हृदयरोगाची सुरुवातच नको!

0
102

– सौ. मोहिनी सप्रे

रोग, आजारपणापासून दूर रहायचे असेल तर कामात मग्न रहा. आपल्या आवडीचे काम करा. जसे- लेखन, लहान मुलांना शिकवणे, भरतकाम, कागदाची फुले करणे, चित्रकला, विणकाम, एखाद्या मंत्राचे लिखाण यांपैकी जे आवडेल ते करा. रोगाची भीति मनातून काढून टाका.

त्यासाठी असे करावे….
१) रुधिराभिसरणात शिथीलता अथवा अवरोध झाल्याने हृदयरोग होतो. रक्त व्यवस्थित फिरत रहावे यासाठी व्यायाम, स्नायूंना हालचाल होईल… अशा क्रिया करणे आवश्यक आहे. वय व शक्तीप्रमाणे झेपेल असा व्यायाम करावा. तरुण असाल तर जास्त व्यायाम करा. प्रौढावस्थेत आसने व संथ गतीने धावणे अशा प्रकारचे व्यायाम करा.
वृद्ध व्यक्तींनी मोकळ्या हवेत चालण्याचा व्यायाम करावा.

२) रुधिराभिसरण वेगाने होण्यासाठी मसाज व तेलाने मालीश फायदेकारक आहे. हृदय व रक्तवाहिन्या यांना मालीशमुळे हालचालींचा व्यायाम होतो. आकुंचन, प्रसरण व दाब अशा मालिशने हृदयास स्फूर्ती व जोम यांचा लाभ होतो. रक्ताभिसरणाची क्रिया हृदय उत्तम रीतीने पार पाडून शरीराला आरोग्य देते.

३) हलका व साधा आहार घ्या. जास्त ऊर्जा असलेला तेलकट आहार रक्तात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवून रक्ताभिसरणात विक्षेप उत्पन्न करतो. म्हणून साधा, हलका, सुपाच्य आहार घ्या. मांसाहार करू नका. वय, पचनशक्ती, शरीराची झीज व श्रमाचे प्रमाण बघून त्याप्रमाणे ऊर्जा मोजून आहार घ्या.

४) स्थितप्रज्ञ व्हा – डोके थंड ठेवा. मन शांत ठेवा. संसाराच्या काळज्यांतच सर्वकाळ बुडू नका. घराची जबाबदारी सामूदायिकरीत्या सर्वांना वाटून द्या. चित्त प्रफुल्लित ठेवा. हसतमुख रहा. सर्वांशी मिळून मिसळून आनंदात रहा. आयुष्यात निरोगी, निकोप व सुखात रहायचे असल्यास आपले विचार सर्वांना रुचतील… असे वळण विचारांना लावा. जीवनाचा दृष्टीकोन बदला. सर्वांच्या सुखात आपले सुख बघा.

५) ध्यानस्थ बसा – ध्यान, धारणा व समाधी यांची सवय करा. ध्यानाची सवय मनाला शांती व वृत्तीला तृप्ती देते. याचा आरोग्याला चांगला फायदा होतो.

६) व्यसनमुक्त रहा – तंबाखूचा हृदयावर फार वाईट परिणाम होतो. तंबाखूतील निकोटीन हे विषारी द्रव्य रक्ताचा दाब वाढवते. धूम्रपान करणार्‍यांच्या नाडीचे ठोके अनियमित असतात व नाडी जोरात चालते. त्यामुळे शरीराला अशक्तपणा येतो. हळुहळू शरीराचे प्राणधारक अवयव अशक्त होतात. कार्यक्षमता गमावतात व हृदयाचे नुकसान करतात.

७) कार्यक्षम रहा – रोग, आजारपणापासून दूर रहायचे असेल तर कामात मग्न रहा. आपल्या आवडीचे काम करा. जसे- लेखन, लहान मुलांना शिकवणे, भरतकाम, कागदाची फुले करणे, चित्रकला, विणकाम, एखाद्या मंत्राचे लिखाण यांपैकी जे आवडेल ते करा. रोगाची भीति मनातून काढून टाका. शरीर म्हणजे मनाचे चित्र. रंगीत रांगोळी आहे. या रांगोळीत स्फूर्ती व आशा यांचा गुलाबी रंग, आनंद-तृप्ती-प्रसन्नता यांचा लाल रंग व शांतीचा पांढरा रंग भरा. ही जीवनाची रांगोळी सर्व सृष्टीत ध्रुव-तार्‍यासारखी झगमगत राहील.
थंड व उष्ण कटीस्नान घ्या. हा रामबाण उपाय आहे. याने रक्ताभिसरण सुधारते.
……………………………….

