॥ मनःशांतीसाठी संतवाणी ॥ आनंदाचे डोही…

0
471

– प्रा. रमेश सप्रे

आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो. पशुपक्षी वनस्पती यांना या आनंदाची जाणीव नसते. परिचय नसतो. पण मानवाच्या बाबतीत आनंद मिळवणं, आनंदात राहणं, आनंदी असणं – जगणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यासाठी बाहेरचे प्रयत्न नकोत. आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो.

आज ज्येष्ठ वद्य अष्टमी. ‘ज्ञानदेवांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान’ असं दिनदर्शिकेत लिहिलेलं असतं. पालखी निघते पंढरीच्या दिशेनं. लक्ष लक्ष पावलं टाकत. मायबाप विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला. सोबत लक्षावधी वारकरी. जमीनीवरून, आकाशातून पाहून धन्यकृतार्थ होण्याचा हा सोहळा. ‘ग्यानबा – तुकारामा’चा अखंड गजर. ‘माऊली-माऊली’ या शब्दाचा अक्षय घोष. सारे माऊलीच. विठोबा माऊली – ज्ञानोबा माऊली – तुकोबा माऊली – भगवंत माऊली – भक्त माऊली — किती हृद्य भाव हा! यातूनच भक्ती ओथंबत असते. निथळत असते. एकच लक्ष्य – एकच ध्येय – एकच मुक्काम — पंढरीचा विठुराया! असलं देवदुर्लभ दृश्य दुनियेत कुठं असेल? कुंभमेळ्यात याच्यापेक्षा अधिक भक्तगण जमतील पण दिंडी – पालखी – वारीचं वैभव कुठे असतं? ही गर्दी नसते तर संतांची मांदियाळी असते.

