हा भगवंतांनी त्याला सुनावलं – गोष्टी पंडितासारख्या प्रज्ञावादाच्या करतोयस अन्‌‌ वागतोयस, मात्र मूर्खासारखा. जे अजून सुरूच झालेलं नाही त्या युद्धातील हिंसेबद्दल शोक व्यक्त करतोयस अरे, ‘न अनुशोचन्ति पंडिताः’|
ज्ञानी माणूस शोक करत नाही नि चुकीच्या दिशेनं विचारही करत नाही. अगदी अस्साच प्रकार होता प्रतापचंद्र हाजरा यांचा. रामकृष्ण म्हणायचे, ‘हाजरा म्हणजे कोरडं ठण्ण लाकूड! तो इथं का राहतो आहे, ठाऊक? जटिलाकुटिलांसारखे खेळात रंग भरत असतो.’ किती विनोदी वृत्तीनं रामकृष्ण अशा व्यक्तींना झेलायचे नि परिस्थितीला हसत सामोरं जायचे!
एकदा गंमत झाली. आपल्या खोलीत नेहमीच्या पलंगडीवर रामकृष्ण बसले होते. सत्संग चालू होता. विषय निघाला सर्वव्यापी ब्रह्माचा. ‘सर्व चराचरात ओतप्रोत राहिलंय परब्रह्म’- असे उद्गार रामकृष्णांनी काढल्यावर समोर बसलेले नरेंद्र (म्हणजे पुढे जगप्रसिद्ध झालेले स्वामी विवेकानंद) व हाजरा उठले. बाहेरच्या हिरवळीवर येऊन टिंगल करत बोलू लागले, ‘म्हणे सारं ब्रह्म! लोटा – वाटी – ताट – पाट सारं सारं परब्रह्म…’ ते ऐकून रामकृष्णांनी नरेंद्रला आत बोलावलं, त्याला स्पर्श करून म्हणाले, ‘नोरेेन, घरी जा तू आता.’ नरेंद्र घरी परतताना कलकत्त्याच्या रस्त्यावरील वाहनं, इमारती, माणसं सार्‍यात परब्रह्म परमेश्‍वराच्या अस्तित्वाची जाणीव त्याला होऊ लागली. ‘हे आपल्याला काय होतंय?’- हे न समजून भारावलेल्या अवस्थेत तो धावतच घरी आला. जेवताना खरंच ताट-पाट-लोटा-पानातलं अन्न सार्‍यात परमात्म्याची अनुभूती येऊ लागली. त्याला जेवणंच काय पण जगणंही अशक्य होऊ लागलं. परत रामकृष्णांना भेटून तो अनुभव परत घेण्याची त्यानं प्रार्थना केली. रामकृष्ण हसले. त्यांनी नरेंद्रला पूर्ववत केलं. त्याला आता पूर्ण पटलं होतं- कण कण में भगवान… किंवा अणुअणूत विष्णू! चराचरात परमेश्‍वर!
हा प्रसंग विस्तारानं सांगण्यामागे एक उद्देश आहे. आपल्याला अनेक व्यक्ती व शक्ती घडवत असतात. आपण मात्र अशा महान व्यक्तींना शरण जायला शिकलं पाहिजे. जसं नरेंद्रानं केलं. प्रतापचंद्र हाजरा नामक तर्कटी विद्वानाला नाही जमलं.
