संस्कार गुरुपौर्णिमेचा

0
300

– प्रा. रमेश सप्रे

गुरुपौर्णिमा हा गुरू-शिष्य दोघांचाही आनंदसोहळा आहे. गुरूचा शिष्याबद्दल आत्मविश्‍वास नि शिष्याची गुरूविषयी कृतज्ञता दोन्हीही या प्रसंगी व्यक्त होतात. एका अर्थानं तो समसमा संयोग असतो. वसंत ऋतूत आम्रवृक्षावर कोकिळानं पंचम सुरात आर्त गीत गावं तसा योग असतो गुरुपौर्णिमा. यात कृत्रिम देखाव्यापेक्षा सहजभाव मात्र असायला हवा.

 

एक प्रसंग. स्थळ- उच्च माध्यमिक विद्यालय. प्राचार्यांचा अत्याधुनिक यंत्रं व यंत्रणांनी सुसज्ज असा कक्ष. नुकत्याच संपलेल्या कार्यक्रमाबद्दल आमंत्रित वक्त्यांशी चर्चा. खरं तर वाद.
प्राचार्य म्हणतात ः ‘‘गुरुपौर्णिमा या विषयावर फक्त ऐतिहासिक नि सामाजिक दृष्टीनंच बोलायला हवं. उगीच सांस्कृतिक-आध्यात्मिक दृष्टिकोन कशाला मांडायचा? या वयात युवकांची मनं आणि मतं दोन्हीही घडत असतात.’’
अतिशय गंभीरपणे मांडलेल्या विचारावर आता वक्ता काय बोलतो इकडे उपस्थित अध्यापक नि कार्यक्रमाची जबाबदारी असलेले विद्यार्थिप्रतिनिधी यांचं लक्ष. शांतपणे वक्तामहोदय उद्गारले, ‘‘अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. युवावर्गाची मनं जीवनाच्या या कालखंडात- म्हणजे अरुणावस्थेत (टीन एजेस)- अतिशय संवेदनक्षम असतात. म्हणूनच त्यांना ऐतिहासिक माहितीबरोबर सांस्कृतिक पैलूची नि सामाजिक माहितीबरोबर आध्यात्मिक पैलूची जाणीव करून द्यायला हवी. आता ‘गुरुपौर्णिमे’चा विचार करायचा झाला तर पौर्णिमेबद्दल भौगोलिक, नैसर्गिक, सामाजिक माहिती देता येईल, पण ‘गुरू’ ही संकल्पना काय फक्त ऐतिहासिक आहे? ‘गुरू’ला सांस्कृतिक- आध्यात्मिक वलय नसतं? दुर्दैवानं आज हे वलय नष्ट व्हायला लागलंय. गुरूचा बनलाय शिक्षक. इतर व्यावसायिक किंवा कर्मचारी यांच्याप्रमाणे शिक्षकही बनलाय एक व्यावसायिक नि कर्मचारी. गमतीनं म्हणायचं तर गुरुपौर्णिमा उत्सव हे एक फॅशनेबल कर्मकांड बनलंय. प्रत्यक्षात साजरी केली जाते ती ‘शिक्षक-पंचदशी’ (चतुर्दशीनंतर येणारी तिथी) आणि त्यातही उत्सव कमी नि इव्हेंट अधिक अशी परिस्थिती झालीय.’’
उपस्थित सर्वजण थोडेसे अंतर्मुख झाले नि विचार करू लागले… इतक्यात त्याच विद्यालयाच्या माध्यमिक विभागाची प्रार्थना (प्रेयर असेंब्ली) सुरू झाली…
‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा…’
खरंच आहे, गुरू काय फक्त माहिती देणारी व्यक्ती असते, जी वेतन घेते अन् शिकवते? ज्ञानाचा वसा म्हणजे व्रत. परंपरा पुढच्या पिढीला देणं, आपल्या जीवनातून- आचरणातून उमलत्या मुलांपुढे जिवंत आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी कुणाची? घरचे पालक हे अत्यंत अनौपचारिक शिक्षक (इन्‌फॉर्मल टिचर्स) असतात, तर दारचे नेते अतिशय अप्रत्यक्ष असे दूरचे शिक्षक (रिमोट टिचर्स) असतात. रोजचे निरनिराळ्या शिक्षणस्तरांवर भेटणारे शिक्षक हेच खरे विद्यार्थ्यांचे जवळचे आदर्श (रोल मॉडेल्स) असतात. त्यांनी स्वतः ज्ञानदानाचं वाण (व्रत) स्वीकारून चालत आलेला सांस्कृतिक वारसा मुलांना आणि युवकांना द्यायला नको का? असो.
