दात किडणे व त्यावरील उपाय…

0
1719

– सौ. मोहिनी सप्रे

रात्री दात घासणे आवश्यक आहे. झोपल्यावर तोंड बंद असल्याने तोंडात शुद्ध हवेची ये-जा होत नाही. दातातील अन्नाचे कण सडतात. तोंडाला घाण येते. झोप लागत नाही. त्यामुळे सकाळी उठतानाच डोके जड होते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासून झोपावे.  

कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरून तोंड व दात नीट साफ करावेत. काही लोक जेवल्यावर दात ब्रश करतात किंवा मिठाच्या पाण्याने गुळण्या करतात. दात निरोगी ठेवण्यास हे उत्तम उपाय आहेत. पुढे दिलेल्या वस्तूंपैकी काहींचा अती उपयोग झाल्याने दात बिघडतात व जास्त काळ असा उपयोग करीत राहिल्यास दात किडतात किंवा सडतात…
* चॉकलेट्‌स, पेपरमिंट यांसारख्या गोड वस्तू.
* मऊ पोळी, पुरी, धिरडी, मैद्याच्या वस्तू, मऊ पाव वगैरे.
* दूधपाक, पुरणपोळी, मिठाई, भजी, गाठीया, खमण, ढोकळा, फरसाण वगैरे.
* साखर, गोड पदार्थ, मुरब्बे, जाम, रेवडी, बर्फी वगैरे.
दात किडण्याची सुरुवात झाली की जातांवर पांढरे डाग दिसू लागतात. हे डाग वाढत जाऊन दाताला भोकं पडतात. प्रत्येकाच्या तोंडात नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत असे अतिसूक्ष्म जंतू असतात. गरमी, बाष्प, अंधार एकत्र झाल्यास हे जंतू फोफावतात. मऊ पदार्थांचे कण नेहमी खाणार्‍याच्या दातांच्या फटीत, हिरड्यांवर, दातांच्या टोकावरील कठीण भागावर चिकटून राहतात. या अन्नकणांवर हे सूक्ष्म जीवजंतू चिकटतात व वाढत जातात. या जंतूंमुळे अन्नातून एक प्रकारचा आंबट व तेजाबसारखा दाहक पदार्थ निर्माण होतो. दंतवेष्टनावरील इनॅमलचा हा पदार्थ नाश करतो. दात नीट साफ न ठेवल्यास दातातून एक दाहक पदार्थ तयार होतो. त्याने दंतवेष्टन व आतील भाग नष्ट होऊ लागतो व वरच्या भागाला भोकं पडू लागतात. हळुहळू ही कीड दातात खोलवर पोहचते व दात किडू लागतात. काही वेळा हिरड्यांवरील त्वचा सरकते व दंतिन उघडे झाल्याने त्यावर हवेचा परिणाम होऊ लागतो. दातांतील मज्जातंतू त्यामुळे उत्तेजित होतात. दात दुखू लागतात व दातांच्या दुखण्यामुळे शरीरातील इतर अवयवही दुखू लागतात. दात किडल्यावर अन्न चावणे शक्य होत नाही. याचा परिणाम म्हणजे घासामध्ये लाळ पुरेशा प्रमाणात मिसळली जात नाही. तोंडात होणारे पिष्टमय पदार्थाचे पचन नीट होत नाही. म्हणूनच दात किडताहेत असे वाटल्यावर लगेच दंतवैद्याचा सल्ला घ्यावा.

वेडेवाकडे दात

वेडेवाकडे दात असण्यामागे खालील कारणे असू शकतात-
१. वारसागत आल्याने.
२. कॅल्शियम व व्हिटॅमिन डीचा अभाव
३. दुधाचे दात सडल्याने पडले म्हणून किंवा ते काढल्याने रिकामी झालेली जागा भरून गेल्यामुळे.
४. जबड्याचा आकार लहान, अविकसीत किंवा बरोबर नसल्याने.
५. पौष्टीक आहाराच्या अभावी व आहार बरोबर न पचल्याने रक्ताचा पुरवठा हिरड्यांना आवश्यक तेवढा न मिळाल्याने, व दात सैल झाल्यामुळे.
६. तोंडात अंगठा किंवा बोटे घालून चोखण्यामुळे.
७. ओठ चावल्याने, जीभ झोपेत चावल्याने.
८. घाणेरडी रबरी खेळणी तोंडात नेहमी ठेवल्याने.
९. दात येताना वाटेल ती वस्तू तोंडात ठेवीत गेल्यामुळे.
१०. घशातील टॉन्सिल्स सुजल्यामुळे.
११. तोंड उघडे ठेवल्यामुळे दात व्यवस्थित एका ओळीत आले नाहीत व फार वेडेवाकडे, तुटलेले असे असले तर दंतवैद्याकडे जाऊन ते नीट करून घ्यावेत.