वाढत्या संख्येनं परदेशी लोक वारीत सहभागी व्हायला लागलेत. सहा-सहा ‘डीं’चा अनुभव घेऊनही निखळ आनंदापासून, मनःशांतीपासून दूर असलेले हे लोक. आनंदाच्या अनुभवासाठी ‘डिनर – डान्स – ड्रिन्क्स – ड्रग्ज – डाऊनफॉल – डिके – डेथ’ असा प्रवास केल्यावर शेवटी जी थोडी भाग्यवान मंडळी पंढरीच्या वारीत सक्रिय सहभाग घेतात त्यांना एकाच ‘डी’चा अमृतानुभव लाभतो – डिव्हिनिटी म्हणजे दिव्यतेचा. संतांचं हे कृपावंत होऊन दिलेलं वरदान हा भारतीय संस्कृतीचा महान वारसा आहे.
मनःशांतीचा मार्ग मनाकडून – मनातून शांतीकडे जातो. संत हे मनाचे डॉक्टर असतात. त्यांचं मनाच्या अशांतीबद्दलचं निदान (डायग्नॉसिस) अचूक असतं. म्हणूनच मनःशांतीसाठी त्यांनी दिलेली औषधं (प्रिस्क्रिप्शन) नि केलेले उपचार (ट्रीटमेंट) अचूक असतात. त्यासाठी त्यांनी ‘वाणी – लेखणी – राहणी’ या त्रिवेणीचा अवलंब केलेला असतो. त्यांची वाणी दिव्य असते. लेखणी प्रभावी असते नि राहणी अनुसरणीय असते. यातूनच साकारतं त्यांचं अमर साहित्य किंवा वाङ्‌मय.
‘अथर्वशीर्ष’ या स्तोत्रात गणेशाचं वर्णन अप्रतिम शब्दात केलंय- हे गणेशा, ‘त्वं वाङ्‌मयः त्वं चिन्मयः त्वं आनंदमयः त्वं ब्रह्ममयः|’ गणेशाचं वाङ्‌मय स्वरूप हेच चैतन्यमय, आनंदमय अन् ब्रह्ममय आहे. संतांची वाणी हेच त्यांचं मुख्य वाङ्‌मय असतं. मग ती श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने असोत की रामकृष्ण परमहंसांचं ‘वचनामृत’ असो. ही अमृतवाणी ऐकून – वाचून – अर्थ लक्षात घेऊन – मनन चिंतन करत मनःशांती प्राप्त करून घ्यायची. हाच तर आपल्या सहचिंतनाचा मुख्य विषय आहे.
उपासना – साधना – आराधना – तपश्चर्या हे शब्द पारमार्थिक किंवा आध्यात्मिक वाङ्‌मयात वारंवार येतात. प्रत्येक शब्दाची अर्थछटा वेगळी आहे. सर्व मिळून एक छान जीवनशैली बनते, जिच्यात मनःप्रसादाची म्हणजेच मनाच्या शांतप्रसन्न अवस्थेची शाश्‍वती असते.
* उपासना – जवळ (उप) बसणं (आसन) हा सरळ सरळ अर्थ आहे. कुणाच्या जवळ बसायचं? अर्थातच परमेश्‍वराच्या जवळ! म्हणजे कुणाच्या जवळ नि कसं बसायचं? हा देव – ईश्‍वर – परमेश्वर आहे कुठं हे कळल्याशिवाय त्याच्याजवळ कसं बसायचं? परमात्मा – परब्रह्म – परमेश्‍वर एकच आहेत का? असे प्रश्‍न — प्रश्‍न — नि प्रश्‍न!
संतवाणीचा अभ्यास करू लागल्यावर या सर्वांचे अर्थ स्पष्ट समजतात. एवढंच नव्हे तर त्यांचा प्रत्यक्ष अनुभव कसा घ्यायचा याचा राजमार्गही कळतो. थोडक्यात यावर सहचिंतन करु या. परमेश्‍वर ही सदासर्वदा पसरून व्यापून राहिलेली सूक्ष्म शक्ती आहे. चैतन्य आहे. ते अर्थातच दिसत नाही, पण त्याचा अनुभव घेता येतो.
अलीकडच्या काळातले व पू. गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेतले सत्पुरुष गु. बाबा बेलसरे. ‘आनंद साधना’ हे त्यांचे आध्यात्मिक आत्मचरित्र आहे. अप्रतिम पुस्तक अन् तेही छोटं -खिशात मावण्यासारखं. तशी त्यांनी लहानमोठी चाळीसहून अधिक पुस्तकं लिहिली, ज्यात मनःशांतीसाठी उपासनेचं सारं शास्त्र-तंत्र-मंत्र सोप्या व स्पष्ट भाषेत, अलीकडच्या जीवनातील संदर्भ देऊन सांगितलं आहे. आनंदमार्गाच्या उपासकांनी, शांतियात्रेच्या साधकांनी ही पुस्तकं संग्रही ठेवून अभ्यासपूर्वक पुनःपुन्हा वाचली पाहिजेत.
तर ‘आनंद साधना’ या आपल्या शांतिदायी उपासनेच्या यात्रेत आरंभीच ‘आनंद’ म्हणजे निश्चित काय हे स्पष्ट होणं गरजेचं होतं? खूप वाचन-मनन-चिंतन-अध्ययन केल्यावर त्यांना आनंदाबद्दल काही गोष्टी (आनंदाचे पैलू) ठामपणे कळून आल्या.