हे सारं सांगायचं कारण- ‘गुरुपौर्णिमा’ या शब्दात ‘गुरू’ अधिक महत्त्वाचा आहे. पौर्णिमा काय दर महिन्याला येतेच. अगदी अधिक मासालासुद्धा पौर्णिमा असतेच.
सहज विचार मनात आला- गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंतानं आपल्या विभूती सांगितल्यायत. जशा- नद्यांत मी गंगा, पर्वतांत हिमालय, अक्षरांत ‘अ’, मंत्रांत ‘ॐ’, ऋषींच्यात भृगू तर मुनींच्यात कपिल इ. इ. भगवंतानं जर तिथीतली आपली विभूती (म्हणजे दिव्यत्वाची प्रचीती) सांगितली असती तर या शब्दांत वर्णन केली असती-
‘‘अर्जुना, महिन्याच्या सर्व तिथीत मी असतोच रे, पण ‘पौर्णिमे’त मी सर्वात अधिक असतो. माझं तेजाळ वैभव पुनवेच्या रात्री ओसंडून वाहत असतं.’’
म्हणूनच ‘गुरुपौर्णिमा’ ही संकल्पना प्रचलित झाली. परमेश्‍वराचं गुरूरूपातलं सान्निध्य नि अस्तित्व अनुभवण्याचा दिवस (किंवा रात्र) म्हणजे गुरुपौर्णिमा!
आपल्या संस्कृतीची काही खास वैशिष्ट्यं आहेत. त्यातलं एक तेजस्वी वैशिष्ट्य म्हणजे आजही जीवनाच्या- ज्ञानाच्या, कौशल्याच्या- अनेक क्षेत्रांत अस्तित्वात असलेली गुरू-शिष्य परंपरा. हजारो वर्षांपूर्वी अनुभवी ऋषिमुनींकडून समाधी अवस्थेत उच्चारले गेलेले मंत्र, गायली गेलेली सूक्तं आणि व्यक्त झालेलं ज्ञान म्हणजे वेद, हे सारं आजही आपल्यासाठी उपलब्ध आहे. याचं कारण म्हणजे, ही अखंड सुरू राहिलेली गुरू-शिष्य परंपरा. प्रथम मौखिक- नंतर लिखित अन् नंतर मुद्रित स्वरूपात हे सारं ज्ञान आपल्यापर्यंत आलंय. हा तो वारसा जो पुढे चालवायचा म्हणजे भावी पिढ्यांपर्यंत पोचवण्याचा वसा आपण घेतला पाहिजे.
गुरू-शिष्यांच्या काळाच्या ओघात टिकून राहिलेल्या अनेक जोड्या आहेत. धौम्य ऋषी म्हटले की आपल्याला अरुणी आठवतो. उद्दालक, अंगीरस, वसिष्ठ, वैशंपायन असे कितीतरी साक्षात परब्रह्माचे अवतार वाटणारे गुरू होऊन गेले आहेत. त्यांचे सत्यकाम, जाबाली, कौत्स, उपमन्यू असे महान शिष्य झाले जे काळाच्या ओघात स्वतः अत्यंत श्रेष्ठ असे गुरू बनले. गुरू-शिष्य परंपरा ही ज्ञान-विद्या-कला यांची परंपरा आहे.
गुरुपौर्णिमा हा या गुरू-शिष्य नात्याला संजीवनी व झळाळी आणण्यासाठी साजरा करावयाचा उत्सव आहे. अलीकडच्या काळातही श्रीरामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद; ऍन सलिव्हन व त्यांची मूकबधीर अंध शिष्या हेलन केलर हे गुरू-शिष्यच होते. केवळ शिक्षक-विद्यार्थी एवढं औपचारिक नातं या दोघींच्यात नव्हतं.
गुरुपौर्णिमा आषाढातच का साजरी केली जाते? तसं पाहिलं तर प्रत्येक पौर्णिमेचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहेच. एक चिंतन यासंदर्भात चांगलं आहे.
