पर्यावरण संस्कृतीकेंद्रित चिखलीचा भक्तिग्राम

0
114

– राजेंद्र पां. केरकर

 

आजच्या धकाधकीने आणि ताणतणावाने ग्रस्त असलेल्या मानवी मनाला चिरंतन शांती, सौख्य प्रदान करण्यासाठी सदाहरित जंगलाच्या कुशीत वसलेल्या चिखली गावात हा भक्तिग्राम उभा आहे. येथेे श्रीकृष्णाचा विचार लोकमानसात रुजविण्याचे कार्य केले जाते.

‘हरे राम, हरे कृष्ण’ हा मंत्र भारतीय धर्मसंस्कृतीत वैष्णव संप्रदायाने प्रभावीपणे रुजवला. श्रीविष्णूच्या दशावतार संकल्पनेतील श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व हे भारतीय लोकमानसाला पिढ्यान्‌पिढ्यांपासून भारावून टाकणारे असेच आहे. त्यामुळेच ‘कृष्णं वंदे जगद्गुरू’ असे मानणार्‍या सर्वसामान्यांसाठी श्रीकृष्ण ही सदैव प्रेरक शक्ती ठरलेली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीकृष्णभक्तीचा आणि विचारांचा प्रचार आणि प्रसारासाठी वावरणार्‍या ‘इस्कॉन’ संस्थेने भक्ती केंद्रस्थानी मानून जगाच्या वेगवेगळ्या भागांत भारतीय संस्कृती, शिक्षणपद्धती, जीवनशैली रुजविण्यासाठी सातत्याने सेवाभावी वृत्तीने यशस्वीरीत्या अभियान राबवलेले आहे.

