पुन्हा केजरीवाल

0
126

दिल्लीनंतर पंजाबप्रमाणे गोव्याला आपली प्रयोगभूमी बनवून येथील राजकीय पर्यायाची पोकळी भरून काढण्याच्या धडपडीत अरविंद केजरीवाल अल्पावधीत पुन्हा एकवार गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या मागील सभेद्वारे दोन लाख गोमंतकीयांपर्यंत पोहोचल्याचा दावा ‘आम आदमी पक्षा’ने केला होता. अशा प्रकारचा जनाधार या पक्षाला खरोखरच मिळालेला आहे असे मानण्याजोगी स्थिती सध्या तरी दृश्य स्वरूपात नाही. परंतु आपला संभाव्य मतदार कोण असेल आणि त्याच्यापर्यंत कसे पोहोचायचे याची अचूक नाडी केजरीवालांच्या स्थानिक बुद्धिवादी सहकार्‍यांना गवसलेली आहे. त्यामुळे जे कॉंग्रेसला कळले नाही, कळले तरी प्रत्यक्षात उतरले नाही, ते करायला आता केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष निघालेला दिसतो. केजरीवालांचा सध्याचा गोवा दौरा पाहिला तर तो अत्यंत विचारपूर्वक आखलेला आहे असे दिसेल. त्यांच्या यापूर्वीच्या पहिल्या सभेने केजरीवाल आणि त्यांचा पक्ष आता गोव्यात उतरले आहेत हा संदेश घरोघरी गेला. आता दुसर्‍या टप्प्यात पुन्हा भव्य दिव्य कार्यक्रमाचा घाट न घालता विशिष्ट गटांना भेटून त्यांना जवळ आणण्याची धडपड ‘आप’ करू पाहतो आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची तमाही त्यांनी बाळगलेली नाही, कारण विधानसभा निवडणूक सर करण्यासाठी तयारी करायला वेळ अत्यंत थोडा आहे याची त्यांना जाणीव आहे. विद्यमान सरकारविरुद्ध रान पेटवायचे असेल तर कामाचा, जनसंपर्काचा वेगवान धडाका हवा हे केजरीवाल जाणून आहेत. ते काल गोव्यात उतरल्यावर पहिल्यांदा भेटले ते दक्षिण गोव्यातील मच्छीमारांना. त्यांच्या प्रश्नांची दखल घेत त्यांना आपल्या पक्षाच्या रूपाने राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वास्कोतील कालच्या सभा – बैठकांमधून केजरीवालांनी जे मुद्दे उपस्थित केले ते स्थानिक मुद्दे असले तरी तमाम मच्छीमार, रापणकारांच्या जिव्हाळ्याचे आहेत. आपल्या भाषणात केजरीवालांनी आपले सरकार आल्यास कोणाचे घर तोडू दिले जाणार नसल्याची गर्जना केली आणि कोणाची रोजीरोटी हिसकावू दिली जाणार नसल्याचेही ते गरजले. बायणातील बेकायदा घरे पाडण्याच्या अलीकडच्या कारवाईचा आणि मुरगाव बंदराची खोली वाढवण्याच्या केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरींच्या निर्णयाचा संदर्भ या विधानांना आहे. खारीवाड्यावरील मच्छीमारांचे हित मुरगाव बंदरात मोठी जहाजे येण्यापेक्षा महत्त्वाचे आहे अशी ही ‘आप’ची एकंदर भूमिका आहे. म्हणजेच धनदांडग्यांपेक्षा श्रमिकांची कड घेणारा आपला पक्ष आहे हा संदेश ते या आपल्या भेटीतून देऊ इच्छित होते हे लक्षात घ्यायला हवे. आजचा त्यांचा गोव्यातील कार्यक्रमही असाच काळजीपूर्वक आखलेला आहे. आज ते किनारपट्टीतील पर्यटन उद्योगाशी संबंधित छोट्या घटकांना भेटणार आहेत. त्यानंतर फोंड्यात युवकांचा मेळावा घेणार आहेत. परिवर्तनासाठी गोव्यात सध्या सर्वांत सक्रिय राजकीय पर्याय ‘आप’च आहे असे चित्र निर्माण करण्याची ही धडपड आहे. ‘आप’च्या या झंझावाताने इतर राजकीय पक्षांची झोप नक्कीच उडाली आहे. गेली चार वर्षे झोपलेली कॉंग्रेस अचानक खडबडून जागी झाली. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असल्याचा साक्षात्कार घडलेले कॉंग्रेसजन पणजीच्या बाजारात फिरू लागले. आजवर हवेतच वावरणारे भाजपाचे लोक जमिनीवर आले. जोरात पुढे सरसावलेला गोवा फॉरवर्ड कधी पिछाडीवर गेला कळलेही नाही. आम आदमी पक्ष गोव्यात नवखा असला तरी त्याच्याकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले आहे हे नमूद करायलाच हवे. दिल्लीची पुनरावृत्ती गोव्यात करू असे केजरीवाल गर्जले आहेत. परंतु दिल्लीतली नौटंकीही ते गोव्यात करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. सतत नकारात्मक, रस्त्यावरचे राजकारण जनतेला रुचत नाही हे केजरीवालांनी लक्षात घ्यायला हवे. तेवढी वैचारिक परिपक्वता दाखवायला हवी. दिल्लीत केजरीवालांच्या सरकारने अनेक चांगली कामे भली केली असतील, परंतु जनतेला पुन्हा पुन्हा दिसते ती रस्त्यावरची नौटंकी. हे टाळले असते तर या पक्षाची स्वीकारार्हता कितीतरी पटींनी वाढली असती. अजूनही हा पक्ष मूठभर बुद्धिवाद्यांच्या आणि एनजीओंच्या कोंडाळ्यात अडकलेला दिसतो आहे. त्यातून बाहेर पडल्याविना येथे व्यापक जनाधार मिळणार नाही. ‘अम्मा’ शैलीची भंपक स्वकेंद्रित जाहिरातबाजीही केजरीवालांनी त्वरित थांबवायला हवी. राजकीय पर्यायाची पोकळी येथे जरूर आहे. ‘आप’ ची पुढील पावले काळजीपूर्वक पडली, स्वतःविषयीचा विश्वास ते निर्माण करू शकले तर प्रस्थापित व्यवस्थेवर नाराज मतदार ‘आप’कडे वळू शकतो. इतरांना हादरे देऊ शकतो!