ःः आनंद हे परमेश्‍वराचं स्वरूप आहे. सत्-चित्-आनंद असं त्याचं वर्णन, म्हणजे अनुभव आहे. जो आनंद ज्याला त्याला प्रत्येकाला – स्वतःच घ्यायचा असतो. तो सगळीकडे सदैव उसळत – ओसंडत असतो. या आनंदानं अखिल विश्‍व ओतप्रोत भरून गेलंय.
ःः आनंद हा कशावरही अवलंबून नसतो. म्हणजेच तो निरालंब असतो. स्वयंभू असतो. कोणतीही वस्तू – व्यक्ती – परिस्थिती – अनुभव – किंवा प्रसंग सर्वांना आनंद देईल असं नसतं. एकाचं अन्न हे दुसर्‍यासाठी विष असू शकतं. (वन् मॅन्स मीट इज अनदर्स पॉयझन). या विश्‍वाची, जगाची, समाजाची रचनाच अशी आहे. आनंद बाहेर कुठंही, कधीही मिळणार नाही.
ःः आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो. पशुपक्षी वनस्पती यांना या आनंदाची जाणीव नसते. परिचय नसतो. पण मानवाच्या बाबतीत आनंद मिळवणं, आनंदात राहणं, आनंदी असणं – जगणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यासाठी बाहेरचे प्रयत्न नकोत. आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो. अनुभवायचा असतो.
ःः ‘आनंद’ हा अंतरंगीचा, सूक्ष्म अनुभव असल्यानं विज्ञानतंत्रज्ञानाच्या कक्षेत येणारा नाही. पण आत्मज्ञानाचा गाभाच आनंदप्राप्ती हा आहे. यालाच आध्यात्मिक अनुभूती म्हणतात.
असा आनंद अखंड अनुभवण्यासाठी आध्यात्मिक साधना मात्र हवी.
* साधना – उपासनेप्रमाणे साधना हीसुद्धा अंतर्यात्रा – आतला प्रवास आहे. फक्त ती दीर्घकाळ करावी लागते. ज्याच्या प्राप्तीसाठी करायची तो आनंद किंवा मनःशांती क्षणभंगूर, क्षणिक नसल्यानं एका क्षणात (इन्स्टंट) लाभत नाही. ती शाश्‍वत (कॉन्स्टंट) असल्यानं दीर्घकाळ साधना करावी लागते.
* तपश्चर्या – यात आचरण (चर्या) हे प्रमुख आहे. तेही बारा वर्षांच्या (तपाच्या) मापानं साध्य होणारं. अनेक वर्षं तपश्चर्या केल्याचे उल्लेख आपण पुराणवाङ्‌मयात वाचतो. कोणत्याही मोठ्या गोष्टीची, शक्तीची उपलब्धी (अचीव्हमेंट) करण्यासाठी तपश्चर्या ही हवीच. साधुसंत हे अशा तपश्चर्येनंच घडलेले असतात. त्यांच्या ‘शांतनिवांत संत प्रकृतीचं रहस्य हे अशी कठीण अवस्थेत दीर्घकाळ केलेली तपश्चर्याच असते.
* आराधना – हा आणखी एक शब्द. यात ‘राध’ हा मूळ शब्द आहे. याचा अर्थ भक्ती (उपासना) करणं हाच आहे. ‘आराध्य दैवत’ असा शब्दप्रयोग नाही का केला जात? भागवतासारख्या ज्ञान-भक्ती मार्गाचं विवेचन करणार्‍या ग्रंथात राधा ही व्यक्ती नसून भक्तीची शक्ती आहे. असंच अप्रत्यक्षरीत्या सांगितलंय. सहज सांगायचं झालं तर संसारातली – प्रपंचातली कोणतीही धारा (पाणी-दूध-तेल-मध इ.ची) ही वरून खालच्या दिशेनंच पडते. अभिषेकाचं पात्र म्हणूनच वरती बांधायचं असतं. अशी ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या (ग्रॅव्हिटी) दिशेनं प्रवास करत राहते. पण भक्तीची दिव्य धारा, नव्हे राधा, मात्र उलट दिशेनं म्हणजे खालून- वर उसळत असते. तीही गुरुत्वाकर्षणाच्या ओढीनंच वरती जात असते. पण ही सद्गुरुंच्या आकर्षणाची – कृपेची (ग्रेस) ओढ असते. ही ओढ अतिशय अनावर असते. हीच ती कृष्णाची राधाशक्ती!
अशाप्रकारे संतवाणीत वरचेवर येणार्‍या काही शब्दांच्या अर्थावर चिंतन केल्यावर यांच्या आधारे मनःशांती कशी मिळवायची याचाही विचार करायला हवा.
समर्थ रामदास साधकांना गर्जून सांगतात-