ज्यांचे विचार व आचार अनेक वर्षं अनेकानेक व्यक्तींवर प्रभाव पाडून आहेत अशा व्यक्तींना शरण जाण्यात, अशा विचारांना मोकळ्या मनानं स्विकारण्यात मनःशांतीचं मूळ दडलंय. सर्वांना गरज असते आधाराची, मार्गदर्शनाची, जीवनाला अर्थ आणणार्‍या संदेश-संस्कारांची! हे देण्याचं काम खरे साधुसंत जीवनभर करत असतात. नरेंद्रचं भाग्य हे की त्याला रामकृष्ण भेटले व तो त्यांना अनन्यशरण गेला. आपलं सौभाग्य हे की आपल्याला रामकृष्ण-विवेकानंद या गुरुशिष्यांच्या आदर्श जोडीचे प्रेरणादायी विचार अनुभवायला मिळाले. जीवनाचं प्रयोजन व उर्वरित जीवनासाठी एकसूत्री कार्यक्रम (ध्येय) मिळाले तर जीवन सार्थ व धन्य बनून जाते. ध्येयपूर्तीतून मिळणारा आनंद – समाधान – मनःशांती यांचाही लाभ होतो. या संदर्भात गुरुशिष्य संबंधाचा एक हृद्य प्रसंग विचार करण्यासारखा आहे.
असेच एकदा रामकृष्ण आपल्या भक्तांसह सत्संग करत होते. सहचिंतनासाठी ग्रंथ घेतला होता ‘वैष्णवतंत्र’. खर्‍या वैष्णवाची (म्हणजे विष्णू किंवा कोणत्याही देवाच्या किंवा संतसत्पुरुषाच्या स्वभावाची) वैशिष्ट्यं सांगितली जात होती. नरसी मेहताची ती प्रसिद्ध रचना आहे ना?
‘वैष्णवजन तो तेणे कहिये| जो पीड परायी जाने रे॥
तसाच काहीसा विषय चालू होता.
रामकृष्ण एकेक गुणाबद्दल उदाहरणं देऊन सांगत होते. एक गुण जो विष्णुभक्ताच्या म्हणजे वैष्णवाच्या अंगी असणं आवश्यक आहे, तो म्हणजे ‘दया’! हे ऐकल्यावर रामकृष्ण जोरात म्हणाले, ‘दया? तू कोण रे दया करणार अन् कोणावर? सेवा कर, तू सेवा कर. तीही सर्व जीवजंतूंची. कशी? तर ‘शिवभावे जीवसेवा’. प्रत्येक लहानमोठ्या जीवाची सेवा करताना मनात त्या जीवाबद्दल ‘शिवभाव’ असावा म्हणजेच सारे शिवच आहेत या भावनेनं सर्वांची सेवा करावी. किती स्पष्ट संदेश रामकृष्ण देत होते!
हे ऐकून समोरच बसलेला नरेंद्र उठला. बाहेर येऊन हिरवळीवर एका घायाळ, अस्वस्थ सिंहासारखा फेर्‍या घालू लागला. त्याच्याबरोबरच खोलीतून बाहेर पडलेल्या प्रतापचंद्र हाजरांनी विचारलं, ‘काय झालं नरेंद्र?’
यावर नरेंद्रानं दिलेल्या उत्तरात त्याचा आनंद, आत्मविश्‍वास तर उसळत होताच; पण त्याला भावी जीवनकार्यासाठी प्रेरणा, दिशा मिळाली होती. सद्गुरू रामकृष्णांचा जणू अनुग्रह झाला होता… आदेश मिळाला होता. तो हाजरा महाशयांना म्हणाला, ‘आता आणखी काय ऐकायचं उरलं? आता फक्त एकच करायचं- शिवभावे जीवसेवा! बस्’. खरंच सार्‍या आयुष्यासाठी एक सुनिश्चित कार्यक्रम नरेंद्राला मिळाला होता, ज्याच्या प्रकाशात तो उरलेल्या आयुष्यातील प्रत्येक श्‍वास घालवणार होता. ज्याचा ध्यास पुढे त्यानं सर्वांसाठी तयार केलेल्या बोधचिन्हाच्या खाली दिलेल्या बोधवाक्यात नव्हे घोषवाक्यात व्यक्त झाला- ‘आत्मनो मोक्षार्थं जगत् हिताय च|’
शरीरातील अनेक व्याधींना धीरोदात्तपणे तोंड देत अतिशय समाधानात तो सतत कार्यरत राहिला. नरेंद्रला या सार्‍या शिवसेवेतून मनःशांतीचा अनुभव येत राहिला.