‘गुरू’ ही व्यक्ती नसून शक्ती असते. शक्ती ही दिसत नाही पण सर्वत्र तिचाच विलास दिसून येतो. ‘अभिनव वाक्‌विलासिनी’ असं वर्णन केलेली शारदाशक्तीही अशीच असते. आषाढातल्या पौर्णिमेला चंद्रबिंब क्वचितच दिसतं. आकाशात नुकत्याच सुरू झालेल्या पावसाच्या ढगांची गर्दी असते. चंद्रदर्शनासाठी आकाश निरभ्र असणं चांगलं. जे सर्वात सुंदर असतं कोजागरी पौर्णिमेच्या रात्री. म्हणून आकाशात असूनही न दिसणारा आषाढी पौर्णिमेचा चंद्र हा सूक्ष्म स्वरूपातल्या गुरूचं प्रतीक बनला. खरं तर गुरूच असतो सूर्य नि गुरूच असतो चंद्र! ज्ञान- विचार- बुद्धी यांचं प्रतीक असलेला सूर्य नि भावना- भक्ती- प्रेम अशा रसांचं प्रतीक असलेला चंद्र. पूर्वी मुलं शिक्षणासाठी गुरूकुलात राहत. अनेक वर्षं हे शिक्षण सुरू राही. गुरूगृही आलेल्या बालकाचा पुढे युवक बनत असे. अशा परिस्थितीत मुलांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी अर्थातच गुरूंवर असे; आणि त्याकाळातले गुरू ही जबाबदारी यशस्वीरीत्या पारही पाडत.
एके ठिकाणी उल्लेख आहे की शैक्षणिक वर्ष गुरुपूजनानं आषाढी पौर्णिमेला संपत असे म्हणून ती बनली गुरुपौर्णिमा. एका महिन्याच्या अवकाशानंतर (व्हेकेशन) नवं वर्ष सुरू होई ते श्रावणी पौर्णिमेला. या दिवशी गुरू आपल्या ज्ञानपरंपरेचं सूत्र शिष्याच्या मनगटावर बांधून ते सूत्र म्हणजे ती परंपरा चालू ठेवण्याची प्रेरणा देत असत. यामुळे श्रावणी पौर्णिमेला आपण सूत्रपौर्णिमा (सुतांपुनव) म्हणतो. अजूनही संगीत, कुस्ती अशा क्षेत्रांत अशी गंडा बांधण्याची प्रथा आहे. शिष्य यावेळी गुरूशी, परंपरेशी, ज्ञानाशी एकनिष्ठ राहीन अशी शपथ घेतो. त्यानुसार प्रयत्न करत राहतो.
यासंदर्भात एक मार्मिक प्रसंग सांगण्यासारखा आहे. एका नामवंत गायिकेला दूरदर्शनवरून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कार्यक्रम सादर करायचा होता. तिने आपल्या गुरूंना बोलावलं व त्यांची साग्रसंगीत पूजा करून गायनाला आरंभ करण्यापूर्वी गुरूंचे आशीर्वाद घेण्याचा मानस व्यक्त केला. पण निधर्मी दूरदर्शनच्या अधिकार्‍यांनी अशी पूजा करण्यास मनाई केली. यावर त्या गायिकेनं अतिशय नम्रतेनं कार्यक्रम सादर करण्यास नकार दिला. नंतर मान्यता मिळाल्यावर तिनं भावपूर्ण अंतःकरणानं सद्गुरूंची पूजा केली व गायनास सुरुवात केली. सारेजण या गुरुभक्तीच्या साक्षात दर्शनानं भारावून गेले.
गुरुपौर्णिमा हा असा गुरू-शिष्य दोघांचाही आनंदसोहळा आहे. गुरूचा शिष्याबद्दल आत्मविश्‍वास नि शिष्याची गुरूविषयी कृतज्ञता दोन्हीही या प्रसंगी व्यक्त होतात. एका अर्थानं तो समसमा संयोग असतो. वसंत ऋतूत आम्रवृक्षावर कोकिळानं पंचम सुरात आर्त गीत गावं तसा योग असतो गुरुपौर्णिमा. यात कृत्रिम देखाव्यापेक्षा सहजभाव मात्र असायला हवा.
