‘संधीवात’ ः म्हातारपणाची चाहूल…. की एक आजार..?

0
892

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

संधीवात हा कूर्चेचा रोग आहे. वयोमानानुसार जशी हाडांची झीज होते तशाच लवचिक कूर्चा कडक व ठिसूळ बनतात. त्यामुळे किरकोळ स्वरूपाचा मार लागला तरी त्या फाटतात व दुखण्यास तसेच सूज येण्यास सुरुवात होते.
हल्ली संगीताच्या तालावर ऍरोबिक्स करताना टीव्हीवर दाखवतात. आपणही प्रभावित होऊन ऍरोबिक्स करायला धावतो. अगदी चाळीशी ओलांडलेलेही हे करायला जातात व परिणामी या व्यायामपद्धतीमुळे कूर्चा व स्नायुबंध यावर अवास्तव ताण पडतो.

साधारणतः पन्नाशीनंतर गुडघे दुखले की त्यास ‘म्हातारपणाची चाहूल’ असे म्हटले जायचे व विशेष औषधोपचारांकडे कल नसायचा. काही नाही. वयाप्रमाणे संधीवात तो, म्हणून एखादे वातशामक तेल चोळले जायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. वयाच्या चाळीशीतच कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे व म्हणून लोकही जागरूक व्हायला लागले आहेत व संधीवातासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला लागले आहेत. सांध्यांचे दुखणे विशेषतः कंबर व गुडघ्यांचे दुखणे याला बोली भाषेत संधीवात म्हणतात. पण आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे यालाच संधिगत वात असे म्हणतात. वात दूषित होऊन, प्रकूपित होऊन जेव्हा संधीच्या ठिकाणी स्थानसंश्रय करतो तेव्हा संधीमध्ये वेदना, सूज याप्रकारची लक्षणे उत्पन्न करतो तेव्हा त्याला संधिगत वात असे म्हणतात.

संधीवात हा लहान व मोठ्या सांध्यांचा आजार आहे. शरीरातील कोणतीही संधी या आजारात विकृत होऊ शकते. पण रोगाची सुरुवात ही नेहमी मोठ्या संधींपासून सुरू होते… विशेषतः गुडघेदुखीपासून. पण एकदा हा त्रास सुरू झाला तर तो दीर्घकाळपर्यंत त्रास देत राहतो. वातव्याधीपैकी सर्वांत अधिक प्रमाणात आढळणारा हा आजार आहे. पुरुषांपेक्षा महिलावर्गात याचे प्रमाण जास्त असून हा कमी वयातच होताना आढळतो. जसे जसे वय वाढत जाते व धातुक्षय होत जातो तसतसा संधीवाताचा त्रास प्रत्येकालाच सुरू होतो. अशाच धातुक्षयामुळे वाढलेल्या वाताने जो संधीवाताचा त्रास सुरू होतो त्यालाच आयुर्वेद शास्त्राने निरूपस्तंभित संधीवात म्हटले आहे व आमामुळे, कफामुळे किंवा अन्य दोष-धातु-मल यांमुळे वायुच्या प्राकृत गतीस अडथळा उत्पन्न होऊन वायू विमार्गगमन होतो व संधीवात उत्पन्न करतो. त्याला उपस्तंभित संधीवात म्हणतात. संधीवात हा प्रामुख्याने गुडघे, कंबर व मणक्याच्या सांध्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

