‘काळा तुकतुकीत उजेड’ ः जीवनेच्छेचा आश्‍वासक स्वर

0
97

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

किशोर पाठक यांनी आजमितीला कवी, कथाकार, कादंबरीकार, ललितनिबंध लेखक व नाटककार म्हणून आपली नाममुद्रा निर्माण केली आहे. काव्यनिर्मिती हा त्यांचा श्‍वास आहे याची प्रचिती त्यांच्या कवितेतून येते…

किशोर पाठक यांनी आजमितीला कवी, कथाकार, कादंबरीकार, ललितनिबंध लेखक व नाटककार म्हणून आपली नाममुद्रा निर्माण केली आहे. साहित्यातील अनेक प्रकार त्यांनी लीलया आणि यशस्वीरीत्या हाताळले तरी कवी किशोर पाठक ही त्यांची पहिली ओळख साहित्यरसिकांना आहे. ‘पालव’ या १९७९ मध्ये प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहामुळे ते रसिकांसमोर आले. त्यानंतर त्यांचे ‘आभाळाचा अनुस्वार’ (१९९८), ‘निरूपण’ (१९९८), ‘मी मृगजळ पेरीत’ (२००५), ‘सम्भवा’ (२०१०) आणि ‘काळा तुकतुकीत उजेड’ (२०१४) हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. नऊ बालकवितांचे संग्रह प्रसिद्ध करून तेही दालन त्यांनी आपल्या परीने समृद्ध केले आहे.