उपासकांसी सूचना | उपासना उपासना |

एवढंच नव्हे तर असंही निक्षून सांगतात-

उपासनेचा आश्रयो | उपासनेविण निराश्रयो|
उदंड केले तरी जयो | निश्चित नाही ॥

आता उपासनेचा म्हणजे परमेश्‍वराच्या जवळ बसण्याचा निश्चित मार्ग कोणता, उपाय कोणता हे पाहू या. हा मार्ग आपल्या आतला असल्यानं संतांची एक सूचना या संदर्भात महत्त्वाची आहे-
ठायीच बैसोनि करा एकचित्त|
आवडी भगवंत आळवावा ॥
इकडे तिकडे भटकून समाधान, शांती कधीही लाभणार नाही. समर्थांचं मार्गदर्शन या दृष्टीनं मोलाचं आहे. ‘मनाचे श्‍लोक’मध्ये ते सांगतात-

बहु हिंडता सौख्य होणार नाही |
शिणावे परी नातुडे हीत काही ॥

अर्थ ः सदासर्वत्र भटकण्यानं, विविध तीर्थक्षेत्रांना भेटी, व्रतवैकल्याचे संकल्प केल्यानं कुणाचंही हित होणार नाही. शीण मात्र येईल, पैसा-शक्ती-वेळ खर्च झाल्यानं एकप्रकारची क्षीणता, अशक्तता मनाला येईल. असलं दुबळं मन काय कामाचं? आजकाल लोक चारोधाम-अष्टविनायक-बारा ज्योतिर्लिंगं-नर्मदा परिक्रमा अशा अनेक यात्रा करतात. खरं तर ती तीर्थयात्रा कमी नि पर्यटन (भ्रमण) अधिक असा प्रकार असतो. अशा यात्रींना अनुभवही तसाच येतो.
गंगेच्या पाण्यात डुबकी मारून तिला आपला एखादा विकार, वाईट सवय अर्पण करून स्वतः सुधारणं हा खरा उद्देश असतो. पण यासाठी शुद्ध मन, पवित्र भाव नि तीव्र इच्छाशक्ती हवी. त्यापेक्षा अंतरंगीची उपासना केली तर अंतर्यामीचा आनंदरूप परमेश्‍वर आतच भेटतो नि अपार आनंद आपल्या जीवनात-वर्तनात व्यक्त होऊ लागतो.
‘मौन’ हे या सूक्ष्म उपासनेचं महाद्वार आहे. श्रवण-वाचन-मनन-चिंतन याच्या जोडीला ध्यान-नाम-अनुसंधान हेही हवंच. संतांच्या वाङ्‌मयात याचं तपशीलवार व दृष्टांत-उदाहरणांसहित विवरण असतं. याला ‘निरुपण’ असंही मानतात. मनःशांतीसाठी संतवाणीचं निरुपण म्हणजे साधुसंतांचा, महात्मेसत्पुरुषांचा आपल्यासाठी ‘निरोप’ काय आहे त्याचा विचार करणं महत्त्वाचं असतं.
संतांचा हा निरोप एका तेरा श्‍लोकी रचनेत अप्रतिम पद्धतीनं सांगितलाय. गु. बाबा बेलसरेंची ही रचना केवळ पू. गोंदवलेकर महाराजांच्याच नव्हे तर अनेक संप्रदायांच्या सामूहिक उपासनेत आर्ततेनं गायली जाते-

‘स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा|
हाचि निरोप(सुबोध) गुरुंचा, मीपण जाळोनिया जगी वागा|’