संधीवाताची कारणे ः

संधीवाताची मुख्य कारणे म्हणजे आपला आहार, बदललेली जीवनशैली, व्यायाम अजिबात नसणे किंवा व्यायामाचा अतियोग व चुकीची पद्धत व वृद्धापकाळ.
– आहार ः रूक्षान्न सेवन, ब्रेडपाव, केक, चिप्स, फरसाण, बिस्किट्‌स यांसारखे बेकरी उत्पादने. शीत पदार्थांचे सेवन. उदा. कोल्ड्रीन्क्स, आईसक्रीम. फ्रीजमधील थंड पाणी, बर्फ इत्यादी.
– अल्पाहार करणे ः शरीराला जेवढ्या अन्नाची गरज आहे त्यापेक्षा कमी खाणे, तिखट, तुरट, कडू पदार्थांचे अतिसेवन, चुकीच्या समजुतीमुळे काहीजण मेथी, कारल्यासारख्या कडू भाज्यांचा अतियोग करतात. कारण नसताना कारल्याचा रस दररोज घेतात. परिणामी शरीरात वात वाढतो.
– बदललेली जीवनशैली ः वैद्यकीय शास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे आयुर्मयादेत वाढ झालेली आहे, पण शरीराच्या झीजेमुळे होणारे दुष्परिणामही वाढले आहेत. संधीवातही त्यातलाच एक – म्हणायला हरकत नाही.
– संधीवात हा कूर्चेचा रोग आहे. वयोमानानुसार जशी हाडांची झीज होते तशाच लवचिक कूर्चा कडक व ठिसूळ बनतात. त्यामुळे किरकोळ स्वरूपाचा मार लागला तरी त्या फाटतात व दुखण्यास तसेच सूज येण्यास सुरुवात होते.
– हल्ली संगीताच्या तालावर ऍरोबिक्स करताना टीव्हीवर दाखवतात. आपणही प्रभावित होऊन ऍरोबिक्स करायला धावतो. अगदी चाळीशी ओलांडलेलेही हे करायला जातात व परिणामी या व्यायामपद्धतीमुळे कूर्चा व स्नायुबंध यावर अवास्तव ताण पडतो. ही मंडळी संधीवाताने ग्रस्त होतात.
– आठवड्याच्या सुटीच्या दिवशी डोंगर चढावयास जाणे अथवा समुद्रकिनार्‍यावर जाऊन विविध खेळ खेळणे ही एक फॅशनच बनली आहे. दुर्दैवाने या प्रकारांमध्ये मंडळी आपल्या शरीरिक कुवतीच्या पलीकडे जाऊन शरीरावर अवास्तव ताण देतात. तसेच डोंगर चढणे व जमिनीवर चालणे या दोन भिन्न क्रिया आहेत- या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.
– संधीवात व शरीराचे वजन यांचा संबंध सर्वश्रुत आहे. हल्ली मध्यम वर्गामध्ये स्थूलतेचे प्रमाण अफाट आहे. सर्वसाधारण गुडघ्याच्या सांध्यात आतील बाजूस बाक असतो. गुडघ्याच्या आतील बाजूवर अवास्तव ताण पडला तर तोल साधण्यासाठी स्नायूंना फारच कष्ट करावे लागतात. यामुळे आतील बाजूची कूर्चा लवकरच झिजू लागते व संधीवातास आमंत्रण मिळते. जर स्थूलता असेल तर हा भार जास्तच सहन करावा लागतो.
– अलीकडे आपले सोफासेट, बेड यामध्ये सात ते नऊ इंची फोम (स्पंज) असतो. त्यातून उठताना सामान्य व्यक्तीची किती कसरत होत असेल याची कल्पना करा.
– याविरुद्ध अतीव सुस्त व्यक्ती… ज्या दैनंदिन क्रियांमध्ये आपल्या सांध्यांना काहीच हालचाल देत नाहीत. आपल्याकडे आता खुर्ची-कमोड ही संस्कृती झपाट्याने पसरत आहे. याचा एक ठळक दुष्परिणाम म्हणजे गुडघ्याच्या पूर्ण हालचालींना वाव न मिळणे.
– हाडांचा ठिसूळपणा हे संधीवाताच्या वाढीव प्रमाणाचे एक कारण आहे. फास्ट फूडमुळे होणारे प्रचंड प्रमाणातील कुपोषण हे हाडांना ठिसूळ बनविण्याचे मुख्य कारण!
… संधीवाताला आमंत्रण देणार्‍या या विविध कारणांचा सविस्तर विचार मांडण्याचे कारण म्हणजे ‘निदान परिवर्जन’ म्हणजे ज्या कारणांनी व्याधी उत्पन्न होतो, त्या कारणांचा त्याग करणे हीच योग्य चिकित्सा होय.
संधीवाताची लक्षणे ः
या व्याधीत सांध्यात वेदना, सांध्यांवर सूज ही प्रमुख लक्षणे असतात. संधीमध्ये वेदना व सूज हे एकत्रितपणे असते किंवा फक्त संधीवेदनाही असू शकते.
– सांध्यांच्या हालचाली करताना वेदना होणे, उठताना, बसताना किंवा चालताना आवाज येणे, संधीचा स्पर्श वाताने भरलेल्या पखालीप्रमाणे जाणवणे, संधीच्या हालचालींवर मर्यादा येणे किंवा त्या नष्ट होणे अशी लक्षणे आढळतात.
संधीवातावरील उपचार व चिकित्सा ः
आपल्या दैनंदिन हालचालींचा विचार केल्यास चालणे, धावणे, उठणे, बसणे, उड्या मारणे, मांडी घालणे, स्ट्रेचिंग करणे सर्वकाही संधीवरच अवलंबून असतात. या सर्व हालचालींवर जर प्रतिबंध आल्यास आपले आयुष्य काय होईल याचा विचार जरी केला तरी भीती वाटते. आधुनिक शास्त्रानुसार चिकित्सेचा विचार केल्यास पेन किलर व कार्टिलेजसाठी ग्लायकोसोमाइन याव्यतिरिक्त काही विशेष चिकित्सा नाही पणआयुर्वेद याला अपवाद आहे.
जीवनशैलीमध्ये थोडासा बदल आणल्यास व काही आयुर्वेदीय औषधांचा वापर केल्यास संधीवात बरा होऊ शकतो व संधीवात होण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो.
* व्यायाम – योग्य पद्धतीने आपल्या शरीराच्या ताकदीपेक्षा अर्ध्या ताकदीचा व्यायाम करणे. सांध्यांच्या नियमित योेग्य प्रमाणात हालचाली करणे.
* आराम – योग्य प्रमाणात झोप घेणे, शरीर मनाला आराम देणे.
* बसण्याची योग्य ती आसनपद्धती वापरणे.
* स्थूलता वाढत असल्यास स्थूलतेवर चिकित्सा घेणे.
* योगशिक्षकांकडून योगासने शिकून घेणे व दररोज करणे.
* त्याच त्याच क्रिया- जसे जास्त वजन उचलणे, सारखे बसून राहणे, सारखे उभे राहणे, यासारख्या क्रिया मध्ये आराम घेऊन करणे. काही व्यवसायामध्ये या क्रिया बंधनकारक असतात.
* आहाराच्या सवयी बदलून संतुलित आहार घेणे.