त्यांच्या ‘काळा तुकतुकीत उजेड’ या अलीकडच्या कवितासंग्रहातील कवितांनी माझे लक्ष वेधून घेतले. व्यवसायाने अभियंता असलेल्या या कवीने तलम पोताची कविता निर्माण केली आहे आणि नाशिकच्या परिसरात काव्यसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे ते उपाध्यक्ष आहेत. शिवाय त्या परिसरातील वाङ्‌मयीन घडामोडींचा साक्षीभाव त्यांनी सजगतेने जागविला आहे. काव्यनिर्मिती हा त्यांचा श्‍वास आहे याची प्रचिती त्यांच्या कवितेच्या वाचनाने येते. आपला चिंतनाचा स्वर मिताक्षरांत ते प्रकट करतात ः
पाखरांना सांभाळण्याचा नव्हताच माझा हट्ट कधी
मी झाडच दिले होते त्यांना घरटे करण्यासाठी
आता घरट्यातली अंडी पळवण्याचा किंवा खाण्याचा
मानवीय स्वभाव पक्ष्यांनी का घेतला
माणसांच्या सहवासात आल्यापासून पाखरं स्वार्थी
आणि खुरटी झालीत (क्र. ५९)
समकाळातील मानसिकतेवर कवीने केलेले हे जळजळीत भाष्य आहे. अशा प्रकारचे दाहक सत्य पचवूनही कवीची जीवनेच्छा मलीन झालेली नाही किंवा सृजनात्मकतेची आकांक्षा लोप पावलेली नाही. धग आणि हुडहुडी यांचा क्रम त्याने हेतुतः बदललेला आहे ः
थंडीची धग आणि उन्हाची हुडहुडी
काठोकाठ भरलीय मनात
म्हणूनच अक्षरांचे खेळ लावत राहायचे
पुन्हा नाती व्यामिश्र असतात म्हणून विव्हळायचे
आता हळूच सोड एखादी गाठ असंख्य गुंत्यामधून
बघ नात्यांचे प्रवाह कसे खळखळू लागलेत शुभ्र व्योमातून (क्र. २९)
शेवटच्या दोन ओळींमधून हा आशातंतू अधिकच दृढ झालेला दिसून येतो.
या कविमनात भविष्यकालीन स्वप्न तरल, भावकोमल शब्दांतून प्रतिमांकित झालेले आहे ः
पाकुळत्या अधरांचे पाकळीचे पाऊल
बोटांनी लिहिलेल्या सुगंधित ओळी
लुकलुकत्या बुबुळांचे अथांग आभाळ
प्रगाढ विश्‍वासाची नीरव गाज
सहवासाच्या संधिप्रकाशात
करायला हवे
उबदार आशांचे समृद्ध बांधकाम (क्र. २८)
सध्याच्या युगमानसात सर्वत्र ऐकू येणारे कारुण्यपूर्ण स्वर, दहशतवादाची प्रचंड दडपणे, संहारकालीन तांडवाचे अंतर्नाद आणि हताशा यांच्या काळ्याकुट्ट पार्श्‍वभूमीवर या कवितेतील आत्मस्वर आश्‍वासक वाटतो ः
पाखरे किलबिलतील -काळजी नको
तुझ्या वळचणीला येतील – काळजी नको
तुझी उब मागतील – काळजी नको
तुझ्या प्रभेने विस्फारतील – काळजी नको
ओक्साबोक्शी बोलतील – काळजी नको
तू पाखरांच्या पंखात हवा भरशील – काळजी नको
पाखरे उडतील, जमीन सोडतील – काळजी नको
तू घट्ट मातीत विलीन होशील – काळजी? नको ना!
ते शोधत राहतील तुला, गेल्यावर – काळजीने (क्र. ८३)
स्त्री-पुरुषाच्या चिरंतन प्रेमभावनेला आवाहन करणारी आणि प्रेमसाफल्यातच इतिकर्तव्यता मानणारी कविता या संग्रहात आढळते. देहिक लालसा येथे नाकारलेली नाही. पण शारीर भावनांकडून मानस भावनांकडे झालेला प्रवास येथे दिसून येतो.
कातडीखाली कातडी
तिच्याही खाली कातडी
त्याखाली एक लखलखता प्रवाह
अखंड ऊर्जेची धार
तूच बांधलास ना ह्या शरीरात कारंजा
हे उडणारे फवारे तुझ्याच बगीच्यात
तू शरीर उपसून श्‍वास सोडून दे हवेत
जगण्याचे आलाप ऐकू येत राहतील जगाला
जग डोलत राहील आपल्या लयदार सुगंधमिठीत (क्र. २९)
ही स्वप्न-वास्तवाच्या हिंदोळ्यावरची कविता आहे याचा प्रत्यय येथे येतो. जीवनातील अंधःकार आणि प्रकाश याविषयीची कवीची आपली म्हणून एक धारणा निश्‍चित झालेली आहे. सुख-दुःखसंमिश्र जीवनाच्या चिंतनाचा तो परिपाक होय. अंधारावर फुल्या मारल्या म्हणून फुलीच्या रेषांमधून उजेड ओघळत नाही… अंधार आपले साम्राज्य पसरतो आणि उजेडाच्या देठातूनच उगवत राहतो… काळोखाची मुळे काळ्या मनात खोलवर जातात…. मग अंधाराच्या बुबुळांनी माणसे प्रकाश वाचत राहतात… कधीतरी तांबडे फुटेल या आशेने आतबाहेर करीत राहतात… दारावर ठकठक करतात… आतल्या अंधाराची बाहेर येण्याची वाट पाहत आयुष्यभर घराबाहेर ताटकळत उभे राहतात- ही तितिक्षा जीवघेणी असते अन् आनंददायीही. सभोवतालचे भयाण वास्तव कविमनाला जाणवत नाही, माणसाच्या उद्याच्या भवितव्याची चिंता वाटत नाही असे नाही. पण ते संवेदनशीलतेने टिपण्याची कवीची खास शैली आहे. उदा.
सगळ्या सावल्यांच्या कहाण्या केल्या
झिजत जगणे मखरात मढवावे म्हणून त्यांचे केले मॉल
दारिद्य्रावर घातल्या वातानुकूलित शाली
आणि गरिबीला टांगून ठेवले दुकानाबाहेर
आता सगळेच जगाच्या परिप्रेक्ष्यात फिरतात
माझ्या सापळ्यांवर सुखाच्या नक्षी कोरतात. (क्र. ४७)
मिताक्षरांत या कवितेतील आशय व्यक्त झाला आहे. जागतिकीकरणाच्या वरवंट्याखाली सापडलेल्या समाजाची ससेहोलपट हा या कवितेचा विषय. विषयाला आशयाची रूपकळा प्राप्त होताना ज्या प्रतिमा आलेल्या आहेत, त्या नव्या गतिमान जगाच्या संदर्भातील आहेत. कृत्रिम समृद्धी जगण्याचा हव्यास हा आजकालच्या माणसांच्या जीवनशैलीचा भाग झालेला आहे. त्यावर कवीने भेदकपणे ‘क्ष’ किरण टाकलेला आहे. तो अंतर्मुख करणारा आहे.
कवितेचे कवीच्या जीवनातील अनन्यसाधारण स्थान पुढील कवितेत अधोरेखित झाले आहे. कविता ही त्याच्या जीवनावेगळी नाहीच मुळी! ः
कविता हसली तिची फुलं झाली
कविता स्तब्ध झाली तिची वही झाली रेघी रेघी
कविता उधळली तिची खळाळ नदी झाली
कविता गप्प गप्प तिची स्वयंपाकाची चूल झाली.
कविता उजळली, घुसळली शांत झाली, स्त्री झाली
कविता थांबली माझ्या श्‍वासात विसर्जित झाली
एक जगण्याचा थेंब घेऊन आली
माझा मृत्यू लिहून गेली (क्र. ७८)
कवितेविषयीचे चिंतन पुढील कवितेत त्याने वेगळ्या वळणावर आणून सोडलेले आहे ः
जगण्याला शिव्या घाल कविता हसेल
कवितेला शिवी घाल जगायला मजा येईल
आपण भोट कुठल्यातरी कळपाच्या गोठ्यात शेणाचा पो होणार
उपयुक्त खत म्हणून झाडांच्या मुळात मातीशी गाडले जाणार
आता म्हणत राहा झाडाला कवितेची फुलं येतील (क्र. ७९)
सृजनशीलता हा या कविमनाचा धर्म आहे आणि कवितेची उपासना हीच या कवीची जीवनधारणा आहे. त्यामुळे कवितेविषयीच्या चिंतनाच्या कविता या संग्रहात अधिक आहेत. कवितेत उद्देशून कवीने आवाहन केले आहे, ‘‘कविते, मला तुझ्या मातीत पुरून टाक… न सापडण्याइतका गाडूनही टाक… शतकानंतर उत्थनन होऊ दे… तेव्हा मातीच्या खाली खोल खोल एक तरतरीत कोरा कागद दिसेल.. तो माझा अंश तुझ्या उदरात असल्याचे ओरडून सांग… सृजन गाडलेल्या संस्कृतीतूनच नव्या गाण्याला जन्म देते, हे कविते, शतकाच्या नव्या स्वरासाठी हेही गाणे तुला पुरावे लागणार आहे.’’
– जीवनाच्या सर्वंकष होरपळीत जीजिविषेचा कोवळा कोंभ जपणारी आणि त्याला संजीवक स्पर्श देणारी कविता कवीला हवी आहे. म्हणून तो उद्गारतो ः
न स्फुरलेल्या शब्दांची नाळ बेंबीत खोचून
मला गर्भाशयात कवितेला शांत झोपवायचंय (क्र. ९९)