संतसहवास – सत्संग – संतवाणी – संतसेवा अशा सर्व अवस्थातून गेल्यावर नरेंद्र पुढे विवेकानंद म्हणून जगासमोर आला. आजही स्वामी विवेकानंद हे व्यक्तिमत्त्व जगाला वंदनीय तसंच अनुसरणीय आहे. उद्याच्या मानवतेला खरा आधार स्वामी विवेकानंदांसारख्या द्रष्ट्या विचारवंताचा तसेच संतप्रवृत्तीच्या व्यक्तीच्या विचारांचाच आहे.
‘दैवदुर्विलास’ हा तसा अवघड शब्द वाटतो. दैवाचा नकारात्मक प्रभाव, त्यातही चांगलं होण्याची शक्यता असूनही विपरीत घडणं असा या शब्दाचा अर्थ आहे. संतांची वाणी, वाङ्‌मय, विचार सर्वांना सर्वत्र सहज उपलब्ध असूनही त्यांच्यावर अनेक लोक विश्‍वास ठेवत नाहीत. हा दैवदुर्विलास होय. संतसद्गुरू आपल्या हिताचंच सांगत असतात. पण आपल्याला ते मान्यच होत नाही.
पू. गोंदवलेकर महाराजांचं याविषयीचं मार्गदर्शन अतिशय सोपं पण मार्मिक आहे. एक छान उदाहरण ते देतात. समजा आपण एका अशा भागात गेलो आहोत जेथील लोकांची बोलायची भाषा, लिहिण्याची लिपी नि व्यवहाराची वाणी सारं आपल्याला अज्ञात आहे. त्यांची एकूणच जीवनशैली आपल्याला अपरिचित आहे. अशा ठिकाणी आपल्या पोटात दुखायला लागून आपण आजारी पडलो. डॉक्टर शोधण्यापासून आपली सुरुवात असते. तो मिळाल्यावर त्याला भाषा समजत नसल्याने खुणा करूनच आपलं दुखणं सांगावं लागतं. त्याला ते काय समजलं, त्यानं आपल्याला काय तपासलं? दिलेलं औषध बरोबर आहे की नाही?, मुख्य म्हणजे त्या औषधात काय – काय घटक आहेत… असं एकूण ओ की ठो काही कळलं नाही तरी ते औषध आपण पोटात घेतो. मग, पू. महाराज विचारतात, ‘संतांनी सांगितलेलं’ अनुभवसिद्ध नाम तुम्ही ओठावर का घेत नाही?’
खरंच आहे.
आपण पाहतो की शरीराच्या दृष्टीनंच विचार करण्याची सवय आपल्याला पहिल्यापासून लागलेली आहे. अगदी लहानपणापासून घरची मंडळी ‘टोपी घातल्याशिवाय उन्हात जाऊ नकोस; पावसात भिजू नकोस. रेनकोट घे; थंडी पडलीय स्वेटर घाल.’ अशा सूचना प्रत्येक ऋतूत देत असतात. शक्यतो कोणत्याही ऋतूचा शरीराला स्पर्शही होऊ नये याची खबरदारी घेतली जाते. त्यामुळे ‘तुझ्यापेक्षा पंचवीस पावसाळे मी जास्त बघितलेयत.’ अशा पूर्वीच्या पिढीच्या तोंडी असलेल्या वाक्यांना आता अर्थ राहिलेला नाही. कोणीही कोणताही ऋतू अनुभवत नाही. यामुळे होतं काय की सारं लक्ष (फोकस) शरीरावर राहतं. मनाचं संतुलन, बुद्धीची स्थिरता, शुद्ध चारित्र्य याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. परिणाम हा होतो की सारे व्यायाम, पथ्यं, फिरायला जाणं, योगासनं शरीराच्या तंदुरुस्तीसाठी उपयोगी पडतात. मन-बुद्धीच्या आरोग्याकडे, मनःशांतीकडे लक्ष दिलं जात नाही.
