योगसाधना ः २६२ योगमार्ग – राजयोग स्वाध्याय – ८९

0
138

– डॉ. सीताकांत घाणेकर

दया, क्षमा, शांती- तेथे देवाची वसती!
माझ्या बालपणापासून हे वाक्य मी वाचतो आहे. फोंडा तालुक्यातील श्रीमहालक्ष्मी मंदिरात मी माझ्या आजोबांबरोबर जात असे. तिथे मंदिराच्या बाहेरच्या दरवाज्याच्या बाजूलाच हे वाक्य नियमित मी वाचत असे. त्यावेळी मला अर्थ समजला नाही. पण आता थोडे चिंतन केले तर भावार्थ समजतो..

‘‘स्वाध्याय’’- महर्षी पतंजलींच्या अष्टांगयोगातील नियम या दुसर्‍या अंगातील तिसरा नियम (व्यक्तिगत शिस्तीशी संबंधित असलेले आत्मशुद्धीचे नियम)- या तीन अक्षरांमध्ये प्रचंड ताकद आहे. शक्ती आहे. ती ओळखूनच वैश्‍विक स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी आपल्या परिवाराला ‘‘स्वाध्याय परिवार’’ असे गोंडस नाव दिले. विष्णुच्या वामनावताराच्या तीन पावलांचा जेवढा विस्तार होता, तसाच या तीन अक्षरांचा आहे.
शास्त्रीजींच्या स्वाध्याय कार्यामध्ये योगशास्त्राच्या तीन मुख्य मार्गांचा समावेश आहे- ज्ञान, कर्म, भक्ती. कार्याच्या आचारसंहितेत राजयोगाचे (अष्टांगयोग) यम-नियम सहज येतात. तसेच सूर्यनमस्कार व ध्यान करण्याचा त्यांचा प्रेमपूर्ण व भावपूर्ण आग्रह आहे.
बहुतेक मानव आज भौतिक गोष्टींकडे जास्त आकर्षित झालेला दिसतो. धन-संपत्ती हेच त्याचे सर्वस्व होऊ पाहतेय. त्याचप्रमाणे स्वार्थ व आत्मकेंद्रीपणा सर्वत्र दिसतो. म्हणूनच विश्‍वाची विनाशाकडे घोडदौड चालू आहे. मानवाने आत्मशुद्धी करून आपल्या व इतरांच्या जीवनविकासाकडे वळावे ही प्रामाणिक इच्छा आपल्या हृदयात बाळगून भारतीय ऋषीमहर्षींनी आपल्याला वेदोपनिषद, योग अशी विविध शास्त्रे दिलीत. प्रत्येकाने योगसाधना नियमित करावी ही त्यांची सदिच्छा. म्हणून त्यांनी आळस न करता ‘स्वाध्याय’ करावा असा प्रेमाचा आग्रह धरला.
नियमित स्वाध्याय केल्याने मानवतेला काय प्राप्त होईल… जे पैसा देऊन मिळत नाही… या विषयावर आम्ही अनेक आठवडे विचार व चिंतन करीत आहोत. त्यातील एक म्हणजे-

‘‘धनसंपत्ती असेल तर मंदिर मिळेल,
मात्र स्वाध्यायामुळे ईश्‍वर मिळेल!’’