पायोरिया व त्या अनुषंगाने होणारे रोग…

पायोरीया हा दातांच्या रोगांपैकी महाभयंकर रोग आहे. दात व हिरड्या यामधील जागेत पू होतो. दात किडणे व पायोरियात फरक आहे. लहान मुलांचेही दात किडतात. दात किडतात त्या सर्वांच्या दातात पू होत नाही. पायोरीया कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. पायोरीयाच्या सुरुवातीला हिरड्या सूजतात व लाल होतात. त्यातून रक्त येते व स्पर्श केल्यावर हिरड्या दुखतात. हिरड्या व दातांमधील भागात अन्नाचे कण अडकतात व सडू लागतात. ही पायोरियाची सुरुवात असते.
अशा रोग्याच्या तोंडाला दुर्गंधी येते. त्यांना स्वाद राहात नाही. जीभही वाईट दिसू लागते. सुरुवातीलाच तातडीने उपाय केलेत तर रोग आटोक्यात येतो.
त्या व्यक्तीला शौचास साफ होत नाही. सर्व पचनमार्ग हळुहळू बिघडत जातो. तोंड, जिभ व दात बिघडतात. दात कमजोर होतात. दातांच्या मुळातील पू काहीवेळा बाहेर निघतो व त्याचा परिणाम गळा, तोंड, फुफ्फुसांवर होतो. मुळातील या पूमुळे इतचर आजुबाजूच्या हाडांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे खालील रोग होण्याचा संभव असतो.
१. अपचन, २. अतिशय मलावरोध, ३. आतड्यांचे रोग,
४. गळ्यातील गाठी व इतर ग्रंथींना सूज, ५. डोळ्यांच्या आत सूज, ६. डोके, कान व नाकांचे विकार. ७. ज्ञानतंतूंवर सूज,
८. रक्तात दोष उत्पन्न होणे, ९. शरीर फिके पडणे,
१०. हृदयाचे विकार, ११. मूत्राशयावर सूज, १२. सांधे व स्नायू ठणकणे, १३. अशक्तपणा.
दात बिघडल्याने अन्न नीट न चावताच पोटात ढकलले जाते. पोटात ते नीट पचत नाही. हे न पचलेले अन्न आतड्यांत पडून कुजू लागते व आतड्याचे रोग होतात. जुलाब होतात किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. शरीर सुकू लागते. दात किडल्.याने त्याच्या कडा वेड्यावाकड्या व धारदार होतात. त्यावर जीभ घासली गेली की जिभेला चरे पडतात. पुढेपुढे त्यामुळे जिभेचा कँसर होण्याची शक्यता असते. दातांतील हा विषारी पू गळ्यातील गाठीवरून सारखा वाहत राहिल्याने त्या भागावर सूज येऊ लागते. कधीकधी ही सूज इतकी वाढते की शस्त्रक्रिया करावी लागते. पू फुफ्फुसात गेला की त्यामुळे खोकला होण्याचा संभव असतो. रक्तात हे जंतू शिरले की त्यांचा प्रसार सर्व शरीरात होतो व अपेंडिसायटीस, गुदद्वाराची दुखणी, संधीवात, डोकेदुखी, झोप नाहीशी होणे… इत्यादी विकार होऊ शकतात.

दातांची स्वच्छता व निगा ः
* दात साफ करण्यासाठी बाभूळ, कडूनिंब किंवा वडाच्या काड्या वापरणे उत्तम. त्यांच्या सालीतील तुरट व कडू रसाने दातातील जंतूंचा नाश होतो. ब्रश वापरायचा झाल्यास तो मऊ असावा. नवा ब्रश मिठाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावा.
* बोटांनी दात घासणे चांगले पण नखे वाढलेली नसावीत. दात घासताना खाली-वर-आत-बाहेर अशा प्रकारे घासावेत.
* बाजारात मिळणारी असंख्य दंतमंजने किंवा पेस्ट वापरणे हितावह नाही. पेस्टमध्ये असलेले ग्लिसरीन दातांवर पातळ थर पसरवते. या थरावर अन्नाचे कण चिकटून राहण्याचा संभव असतो. काही काळाने हे कण सडतात व तोंडाला घाण वास येऊ लागतो.
सोपे पण महत्त्वाचे….
– दात कोरू नयेत.
– रोज सकाळी व रात्री दात घासावेत.
– नाश्ता, जेवण, पेये घेतल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या.
– बिछान्यात चहा पिऊ नये(बेड टी).
– फार गरम अथवा गार वस्तू खाऊ किंवा पिऊ नये.
– पौष्टीक आहार घ्यावा व पोट साफ असावे.
– मुठभर तीळ रोज चावून खावेत.
– खारीक, खोबरं, काकडी, गाजर असे कठीण पदार्थ चावून खावेत.
– तेलात थोडे पाणी घालून ते तोंडात काहीवेळ धरून ठेवावे.
– तेलात बोट बुडवून दातावर घासावे.
– गर्भवती स्त्रीने रोजच्या आहारात दूध, अंजीर वगैरे कॅल्शियम व लोह असलेल्या वस्तू खाव्या.
– पान, तंबाखू, सुपारी, जर्दा, बिडी, सिगारेट, दारू इ. व्यसनांचा त्याग करावा.
– रात्री दात घासणे आवश्यक आहे. झोपल्यावर तोंड बंद असल्याने तोंडात शुद्ध हवेची ये-जा होत नाही. दातातील अन्नाचे कण सडतात. तोंडाला घाण येते. झोप लागत नाही. त्यामुळे सकाळी उठतानाच डोके जड होते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासून झोपावे.

कृत्रिम दात
कृत्रिम दातांमुळे हिरड्यांचा व जबड्याचा आकार पूर्ववत राहतो. न चावलेले व लाळ न मिसळलेले अन्न पोटात जात नाही. कृत्रिम दात न लावल्यास जबड्याचे स्नायू बेडौल होऊन चेहर्‍याचा घाट बदलतो. कृत्रिम दातांमुळे काही वेळा त्रास होतो. पण ते लावायचे बंद करू नयेत. रात्री कवळी काढून स्वच्छ करून ठेवावी. साबण, पापडखार याने साफ करावी. वर्षातून एकदा दंतवैद्याकडून तपासून घ्यावी.