वाढवा यकृता (लिव्हर)ची कार्यक्षमता…

यकृत हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे.
यकृताचे कार्य – १) रक्तातील काही द्रव्यांपासून यकृताच्या पेशी पित्तरस तयार करतात. हा पित्तरस पचनकार्यात उपयोगी असतो. पित्तरस तयार करताना रक्तातील नष्ट झालेल्या लाल पेशींचाही खूप उपयोग होतो. पित्तरस अविरत तयार होत असतो. पचनक्रियेसाठी आवश्यक नसलेला… ज्यादाचा पित्तरस यकृतात साठवला जातो. या पित्तरसातील क्षार चरबीचे पचन करण्यात व त्याचे शोषण करण्यात मदतरूप होतात. पित्तरस अन्न सडू देत नाही. आतड्यातील स्नायूंना संकोच पावण्याची प्रेरणा देतो व मलोत्सर्जनात मदत करतो.
२) जखम झाल्यास रक्तस्राव बंद करण्यासाठी रक्त साकळण्याच्या क्रियेत यकृत मदत करते.
३) शरीराचे पोषण करण्यात यकृत महत्त्वाची मदत करते. शरीरातील अवयवांना त्यांच्या गरजेप्रमाणे ग्लुकोज पुरविण्याचे कार्य यकृत करते. लहान आतड्यातील शोषून घेतलेली ग्लुकोज-साखर पोटातील रक्तवाहिनीमार्फत यकृतात जाते. यकृत त्यातून ग्लायकोजीन तयार करून साठवून ठेवते. शरीरात शक्ती अथवा गरमीची आवश्यकता उत्पन्न झाली की ग्लायकोजीनचे परत ग्लुकोजमध्ये परिवर्तन करून रक्तामार्फत त्याच्या आवयवाला हे ग्लुकोज यकृत पुरवते. तिथे या ग्लुकोजचे दहन झाल्याने गरमी व शक्ती त्या त्या अवयवाला मिळू शकते. चरबीची मोठ्या प्रमाणातील उलाढाल यकृतात होते. तिथे आलेली चरबी रुपांतरित होऊन वेगवेगळ्या भागात जाते व तिथे जमा होते.
४) यकृत म्हणजे हृदयाचे रक्तभांडार होय.
५) जास्तीच्या लोहाचा (आयर्न) आणि तांब्याचा संग्रह यकृतात असतो.
६) विटामिन ‘ए’ व ‘डी’ यकृतात भरपूर आहे. विटामिन ‘बी’पण बर्‍याच प्रमाणात असते.
७) शरीरातील निरुपयोगी होत असलेल्या पेशींमधील नत्रल (नायट्रोजन) द्रव्यांना यकृतात आणल्यावर यकृत त्यातून युरिया व युरिक ऍसीड तयार करते. त्वचा व मूत्रपिंड यामार्फत त्यांना शरीराबाहेर काढून टाकते.
८) शरीरात रोगाचे विष तयार झाल्यास त्यावर उतारा म्हणून ‘प्रतिविष’ उत्पन्न करते.
९) विषारी पदार्थ यकृतात पोहोचताच यकृत त्याला शोषून घेते. त्यामुळे सर्व शरीरभर विष पसरत नाही. यकृतात उत्पन्न होणारी काही द्रव्ये विषावर रासायनिक क्रिया करून त्याचे निरुपद्रवी द्रव्यात रुपांतर करतात. अशा रीतीने काही विषांचा पूर्ण नाश होतो. काही संग्रहित केली जातात व शरीराला सोसेल अशा थोड्या माफक प्रमाणात ती हळुहळू बाहेर टाकली जातात. संशयास्पद अवस्थेत मरण पावलेल्या व्यक्तीच्या मरणोत्तर तपासणीत एवढ्याकरताच यकृताची तपासणी केली जाते.
शरीरातील मुख्य अवयव म्हणजे जठर, आतडी, मूत्राशय, प्लिहा, कटिबंधाच्या खालचा भाग, पॅन्क्रियाज, मूत्रपिंड इ. यकृताच्या आजुबाजूस आहेत. एखादा प्राणधारक अवयव आजारी झाल्यास सर्वांवर परिणाम होतो. यासाठीच यकृताच्या आजुबाजूला असलेल्या कटिप्रदेशातील सर्व अवयवांना व्यायाम मिळायला पाहिजे. यकृताचा आजार असलेल्यांनी पुढील गोष्टी कराव्यात…
१. थंड पाण्याने भरलेल्या टबात बसावे.
२. ओल्या टॉवेलने कंबरेला मालीश करावी.
३. स्नानानंतर कोरडे घर्षण करावे.
४. सकाळी कोणतेही तेल घेऊन हलक्या हाताने पोटाला मालीश करावी. यकृताचा भाग दाबून थोपटून उत्तेजित करा. तसेच ओटीपोटालाही मालीश करा.