खरा स्वार्थ साधायचा म्हणजे अखंड आनंद नि मनःशांतीचा निरंतर अनुभव घ्यायचा. यासाठी उपाय ‘नित्य नामगायन’ म्हणजे भावपूर्णतेनं अखंड नामस्मरण. हे जमण्यासाठी संतांचा संदेश कोणता? ‘मीपण जाळोनिया जगी वागा’- अर्थ स्पष्ट आहे. अहंकार नष्ट करून जगा- अवघड असलं तरी अशक्य नाही. संतांचा तसेच साधकांचा हा सहज अनुभव आहे.
एक उदाहरण दिलं जातं. शुक-जनक भेटीचं. खरं तर पूर्ण वैराग्य असलेल्या मुक्तच बनलेल्या शुकाचार्यांना जनक राजानं अनुग्रह देण्याचं. आपले पिताश्री व्यासमहर्षी यांच्या सांगण्यावरून मोक्ष मिळवण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान मिळवण्यासाठी शुकमुनी जनकाची राजधानी मिथिलेला आले. जनकाच्या राज्याचं नाव होतं विदेह. तो स्वतः होता देहात असून विदेही म्हणजे अखंड आत्मानंदात बुडून गेलेला (सहज सांगायचं तर असंच जीवन जगणार्‍या जनकनंदिनी सीतेचं एक नाव-वैदेही!) त्यानं शुकदेवांना मिथिलेच्या वेशी (सीमे)बाहेर थांबायला सांगून निरोप पाठवला की ‘भेटीसाठी एकटेच या’. पूर्ण विरक्त, दिगंबर असलेल्या शुकाचार्यांनी खूप विचार केला. तीन दिवस-रात्र ते तिथं उभे होते. शेवटी आत्मप्रचीती झाली, ‘अहंकाराचं गाठोडं आपल्याजवळ आहे की! ते फेकल्याशिवाय एकट्यानं कसं जाता येणार? नि गुरुदेव जनकाची भेट तरी कशी होणार?’ या विचारानं ते अहंकारमुक्त झाले. खरे निःसंग झाले. जनकानं त्यांना आदरपूर्वक बोलावून आलिंगनच दिलं कारण आता दोघेही एकाच अनुभवाच्या अवस्थेत आले होते. जीवनमुक्त झाले होते.
आपल्याजवळ गाठोडं किती गाठीगाठींचं बनलेलं असतं! ऋणानुबंधाच्या गाठी असतातच. काम-क्रोध-मोह-मद-दंभ-मत्सर या सहा गाठी तर असतातच ना प्रत्येकाच्या स्वभावाला? त्याचप्रमाणे गाठीला दोन पैसे असावेत म्हणता म्हणता अपार पैसा नि सुखोपभोगाची साधनं आपल्याजवळ असतातच की! देहातल्या लाळ-अश्रू आदींचा स्राव करणार्‍या ग्रंथी या गाठीच नि अहंकार निर्माण करणार्‍या ज्ञानाचे, विद्वत्तेचे स्रोत (उगम) असलेले नानाविध ग्रंथही गाठीच! हे कमी म्हणून की काय आपल्यापैकी अनेकजण ‘आतल्या गाठीचे’ म्हणजे गूढ, धूर्त असतात. असल्यांची भेट हीही गाठच नसते का? तर आपलं – मानवाचं – प्रतीक म्हणून जर काही निवडायचं असेल तर गाठींचं ‘गाठोडं’ हे योग्य राहील. या सर्व गाठी सुटणं – तुटणं म्हणजेच मुक्ती किंवा मोक्ष! अशा मोक्षाचं गाठोडं मागणार्‍या (रेडीमेड मुक्ती हवी असलेल्या) भक्तांची कीव करत तुकोबा म्हणतात ते किती मार्मिक आहे!-
‘बाबांनो, मोक्षाचं गाठोडं हे विपरीत मागणं आहे. असं असतं तर तुम्हाला दिलं नसतं का?’ – विचार करुया.