कर्नाटकात कणकुंबी ओलांडल्यानंतर गोव्याच्या म्हादई अभयारण्याच्या सीमेपासून काही अंतरावर जे चिखली गाव आहे तेथे पर्यावरण मूल्यांवर आधारित स्वयंपूर्ण अशा भक्तिग्रामाची निर्मिती माधव प्रभू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. वीज, नळपाणी पुरवठा, वातानुकूलित यंत्रणा, भ्रमणध्वनी सुविधा, दूरदर्शन किंवा मनोरंजनाची आधुनिक साधने यांसारख्या सुविधांपासून कैक मैल दूर असलेला, आजच्या धकाधकीने आणि ताणतणावाने ग्रस्त असलेल्या मानवी मनाला चिरंतन शांती, सौख्य प्रदान करण्यासाठी सदाहरित जंगलाच्या कुशीत हा भक्तिग्राम उभा राहिलेला आहे.
ब्रिटिशांचे आगमन भारतात होण्यापूर्वी आणि ते इथले सत्ताधीश होण्यापूर्वी आपल्या देशात मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्ण गावे अस्तित्वात होती. अन्न, पाणी, आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण गावातच होत असल्याने, अभावानेच या लोकांचा संबंध शहरांशी किंवा नागरी संस्कृतीशी यायचा. गावातच बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या अवस्थांना सामोरे जात सुखाचे आणि प्रफुल्लित जीवनाचे गावकरी धनी व्हायचे. परंतु कालांतराने स्वयंपूर्ण गावाचा पाया विस्कळीत होत गेला आणि आज केवळ शिक्षण, आरोग्य, मनोरंजन आदी सुविधांसाठीच नव्हे तर अन्नधान्यांसह पिण्याच्या पाण्यासाठी गावे परावलंबी होऊ लागली. नागरीपुरवठा खात्याद्वारे आवश्यक अन्नधान्यांचा कोठा आणि सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसेल तर त्या गावांची परिस्थिती बिकट होऊ लागते. पायी चालणार्‍या माणसाला आज केवळ एक कि.मी. अंतरावर जाण्यास दुचाकी, चारचाकीसारख्या वाहनाचा आधार घ्यावा लागतो. दूरध्वनी, भ्रमणध्वनीविना काही क्षण मोकळे राहणे माणसाला आज शक्य होत नसते. चॅनेलच्या माध्यमातून होणारा चित्रपटांचा तसेच वेगवेगळ्या मालिकांचा आस्वाद घेत जगणे ही जीवनाची अविभाज्य बाब बनलेली आहे. अशा कालखंडात भक्तीला गाभा मानून पर्यावरणीय गावाची निर्मिती करणे हे ज्यांचे स्वप्न होते त्या श्रीमद् भगवद्गीतेच्या अमृताचा लाभ झालेल्या माधव प्रभू आणि त्यांच्या श्रीकृष्णभक्तांनी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले. चिखलीकत्री येथून केवळ २० पावले चालून गेल्यावर पूर्णपणे माती आणि संस्कृतीशी नाते सांगणार्‍या भक्तिग्रामातल्या पर्यावरणीय कुटिरांचे दर्शन होते. प्रदेशाला आणि विशेष पर्जन्यवृष्टी होणार्‍या परिसराला साजेल अशा गृहबांधणीला प्राधान्य देण्यासाठी येथे वावरणार्‍या उच्चविद्याविभूषित अभियंत्यांनी भारतीय पारंपरिक वास्तुकलेचा अभ्यास, संशोधन करून इथल्या घरांची उभारणी केलेली आहे. येथे हे गाव उभे आहे ते खरंतर सदाहरित जंगलांनी समृद्ध आणि नाना प्रकारच्या जंगली श्‍वापदांचा नैसर्गिक अधिवास. येथे घरे उभारून शेती, बागायती, पशुपालन करणे म्हणजे जंगली श्‍वापदांच्या उपद्रवासाठी सिद्ध राहणे. रानडुक्कर, गवेरेडे यांसारखे तृणहारी प्राणी असो अथवा बिबट्यासारखा गुराढोरांवर सहजपणे हल्ला करण्यासाठी प्रवृत्त होणारा प्राणी असो. येथे हा उपद्रव ही नित्याचीच बाब झाली होती. परंतु श्रीकृष्णभक्तांनी श्रमशक्तीद्वारे परिसरातील उपलब्ध दगड, माती यांचा कल्पकतेने उपयोग करून जे कुंपण उभे केले आहे, त्याने येथील भाजीपाला, केळी, गाईगुरांना संरक्षण दिलेले आहे. आज कुंपणाची पूर्वीची परंपरा लुप्त झाल्याने रानडुक्कर, गवेरेडे, हरणे यांनी शेतकर्‍यांचा, बागायतदारांचा त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेती-बागायती करण्याबाबतीत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु चिखली येथे भक्तांनी उभारलेल्या या दगडमातीच्या कुंपणाने जंगली श्‍वापदांचा उपद्रव दूर केला आहे.
आज शेती-बागायतींतले उत्पादन वृद्धिंगत व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके, जंतुनाशके यांचा वापर केला जातोे. त्यांच्या वापरामुळे उत्पन्नात भरीव वाढ होते असा गैरसमज रूढ झालेला असून, खरंतर ही वाढ जलसिंचनामुळे होत असते. पिकांत अधिक पाणी मुरते आणि भूमीची सुपीकता वाढणार्‍या सूक्ष्म पोषकतत्त्वांची कमतरता निर्माण होते. रसायनांच्या असंतुलित वापरामुळे अन्नात विष मिसळण्याची प्रक्रिया तीव्र होत जाते. आज मानवी जीवन नानाविध व्याधींनी ग्रस्त झालेले आहे. त्याला विषारी घटकांनी युक्त असलेले अन्नधान्य कारणीभूत आहे. यासाठी आज सेंद्रीय खताचा वापर करून शेती-बागायतीत क्रांती करणे शक्य आहे हे आपल्या पर्यावरणीय भक्तिग्रामातील भाविकांनी पुरेसा भाजीपाला, नाचणी, केळी, फुलझाडे यांच्या यशस्वी लागवड करून सिद्ध करून दाखवले आहे. येथे केलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती लागवडीसाठी खत म्हणून गोमूत्राचा जंतुनाश म्हणून वापर केला जातो. येथे आसामहून आणलेल्या केळीच्या एका प्रजातीने त्यांना साबणाशिवाय भांडी-कपडे धुण्यासाठी पोषक आणि लाभदायक पर्याय दिलेला आहे. या केळीच्या गाब्यापासून तयार करण्यात आलेले द्रव्य, पावडर उपयुक्त ठरलेली आहे. शेण, केरकचरा यांच्या मिश्रणातून तयार झालेले सेंद्रीय खत इथल्या केळीच्या वाढीसाठी लाभदायक ठरले आहे. बहुगुणी असणारी ही केळी या भक्तिग्रामाचे वैभव ठरलेली आहे.
आजच्या काळात सिमेंट-कॉंक्रीटचे घर ही आवश्यक बाब झालेली आहे आणि त्यामुळे मातीच्या भिंतीची कौलारू घरे इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहेत. सिमेंट-कॉंक्रीटच्या घरांचे जसे फायदे आहेत, तसेच ती मानवी आरोग्याबरोबर मनःशांती भंग करण्याला कारणीभूत झालेली आहेत. याची जाणीव एकेकाळी ऐषआरामी आणि सुखलोलूपतेचे जीवन जगणार्‍यांना झाली तेव्हा त्यांनी चिखली येथे नाना प्रयोगांअंती सिमेंट, कॉंक्रीट, पोलाद यांचा वापर नव्हे तर शेवटचे घर उभारतानाही लाकडाचा वापर टाळून पूर्णपणे मातीचे सुबक आणि परिसरात तग धरू शकणारे असे कल्पकतेने घर उभे केले. बर्‍याचदा जून संपून जुलै महिना आला तरी मान्सूनच्या पावसाची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. अशा वेळी दिवसेंदिवस कृत्रिमरीत्या धरणांच्या माध्यमातून आलेल्या जलस्रोतांतील पाण्याचे प्रमाण कमी-कमी होऊ लागते. आणि पंधरवडाभर पाऊस लांबला तर देशातल्या बर्‍याच भागांतली पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी चालू असलेली वणवण अधिकच तीव्र होत जाते. परंतु येथे हिरव्यागार जंगलामुळे कार्यान्वित असलेल्या झर्‍यांच्या पाण्यावर इथल्या भक्तांची तहान भागते आणि दैनंदिन व्यवहारही सुरळीत चालतात.
येथे विजेचा आणि विजेवर चालणार्‍या यंत्रांचा मुळीच वापर केला जात नसून पाण्याचा साठा करण्यासाठी जो तलाव खोदलेला आहे त्याला बैलांनी चालविलेल्या मोटेची शक्ती कारणीभूत ठरलेली आहे. या शक्तीतून जो तलाव खोदलेला आहे तो इथल्या भक्तांतल्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेचा प्रत्यय आणून देतो. मिक्सर, ग्राईंडर, मोबाईल, ओव्हन, गॅस सिलिंडर, कम्प्युटर अशी आधुनिक यंत्रे आणि उपकरणांविना आजच्या जगण्याची कल्पना करणेही संभव नसताना येथे चैतन्याने, प्रसन्नतेने ओथंबलेली माणसे श्रीकृष्णाचा विचार लोकमानसात रुजविण्याचे कार्य करत असतात.