विश्‍वाकडे नजर फिरवली तर सहज लक्षात येईल की आज सगळीकडे मोठमोठी भव्य-दिव्य मंदिरे बनविली जात आहेत. त्यांत देवाच्या सुंदर मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. मूर्तीला किंमती दागिन्यांनी सुशोभित केले जाते. देवाच्या मूर्तीला मंदिर परिसरात फिरविण्यासाठी करोडो रुपयांच्या पालख्या बनविल्या जातात. गोष्ट चांगली आहे. पण प्रत्येकाने चिंतन करायला हवे की या मंदिरात भगवंताचे अस्तित्व आहे का?
संत सांगतात- * देव भावाचा भुकेला!
* मनी नाही भाव म्हने देवा मला पाव!
– याचाच अर्थ हा की परमेश्‍वराचे चैतन्य, अस्तित्व असण्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे भक्ताच्या मनामधील भाव, प्रेम, आत्मीयता- फक्त देवावरच नाही तर त्याच्या सर्व निर्मितीवर- मानव, प्राणी, पशू, पक्षी, निसर्ग. म्हणूनच तर आपली प्राचीन मंदिरे निसर्गरम्य ठिकाणी बांधली जात असत. ऋषींचे आश्रम जेथे पवित्र असे विद्यादान होत असे- ते जंगलात असायचे. आश्रमातील सर्वजण- गुरू-शिष्य निसर्गाला प्रेमाने सांभाळीत असत. तेथे विविध प्रकारची झाडे, वृक्ष लावले जात असत. आजदेखील अशा प्राचीन मंदिरात फार जुने वड, पिंपळ दिसतात.
एवढेच नव्हे तर आश्रमातील सर्वजण पशुपक्षांचा सांभाळ करीत असत. तेदेखील निर्भयपणे आश्रमाच्या आसपास फिरत असत. हे महापुरुष निसर्गातील अनेक घटकांना देव मानून त्यांची पूजा करीत असत म्हणून त्यातील विविध घटकांना देव संज्ञा दिली जात असे- भूमीदेवी (माता); जलदेवता; वायुदेवता; सूर्यदेव; चंद्रदेव; इ. तुळशीसारख्या लहानशा रोपट्याचे महत्त्व ओळखून (दिवसरात्र प्राणवायु देणे) तुळशी वृंदावन घरोघरी बांधण्याचा आग्रह धरला. या सामान्य रोपाला देवत्व देण्यासाठी श्रीकृष्णाशी तिचा विवाह केला. किती भावपूर्ण व अर्थपूर्ण विचार आहे हा!
वडाचे अस्तित्व टिकवण्यासाठी ‘वटपौर्णिमा’ हा एक सुंदर उत्सव सुरू केला. प्रत्येक विवाहित महिलेने वडाची पूजा कां करावी याचे महत्त्व पटण्यासाठी सत्यवान-सावित्रीची कथा सांगितली.
कडुलिंब या छोट्याशा झाडाचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व जाणून पाडव्याच्या दिवशी त्याच्या पानांचे सेवन करावे… हे कर्मकांड सुरू केले. कृती लहानशी पण त्यातील तत्त्वज्ञान फार मोठे.
अशा अनेक गोष्टी विचारांती लक्षात येतील. आजही या सर्व प्रथा आहेत पण मुख्य म्हणजे या सगळ्यांत ‘भाव’ आहे कां? भाव असेल तर देवाचे अस्तित्व नक्की आहे. फक्त कर्मकांडं म्हणून भीतिपोटी केले तर त्यात देवत्व किती असेल याचा प्रत्येक सूज्ञ व्यक्तीने विचार करणे अत्यावश्यक आहे.
संतमहापुरुष देव कुठे असतो, त्याचा वास कशात असतो याबद्दल सांगताना म्हणतात…
* दया, क्षमा, शांती- तेथे देवाची वसती!
माझ्या बालपणापासून हे वाक्य मी वाचतो आहे. फोंडा तालुक्यातील श्रीमहालक्ष्मी मंदिरात मी माझ्या आजोबांबरोबर जात असे. तिथे मंदिराच्या बाहेरच्या दरवाज्याच्या बाजूलाच हे वाक्य नियमित मी वाचत असे. त्यावेळी मला अर्थ समजला नाही. पण आता थोडे चिंतन केले तर भावार्थ समजतो…
