बुर्‍हान वानी कोण गद्दार की शहीद?

0
127

– दत्ता भि. नाईक

काश्मीरमधील घटना ही काश्मीरपुरती नाही, त्यामागे पाकिस्तान तर आहेच, त्याचबरोबर आय.एस.आय.एस.ने जगात इस्लामचे राज्य स्थापन करण्याचे केलेले आवाहनही आहे हे लक्षात ठेवावे लागेल. देशातील स्वातंत्र्यप्रिय, लोकशाहीप्रिय व देशभक्त नागरिकांच्या मते बुर्‍हान वानी हा गद्दार असला तरी दहशतवाद्यांच्या मते तो शहीद आहे म्हणूनच या घटनांपासून सावध झाले पाहिजे.

शुक्रवार दि. ८ जुलै २०१६. काश्मीर खोर्‍याला पुन्हा एकदा समस्यांच्या खाईत लोटणारा हा दिवस. ‘हिजबुल मुजाहिद्दिन’ आणि ‘जमात-उद्-दवा’ या दोन संघटनांच्या चिथावणीला बळी पडून काही तरुण रस्त्यावर उतरले. पाकिस्तानचे झेंडे फडकावले गेले. त्याचबरोबर पोलीस व सुरक्षादलांवर दगडफेक करण्यात आली. जमाव इतका अनावर झाला की सुरक्षादलांना गोळीबार करावा लागला. त्यात बर्‍याच जणांना गोळ्या लागल्या. पहिल्या दिवशी आठ जण ठार झाल्याची बातमी होती. त्यानंतर गंभीरपणे जखमी असलेल्यांमधील मरण पावणार्‍यांची संख्या वाढत गेली. आता ही संख्या पन्नासच्या आसपास जाईल असे वाटते. श्रीनगर शहरातील सर्व हॉस्पिटले जखमी निदर्शक व निदर्शकांनी केलेल्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या पोलीस व सुरक्षादलाचे जवान यांच्यामुळे पूर्णपणे भरून गेली आहेत. या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दिनचा तरुण नेता बुर्‍हान वानी ठार झाला. त्याला शहीद ठरवण्याचा प्रयत्न फुटीरवाद्यांकडून केला जात आहे. राज्य व केंद्रसरकारची झोप उडवणारी अशी ही घटना आहे.
दुःखद दिवस
प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल हे आपला परदेश दौर्‍यातील एक दिवस कमी करून दिल्लीला परत आले एवढे या घटनेचे महत्त्व आहे. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी दि. १२ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावून घटनेच्या गांभीर्यासंबंधाने चर्चा केली. दुसर्‍या बाजूला सोपोर, हंडवारा, बंदीपोरा व करामुल्ला या ठिकाणीही दगडफेकीचे प्रकार चालू होते. याचा परिणाम म्हणून अमरनाथयात्रेसाठी निघालेल्या शिवभक्तांना काही दिवस ठिकठिकाणच्या निवारा शिबिरांमध्ये थांबावे लागले. परिस्थिती चिघळत चालल्यामुळे सुरक्षाबलाच्या विशेष तुकड्या तैनात केल्या गेल्या. श्रीनगर परिसरात बेमुदत काळासाठी कर्फ्यू जारी करण्यात आला.
दि. ९ जुलै रोजी श्रीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे पोलीस महाअधीक्षक मुजतबा गिलानी तसेच राज्याच्या गुप्तचर पोलीस विभागाचे प्रमुख एस. एम. सहाई यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात निदर्शकांपैकी काहीजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आजचा दिवस आमच्या जीवनातील सर्वात दुःखद असा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसक निदर्शकांनी वीस सरकारी इमारतींवर हल्ला केला तर संग्राम, लार्नू, सीर, गोपालपुरा, मत्तन, कोकेरनाग, दुरू, जंगलात मंडी या ठिकाणांवर व सैनिकी तळांवर हल्ले चढवले. यांतील बर्‍याच हिंदुबहुल वस्त्या आहेत. कुलगाम जिल्ह्यात भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला. पुलवामा येथील पोलीस कँपवरही हल्ला झाला, तो तेवढ्यात तीव्रतेने परतवला गेला. बर्‍हान वानी याला जिवंत का पकडले नाही, या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ‘आम्हाला कुणालाही ठार मारण्याची हौस नसून परिस्थितीच अशी आली की गोळीबार करण्यावाचून इलाज नव्हता’ असे सांगितले. या काळात ठरलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून श्रीनगर- बारामुल्ला, श्रीनगर- अनंतनाग हे हमरस्ते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय काश्मीरच्या दिशेने जाणार्‍या सर्व रेलगाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील महाराजा हरिसिंह हॉस्पिटल व शेर-ए-काश्मीर हॉस्पिटल ही दोन्ही मोठी रुग्णालये गंभीरपणे जखमी झालेल्यांवर इलाज करीत आहेत. पोलिसांचे तीन जवान हरवले असून त्यांचा अजून शोध लागलेला नाही.