गुरूपौर्णिमेला ‘व्यासपौर्णिमा’ असंही म्हणतात. याचं कारण उघड आहे. महर्षी वेद व्यासांना त्यांच्या कार्यामुळे नि विपुल साहित्यामुळे आदिगुरू म्हटलं जातं. या दिवशी गुरुपूजनाचा जो विधी असतो त्यात व्यासांचं पूजन करायचं असतं. आपले सद्गुरू देहात असोत-नसोत पण व्यासांना अग्रस्थान व अग्रमान द्यायचा असतो. त्याचप्रमाणे आपण परंपरेनं ज्यांना परात्पर म्हणजे सर्वश्रेष्ठ गुरू मानतो त्या दत्तात्रेयांची पूजाही करायची असते. ‘कृष्णं वंदे जगद्गुरूम्‌|’ अशी आपली श्रद्धा असते. म्हणून या गुरूपूजनात श्रीकृष्णाचा समावेश करायला हरकत नसावी. नाहीतरी गीता हा भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून सहज बाहेर पडलेला विश्‍वग्रंथ आहेच. तेव्हा गुरूपूजनात श्रीकृष्णाचा अंतर्भाव असावा. याशिवाय ज्या आद्य शंकराचार्यांनी गीता- उपनिषदं यांच्यावर भाष्यग्रंथ लिहून व अनेक देवदेवतांची मधुर स्तोत्रं रचून स्वतः जगद्गुरूंचं स्थान प्राप्त केलं, म्हणून गुरुपौर्णिमेला त्यांचंही स्मरण-पूजन करायला हरकत नाही. याच्या जोडीला सर्वांच्या अंतःकरणात स्फुरणरूपात गुरुतत्त्व असतं, ज्याला आत्मगुरू म्हणतात. याची जाणीव आतून होते. यालाच ‘गुप्तरूप’ म्हणजे गुरू असं म्हणतात.
ज्ञानोबा माऊलीच्या शब्दांत-
‘मज हृदयी सद्गुरु| जेणे तारिलो हा संसारपूरू|
म्हणौनि विशेषे अत्यादरू| विवेकावरी॥
गुरुपौर्णिमेला गुरुपंचायतन पूजा करायला हरकत नाही. वरच्या एका बाजूला सद्गुरू (स्वामी समर्थ, साईबाबा किंवा जे कोणी आपले सद्गुरू असतील ते- त्यांची प्रतिमा); दुसर्‍या बाजूला भगवान श्रीगोपालकृष्ण- कृष्णं वंदे जगद्गुरूम्; खाली एका बाजूला आद्य शंकराचार्य- कारण ते ज्ञान- विवेक या दृष्टीनं जगद्गुरू; खाली दुसर्‍या बाजूला व्यासमहर्षी- आदिगुरू आणि मध्ये रिकामी जागा- अवकाश, तेथे एक दीप ठेवून ‘आत्मदीपो भव’ याचं स्मरण करत या गुरुपंचायतनाची पूजा करायची. दीपाच्या प्रकाशात उजळलेल्या गुरुप्रतिमा पाहत शांतपणे ध्यान करत मानसपूजा केल्यास खूप समाधान मिळतं. ज्यांना देहातले (जिवंत किंवा आता देहात नसलेले… साईबाबांसारखे) गुरू नाहीत त्यांनी त्यांच्या प्रतिमेच्या ठिकाणी दत्तगुरूंची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवायला हरकत नाही. सामूहिक उपासनेच्या वेळीही अशी मांडणी करून गुरूपंचायतन-पूजन करता येईल. गुरुपौर्णिमा हा मुख्यतः गुरुपूजनाचा व मन पूर्णपणे गुरुभावानं भरून जाण्याचा दिवस आहे.
