‘आप’ गोव्यात ४० पैकी ३५ जागा जिंकेल ः केजरीवाल

0
95

>>जनतेच्या आशा – आकांक्षा पूर्ण करण्याची ग्वाही

 

आम आदमी पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून हे गोरगरीबांचे आंदोलन आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत दिल्लीची पुनरावृत्ती घडवीत गोव्यात ४० पैकी ३५ जागा जिंकून आम्ही जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर राहू. यापुढे कोणाचे घर तोडू दिले जाणार नाही, कोणाची रोजीरोटी हिसकावली जाणार नाही, असे अभिवचन दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते श्री. अरविंद केजरीवाल यांनी येथे काल दिले.

काल दुपारी श्री. केजरीवाल यांचे गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते खारीवाडा – वास्को येथील मच्छीमारांच्या समस्या ऐकण्यासाठी क्रिस्तिदियो फर्नांडिस यांच्या घरी आले. तेथे त्यांनी स्थानिक मच्छीमारांशी व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत गोवा रापणकारांचे अध्यक्ष वेनान्सियो सॅम्युअल व आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. केजरीवाल म्हणाले की, भाजपा आणि कॉंग्रेस ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्ष मिळून – मिसळून जनतेशी स्पर्धा करीत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. भारतीय जनता पक्षाने गोरगरिबांची रोजीरोटी हिसकावून घेतली आहे. ड्रेजिंग करून मच्छीमारांची छळणूक चालवून त्यांची रोजीरोटी काढून घेण्याचा प्रयत्न भाजप सरकारने चालवलेला आहे. यापुढे आम आदमी पार्टी गरीबांवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी गोव्याची संस्कृती नष्ट करून टाकली आहे. ही संस्कृती टिकवून ठेवण्याची जबाबदारी आम आदमी पक्षाने आपल्या खांद्यावर घेतली असून दोन्ही पक्षांनी चालवलेली स्पर्धा निकाली काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी गोव्याची जनता प्रामाणिकपणे आपली मते ‘आप’च्या पारड्यातच टाकील असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
यावेळी ओल्ड क्रॉस मासळी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष श्री. क्रिस्तिडिओ फर्नांडिस यांनी श्री. केजरीवाल यांचे स्वागत केले व मच्छीमारांच्या चाललेल्या छळणुकीचा पाढा त्यांच्यापुढे वाचला.

भाजप व कॉंग्रेस पक्षाला निवडणुकीत अद्दल घडवा
‘आप’ राजकारण करण्यासाठी नव्हे, तर राजकारण बदलण्यासाठी स्थापन झाला आहे. भाजप व कॉंग्रेसमुळे सामान्य गोमंतकीय जनता भरडली जात असून पुढील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला सत्तेवर आणून या दोन्ही पक्षांना अद्दल घडवा असे आवाहन आपचे ज्येष्ठ नेते अरविंद केजरीवाल यांनी काल वास्को येथे मच्छीमारांच्या सभेत बोलताना करताना केले. वास्को येथील रेल्वेच्या सभागृहात आयोजित सभेला कार्यकर्ते व मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मच्छीमारांचे प्रश्‍न सोडवू
मच्छीमार वाचले तरच गोवा वाचेल असे सांगून आप सत्तेवर आल्यास मच्छीमारांच्या समस्यांचे निवारण करण्यात येईल असे अभिवचन केजरीवाल यांनी यावेळी दिले. मच्छीमारांच्या घरांचे सर्व्हेक्षण करून त्यांच्या घरांना संरक्षण दिले जाईल. त्यांच्या रोजीरोटीवर गदा येणार नाही याची काळजी आप घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. एमपीटी ड्रेजिंग करून मच्छीमारांच्या पोटावर पाय ठेवण्याचे प्रयत्न करीत असून ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. आप सत्तेवर आल्यास येथील जनतेला विश्‍वासात घेऊनच विकास प्रकल्पांना मान्यता दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य व केंद्रातील भाजप सरकारने मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून मच्छीमारांच्या पोटावर पाय ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. या कटाविरुद्ध मच्छीमार बांधवांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली असून या लढ्याला आपचा खंबीर पाठिंबा असेल. मच्छीमारांची बाजू मांडण्यासाठी चांगल्या वकिलाची नियुक्ती करण्यात येईल असे आश्‍वासन केजरीवाल यांनी दिले. या सभेत किस्तोदा डिसौझा, नबार पागी, ओलांसियो सिमॉईश, पंढरी केरकर, भीम पेडणेकर, कारीदाद परेरा या मच्छीमारांनी व्यथा मांडल्या. विविध भागातील मच्छीमार या सभेला उपस्थित होते.