ओमर अब्दुल्लांच्या मनात काय आहे?
बुर्‍हान वानी आणि त्याचे दोन साथीदार एका घरात लपून सुरक्षादलांच्या जवानांवर गोळीबार करत होते. दोन जवान गंभीरपणे जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर उलट गोळीबार केला गेला. त्यांच्या आक्रमकतेमुळे त्यांना जिवंत पकडणे शक्य झाले नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
बुर्‍हान वानी याचे शव ताब्यात मिळताच त्याच्या चाहत्यांनी त्याची प्रेतयात्रा काढली. त्याचा मृतदेह पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळला व हजारो लोक त्याच्या प्रेतयात्रेत सहभागी झाले. देशाच्या ऐक्याला आव्हान देणारीच ही प्रेतयात्रा होती. सहभागी झालेले सर्वजण हिजबुल मुजाहिद्दिनचे समर्थक होते असे समजण्याची आवश्यकता नाही. हिजबुल मुजादिद्दिनच्या गुंडांकडून स्वतःचे हलाल होण्याचे टाळण्यासाठी त्यांनी मूकपणे या प्रेतयात्रेत सामील होण्याचे ठरवले असू शकते.
पाकव्याप्त जम्मू-काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथे हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापक सईद सलाउद्दिन आणि जमात-उद्-दवाचा प्रमुख हाफीझ सईद यांनी लगेच एक बैठक बोलावून एका प्रार्थनासभेचे आयोजन केले व बुर्‍हान वानी याच्या मृत्यूचा सूड उगवण्याचे उपस्थितांना आवाहन केले. तो त्यांच्या जेहादमधील शहीद असल्याचे जाहीर करण्यात आले.
पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाझ शरीफ यांनी नेहमीप्रमाणे भारतीय सशस्त्र दलांचा निषेध केला असून बुर्‍हान वानी याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. स्वतः दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकलेला हा देश भारतातील दहशतवाद्यांना मदत करतो. त्यांना अत्याधुनिक शस्त्रे पुरवतो तरीही धडा शिकण्याचे नाव घेत नाही. लंडनमधून हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करून परत आल्यावर शरीफ यांनी लगेच ही प्रतिक्रिया देऊन आपला कोतेपणा उघड केला आहे.
माजी मुख्यमंत्री व वाजपेयी सरकारात काहीकाळ परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम केलेले ओमर अब्दुल्ला यांनी एकूण घटनेचा दोष सुरक्षादलांच्या माथी मारला आहे. सुरक्षादलांनी संयम पाळला पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केले आहे. हिंदूंचे तीर्थक्षेत्र असलेल्या अमरनाथ यात्रेकरूंना निवार्‍यासाठी जागा नाकारणार्‍या या शेख अब्दुल्लाच्या मनात काय आहे याची येथे चाहूल लागते.
गृहमंत्री राजनाथसिंह तसेच गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पाकिस्तानकडे अंगुलिनिर्देश केला असून पाकिस्तानने पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील जनतेवरील अत्याचार थांबवावे असे त्यांनी आवाहन केले आहे. तोपर्यंत पाकिस्तान सरकारने बुर्‍हान वानी यास शहिदाचा दर्जा देऊन १९ जुलै रोजी देशभर शोक पाळण्याचे आवाहन केले.
विचारवंतांचा दिवाळखोरपणा
स्वतःला प्रचंड मोठे विचारवंत म्हणवून घेणारे काही विचारवंत आहेत. त्यांत शोभा डे, दीपंकर गुप्ता तसेच दिलीप पाडगावकर यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. शोभा डे यांच्या रविवार, दि. १७ जुलैच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लघुलेखात त्या म्हणतात, ‘काश्मिरींना मानाने जगण्याचा अधिकार दिला गेलेला नाही. त्यांना मानाने जगू द्या.’ दोन्ही बाजूंना युद्धखोर ठरवून त्या स्वतः एकदम मानवतावादी असल्याचा मुखवटा चढवतात. याच काश्मीर खोर्‍यात अनेक मुसलमान आहेत जे पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेवर राहतात व पाकिस्तानी सेनेच्या हालचालीबद्दल भारत सरकारला माहिती देतात. एका गावात तर एकाच इमारतीमध्ये मंदिर व मशीद आहे. हे सर्व शोभा डेसारख्या डोळसांना दिसत नाही. देशाविरुद्ध बंड करणार्‍यांसमोर ही उदाहरणे प्रस्तुत करायचे सोडून सवंग शांतीचा त्या प्रस्ताव ठेवतात.