आता गुरुपौर्णिमेच्या पौराणिक संदर्भाविषयी- काहींच्या मते ऋषी पराशर व सत्यवती यांचा पुत्र व्यास जो पुढे महर्षी वेद व्यास म्हणून प्रसिद्ध झाला त्याचा जन्म आषाढी पौर्णिमेला झाला म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
आणखी एक कथा गुरुपौर्णिमेला जोडलेली आहे. सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वी एक योगी हिमालयात तपश्‍चर्येसाठी आला. तो समाधिस्त अवस्थेत दीर्घकाळ बसून राहिला. त्या भागातल्या लोकांसाठी त्याचं आगमन व तपश्‍चर्या खूप भाग्याची, आनंदाचा योग ठरली. पण त्याने अनेक वर्षे डोळे काही उघडले नाहीत. इतर लोक काही दिवसांनी आपापल्या जीवनात गढून गेले. पण सात साधक मात्र त्याची सेवा करत, प्रतीक्षा करत राहिले. अखेर त्या योग्यानं त्या सात साधकांवर कृपा करून त्यांना योगाचं ज्ञान दिलं. त्या दिवसापासून तो आदियोगी सर्वांचा आदिगुरू बनला आणि ते सात साधक-शिष्य बनले सप्तर्षी. तो पवित्र दिवस आषाढ मासातील पौर्णिमा हाच होता. तेव्हापासून गुरुपौर्णिमा साजरी होऊ लागली. असो.
गुरुपौर्णिमा हा केवळ एक उत्सव, समारंभ किंवा सोहळा नाही. तो एक संस्कार आहे. त्यात उपचार, विधी तेवढे महत्त्वाचे नाहीत जेवढा गुरूच्या व्यक्त (प्रत्यक्ष) किंवा अव्यक्त (अप्रत्यक्ष किंवा अमूर्त) सान्निध्याचा, सत्संगाचा उदात्त अनुभव महत्त्वाचा आहे.
‘कुलार्णव तंत्र’ नावाच्या ग्रंथात गुरूच्या संदर्भात देवी सरस्वतीला केलेली प्रार्थना आहे ः
– हे देवी, प्रत्येक गृहात ज्याप्रमाणे दीप असतात तसे गुरू अनेक आढळतात; पण सूर्य जसा सर्व दीपांना उजळतो त्या सूर्यासारखा स्वयंप्रकाशित गुरू विरळाच!
– हे देवी, वेदज्ञानात पारंगत असलेले विद्वान, व्यासंगी गुरू अनेक आढळतात; पण अंतिम सत्याचा अनुभव घेतलेला आत्मसाक्षात्कारी गुरू विरळाच!
– हे देवी, आपल्या शिष्यांकडून गुरुदक्षिणा घेऊन त्यांना ज्ञान देणारे गुरू अनेक आढळतात; पण शिष्यांचं सर्व दुःख हरण करून त्यांना आनंदाचा अमृतानुभव देणारा गुरू विरळाच!
अशा प्रकारे आत्मज्ञान झालेला गुरूच खरा पूजा स्वीकारण्याचा अधिकारी असतो. त्याला पूर्णभावानं अनन्य शरण जाण्यात व त्यानं दाखवलेल्या मुक्तिमार्गावरून वाटचाल करण्यातच मानवी जीवनाची धन्यता आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण संकल्प करूया की आदिगुरू जो अखंड तेवणार्‍या नंदादीपाप्रमाणे आपल्या आत राहून आपलं सारं जीवन उजळून टाकत आहे, त्याच्या मार्गदर्शनानुसार म्हणजेच अंतःप्रेरणेनं वागून आनंदाचा अक्षय अनुभव घेऊया. यासाठी संत सोहिरोबांचं सांगणं मोलाचं आहे ः
अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे…
अनुभवावीण मान हालवू नको रे…
अशा ‘अनुभवासाठी’ अंतरंगीची उपासनाच महत्त्वाची आहे. बाहेरची पूजाअर्चा करूयाच, पण एकांतात मौन- वाचन- श्रवण- मनन- ध्यान- नामस्मरण अशी आत… आत… अगदी आत नेणारी सूक्ष्म उपासनाही करूया. आत आहे उदंड उसळणारा आनंद… कधीही न काजळणारा, मावळणारा दिव्य प्रकाश. हेच खरं गुरूचं स्वरूप आहे… कार्य आहे.
‘गु’ म्हणजे अंधःकार अन् ‘रू’ म्हणजे दूर करणारा…. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना अशा गुरुलाच करायची असते. कारण त्याची महतीच (महिमा तशी आहे ना?)-
‘गु’शब्दस्त्वंधकारः स्यात ‘रु’शब्दस्तन्निरोधकः|
अंधकारनिरोधित्वात् ‘गुरु’रित्यभिधीयते॥
॥ तस्मै श्री गुरवे नमः ॥