* मानवाला मानसिक शांती मिळायला हवी असेल तर त्याने इतरांना क्षमा करायला शिकणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी त्याला दया वाटणे आवश्यक आहे.
हे तीनही शब्द परस्परांशी जोडलेले आहेत. दया नसेल तर क्षमा नाही व क्षमा नसेल तर शांती नाही. आज प्रत्येक व्यक्ती शांतीची अपेक्षा करीत आहे आणि अपवाद सोडले तर कुणालाही शांती मिळत नाही. म्हणून सर्व प्रकारची दया – भूतदया – अत्यंत गरजेची आहे.
खरे तत्त्वज्ञान या तीन शब्दांतच आहे. … तेथे देवाची वसती.
शास्त्रकार सांगतात की आत्मा-परमात्मा प्रत्येक प्राणिमात्रात आहे. विचारवंत विचार करतो- आत्मा-परमात्मा आपल्यातच आहे हे मान्य, पण ते आहेत कुठे? आपले शरीर तर एवढे मोठे आहे. तसेच त्यात पुढे मन, चित्त, बुद्धि आहेत. मग हे नक्की कुठे स्थित आहेत?
चिंतन केले तर सहज उत्तर मिळेल – जेथे भाव आहे तेथेच परमात्मा आहे आणि त्याच्याबरोबरच आत्मा आहे. शास्त्राप्रमाणे व्यक्तीचा भाव त्याच्या हृदयात आहे – बुद्धीत किंवा मेंदूत नाही. मला वाटते की त्यामुळेच कुठलाही भावनिक आघात झाला तर कळ हृदयात येते. तसेच आपल्या जीवनाचे स्पंदन हृदयातून सुरू होते. म्हणून ‘हृदय’ हे स्थान अति महत्त्वाचे आहे. ते एक संवेदनशील इंद्रिय आहे. म्हणूनच हृदय हे भगवंताचे अधिष्ठान आहे, हे मनाला पटते.
पू. पांडुरंगशास्त्रींनी अनेक शास्त्रांचा अभ्यास केला आहे. त्याचबरोबर शरीरशास्त्राचासुद्धा! ते म्हणतात- जेथून हृदयाचे स्पंदन सुरू होते त्या केंद्राला – नोड ऑफ हीस म्हणतात. खरे म्हणजे तिथे शास्त्रज्ञाचे नाव जोडलेले आहे- ज्याने याचा शोध लावला. पण शास्त्रीजींना तिथे एच-इ म्हणजे मोठ्या अक्षरातील ‘ही’ म्हणजे देव दिसतो. म्हणून ते म्हणतात- हृदयाचे स्पंदन सुरू होते तिथेच भगवंताचे अस्तित्व आहे.
आम्ही वैद्यक शास्त्राचा एवढा अभ्यास केला पण ही गोष्ट आमच्या कधीच लक्षात आली नाही. परंतु महापुरुषांची विचार करण्याची पद्धतच वेगळी. खरे म्हणजे ते भावपूर्ण चिंतन करतात. म्हणून त्यांना गर्भितार्थ दिसतो.
शास्त्रीजी पुढे म्हणतात की या हृदयाच्या स्पंदनातील एक ठोका ‘मिस’ झाला म्हणजे ‘चुकला’ म्हणजे आम्ही ‘मिस’ होतो म्हणजेच आमचे अस्तित्वच संपते.
खरेंच, हे महापुरुष जीवनाचे कठीण असे तत्त्वज्ञान किती सोपे करून सांगतात! अशा या हृदयातील ‘राम’ गेला तर लगेच आमची तिरडी उठते… गजर चालू होतो..!
* राम नाम सत्य है!
या अशा विषयांचा थोडा जरी स्वाध्याय केला व तदनंतर थोडे चिंतन केले तर लगेच मानवजीवनाचे क्षणभंगुरत्व सहज लक्षात येईल. ‘दया’ हा सद्भाव, प्रत्येकाच्या हृदयात अंकुरित होईल. मग आपोआप ‘क्षमा’ करणे शक्य होईल. ‘शांती’ मग सहज प्राप्त होईल. ‘देवाची वसती’ मग आपोआप अभिप्रेत आहे.
म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात-
* देह हे मंदिर.
धनसंपत्ती असली तरी हे देह मंदिर होणार नाही. त्यासाठी हवा ‘स्वाध्याय’ – ‘भाव’!