१६ जुलैच्या याच वर्तमानपत्रात श्री. दीपंकर गुप्ता यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या समस्येची युनायटेड किंगडममधील उत्तर आयर्लंड, स्पेनमधील बास्क व कॅनडामधील क्वेबेकच्या फुटीरतावादी आंदोलनांशी तुलना केली असून त्या-त्या देशांनी त्या-त्या प्रदेशांना वेगवेगळ्या प्रकारची संधी व अधिकार देऊन या समस्या सोडवल्याचे त्यांनी लिहिले आहे. या देशांतील समस्या वेगळ्या आहेत हे मान्य करूनही त्यांनी ‘काश्मीरला आपल्या देशाचे स्वीत्झर्लंड मानले जाते त्यापेक्षा ते भारताचे आयर्लंड वा बास्क मानल्यास काश्मीरला चांगले स्थान मिळू शकेल’ असेही त्यांनी अखेरीस लिहिले आहे.
आयर्लंडची कॅथलिक व प्रोटेस्टंट या आधारावर फाळणी झाली असून उत्तर आयर्लंड हे प्रोस्टंट असल्यामुळे इंग्लंडबरोबर आहे. स्पेन हा देश अनेक देशांचा समूह असून बास्कसारखे अनेक देश राजघराण्यांच्या दडपशाहीमुळे स्पेनच्या अधिपत्त्याखाली आहेत. कॅनडा ही एक वसाहत आहे. तेथे जास्त प्रमाणात इंग्रजी बोलणारे लोक वसले व क्वेबेकमध्ये फ्रेंच बोलणार्‍यांनी वसाहत केली म्हणून कॅनडाला क्वेबेकला भाषेच्या बाबतीत सूट देणे भाग पडले. याउलट भारताची फाळणी इस्लामच्या आधारावर झालेली आहे व इस्लाम हा जग व्यापण्यासाठी निघालेला उपासनापंथ आहे. या महत्त्वाच्या गोष्टीकडे डोळेझाक करून या धर्मनिरपेक्ष विद्वानाने धर्मनिरपेक्ष भारताची एका प्रकारे टिंगलच केली आहे.
दिलीप पाडगावकर यांनी याच वर्तमानपत्राच्या १२ जुलैच्या अंकात २०१० सालचे आंदोलन व २०१३ साली अफझल गुरूला फाशी दिल्यानंतर घडलेल्या घटनांपासून केंद्र सरकार काहीही शिकले नसल्याचे मत व्यक्त केले आहे. यासाठी सर्व विभाजनवाद्यांशी चर्चा करावी असे सुचवून, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या ‘भारत व अफगाणिस्तानशी सतत युद्धाचे वातावरण चालू ठेवून भागणार नाही हे लक्षात आल्याचे’ त्यांनी या लेखात म्हटले आहे.
पाकिस्तानला पश्‍चात्ताप होत असल्याचा पाडगावकर यांचा स्वतःचा जावईशोध आहे. भारतविरोध सोडल्यास पाकिस्तानच्या अस्तित्वाचे कारणच राहणार नाही हे पाकिस्तान चालवणार्‍यांना माहीत आहे. यापूर्वीही ‘संवादक’च्या चमूचे सदस्य म्हणून काश्मीरमध्ये जाऊन आल्यानंतर बालिश मते व्यक्त करून पाडगावकरांनी स्वतःचे हसे करून घेतले होते.
ही समस्या काश्मीरपुरती नाही
जम्मू-काश्मीर राज्याला अजून विशेष अधिकार दिले पाहिजेत म्हणणारे ३७० व्या कलमाखाली राज्याला विशेष अधिकार दिलेले आहेत हे सोयिस्करपणे विसरतात. राज्यातील निवृत्त जवानांना वसाहत बांधून द्यायच्या सरकारी योजनेला विरोध करणारे कोणत्या मनोवृत्तीचे आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जम्मू-काश्मीरचा देशाच्या संरक्षणात वाटा आहे ही गोष्ट या मंडळीना सहन होत नाही. मुख्यमंत्री मुफ्ती मेहबुवा यांचा पोटनिवडणुकीतला विजयही त्यांना खुपतो आहे. सर्वजणांनी दगड उचलले असते तर एवढे भारी मतदान झालेच नसते.
जम्मू- काश्मीरचा विकास झाला तर जम्मू-काश्मीरचा देशाच्या इतर भागांपेक्षा असलेला वेगळेपणा नाहीसा होईल. परागंदा झालेले हिंदू पंडित परत आले तर दुसरे पाकिस्तान स्थापण्याचे स्वप्न भंगेल. सैनिकांची वसाहत उभी राहिली तर तरुणांना सैन्यात भर्ती व्हावेसे वाटेल. काश्मीरमधील घटना ही काश्मीरपुरती नाही, त्यामागे पाकिस्तान तर आहेच, त्याचबरोबर आय.एस.आय.एस.ने जगात इस्लामचे राज्य स्थापन करण्याचे केलेले आवाहनही आहे हे लक्षात ठेवावे लागेल. देशातील स्वातंत्र्यप्रिय, लोकशाहीप्रिय व देशभक्त नागरिकांच्या मते बुर्‍हान वानी हा गद्दार असला तरी दहशतवाद्यांच्या मते तो शहीद आहे म्हणूनच या घटनांपासून सावध झाले पाहिजे.