या संदर्भात संतांचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडतं. पू. गोंदवलेकर महाराज स्वामी रामदासांनी लिहिलेले ‘मनाचे श्‍लोक’ वाचून त्यावर चिंतन करायला सांगायचे. ते म्हणायचे, ‘मधुमेह (डायबेटीस) झालेल्यांना आयुष्यभर रोज इंजक्शनं घ्यावी लागतात (इन्शुलीनची). त्याबरोबरच मनाच्या श्‍लोकांचा रोज एक याप्रमाणे दोनशे पाच दिवस (सु. सात महिने) अभ्यास हे ‘मनाला’ दिलेलं इंजेक्शन समजावं. त्यामुळे मन शांत होईल. सदैव प्रसन्न राहील. संतांचा स्वतःचा अनुभव तसा असतो.
आणखी एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. एका श्रीमंत व्यापार्‍याला निद्रानाशाचा रोग झाला होता. सर्व डॉक्टर-वैद्य झाले. पण उपाय झाला नाही. शेवटी तो श्रीमहाराचांकडे आला. त्याची समस्या ऐकल्यावर श्रीमहाराजांनी त्याला एक मिळेल तेवढा मोठा टब (पसरट भांडं) आणून तो पाण्यानं भरून त्यात त्याला रात्री झोपण्यापूर्वी काही तास बसायला सांगितलं. काही दिवसांनंतर तो व्यापारी आनंदात श्रीमहाराजांना भेटून म्हणाला, ‘महाराज, जादू झाली. आता मला छान झोप लागते.’
यावर श्रीमहाराजांनी उत्तर दिलं ते महत्त्वाचं आहे. संतवाणी, नव्हे अमृतवाणीच आहे ती. – ‘अरे, पाणी हे पंचमहाभूतांपैकी (पृथ्वी-पाणी-अग्नी-वायू-अवकाश) फक्त एक आहे. पृथ्वीवरील पाण्याच्या फक्त एका अंशाशी तुझा संपर्क झाला तर तुझा निद्रानाश बरा झाला. सर्व पंचमहाभूतांशी, सर्व ऋतूंशी, बदलत्या हवामानाशी असाच जिवंत संबंध आला तर सारे रोग-व्याधी पळून जातील. झाले तरी त्यांचा त्रास तुला होणार नाही’. आपणही सर्व ऋतूंशी थोडी जवळीक, थोडा संवाद साधायला काय हरकत आहे? तन शांत तर मन शांत हे जितकं खरं आहे त्याहून अधिक खरं आहे मन शांत तर तन शांत अन् जीवनही शांत तृप्त समाधानी आनंदी बनेल.
थोडक्यात मी सेवेच्या माध्यमातून ‘शिवभावे जीवसेवा’ या भावनेतून समाजाला जोडलं पाहिजे. तर.. एकरूपतेच्या प्रयत्नातून – प्रयोगातून निसर्गाला जोडलेलं राहिलं पाहिजे. तरच माझा विकास परिपूर्ण व सर्वांगीण होईल. मुख्य म्हणजे मला मनःशांती लाभेल. डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना भावजीवन असतं हे वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध केलं. संतांनी वृक्ष, वल्ली, वनचरे यांना ‘सोयरे (संबंधी, नातलग) मानलं. दोघांचीही – शास्त्रज्ञ व संत दृष्टी एकच आहे. म्हणून सृष्टीही एकच आहे. अन् त्यांच्यावर कृपेची वृष्टी करणारा परमेष्टी (परमेश्‍वर) एकच आहे. आपणही संतवाणीचं अनुसरण करून मनावर शांतीचा वर्षाव करून घेऊया. कल्याणमस्तु! ॐ शांतिः शांतिः शांतिः|