ऍसिडिटी किंवा अम्लपित्त

0
1285

– डॉ. स्वाती अणवेकर

आपण सारखे अपथ्य सुरूच ठेवले तर हळुहळू शरीरातील पित्त गरजेपेक्षा वाढेल आणि मग आपण जे अन्न खातो ते अन्न या वाढलेल्या पित्ताने आंबेल आणि त्याचे पचन नीट न झाल्यामुळे आपल्या शरीराला उपकारक असा आहाररस निर्माण होणार नाही आणि हे पित्त आपल्या पोटात जळजळ-दाह निर्माण करेल. यालाच आपण ऍसिडिटी किंवा अम्लपित्त म्हणतो.

अर्चना एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत होती. ती मोठ्या हुद्यावर रुजू होती. हुद्दा जेवढा मोठा तेवढीच कामाची जबाबदारीसुद्धा मोठी. त्यामुळे नेहमीच वेळी-अवेळी जेवण, कामानिमित्त रात्री जागरण, पहाटे लवकर उठणे, हे सर्व सुरूच होते. बरेचदा रात्री-अपरात्री पार्ट्याही व्हायच्या आणि या अशा सगळ्या जीवनशैलीमुळे तिला नेमका व्हायचा तोच त्रास सुरू झाला.
सारखी छातीत जळजळ, सकाळी उठल्यावर डोके जड होणे, पोटात गॅस होणे, चक्कर येणे अशा तक्रारी सुरू झाल्या. बर्‍याच डॉक्टरांची पारायणे झाली. तात्पुरता आराम मिळायचा, पण पूर्ण बरे वाटत नव्हते. शेवटी एका मैत्रिणीच्या सल्ल्यावरून ती शहरातील एका विख्यात आयुर्वेद तज्ञाजवळ गेली.
अर्चना ः डॉक्टर, गेली दोन वर्षे मला हा त्रास होतोय. बरेच डॉक्टर्स झाले पण कुणाच्याच औषधाने गुण आला नाही. शेवटचा उपाय म्हणून मला माझ्या मैत्रिणीने आपल्याकडे पाठविले आहे.
डॉक्टर ः तू जी लक्षणे सांगितलीस, त्यावरून तरी असे वाटतेय की हे अम्लपित्त आहे.
अर्चना ः बापरे, हा कोणता आणि भयंकर आजार झालाय मला?
अर्चना डॉक्टरांचे बोलणे ऐकून एकदम बिथरलीच.
अर्चना ः मला तर सगळ्या डॉक्टरांनी ही फक्त ऍसिडिटी आहे, असेच सांगितले होते.
डॉक्टर ः हो, पण आमच्या आयुर्वेदाच्या भाषेत याला ‘अम्लपित्त’ असे म्हणतात.
अर्चना ः वॉव, इट साउंड्‌स इंटरेस्टिंग डॉक्टर. जरा आपल्या वैद्यक शास्त्राच्या भाषेत मला समजावून सांगाल का?
डॉक्टर ः हो, नक्कीच. अयोग्य आहार-विहार यामुळे शरीरात पित्त वाढते आणि मग हा त्रास सुरू होतो.
अर्चना ः डॉक्टर, पण या आजारातून मी बरी होईल ना?
डॉक्टर ः होऽऽ, का नाही होणार? तू या आजारातून पूर्ण बरी होशील. पण मी सांगेन तशी औषधे घेऊन! त्याचबरोबर योग्य आहार-विहार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
अर्चना ः थँक्स डॉक्टर.
डॉक्टर ः चला, आता जरा तपासणी करुयात आणि मग काही गोष्टी समजावून सांगणार त्या कायम लक्षात ठेवायच्या. अगदी आजार बरा झाला तरीदेखील!
डॉक्टरांनी अर्चनाला तपासले आणि औषधांसोबतच पथ्यदेखील सांगितले. आणि काय आश्‍चर्य! सहा महिन्यातच अर्चना पूर्णपणे ठणठणीत बरी झाली. तर… ही आहे आयुर्वेद चिकित्सेची कमाल. ती रोग बरा करून मुळापासून शरीरातून उखडून काढते. चला तर मग आता या अम्लपित्ताची माहिती जरा सविस्तरपणे पाहू या.
अम्लपित्त होण्यामागची कारणे ः-
* शिळे, आंबट, खारट, तिखट, तेलकट, तळलेले पदार्थ, करपलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, फ्रीजमधले, डबाबंद रेडीमेड पदार्थ, गरम मसाला, हिरवी मिरची, चटपटीत चाट, फास्टफूड, जंक फूड जास्त प्रमाणात सेवन करणे.
* फायबर-कोंडा हे नैसर्गिक स्वरूपात असणारे पदार्थ जेवणात नसणे.
* काकवी, खरवस, आंबट दही व ताक, उष्ण कोरडे पचायला जड अशा पदार्थांचे सेवन.
* मांस-मटण यांचे सेवन. खारवलेले मासे, लोणचे, पापड, दारू, कुळीथ, तूरडाळ, चना डाळ, बेसन यांचा जेवणात भरपूर उपयोग.
* तसेच बेकरीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे.
वरील कारणांमुळे अम्लपित्त होते.
* विहारामध्ये पहिले अन्न नीट जिरले नसतानाच पुन्हा जेवणे, भराभर जेवणे, वेळी-अवेळी जेवणे, वारंवार उपवास, जेवल्यावर लगेच झोपणे, जेवताना जास्त पाणी पिणे, रात्री जागरण, अति चिंता, तसेच संडास-लघवीचा वेग अडवून धरणे या गोष्टी या आजाराचे कारण बनतात.