संधीवाताची चिकित्सा करण्यापूर्वी उपस्तंभित किंवा निरुपस्तंभित यांचे निदान करणे फार आवश्यक असते. संधिगत वातामध्ये प्रकूपित वाताच्या विरुद्ध चिकित्सा करणे जास्त आवश्यक असते. स्निग्ध, गुरू, उष्ण, मधुर, स्थिर अशा अनेक गुणांनी युक्त औषधांचा उपयोग करावा.
– सांध्यांच्या ठिकाणी नारायण तेल, बल्प तेल, तिळ तेल, क्षीर बला तेलाने मालिश करणे. मार्गाविरोधजन्य संधिवातामध्ये विषगर्भ तेलाचा उपयोग करावा. निरगुंडी किंवा एरंडाच्या पानांनी शेक घ्यावा.
– लेपनासाठी दशांग लेपासारख्या लेपांचा उपयोग करावा.
– एरंडतेल वा गंधर्वहरितकी याच्या सहवासाने मृदू अनुलोमन देणे. पोळी किंवा भाकरीच्या पीठात १ चमचा अरंडेल तेल घालून ती पोळी किंवा भाकरी रोज खावी.
– औषधांमध्ये उपस्तंभित अवस्था असताना भल्लातकपर्पटी, भल्लातकासव, महारास्नादि काढा, त्रिफळा गुग्गुळ, रास्नागुग्गुळ यांसारखे कल्प लाभदायी ठरतात.
– निरुपस्तंभित अवस्थेत योगराजगुग्गुळ, महायोगराजगुग्गुळ, शतावरी कल्प, त्याचप्रमाणे सुवर्ण कल्पांचाही उपयोग होतो.
– रोज सकाळी सुंठ, गूळ व तूप एकत्र करून छोट्या सुपारीएवढी गोळी खाल्ल्यास संधीवातातील दुखणे कमी होते.
– हाडे झिजून सांधे दुखत असल्यास मेथीचे, डिंकाचे लाडू खावेत.
– आहारामध्ये साजूक तूपाचा समावेश करावा.
पथ्य ः गहू, तांदूळ, दुधी, दोडका, घोसाळी, पडवळ, कोहळं, काकडी, मूग, तूर, कुळीथ, द्राक्षे, दूध, तूप, लोणी, आले, लसूण, गरम पाणी.
अपथ्य ः चवळी, वाल पावटे, छोले, मटार, गवार, कारले, कैरी, चिंच, श्रीखंड, फ्रीजमधील थंड पाणी व शीत पेये.
संधीवाताच्या वाढत्या समस्येला आटोक्यात आणण्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम, आयुर्वेदिय पद्धतीने दिनचर्या, रात्रीचर्या व ऋतुचर्यांचे पालन करावे. पाश्‍चात्त्य जीवनशैलीकडे वळलेल्या मनाला आवर घाला व विविध व्याधींपासून स्वतःला जपा.