अम्लपित्त आजार शरीरात कसा बळावतो?
वर सांगितलेली कारणे आपल्याकडून वारंवार घडली की काय होते? – जसे नळाला लावलेली बादली… त्यामध्ये बारीक धार सोडून ठेवतो… ती संथ गतीने भरत असते आणि काही काळाने बादली पूर्ण भरते… आता आपण काय करायला पाहिजे? नळ बंद करायला पाहिजे. पण तसे न करता आपण जर तो चालूच ठेवला तर नक्कीच बादलीमधले पाणी भरून बाहेर वाहू लागेल. तर हाच सिद्धांत इथे लागू पडतो. इथे बादली म्हणजे आपले शरीर आणि पाणी म्हणजे आपण खाल्लेल्या आहारातून निर्माण होणारे पित्त! तर होते काय… आपण सारखे अपथ्य सुरूच ठेवले तर हळुहळू शरीरातील पित्त गरजेपेक्षा वाढेल आणि मग आपण जे अन्न खातो ते अन्न या वाढलेल्या पित्ताने आंबेल आणि त्याचे पचन नीट न झाल्यामुळे आपल्या शरीराला उपकारक असा आहाररस निर्माण होणार नाही आणि हे पित्त आपल्या पोटात जळजळ-दाह निर्माण करेल. यालाच आपण ऍसिडिटी किंवा अम्लपित्त म्हणतो.
अम्लपित्ताची लक्षणे कोणती..?
* भूक न लागणे, अन्न नीट न पचणे, मळमळणे, छातीत-घशात जळजळणे. ही लक्षणे जाणवू लागली की समजावे आपले शरीर आपल्याला पुढे वाढून ठेवलेल्या संभाव्य धोक्याची कल्पना देत आहे आणि लागलीच सावध व्हावे.
पण या असल्या टूक्कार वाटणार्‍या संकेताना आपण नाही बाबा भीक घालत! आपण आपले तेच खरे करत आपले पूर्वीचेच खानपान चालूच ठेवतो आणि वर म्हणतो- चांगले खाऊन-पिऊन रहायचे, नाहीतर जगायचेच कशाला?
मग आपल्या संवेदनशील शरीराचे आपण ऐकले नाही तर तेसुद्धा आपल्याला होणार्‍या त्रासाच्या विरोधात बंड पुकारणारच ना! मग तेदेखील म्हणजे ‘आता भोग आपल्या कर्माची फळे!’ … पुढे जसजसा आपला आजार शरीरात बळावतो तशी अपचन, घशाशी आंबट-कडू येणे, सकाळी सकाळी कडू उलटून जाणे, डोके दुखणे, पोटात गॅस होणे, घसा-छातीत दुखणे, छातीत-पोटात जळजळणे, संडासला पातळ होणे, भूक कमी होणे, खाल्लेले जेवण न पचणे, तोंडाला चव नसणे ही बळावलेल्या आजाराची लक्षणे शरीरात दिसू लागतात व आता मात्र याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महाग पडू शकते. कारण या सगळ्यावर आता आपण उपाय केले नाहीत तर पुढे जाऊन पोटात- आतड्यात अल्सरदेखील होण्याचे भय असते, हे लक्षात ठेवावे.
आयुर्वेदामध्ये यावर अगदी चांगल्या पद्धतीने उपचार होऊन हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो.
आजाराची लक्षणे पाहून वैद्य लंघन म्हणजे हलका-सुपाच्य आहार घेऊन उपवास करणे, वमन, विरेचन हे पंचकर्म उपचार रुग्णावर करतात.
तसेच पोटात सुतशेखर, प्रवाळपंचामृत, अविपत्तीकर चूर्ण, कामदुधा, भुनिंबादी काढा, गुळवेल, किरायते, आवळा, हरडा, बेहडा इ. औषधे आजाराची स्थिती आणि गंभीरता पाहून उपचारामध्ये वापरतात.
तसेच हा आजार बरा होण्यासाठी पथ्य सांभाळणेही तेवढेच गरजेचे आहे…
* जव, गहू, वरी, मूग, मेथी, जुने तांदूळ, पडवळ, भेंडी, दुधीभोपळा, कारले, नारळ, डाळींब, कोहळा, आवळा, केळफूल, साखर, मध, गोड ताक, गाईचे दूध, साजूक तूप या गोष्टी खाण्यात पथ्यकर आहेत.
तसेच रात्री वेळेत झोपून सकाळी लवकर उठणे; सर्व जेवणे वेळेत घेणे, संडास-लघवीचे वेग न धरणे, मन शांत ठेवणे, कामाची दगदग न करणे या गोष्टी पाळल्यास हा आजार त्वरित बरा होऊ शकतो.
घरगुती उपाय ः-
१. हरड्याचे चूर्ण मधासोबत घ्यावे.
२. चार चमचे कोवळ्या मुळ्याचा रस खडीसाखर घालून घ्यावा.
३. कोहळ्याचा रस खडीसाखरेसोबत घ्यावा.
४. आमसूल, वेलची, खडीसाखर एकत्र वाटून गोळ्या कराव्यात व या गोळ्या दोन वेळेस घ्याव्यात.
५. आंबाड्याच्या कोवळ्या फळाचा रस, खडीसाखर आणि चिमूटभर मिरपूड घालून सात दिवस घ्यावा.
अशा रीतीने पावसाळ्यात आपण स्वतःची काळजी घेऊन अम्लपित्त आजारापासून स्वतःला वाचवू शकता व निरामय राहू शकता.